अनगारिक धम्मपाल : (१७ सप्टेंबर १८६४—२९ एप्रिल १९३३). एक बौद्धधर्मप्रसारक. त्यांचे शिक्षण मिशनरी लोकांनी चालविलेल्या शाळेतून झाले. पण पुढे ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ चे कर्नल ऑल्कट, मादाम ब्लाव्हॅट्स्की व लेडबीटर ह्यांची छाप पडून बौद्ध धर्माच्या अभिमानाने सरकारी नोकरी सोडून ते सार्वजनिक कार्यात पडले. १८८४ मध्ये ते कर्नल ऑल्कटबरोबर जपानमध्ये गेले. १८९० साली अड्यार येथील थिऑसॉफिकल मेळाव्याला ते हजर राहिले. तेथून बुद्धगयेला गेल्यावर तेथील बुद्धमंदिराच्या परिसराची दुर्दशा पाहून बुद्धमंदिराची जागा व देखभाल तेथील महंताकडून बौद्ध लोकांकडे यावी, म्हणून त्यांनी कित्येक वर्षे खटपट केली. पण त्यात कायदेशीर मालकीचा प्रश्न निघून ते प्रकरण कोर्टाकडे गेले. १८९१ साली बुद्धगयेला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदही त्यांनी घेतली. १८९३ साली शिकागो येथील निरनिराळ्या धर्मांच्या परिषदेस ते हजर राहिले. त्यांच्या खटपटीने सीलोन व कलकत्ता येथे महाबोधी सोसायटीची स्थापना झाली. न्यूयॉर्क व लंडन येथे बौद्ध मिशनची त्यांनी स्थापना केली. मृत्यूच्या पूर्वी काही महिनेच त्यांनी भिक्षु-धर्माची दीक्षा घेऊन ‘देवमित्र’ असे नावही धारण केले होते.
पहा : महाबोधी सोसायटी.
बापट, पु. वि.