अठ्ठकथा (अर्थकथा): त्रिपिटकातील मूळ ग्रंथांवर भाष्यवजा अशा ज्या पहिल्या टीका लिहिल्या गेल्या, त्यांना अट्ठकथा असे म्हणतात. ⇨ त्रिपिटकातील ग्रंथांइतक्याच महत्त्वपूर्ण ग्रंथांवरील टीकांनाही क्वचित प्रसंगी हेच नाव दिलेले आढळते. उदा., नेत्तिपकरण अट्ठकथा, महावंस अट्ठकथा इत्यादी. बौद्धांचे पाली भाषेतील ग्रंथ वाचणाऱ्यांना स्वाभाविकपणेच अट्ठकथांची गरज भासू लागल्यामुळे निरनिराळ्या भागांत राहणाऱ्या विद्वानांनी अट्ठकथा रचिल्या असल्या पाहिजेत. आंध्रदेशातील विहारांत राहणाऱ्या भिक्षूंसाठी तेथील विद्वानांनी आंधअट्ठकथा रचिल्या असाव्यात. या आंध्र-अट्ठकथा आज उपलब्ध नाहीत. तथापि असल्या आंध्र-अट्ठकथेचा मोघम किंवा छोटी उद्धरणे देऊन केलेला उल्लेख ⇨विनयपिटकावरील संमतपासादिका या अट्ठकथेत आलेला आहे.
सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र (महिंद) आणि कन्या संघमित्रा (संघमित्ता) यांच्या प्रयत्नाने बौद्धांमधील थेरवादी पंथ सिंहलद्वीपात प्रविष्ट झाला. तेथे गेलेल्या विद्वान भिक्षूंनी तेथील लोकांसाठी सिंहली भाषेत अट्ठकथा तयार केल्या. याच अट्ठकथांच्या आधारे मागधी भाषेत अट्ठकथा तयार करून त्या भारतीयांना उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने ⇨बुद्धघोष सिंहलद्वीप येथे आला व सिंहली भाषेतील काही प्रमुख अट्ठकथा त्याने मागधीत आणल्या.
बुद्धघोषाखेरीज ⇨बुद्धदत्त, ⇨ धम्मपाल, उपसेन, महानाम अशांसारख्या ज्ञानी भिक्षूंनीही अट्ठकथा लिहून ठेवल्या आहेत. पाश्चात्य पंडित बर्लिंगेम याच्या मते बुद्धघोषाच्या अट्ठकथा सर्वांत प्राचीन होत. बुद्धघोषाने लिहिलेल्या अट्ठकथांव्यतिरिक्त इतर अट्ठकथांच्या ग्रंथकर्तृत्वासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा सर्व अट्ठकथा प्रसिद्ध होऊन त्यांचा चिकित्सकदृष्ट्या अभ्यास झाल्यानंतरच होऊ शकेल, तथापि त्रिपिटकातील मूळ ग्रंथ, त्यांवर लिहिल्या गेलेल्या अट्ठकथा आणि त्यांचे कर्ते यांसंबंधीचे उपलब्ध तपशील खालीलप्रमाणे आहेत:
पिटक विनय- पिटक : सुत्त- पिटक : अभिधम्म पिटक : |
मूळग्रंथ विनयपिटक पातिमोक्ख अ)दीघनिकाय आ)मज्झिमनिकाय इ)संयुत्तनिकाय (ई)अंगुत्तरनिकाय (उ)खुद्दकनिकाय : १. खुद्दकपाठ २. धम्मपद ३. उदान ४. इतिवुत्तक ५. सुत्तनिपात ६. विमानवत्थु ७. पेतवत्थु ८. थेरगाथा ९. थेरीगाथा १०. जातक ११.निद्देस : अ) महा आ) चुल्ल १२.पटिसंभिदामग्ग १३. अपदान १४. बुद्धवंस १५. चरियापिटक अ) धम्मसंगणि आ) विभंग इ) धातुकथा ई)पुग्गलपंजत्ति उ) कथावत्थु ऊ)यमक ए)पट्ठान |
अट्ठकथा संमतपासादिका कंखावितरणी सुमंगलविलासिनी पपंचसूदनी सारत्थप्पकासिनी मनोरथपूरणी परमत्थजोतिका(१) धम्मपद-अट्ठकथा परमत्थदीपनी(१) परमत्थदीपनी(२) परमत्थजोतिका(२) परमत्थदीपनी(३) परमत्थदीपनी(४) परमत्थदीपनी(५) परमत्थदीपनी(६) जातक-अट्ठकथा सद्धम्मप्पज्जोतिका(१) सद्धम्मप्पज्जोतिका(२) सद्धम्मप्पकासिनी विसुद्धजनविलासिनी मधुरत्थविलासिनी परमत्थदीपनी(७) अट्ठसालिनी संमोहविनोदनी पंचप्पकरणट्ठकथा(१) पंचप्पकरणट्ठकथा(२) पंचप्पकरणट्ठकथा(३) पंचप्पकरणट्ठकथा(४) पंचप्पकरणट्ठकथा(५) |
ग्रंथकर्ता बुद्धघोष(?) बुद्धघोष बुद्धघोष बुद्धघोष बुद्धघोष बुद्धघोष बुद्धघोष (?) बुद्धघोष (?) धम्मपाल धम्मपाल बुद्धघोष(?) धम्मपाल धम्मपाल धम्मपाल धम्मपाल बुद्धघोष(?) उपसेन उपसेन महानाम (महामिधान) ? बुद्धदत्त धम्मपाल बुद्धघोष(?) बुद्धघोष(?) बुद्धघोष(?) बुद्धघोष(?) बुद्धघोष(?) बुद्धघोष(?) बुद्धघोष(?) |
विनयपिटक ⇨सुत्तपिटक आणि ⇨ अभिधम्मपिटक हे ग्रंथ नालंदा येथील ‘नवनालंदा महाविहार’ या संस्थेतर्फे देवनागरी लिपीत छापून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच ‘पालि टेक्स्ट सोसायटी’ या लंडन येथील संस्थेमार्फत बऱ्याच अट्ठकथा रोमन लिपीत मुद्रित करण्यात आल्या आहेत. सिंहली, ब्रह्मी व सयामी या लिपींतही अट्ठकथा छापल्या गेल्या आहेत.
