अशन-यंत्रणा, प्राण्यांची : अन्न मिळवून ते खाण्याकरिता प्राणी जी वेगवेगळी साधने उपयोगात आणतात त्यांना अशन-यंत्रणा म्हणतात. प्राण्यांच्या सर्व क्रियांना ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा त्यांना अन्नापासून मिळू शकते. त्याचप्रमाणे ऊतकांची (प्राण्याच्या शरीराच्या एखाद्या भागातील किंवा इंद्रियातील समान रचना आणि कार्य असणाऱ्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या स्तरांची किंवा समुदायांची) वाढ आणि सुस्थिती अन्नावरच अवलंबून असते. प्राण्यांचे अन्न विविध प्रकारचे असते. पण एखाद्या विशिष्ट वसति- स्थानात राहणाऱ्या प्राण्यांना त्या वसतिस्थानात मिळणाऱ्या अन्नावरच गुजराण करावी लागते.यामुळे वेग- वेगळ्या वसतिस्थानांत राहणाऱ्या प्राणिसमूहांचे अन्न निरनिराळ्या प्रकारचे असते आणि या विविध प्रकारच्या अन्नाचा उपयोग करून घेता यावा म्हणून या भिन्न भिन्न प्राणिसमूहांत मूळ साधनांच्या परिवर्तनाने विविध अशन-यंत्रणा निर्माण होतात एवढेच नव्हे तर या प्राण्यांच्या आहारनालाची (अन्ननलिकेची) घडण व कार्य आणि अन्नाचा प्रकार व ते मिळवून खाण्याचे साधन यांचा परस्परसंबंध असतो.आ. १. ॲलोग्रोमिया चिकट पादाभांनी भक्ष्य पकडीत आहे. (१) कवच, (२) कवचाचे मुख, (३) पादाभ.                                                                                                                                                                                                                   

 प्राणिसृष्टीत आढळणाऱ्या काही प्रमुख यंत्रणांचाच येथे निर्देश केलेला आहे.

 

  बारीक कण : पाण्यात निलंबित (तरंगत असलेले) बारीक अन्न- कण त्याचप्रमाणे सूक्ष्म प्राणीही असतात. पुष्कळ जलीय प्राण्यांना यांचा अन्न म्हणून उपयोग करण्याकरिता यंत्रणा असतात. फोरॅमिनीफेरा, हीलिओझोआ या गणांतले प्राणी आपल्या बारीक चिकट पादाभांनी (पायासारख्या अवयवांनी) बारीक जीव पकडतात. क्युक्युमारिया (होलोथूरॉयडिया वर्ग) आणि त्याच्याच जातीचे इतर प्राणी आपले संस्पर्शक (डोक्यावरील सडपातळ लवचिक इंद्रिये) पूर्णपणे पसरून पडून राहतात. संस्पर्शकांवर श्लेष्म्याचा ( एक प्रकारच्या गिळगिळीत चिकट पदार्थाचा )   

 आ. २. सागरी काकडी (होलोथूरॉडिया-वर्ग) : भक्ष्य पकडण्याकरिता संस्पर्शक पसरलेले. (१) संस्पर्शक.  

पातळ थर असते, त्यात लहान प्राणी गुरफटतात आणि संस्पर्शक ग्रसनीत (मुखगुहेच्या मागील अन्ननलिकेच्या अग्र भागात) खुपसून हे प्राणी गिळले जातात. ऑफिओकोमिना नायग्रा  हा भंगुरतारा (ब्रिटल स्टार) आणि संथ पाण्यात राहणारे काही जातींचे उदरपाद (पोटाखाली असलेल्या पायांनी सरपटत जाणारे प्राणी म्हणजे ग्रॅस्ट्रोपॉड) श्लेष्मल- -तंतू पाण्यात पसरून ठेवतात आणि त्यांत अडकलेले जैव कण किंवा सूक्ष्म प्राणी यांच्यासह ते काही काळानंतर  गिळतात. कित्येक प्राण्यांच्या शरीरावर बसणारे किंवा त्यांच्या शरीराशी संबंध येणारे अन्नकण श्लेष्म्यात गुंततात आणि नंतर पक्ष्माभिकांच्या (हालचाल करणाऱ्या केसांसारख्या बारीक तंतूंच्या) सक्रियतेमुळे ते मुखाकडे नेले जातात.

