अतींद्रिय मानसशास्त्र : मानवाच्या ज्ञानेंद्रियांना तसेच कर्मेंद्रियांना स्थळ व काळ यांच्या मर्यादा असतात. वर्तमानकाळी व इंद्रियांच्या टप्प्यात असलेल्या विषयांचेच ज्ञान ज्ञानेंद्रियांद्वारा होऊ शकते. कर्मेंद्रिय साक्षात स्पर्शाखेरीज गती उत्पन्न करू शकत नाहीत. इतरांच्या मानसिक क्रियांचे ज्ञानदेखील त्यांच्या शाब्दिक अभिव्यक्तीद्वारा किंवा दृश्य आविर्भावाद्वाराच सामान्यत: होत असते. तथापि इंद्रियांच्या माध्यमावाचून परिसरातील पदार्थांचे व घटनांचे तसेच इतरांच्या मानसिक क्रियांचे ज्ञान झाल्याच्या तसेच शरीरस्पर्शाचा संबंध नसताना पदार्थ गतिमान झाल्याच्या घटना घडल्याचे विश्वसनीय वृत्तांत अनेकदा कानी येतात. मानवाच्या अतिंद्रिय ज्ञानाचे व क्रियाशक्तींचे वैज्ञानिक पद्धतीने व शक्य तो प्रयोगनिष्ठ अन्वेषण करणारे, त्यांचे स्वरूप व त्यांच्याशी संबंधित असलेले विविध घटक निश्चित करू पाहणारे शास्त्र म्हणजे अतींद्रिय मानसशास्त्र होय.

सर विल्यम बॅरेट, स्टॉन्टन मोझेझ व मायर्झ यांनी १८८२ मध्ये सिज्विक दांपत्य, गर्नी व पॉडमोर यांच्या मदतीने लंडन येथे ‘सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च’ स्थापन केली. पॅरिस येथे चार्ल्‌‌स रीशे यानेही अतींद्रिय मानसशास्त्रविषयक प्रयोग केले. १८८४ मध्ये विख्यात मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स याच्या प्रयत्नांनी न्यूयॉर्क येथे ‘द अमेरिकन सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च’ स्थापन झाली. १९२४ मध्ये बॉस्टन  येथेही तिची शाखा स्थापन झाली. १९३० नंतर ड्यूक विद्यापीठात प्रख्यात मानसशास्त्रज्ञ विल्यम मॅक्डूगल याच्या प्रोत्साहनाने डॉ. जे. बी. राइन याने संशोधनकार्य सुरू करून पुढे अतींद्रिय मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापिली. सध्या अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, पश्चिम जर्मनी, पोलंड, स्वीडन, रशिया, दक्षिण आफ्रिका, जपान व भारत (वॉल्टेअर, पुणे व अलाहाबाद येथे) इ. देशांत संशोधन-केंद्रे कार्य करीत आहेत.

चार्ल्‌स रीशे, एफ्. डब्ल्यू. एच्. मायर्झ, सिज्विक, क्रुक्स, बॅरेट, ऑलिव्हर लॉज, विल्यम जेम्स, विल्यम मॅक्डूगल, जे.बी.राइन, आर्. एच्. थाउलेस, गार्डनर मर्फी, सिरिलबर्ट, सी. डी. ब्रॉड, फ्रॉइड, कार्ल युंग, श्टेकेल, सर ॲलिस्टर हार्डी वगैरे मानशास्त्रज्ञांनी, भौतिकीविज्ञांनी, तत्त्वज्ञांनी व विचारवंतांनी या क्षेत्रात आस्थापूर्वक संशोधन व विवेचन केलेले आहे. विद्यापीठीय स्तरावर या विषयाची होत आलेली उपेक्षा अलीकडे झपाट्याने कमी होत आहे. १९६९ मध्ये ‘अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या मंडळाने अतींद्रिय मानसशास्त्रीय संशोधन हे वैज्ञानिक संशोधनाचेच एक क्षेत्र आहे, हे ‘पॅरासायकॉलॉजिकल असोसिएशन’ ला संलग्न करून व मान्यता देऊन सिद्ध केले आहे.

