अल्तामिरा : गुहेतील अश्मयुगातील चित्रांबद्दल प्रसिद्धी पावलेले उत्तर स्पेनमधील स्थळ. ही चित्रे १८७९ मध्ये दॉन मार्सिलीनोने उजेडात आणली परंतु ती अश्मयुगीनच आहेत, हा निर्णय १९०२ मध्ये झाला. ती १७,००० वर्षांपूर्वी चितारलेली असावीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अल्तामिरा येथील गुहेतील चित्रे अनेक रंगांत काढलेली आहेत. परंतु लाल व काळ्या ह्या दोन रंगांवरच मुख्य भर आहे. गेंडा, घोडा, हरिण व रानडुक्कर हे दमट जंगली हवेत राहणारे प्राणी यांत चित्रित केले आहेत. ह्यांतील काही प्राणी सु. दोन मी. लांबीच्या पृष्ठभागावर रंगविलेले आहेत. आधी रेखांकन करून मग रंग भरून चित्रे पूर्ण केली असावीत, असे वाटते.
अल्तामिराची कला अश्मयुगातील मग्डेलेनिअन संस्कृतीशी संलग्न आहे.
संदर्भ : 1. Altamira, Rafael Trans. Lee, Muna, A History of Spain, New York, 1966.
2. Breuil, H. Hugo, O. Trans. Boyle, M. E. The Cave of Altamira at Santillana del Mar, Spain, New York, 1935.
देव, शां. भा.