आ. ३. मिलिटसच्या निस्वंदन-अशनात उपयोगात येणारे पक्ष्माभिका प्रवाह दाखविणारे आरेख. (१)मुख, (२) स्पर्शक, (३)पाद, (४) अंतर्वाही प्रवाह, (५) अपवाही प्रवाह, (६) क्लोम (आ) १) अग्रअभिवर्तनी कोशिका, २) स्पर्शक, ३) पश्च-अभिवर्तनी कोशिका, ४) गिल.

त्याचप्रमाणे पक्ष्माभिकी यंत्रणांमुळे प्राण्यांच्या भोवतालच्या पाण्यात प्रवाह उत्पन्न होऊन त्यातून प्राण्याकडे अन्न जाते. सिलिएटांमधील विशिष्ट पक्ष्माभिकी क्षेत्रे अथवा आंदोल-कला (पक्ष्माभिकांच्या एकीकरणामुळे तयार झालेली अतिशय पातळ पडद्यासारखी रचना) आणि कशाभिका (कित्येक कोशिका व आदिजीव यांच्यावर असणारी चाबकाच्या वादीसारखी किंवा दोऱ्यासारखी संरचना) यांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या तरंगांच्या योगाने अन्नकण कोशिका-मुखाकडे वाहत येतात.

आ. ४. निलंबन अशन. वाळूत पुरून घेणाऱ्या द्विपुटाचे निलंबन अशन. याचे अंतर्वाही आणि बहिर्वाही निनाल आखूड असून वाळूबाहेर पाण्यात असतात. अंतर्वाही नालातून पाण्यात तरंगणारे अन्नकण व जीव आत जातात.

पुष्कळ प्राण्यांमध्ये पक्ष्माभिका अथवा स्‍नायू यांच्या सक्रियतेमुळे उत्पन्न होणारा पाण्याचा प्रवाह एका प्रकारच्या गाळण्यामधून किंवा चाळणीतून जातो. या ठिकाणी कण चाळले जाऊन त्यांच्या आकारमानाप्रमाणे ते निवडले जातात अखेर बारीक कण मुखात शिरतात व मोठे बाहेर टाकले जातात. अशा तऱ्हेच्या साधनांमध्ये सर्प्युलिडी कुलातील क्लोम (कल्ल्यांची) शिखरे, ब्रायोझोआ, कॅलिसोझोआ, फोरोनिडा वगैरेंतील लोफोफोरवरील (संस्पर्शकधर) संस्पर्शक, काही बायव्हाल्व्हियांचे (द्विपुटी प्राण्यांचे) फार मोठे झालेले कंकतक्लोम (फणीसारखे क्लोम) वगैरेंचा समावेश होतो.