‘माध्यमां’च्या (अतींद्रिय अनुभव येणाऱ्या व्यक्ती) उपस्थितीत घडून येणाऱ्या भौतिक घटना, तथाकथित मृतात्म्यांची छायाचित्रे व त्यांच्या योगे सूचित होणारे मरणोत्तर अस्तित्व हा १८८२ ते १९२५ या कालखंडातील संशोधनाचा मुख्य विषय असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जडवादी विचारसरणी फोफावू लागली होती त्यामुळे मरणोत्तर अस्तित्वाच्या प्रश्नाकडे म्हणजे आत्मवादाकडे कल असलेले विद्वान त्याकडे चिकित्सक वृत्तीने वळले. अर्थात त्यांपैकी कांहीनी परचित्तज्ञानविषयक प्रयोगही केले होते परंतु मरणोत्तर अस्तित्वाच्या संभाव्यतेवर त्यामुळे प्रकाश पडेल असे वाटल्यामुळे या संशोधनात वस्तुनिष्ठ व काटेकोर मूल्यमापन पद्धतीचा वापर करण्यात आला नाही व ते अनिर्णायक ठरू लागले. तशातच श्रीमती आयलीन गॅरेट या विख्यात माध्यमाच्या ठिकाणी अतींद्रिय ज्ञानक्षमता असल्याचे डॉ. राइन यांना आढळले व त्यामुळे ‘माध्यमाच्या द्वारे मिळणारी मृतात्म्याकडून आलेली असण्याऐवजी माध्यमाच्याच अतींद्रियज्ञानक्षमतेमुळे उपलब्ध झालेली असू शकेल’, हे पर्यायी गृहीतक पुढे आले. त्याचा परिणाम म्हणून मरणोत्तर अस्तित्वाचा प्रश्न व माध्यमासंबंधीचे अन्वेषण बरेचसे मागे पडले व अतींद्रिय ज्ञानाचे व क्रियाशक्तीचे सत्यत्व. सांख्यिकीय मूल्यमापनक्षम अशी प्रयोगपद्धती वापरून प्रस्थापित करण्याकडे, अतींद्रिय शक्तीचे स्वरूप समजून घेण्याकडे व तिच्याशी निगडित असलेले घटक शोधून काढण्याकडे संशोधकांचे लक्ष अधिक प्रमाणात लागले. संशोधनाला हे नवीन वळण देण्यात व सांख्यिकीय मूल्यमापनक्षम तंत्राचा अवलंब करायला लावण्यात डॉ.जे.बी. राइन यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे.

अतींद्रिय मानसशास्त्रात परा-प्रत्यक्ष (क्लेअरव्हायन्स), परचित्तज्ञान (टेलेपथी), पूर्वज्ञान (प्रीकॉग्निशन) व मनोगती (सायकोकायनेसिस) या विषयींचे प्रायोगिक अन्वेषण करण्यात येते. मरणोत्तर अस्तित्वविषयक अन्वेषणे जरी निर्णायक ठरलेली नाहीत, तरी तथाकथित कर्णपिशाच, भानामती, भूत दिसणे या प्रकारच्या घटनांचे अन्वेषण केले पाहिजे व त्यांपैकी कोणत्या घटनांची उपपत्ती मृतात्म्याचे अस्तित्व मानल्याविना लागत नाही हे पाहिले पाहिजे, अशी अतीद्रिंय मानसशास्त्रज्ञांची भूमिका आहे.

मानसशास्त्रीय इतर प्रयोगांप्रमाणेच प्रयोगाला अनुरूप अशी परिस्थिती, प्रयुक्ताची (प्रयोगविषय व्यक्ती) अनुकूल मन:स्थिती, प्रयुक्त व प्रयोगकर्ता यांचे सहकार्य व उत्साह इ. बाबींकडे लक्ष देऊन परा-प्रत्यक्ष, परचित्तज्ञान, पूर्वज्ञान व मनोगती यांविषयीचे प्रयोग करण्यात येतात. ज्ञानविषयक प्रयोगांसाठी लक्ष्य-साहित्य (टार्गेट मटेरियल) म्हणून बंद खोलीत किंवा पडद्याआड किंवा सीलबंद पाकिटात ठेवलेली चित्रे, अक्षरे किंवा आकृत्या असलेले पत्ते, वेगवेगळ्या वेळा दाखविणारी घड्याळांची चित्रे इ. विविध प्रकारचे साहित्य वापरण्यात आले. सर्वसाधारणपणे सोबतच्या

झेनर कार्ड्‌स

झेनर कार्डांच्या चित्रातील पाचपैकी एकेक आकृती असलेले पंचवीस पत्ते वापरण्याची प्रथा पडली आहे कारण विशिष्ट प्रकारचे साहित्य वापरले, तरच प्रयोग विशेष यशस्वी होतो, असे आढळून आलेले नाही. अतींद्रियज्ञानविषयक प्रयोगांत प्रयुक्ताने बंद खोलीतील, पडद्याआड किंवा सीलबंद पाकिटात ठेवलेला एक एक पत्ता ओळखावयाचा असतो.

