अजबगड माला : दिल्ली संघाच्या खडकांच्या सर्वांत वरच्या व नव्या विभागाला ‘अजबगड माला’ म्हणतात. जयपूरच्या वायव्येकडील भागात व अलवराच्या काही भागात या मालेचे खडक आढळतात. शेल व शेलांचे कमीअधिक रूपांतरण होऊन तयार झालेले स्लेट (पाटीचे दगड), फिलाइट व बायोटाइट-शिस्ट हे या मालेचे मुख्य खडक होत. मधूनमधून सिलिकामय-चुनखडकांचे, लोही-क्वॉर्ट्झाइटाचे किंवा कॅल्शियमी स्लेटीचे पातळसे थर आढळतात. ⇨ पिंडाश्म, पिंडाश्मी क्वॉर्ट्झाइट किंवा शुद्ध क्वॉर्ट्झाइट मात्र आढळलेले नाहीत. माती व कॅल्शियम कार्बोनेट यांच्या मिश्रणाने बनलेल्या खडकांचे रूपांतरण होऊन तयार झालेले कॅल्क-शिस्ट, कॅल्क-नाइट व कॅल्सिफायर हे खडक मधूनमधून आढळतात. कॅल्क-शिस्ट हे कॅल्साइट व कृष्णाभ्रक यांचे बनलेले असून बारीक कणी असतात. फोडल्यावर त्यांचे पातळ पत्रे सहज निघतात. कॅल्क-नाइस भरडकणी असून त्यांची रचना पट्टेदार असते. कॅल्साइट व क्वॉर्ट्झ हे त्यांचे मुख्य घटक असतात. ते कॅल्क-शिस्टांपेक्षा अधिक कठीण असतात व त्यांचे पातळ पत्र्यासारखे तुकडे होत नाहीत. मातीमिश्रित चुनखडकांचे रूपांतरण होऊन त्यांच्यात डायोप्साइड, ट्रेमोलाइट, हॉर्नब्लेंड इ. कॅल्शियममय सिलिकेटे तयार झालेली असली म्हणजे त्याला ‘कॅल्सिफायर’ म्हणतात. अजबगड मालेच्या खडकात पेग्मटाइटांची व ॲप्लाइटांची कित्येक अंतर्वेशने झालेली आहेत म्हणजे त्यांच्या शिरा व भित्ती या खडकात घुसलेल्या आहेत व त्यांच्यामुळे निर्माण झालेले संमिश्र पट्टिताश्म [→रूपांतरित खडक] कित्येक भागांत आढळतात.
पहा : दिल्ली संघ.
केळकर, क. वा.