निस्यंदक अशन : (अन्न गाळून घेऊन खाणे). यामध्ये जरी अन्न पाण्यापासून वेगळे करण्यात येत असले तरी पुष्कळ समुद्री अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी अन्नाबरोबर बरेचसे पाणी निस्संशय पीत असले पाहिजेत. कित्येक पृष्ठवंशी प्राणीदेखील निस्यंदक (अन्न गाळण्याची) योजना उपयोगात आणतात. परंतु त्यांच्या देहद्रवाचे गुणधर्म बाहेरच्या माध्यमाच्या गुणधर्मांपेक्षा फार निराळे असल्यामुळे शरीरात येणाऱ्या पाण्याचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. देवमासा आपले तोंड उघडे ठेवून पोहत पुढे जात असताना अन्न मिळवितो. तिमि-अस्थींच्या (देवमाशाच्या जबड्यावरील हाडांच्या) कडांवरील झालरीतून आत शिरणारे पाणी गाळले जाऊन, अन्नकण मुखात राहून पाणी मुखाच्या दोन्ही बाजूंतून बाहेर पडते. तोंड बंद करून जीभ वर उचलली म्हणजे मुखगुहेत शिल्लक राहिलेले पाणी जोराने बाहेर पडून प्लवक (पाण्यात तरंगणारे जीव) जिभेवर बसतात. ऊनखाऊ शार्क माशांमध्ये ताठ उभ्या क्लोमकर्षणी (क्लोमचापांवर अथवा कमानींवर ओळीने असलेल्या लहान काट्यांसारख्या रचना) प्लवक-जीव अडकवून ठेवतात. तोंड  बंद केल्यावर क्लोमकर्षणी पडतात आणि प्लवक-जीव मुखात कोंबले जाऊन पाणी क्लोमदरणांमधून (क्लोमांच्या चिरांमधून) बाहेर पडते. काही पक्ष्यांच्या (फ्लॅमिंगो, बदक इ.) जबड्यांवर तकटांसारख्या पटलिकांच्या (लहान पातळ पत्र्यांच्या) ओळी असतात आणि या पटलिकांच्या आतल्या कडा झालरीसारख्या असल्यामुळे पाण्या- तील अन्नकण अडकवून ठेवतात. फ्लॅमिंगो पक्षी आपल्या जिभेने पाणी जोराने पटलिकांमधून ढकलतो. त्यामुळे अन्न आत राहून पाणी बाहेर पडते.

खरवडणे आणि विंधणे : पुष्कळ प्राण्यांना एका वेळी अगदी थोडे थोडे अन्नच खाता येते अन्नाचे मोठे घास एकदम घेता येत नाहीत. अशा प्राण्यांना मेलेल्या अथवा जिवंत प्राण्यांचे शरीर खरवडून अथवा त्याला भोक पाडून मांस खाण्याकरिता साधने असतात. असे प्राणी मंद व सुस्त असून भक्ष्याला चिकटून राहण्याकरिता आणि ते खाण्याकरिता त्यांना मजबूत यंत्रणा असतात. अशा तऱ्हेच्या रचना उदरपादांमध्ये आढळतात उदरपादांच्या रेत्रिका (कायटिन या पदार्थाच्या बनलेल्या दातांच्या ओळी असलेली मुखातील कलेची एक आखूड व रुंद पट्टी) इतर कठीण पदार्थांच्या पृष्ठावर पापुद्र्यासारखे पसरलेले जीव खरडून खाण्याकरिता, वनस्पतींचे अथवा प्राण्यांचे ऊतक किसून खाण्यासाठी अथवा एखाद्या द्विपुटीच्या शिंपेला भोक पाडून त्यातून सोंड आत खुपसून ऊतक खाण्यासाठी उपयोगी पडतात. टेरेडोसारखी काही द्विपुट आपल्या विशेषित शिंपांनी लाकडाला भोके पाडतात आणि लाकडाच्या भुशावर अंशतः उदरनिर्वाह करतात. कित्येक क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी व कीटक आपल्या मुखांगांचा खरवडण्याच्या आणि किसण्याच्या कामी उपयोग करतात. पृष्ठवंशी प्राण्यांत प्रौढ सायक्लोस्टोम मासा आपल्या जिभेचा इतर माशांचे मांस खरवडण्या- करिता किंवा त्यांच्या शरीराला भोक पाडून मांस खाण्याकरिता उपयोग करतात.

