अश्काबाद : रशियाच्या तुर्कमेनिस्तान राज्याची राजधानी. लोकसंख्या सु. २,५३,००० (१९६९). रशिया-इराणच्या सीमारेषेवर असलेल्या कोपेत दा या पर्वंताच्या पायथ्याशी, हे मॉस्कोच्या आग्नेयीस २,४९४ किमी. अंतरावर आहे. १८८१ साली स्थापलेल्या या शहरास काही काळ ‘पोल्तोरॅत्स्क’ नाव होते. ट्रान्सकॅस्पियन लोहमार्गावरील हे स्थानक असून इराणमधील मेशेद शहरी जाणारी सडक येथूनच जाते. शहरात सुती व रेशमी कापडाच्या गिरण्या, काच-कारखाना, मांस डबाबंद करणे, मद्यनिर्मिती वगैरे उद्योगधंदे असून हे शैक्षणिक केंद्र आहे. येथे विद्यापीठ, संग्रहालय, शास्त्रीय संशोधन-केंद्र, रशियाच्या विज्ञान-अकादमीची शाखा व चित्रपट-निर्मितिकेंद्र आहे. १९४८ च्या भूकंपाने शहराची बरीच हानी झाली होती.

शाह, र. रू. जोशी, चंद्रहास