अवचित सत्तांतरण : एका धक्क्यासरशी व कमीत कमी हिंसा होईल अशा रीतीने स्वदेशातील एका नेत्याने वा गटाने दुसर्या सत्ताधारी गटाला वा व्यक्तीला अवचितपणे, म्हणजे अगोदर कल्पना येऊ न देता, सत्तास्थानापासून हुसकावून लावून राजकीय सत्तेची सूत्रे आपल्या ताब्यात घेणे, म्हणजे ‘अवचित सत्तांतरण’होय. ही शब्दावली पश्चिमी राजकारणात रूढ असलेल्या ‘कू देता’ (Coup d’etat) या फ्रेंच संज्ञेचे भाषांतर होय. यूरोपात सु. तीनशे वर्षे ही संज्ञा राजकीय परिभाषेमध्ये रूढ आहे. नेपोलियन बोनापार्टने सत्ता काबीज केली (९ नोव्हेंबर १७९९) त्या प्रक्रियेस ही संज्ञा लावतात. लुई नेपोलियनने विधिमंडळ बरखास्त करून फ्रान्सचे दुसरे गणराज्य ताब्यात घेतले (२ डिसेंबर १८५१) जुलै १९४० मध्ये दुसर्या जागतिक महायुद्धकालात आंरी फिलिप पेतँ याने फ्रान्सचे तिसरे गणराज्य बरखास्त करून व्हिशी येथे आपली राजवट सुरू केली ईजिप्तमध्ये जमाल आब्दुल नासय यानेही १९५२ मध्ये राजा फारूक यास पदच्युत केले ही सर्व अवचित सत्तांतरणे होत. मध्य अमेरिकेत आणि दक्षिण अमेरिकेत १९४५ पासून आतापर्यंत अशा पद्धतीची अवचित सत्तांतरणे पुष्कळच झाली आहेत. पाकिस्तानमध्ये अयुबखान याने १९५८ मध्ये आणि याह्याखान याने १९६९ मध्ये आणि ब्रह्मदेशामध्ये सेनापती ने विन याने याच पद्धतीने लष्करी राजवट आणली.
राजमहाली क्रांती व अवचित सत्तांतरण ह्या पर्यायी संज्ञा नव्हेत. पुष्कळ राजमहाली क्रांत्या जगाच्या इतिहासात प्राचीन काळापासून आतापर्यंत नोंदलेल्या आढळतात. राजपुत्र आपल्या पित्यास, धाकटा भाऊ जेष्ठ राजपुत्रास, प्रधान किंवा अन्य राजदरबारी, वरिष्ठ लष्करी अथवा अन्य अधिकारी गुप्त कट करून राजास वा बादशाहास पदच्युत करतात व राज्य बळकावितात या प्रकारास ‘राजमहाली क्रांती’ म्हणतात. अवचित सत्तांतरण ही बरीचशी अलीकडची कल्पना आहे. ती राजमहाली क्रांतीपेक्षा पुष्कळ व्यापक आहे.
प्रस्थापित राजकीय सत्ता कशीही असो—म्हणजे लोकशाही, सरंजामशाही, राजेशाही किंवा हुकूमशाही असो—, तिच्याविरुद्ध युक्त्या-प्रयुक्त्या योजून गुप्त कट शिजवावयाचा सत्ताप्रमुखास कैद करून, स्थानबद्ध करून वा ठार करून आणि त्याच्या सहकार्यांस किंवा गटास कैद करून किंवा ठार मारून प्रशासनयंत्रणा कमीत कमी हिंसा होईल, अशा रीतीने ताब्यात घ्यावयाची व शांतता आणि शिस्त स्थापन करावयाची, अशी अवचित सत्तांतरणाची प्रक्रिया असते. शांतता त्वरित स्थापन होईलच, असे नाही परंतु सत्तांतरण मात्र पक्के झालेले असेल. अशा सत्तांतरणाचा प्रयत्न अनेकदा फसतोही.