मोठ्या कणांचे अथवा पुंजांचे अंतर्ग्रहण: पुष्कळ प्राणी आपल्या खाद्य पदार्थांचे तुकडे करीत नसले, तरी जड द्रव्याचे मोठे कण किंवा पुंज आणि जिवंत प्राणी खातात. जड द्रव्यावर निर्वाह करणारे प्राणी बहुशः बिळे करणारे असून, ती खणताना ते बरीच माती व त्याबरोबरच तीत मिसळलेले बारीक अन्नकणांचे पुंजके खातात. अशा प्राण्यांच्या विशिष्ट अशन यंत्रणांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत : काही होलोथूरियन प्राण्यांचे मुख-संस्पर्शक मुखात चिखल ढकलतात ॲरेनिकोलासारख्या पुष्कळ पॉलिकीटांची उद्वर्त्य (आतली बाजू बाहेर करून बाहेर काढणे) ग्रसनी गांडुळांची चूषण-( चोखण्यासाठी उपयुक्त असणारी ) ग्रसनी आणि बिळे करणाऱ्या उदरपादांचा शुंड (सोंड) आणि रेत्रिका. जिवंत प्राणी पकडून खाणाऱ्या प्राण्यांना भक्ष्य पकडण्या- करिता विशेष अंगे असतात. उदा., पादाभ (अमीबा), ⇨ दंशकोशिका (सीलेंटरेटा), आसंजक कोशिका (भक्ष्याला चिकटणाऱ्या संस्पर्शकांवरील कोशिका) (टिनोफोरा) इत्यादी. पृष्ठवंशी प्राण्यांपैकी जे आपले भक्ष्य सबंध गिळतात अशा प्राण्यांना दात असले, तरी भक्ष्य फाडण्याकरिता त्यांचा उपयोग होत नसून ते धरून ठेवण्याकरिताच होतो उदा., साप. पुष्कळ स्थलचर, उभयचर आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी ) आपल्या जिभेने प्राणी पकडतात आणि दात असलेच तर ते भक्ष्य तोंडातून निसटून जाऊ देत नाहीत.

पकडणे आणि चावणे (चर्वण) : विविध प्राण्यांत भक्ष्य पकडून त्यांचे तुकडे करण्याकरिता किंवा ते चावून बारीक करण्याकरिता साधने असतात. पॉलिकीटांमध्ये भक्ष्य पकडण्याकरिता आणि त्याचे तुकडे करण्या- करिता उद्वर्त्य ग्रसनीवर दात आणि जंभ (भक्ष्य पकडण्याकरिता आणि ते चावण्याकरिता असणारी मुखांगांची जोडी) असतात पुष्कळ संधिपाद आपले कीले (कवचधारी आणि अष्टपाद प्राण्यांच्या काही पायावरील नखर) आणि मुखांगे (मुखाशी संबंध असणारी उपांगे) यांचा या कामी उपयोग करतात. सामान्यतः मांसभक्षक प्राण्यांचे पुढचे दात चावण्याकरिता आणि भक्ष्य फाडण्याकरिता असतात, तर शाकाहारी प्राण्यांत मागचे दात शाकान्न नीट चावून दळण्याकरिता असतात. पक्ष्यांना दात नसतात, पण काही पक्ष्यांच्या चोचीच्या कडांवर दातांसारख्या पटलिका असतात त्यामुळे चोचीचा उपयोग करवतीसारखी पाती असलेल्या कात्रीसारखा होतो.

बाह्य पाचन : पुष्कळ प्राणी विशेष साधनांनी भक्ष्य पकडल्यानंतर त्याचे मांस अर्धद्रवरूप करण्याकरिता त्याच्या अंगावर एंझाइम (रासायनिक क्रियेला प्रेरणा देणारे द्रव्य) ओततात किंवा त्याच्या अंगात एंझाइम टोचतात. यालाच ‘आंत्र-बाह्य (आतड्याच्या बाहेर घडून येणारे) पाचन’ म्हणतात. फायजेलियाच्या संस्पर्शकांनी पकडलेले प्राणी पुष्कळदा मोठे असतात अशा वेळी फायजेलियाचे जठर-जीवक (मुख व संस्पर्शक असणाऱ्या व्यक्ती) त्यांच्यावर एंझाइम सोडून त्यांचे बरेचसे बाह्य पाचन घडवून आणतात. भक्ष्य बरेच मोठे असून गिळता येत नसेल, तर पुष्कळ तारामीन आपले जठर बाहेर काढून त्याने भक्ष्य वेढतात व त्याचे बाह्य पाचन घडवून आणतात. कोळी आपल्या भक्ष्यांच्या अंगात प्रथिन-अपघटक एझांइम टोचतात आणि तयार झालेला द्रव पदार्थ ग्रसनीच्या साह्याने शोषून घेतात. अशा तऱ्हेचे बाह्य पाचन कीटकांतदेखील मोठ्या प्रमाणात आढळते.

