अटक : पश्चिम पाकिस्तानातील अटक जिल्ह्यातील तहसिलीचे ठिकाण. लोकसंख्या १९,०४१ (१९६१). हे लाहोर-पेशावर रेल्वेमार्गावरील स्थानक असून पेशावरच्या आग्नेयीस ७० किमी. वर सिंधू व काबूल नद्यांच्या संगमाजवळ, सिंधू नदीकाठी वसलेले आहे. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे या ठिकाणी ती ओलांडणे कठीण असे व त्यामुळे ‘अटक’ हे नाव पडले असावे. या भागात उन्हाळा भरपूर व पाऊस बेताचा असतो. घोड्यांच्या पैदाशीसाठी अटक प्रसिद्ध आहे. अटकजवळ तेलविहिरी व सिमेंटचे कारखाने आहेत. सध्या अटक कँबेलपूर शहरात समाविष्ट आहे.
अकबराने युद्धदृष्ट्या याचे महत्त्व लक्षात घेतले आणि १५८१ मध्ये अटक किल्ला पुन्हा बांधून काढला. पेशव्यांच्या स्वाऱ्या अटकेपर्यंत गेल्या होत्या. १८१२ मध्ये रणजितसिंगाने हा भाग आपल्याकडे घेतला. १८४९ मध्ये तो ब्रिटिशांकडे गेला. किल्ल्याच्या पश्चिमेकडे अब्दुल कादिर जीलानी ह्या साधूची कबर असून उत्तरेला ‘बेगमकी सराई’ ही जुनी धर्मशाळा आहे. अटक येथे १८७३ मध्ये सिंधू नदीवर रेल्वे व सडक यांसाठी पूल बांधण्यात आला. १९२९ मध्ये नदीवर एक लोखंडी पूल बांधला गेला. शहराभोवतीचे सृष्टिसौंदर्य मनोहर आहे.
दातार, नीला