ॲमेरिलो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्यातील व्यापर, उद्योगधंदे व दळणवळण यांचे मोठे केंद्र. लोकसंख्या १,२७,०१०(१९७०). ओक्लाहोमा शहराच्या पश्चिमेस ३९२ किमी. अंतरावर हे आहे.अमेरिकेतील वन्य गुरांच्या शिकारीचे हे स्थान लोकांनी गव्हाचे कोठार बनविले. अन्नधान्य-उत्पादन व दुग्धव्यवसाय हे येथील मूळचे उद्योग. येथील परिसरात तेल व नैसर्गिक वायू सापडल्याने हे औद्योगिक केंद्र बनले. मांस व खाद्यपदार्थ डबाबंद करणे, धान्य दळणे, तेलशुद्धीकरण, जस्ताच्या भट्ट्या, कृत्रिम रबर-उत्पादन, कृषि-अवजारे तयार करणे, यंत्रे, लोखंड- व पोलाद-निर्मिती, निरनिराळे क्रीडासाहित्य तयार करणे इ. अनेक उद्योग येथे आहेत. येथून खनिज तेल व नैसर्गिक वायू इतर राज्यांत नळांतून पाठविण्यात येतात. शहराजवळच हेलियम वायुनिर्मितीचा मोठा कारखाना, अणुसंशोधन केंद्र व हवाईतळ आहे. १८८७ मध्ये सुरू करण्यात आलेले पॅलो ड्यूरो कॅन्यन उद्यान परकी प्रवाशांचे आकर्षण आहे.
लिमये, दि. ह.
“