विद्राव्य अन्न : निसर्गजन्य पाण्यात विरघळलेले जैव द्रव्य मोठ्या प्रमाणात असते. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीराचा सर्व पृष्ठभाग हे विद्राव्य अन्न शोषून घेतो, असा पूर्वी समज होता. पण तो चुकीचा होता. फक्त सूक्ष्मजंतू आणि थोडे आदिजीव विरघळलेले अन्न शोषून घेऊ शकतात. समुद्रातले आणि गोड्या पाण्यातले मासे पाणी पितात, पण या मार्गाने त्यांच्या पोटात जाणारे अन्न त्यांच्या अन्नाच्या गरजेच्या मानाने कितीतरी कमी (केवळ अंशमात्र) असते. फक्त अंतःपरजीवी (दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात राहून त्यांनी पचविलेल्या अन्नावर उपजीविका करणारे) प्राणी विद्राव्य अन्न शरीराच्या पृष्ठावरून शोषून घेऊन त्यावर जगतात. पट्टकृमी आणि ॲकँथोसेफाला या परजीवी प्राण्यांना आहारनाल नसतो. ज्या पोषकाच्या आहार- नालात ते राहतात त्याच्या पचनक्रियेमुळे उत्पन्न झालेले द्रवरूप अन्न ते देहभित्तीतून शोषून घेतात. पुष्कळ परजीवी आदिजीव अशाच प्रकारे अन्नग्रहण करतात. प्राण्याच्या रक्तात परजीवी असणारा ट्रिपॅनोसोमा  हा आदिजीव रक्तातून साखर शोषून घेतो.

पुष्कळ प्राणी इतर प्राण्यांचे रक्त, ऊतक-द्रव अथवा द्रव निःस्राव (पाझरणारे पातळ पदार्थ) यांच्यावर उदरनिर्वाह करतात. अशा प्राण्यांच्या अशन-यंत्रणेत चूषण-पंप (ग्रसनीच्या परिवर्तनाने तयार झालेला पंप), वेधन-(भोक पाडणारी) मुखांगे आणि पुष्कळ रुधिर-चूषकांच्या (रक्त शोषणाऱ्या) प्राण्यांच्या क्लथनरोधक (रक्त साखळू न देणारे पदार्थ) उत्पन्न करणाऱ्या ‘लालाग्रंथी’ (लाळेचे पिंड) यांचा समावेश होतो. पुष्कळ मुक्तजीवी (स्वतंत्र राहणाऱ्या) प्राण्यांत आणि बाह्य परजीवींमध्ये चूषण (शोषून घेणे) आणि वेधन-यंत्रणा आढळतात, पण अंतःपरजीवींमध्ये फक्त चूषण अथवा शोषण-यंत्रणांचीच जरूरी असते. मुक्तजीवी गोलकृमी, कीटक, ॲरॅक्निड (अष्टपाद) प्राणी, जळवा, रक्त शोषणारी वटवाघुळे इत्यादींमध्ये दोन्ही प्रकारची साधने आढळतात. सक्टोरिया उपवर्गातील प्राणी, पर्णाभकृमी आणि अंतःपरजीवी जंत यांच्यात फक्त चूषणाचीच साधने आढळतात.

कर्वे, ज. नी.