पाली अट्ठकथांतून आगम-अट्ठकथा महाअट्ठकथा, संखेप-अट्ठकथा, कुरुंदी, महापच्चरी वगैरे अट्ठकथांचा उल्लेख वरचेवर येतो. एखाद्या ग्रंथसंग्रहावर अट्ठकथा लिहीत असताना बुद्धघोष त्या अट्ठकथेत याच नावाच्या दुसऱ्या एखाद्या अट्ठकथेचा उल्लेख करतो, असेही काही ठिकाणी आढळते. हा उल्लेख त्याच नावाच्या सिंहली भाषेतील अट्ठकथेचा असावा. अट्ठकथांचा काळ इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत असावा.
या अट्ठकथांतून मूळ पाली ग्रंथांतील शब्दांचा अथवा शब्दसंमुच्चयांचा अर्थ दिलेला असतो. त्याचप्रमाणे वैदिक ब्राह्मणग्रंथांच्या अर्थवादाप्रमाणे त्यांत इतिहास व आख्यानेही असतात. प्रसंगानुरूप पौराणिक, पारंपरिक आणि कल्पित कथाही येतात. बुद्ध आणि त्याचे शिष्य यांनी केलेल्या दैवी चमत्कारांच्या कथाही अंधश्रद्धेच्या सुरात अनेक ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत. पुष्कळ वेळा एकच गोष्ट अनेक ठिकाणी जशीच्या तशी किंवा काही किरकोळ फेरफाराने आढळते. काही ठिकाणी एखाद्या वंशाच्या अथवा घराण्याच्या मूळ उत्पत्तीची कथा येते. उदा., दीघनिकायावरील सुमंगलविलासिनी या अट्ठकथेत कोलियवंश कसा उत्पन्न झाला, यासंबंधीची कथा आहे.
भासाच्या स्वप्नवासवदत्त व प्रतिज्ञायौगंधरायण या नाटकांचा कथाविषय झालेला राजा उदयन आणि त्याची प्रेयसी वासवदत्ता यांची कथा धम्मपद- अट्ठकथेत येते. जैन भिक्षूंच्या नग्नचर्येबद्दल नापसंती दाखविणाऱ्या विशाखेची कथाही याच अट्ठकथेत येते. या अट्ठकथेत नर्मविनोद आणि वाक्चातुर्यही मधूनमधून दिसते. उदा., बोधिसत्त्व आणि त्याचे गाढव यांची कथा. बोधिसत्त्व व्यापार करीत असताना आपला माल एका गाढवावर लादून गावोगाव हिंडत असे. एका गावी या गाढवाची एका गाढवीशी गाठ पडली. त्या दोघांचे प्रेम जमले. रोज असह्य भार वहावयास लावून मालकाने तुझी स्थिती अगदी दीनवाणी करून टाकली आहे, अशी त्या गाढवीने त्या गाढवाची खात्री पटविली. साहजिकच त्या गाढवाने बोधिसत्त्वाबरोबर परत जावयास नकार दिला. त्या गाढवीला आपण पुढे आपल्या गावी जाऊन येऊ, असे वचन देऊन बोधिसत्त्वाने त्या गाढवाला आपल्याबरोबर यावयास प्रवृत्त केले. गावी आल्यानंतर मात्र त्याने गाढवाला स्पष्टपणे सांगितले, की त्या गाढवीला येथे आणून आपले वचन मी पाळीन. तथापि तिच्या सर्व चरितार्थाची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. हे ऐकून गाढव स्तंभितच झाला व आपल्या प्रेयसीचा विचार त्याने सोडून दिला.
अट्ठकथांतूनमहत्त्वाची माहितीही मिळते. मज्झिमनिकाय या मूळ ग्रंथावरील पपंचसूदनी या अट्ठकथेत. अस्सलायनसुत्तावर भाष्य करताना भाष्यकाराने चार वर्णांच्या ऐवजी पाच वर्ण अस्तित्वात असल्याचा उल्लेख केला आहे. दक्षिणेत पंचम म्हणून पाचवा वर्ण मानतात. हे सुप्रसिद्धच आहे. अंगुत्तरनिकायावरील मनोरथपूरणी या अट्ठकथेत ब्राह्मणांच्या यज्ञयागांची माहिती देताना ‘शम्या-प्रास’ (सम्मापास) या नावाच्या यज्ञाची माहिती दिलेली आहे. अश्वमेधाचे काही उपयज्ञ, तसेच पुरुषमेध, वाजपेय व निरर्ग्गड (निरग्गळ) हे यज्ञ कसे होत, यासंबंधीही माहिती देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती शतपथ-बाह्मणावर आधारलेली दिसते. कथावत्थूवरील पंचप्पकरणअट्ठकथेत सम्राट अशोकाच्या काळी जी निरनिराळी पाखंडी मते प्रचारात आली होती, ती कोणत्या बौद्ध पंथांची वा संप्रदायांची होती, हे सविस्तरपणे सांगितले आहे. बौद्धांच्या साहित्यात त्रिपिटकाच्या खालोखाल अट्ठकथांचे महत्त्व आहे.
बापट, पु. वि.
“