अश्मंत : (फोर्‌नॅक्स—‘भट्टी’ अर्थाच्या ग्रीक शब्दावरून). तिमिंगिल (सेट्स) व यमुना (एरिडानस) यांच्या दक्षिणेला असलेला, चौथ्या किंवा त्याहून कमी प्रतीच्या ताऱ्यांचा छोटा समूह (क्रांती–३२, विषुवांश २ ता. ४० मि., → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति). डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात रात्री ९ च्या सुमारास थेट दक्षिणेस दक्षिण-मध्य आकाशात अंधाऱ्या रात्रीच दिसण्याची शक्यता असते. हा समूह टॉलेमी यांनी शोधून काढला. याचे ज्योतिषशास्त्रीय वर्णन प्रथम नीकॉला ल्वी द लाकाय यांनी केले. या समूहात काही तारकायुग्मे, काही चल (तेजस्वीपणा स्थिर नसलेले) तारे व एक अभ्रिका ही आहेत. हार्लो शॅप्ली व त्यांचे सहकारी यांनी १९३८ साली या समूहात एक लघुदीर्घिका [ → दीर्घिका ] शोधून काढली. तिलाही ‘अश्मंत’ असे नाव आहे.

ठाकूर, अ. ना.