असे सत्तांतरण करताना त्याचा नेता परकीय राजसत्तेचा लष्करी पाठिंबाही मिळवितो. १९४८ मध्ये रूमानियामध्ये आणि चेकोस्लोव्हाकियामध्ये रशियन लष्काराच्या साहाय्याने कम्युनिस्ट पक्षांनी राजकीय सत्ता काबीज केली. परंतु ज्या वेळी परकीय राजसत्ता दुसर्या दुर्बळ राष्ट्रावर आक्रमक लष्करी छापा घालून त्या राष्ट्राची राजकीय सत्ता अंकित करते, त्या वेळी ही संज्ञा नीट लागू पडत नाही. राष्ट्रातील एका गटातून दुसर्या गटाकडे जाणार्या सत्तांतरणाच्या विशिष्ट प्रक्रियेलाच ही संज्ञा लागू पडते. जनतेचा उठाव होऊन बंड होते किंवा यादवी युद्ध होते व सत्तांतरण होते, त्यास ‘क्रांती’ म्हणतात. गनिमी काव्याचा लढा दीर्घकाळ चालून सत्तांतरण होते, त्यालाही क्रांतीच म्हणतात. तशी ही क्रांती नव्हे. अवचित सत्तांतरणाच्या संकल्पनेत उजवा वा डावा ध्येयवाद, लोकशाही वा हुकूमशाही इ. विशिष्ट राजकीय ध्येयवादांचा अथवा राज्यपद्धती कोणती असावी, यांबद्दलचा संघर्ष असेल किंवा नसेल. तीच राज्यपद्धती, तीच अर्थव्यवस्था वा तोच ध्येयवाद असूनही अवचित सत्तांतरण होऊ शकते.
अशा तर्हेच्या सत्तांतरणाच्या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे प्रस्थापित सत्तेच्या निरनिराळ्या केंद्रस्थानी बसलेले असंतुष्ट कोण आहेत याचा अंदाज घेतला जातो. गेल्या अडीचशे-तीनशे वर्षाच्या अवघीत शासनयंत्रणा किंवा नोकरशाही ही स्वयंनियंत्रित व स्थायी अशी यंत्रासारखी बनलेली असते. तिच्यातील तरफेसारख्या उपयोगी पडेल अस गट आपल्या बाजूला वळवून घेऊन गुप्त कट रचावा लागतो, ही दुसरी पायरी होय. हे ज्याला जमेल, तोच यशस्वी होतो. अशा स्थितीत लोकशाहीतील वा हुकूमशाहीतील संसद वा विधिमंडळे यांच्या द्वारे सामान्य जनतेचा आणि राजकीय सत्तेचा सुसंवाद युक्त, बळकट व सतत स्वरूपाचा असेल, तर अवचित सत्तांतरणाचा प्रयत्न फसतो. संसद वा विधिमंडळे प्रभावशून्य असली, म्हणजे निःशस्त्र व प्रभावशून्य अशा चार-पाचशे माणसांचा गट एवढेच संसद व विधिमंडळे यांचे स्वरूप असले तर कट यशस्वी होऊ शकतो. राष्ट्राची आर्थिक व्यवस्था घसरून दुरवस्था झालेली असेल, तर अवचित सत्तांतरणाचेही योग्य पर्यावरण वा परिस्थिती निर्माण झालेली असते. ही योग्य परिस्थिती म्हणजेच योग्य संधी नव्हे. असंतुष्टांची नाडी पाहावी लागते. नंतर गुप्तकट रचावा लागतो. नोकरशाही, पोलीस, गुप्तवार्ता संकलन-योजना, लष्करातील अधिकारी, प्रचारसाधने म्हणजे दूरवाणी, बिनतारी संदेशवहन इ. दळणवळणाची साधने, सत्ताभिमुख धर्मपीठे, विमानतळ हे आपल्या हाती त्वरित पडतील, ताब्यात येतील, अशी योजना आखावी लागते ही तिसरी पायरी होय. सत्तांतरणाचा नेमका मुहूर्त साधावा लागतो. दोनचार दिवस किंवा दोन-चार तास आगेमागे झाले, तर योजना फिसकटते, डाव उलटतो. गुप्त कट फुटीर व्यक्तींनी वा मंडळींनी अगोदरच फोडलेला असण्याचा संभव असतो. त्यामुळे डाव फुकट जातो वा उलटतो. कट करणार्यांनाच अटक होतो. उदा., चीनमध्ये १९७१ मध्ये लिन पिआओ याने माओत्सेतुंग यांस पदच्युत करून सर्व सत्ता ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
संदर्भ : Luttwak, Edward, Coup d’Etat, London, 1968.
जोशी, लक्ष्मणशास्त्री