अनुपल्लवि : कनार्टक संगीतपद्धतीमधील एक संज्ञा. कर्नाटक संगीतात ⇨कृती, वर्ण, पदम् किंवा तत्सम संगीतरचनेचे अनुक्रमे ⇨पल्लवी, अनुपल्लवी आणि ⇨चरण असे एकूण तीन भाग तिरूपती येथील ताळ्ळपाक्कम रचनाकारांच्या काळापासून (१५ वे शतक) अस्तित्वात आहेत. तत्पूर्वी उद्ग्राह, मेळापक, ध्रुव आणि ⇨आभोग हे संगीतरचनेचे चार भाग असत. संगीतरचनेतील अनुपल्लवीचा भाग पल्लवीइतकाच किंवा पल्लवीच्या दुप्पट मोठा असतो. तसेच तो पल्लवीतून अत्यंत स्वाभाविकपणे विकासित होत जातो. पल्लवीतील साहित्यात जे कल्पनाबीज असते, त्याचाच विस्तार अनुपल्लवीत केला जातो. पल्लवी आणि अनुपल्लवी यांच्या आरंभी येणारे स्वर एकच किंवा एकमेकांचे संवादी असून क्वचित पल्लवीचा एखादा आरंभस्वर अनुपल्लवीच्या एखाद्या आरंभस्वराचा अनुवादी असतो. काही संगीतरचनांत मध्यमकाल साहित्यासारखी आणि चिट्टस्वरांसारखी आलंकारिक अंगेही अनुपल्ल्वीत समाविष्ट केली जातात.
सांबमूर्ती, पी.(इं.) कुलकर्णी, अ.र.(म.)