अतींद्रियक्रियाशक्तिविषयक प्रयोगांत एक किंवा अधिक फासे वापरण्यात येतात. उतरत्या फळीवरून किंवा फिरत्या पिंजऱ्यातून फासा गडगडत जमिनीवर टाकला जातो व प्रयुक्ताच्या केवळ मनोबळाने त्याने आधीच जाहीर केलेली बाजू वर येईल अशा रीतीने फासा पडतो की नाही हे पहातात.

वरीलप्रमाणे पाच प्रकारचे एकूण पंचवीस पत्ते वापरून केलेल्या प्रयोगात पंचवीस अंदाजांपैकी पाच अंदाज केवळ योगायोगाने बरोबर येण्याचा संभव असतो. अंदाजांची सरासरी जर पाचहून अधिक किंवा पाचहून कमी आली व जर तो फरक सांख्यिकीय हिशेबानुसार वैशिष्ट्यपूर्ण ठरला, तर ती गोष्ट प्रयुक्ताच्या अतींद्रियज्ञानशक्तीचे गमक समजली जाते. फाशांच्या प्रयोगात एक फासा असेल, तर तो २४ वेळा किंवा दोन फासे असतील तर ते १२ वेळा टाकले जातात. प्रयुक्ताने इच्छाशक्ती केंद्रित केलेली बाजू केवळ योगायोगाने वर येण्याचा संभव १/६ असतो म्हणजे २४ खेपांत ४. पण जर त्याहून बऱ्याच अधिक वेळा ती बाजू वर आली, तर तो प्रयुक्ताच्या अतींद्रियक्रियाशक्तीचा पुरावा मानावा लागतो. डॉ. राइनच्या देखरेखीखाली ड्यूक विद्यापीठात १९३९ पासून अतिशय दक्षता बाळगून काटेकोरपणे करण्यात आलेले अनेक प्रयोग, जी. एन्. एम्. टिरेल यांचे प्रयोग, मर्फीच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीमती श्माइड्लरचे प्रयोग, मार्गारेट अँडरसन व ऱ्हिया व्हाइट यांचे प्रयोग, ॲम्‌स्टरडॅम येथील डॉ. बुशबाखचे प्रयोग, इंग्लंडमधील डॉ. सोल यांचे प्रयोग या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहेत. अतींद्रिय शक्तीला अनुकूल व प्रतिकूल असणाऱ्या घटकांचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने विविध गृहीतके स्वीकारून हे प्रयोग झालेले आहेत.


या क्षेत्रातील प्रायोगिक संशोधनावरून असे दिसून आले आहे, की व्यक्तीची उल्हसित वृत्ती, निरामयता, अतींद्रियज्ञानाच्या शक्यतेवरचा विश्वास वगैरे गोष्टी अतींद्रियज्ञान होण्याला अनुकूल असतात. अतींद्रिंयज्ञानास आवश्यक त्या प्रकारची मन:स्थिती कधी कधी काही औषधिद्रव्यांच्या सेवनाने येऊ शकते, असे काही प्रयोगांवरून दिसते. काही व्यक्तींना ही शक्ती आनुवंशिकतेनेच प्राप्त झालेली असते, असे सुचवणारी उदाहरणेही उपलब्ध आहेत. संमोहित अवस्था हमखास अनुकूल असते काय, हा प्रश्न अद्यापि अनिर्णित आहे. मेंदूतील प्रक्रियांचा काही विशिष्ट संबंधही त्याला अनुकूल असावा असे दिसते. अतींद्रियज्ञानाची व क्रियाशक्तींची सत्यता मान्य करावयास लावणारा प्रायोगिक व शंकातीत पुरावा उपलब्ध असल्यामुळे, मानवाच्या स्वरूपाविषयीची भौतिक विज्ञानांवर आधारलेली कल्पना अपुरी व अयथार्थ आहे, हे लक्षात येऊ लागले आहे. मरणोत्तर अस्तित्व अगदीच असंभवनीय नाही, असे म्हणायला लावणारा काही पुरावाही उपलब्ध आहे. साहजिकच अतींद्रिय मानसशास्त्र हे विचारक्रांतिकारक ठरू पहात आहे.

संदर्भ : 1. Board, C. D. Lectures on Psychical Research, London 1962.

           2. Heywood, R. Beyond the Reach of Sense, New York, 1961.

           3. Pratt, J. G. Parapsychology, London, 1964.

           4. Rhine, J. B. New World of the Mind, London, 1954.

           5. Rhine, J. B. The reach of the Mind, New York, 1947.

           6. Rhine, L. E. ESP in Life and Lab., London, 1969.

           7. Rhine, L. E. Hidden Channels of the Mind, New York, 1961.

           8. Murphy, G. challenge of Psychical Research, New York, 1961.

अकोलकर, व. वि. कुलकर्णी, वा. मा.