ॲलर्जी : काही असात्म्य अथवा बाह्य पदार्थ शरीरात गेले असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया जेव्हा होते तेव्हा त्या अवस्थेला ‘ॲलर्जी’ किंवा ‘अधिहृषता’ असे म्हणतात. अशी विपरीत प्रतिक्रिया काही व्यक्तींतच दिसते. प्राकृत (सर्वसामान्य) व्यक्तींत ती दिसत नाही.

ज्या बाह्य पदार्थामुळे अधिहृषता होते ते पदार्थ सामान्यतः प्रथिनस्वरूपी किंवा प्रथिनांशी संयोजित असलेले कार्बोहायड्रेट अशा स्वरूपाचे असतात.

कोणताही असात्म्य पदार्थ शरीरात प्रविष्ट झाला असता त्याला निरुपद्रवी करून टाकण्याची यंत्रणा शरीरात असते. तिला ‘प्रतिरक्षायंत्रणा’ म्हणतात. असात्म्य पदार्थांना ⇨प्रतिजन अशी संज्ञा असून त्या पदार्थांना निरुपद्रवी करण्यासाठी शरीरात उत्पन्न होणाऱ्या पदार्थांना ⇨प्रतिपिंड  म्हणतात. प्रत्येक प्रतिजनाशी संयोग करणाऱ्या या प्रतिपिंडाचा दुसरा एक महत्त्वाचा गुण असा आहे, की प्रत्येक प्रतिजनासाठी विशिष्ट प्रतिपिंडच उत्पन्न होत असून तो दुसऱ्या प्रतिजनाविरुद्ध निकामी असतो. प्रतिपिंड शरीरातील गॅमा-ग्‍लोब्युलिनांशी (रक्तरसातील एक प्रकारच्या प्रथिन पदार्थांशी) संयुक्त असतात. शरीरात जंतुविषांसारखे उपद्रवी बाह्य पदार्थ गेले असता त्या प्रतिजनांविरुद्ध शरीरात प्रतिपिंड तयार होतात. या प्रतिजनप्रतिपिंडांचा संयोग होऊन प्रतिजने निरुपद्रवी होतात. या क्रियेला ‘प्रतिजन-प्रतिपिंड-प्रतिक्रिया’ असे म्हणतात. शरीरात प्रतिजन प्रविष्ट झाले असता शरीरकोशिकांमध्ये (पेशींमध्ये) तद्विशिष्ट प्रतिपिंडे उत्पन्न होऊन बाह्य विषारी पदार्थांपासून शरीराचे संरक्षण होत असते. या संरक्षणक्रियेली ‘प्रतिरक्षा’ (प्रतिकारक्षमता) म्हणतात.

काही व्यक्तींमध्ये प्रतिरक्षा उत्पन्न होण्याची क्रिया विपरीत झाल्यामुळे ‘प्रतिजन-प्रतिपिंड-प्रतिक्रिया’ न होता, शरीरातील कोशिका त्या विशिष्ट प्रतिजनांसंबंधी अतिसंवेदनशील (हळव्या) होतात. त्यामुळे प्रतिजनाचा शरीरात प्रवेश झाला असता तात्काळ किंवा काही काळानंतर त्या व्यक्तीमध्ये विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. या तऱ्हेच्या सर्व रोगांना ‘अधिहृषताजन्य रोग’ असे म्हणतात. अशी विपरीत प्रतिक्रिया होणाऱ्या शरीरात प्रतिजनाचा दुसऱ्या वेळी प्रवेश झाला की, इंद्रियातील कोशिकांवर विपरीत परिणाम होऊन त्यांपासून ⇨हिस्टामीन जातीचे पदार्थ उत्पन्न होतात व त्यांच्यामुळेच रोगलक्षणे दिसतात.

अधिहृषतेचे तात्कालिक व विलंबित असे दोन प्रकार आहेत. पहिल्यात शरीरातील प्रतिक्रिया लगेच होऊन लक्षणे दिसू लागतात, तर दुसऱ्या प्रकारात काही अवधीनंतर लक्षणे होतात. पहिल्या प्रकाराला ‘तीव्र ग्राहिता’ असे म्हणतात. दुसरा प्रकार बहुधा जंतुविषामुळे होत असल्यामुळे त्याला ‘जंतुजन्य ग्राहिता’ असे म्हणतात. तीव्र ग्राहितेमध्ये रोग्याच्या रक्तरसात प्रतिजने सापडतात व ते रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात घातले, तर त्या व्यक्तीतही तीव्र ग्राहिता दिसून येते. ती बहुधा आनुवंशिक नसते. ‘जंतुजन्य ग्राहिता’ अथवा तिची प्रवृत्ती मात्र आनुवंशिक असून ती बहुधा जन्मभर टिकते. तीव्र ग्राहितेमध्ये अरेखित स्‍नायूंचे (अनैच्छिक स्‍नायूंचे) आकुंचन ही प्रमुख विकृती असून दुसऱ्या प्रकारामध्ये ‘शोफ’ (सूज) किंवा ‘शोथ’ (दाहयुक्त सूज) ही प्रमुख विकृती असते.

तीव्र ग्राहितेचा एक अतितीव्र, प्रसंगी मारक, प्रकार आहे. या प्रकारात असात्म्य पदार्थाचा संबंध पहिल्याने झाल्यानंतर बऱ्याच अवधीनंतर पुनः तसा संबंध आला तर अवसादाची (शॉकची) लक्षणे दिसतात. घोड्याचा रक्तरस, पेनिसिलीन यांसारखी औषधे दुसऱ्या वेळी टोचण्याचा प्रसंग आला तर अशी अतितीव्र लक्षणे होतात.

परागज्वर, दमा, काही त्वचारोग ही तीव्र ग्राही अधिहृषतेची उदाहरणे होत. या प्रकारात जी विपरीत प्रतिक्रिया दिसते ती सार्वदेहिक नसून फक्त अरेखित स्‍नायू, रक्तवाहिन्या अशा विशिष्ट ऊतकांतच (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतच) दिसून येते.

विलंबित अधिहृषतेची उदाहरणे म्हणजे क्षयरोगाच्या निदानासाठी वापरण्यात येत असलेल्या फोन पिरके परीक्षेतील त्वचेवरील प्रतिक्रिया, काही प्रकारचे संधिवात, हृदांतःशोथ (हृदयातील अंत:स्तराची सूज), परागज्वर व अर्धशिशी ही होत. अर्धशिशी, परागज्वर, संधिवात इत्यादींचे वर्णन त्या त्या स्वतंत्र नोंदीत दिलेले आहे.

चिकित्सा : चिकित्सेतील पहिला प्रकार म्हणजे ज्या प्रकारच्या पदार्थांमुळे अधिहृषता येते त्यांचा संबंध टाळणे हा होय. घोंगडी किंवा रग पांघरण्याने, तसेच नायलॉनचे पदार्थ वापरण्याने त्वचेची अधिहृषता दिसत असेल अथवा विशिष्ट पदार्थ खाण्यात आल्याने दमा होतो असे आढळले असेल, तर तसे जिन्नस वापरणे किंवा खाणे टाळावे. या गोष्टी रुग्णाच्या इतिहासावरून कळतात.

दुसरा प्रकार थोड्या थोड्या प्रमाणात प्रतिजन टोचून प्रतिरक्षाक्रिया अधिक समर्थ करणे प्रतिजन निश्चित करणे कठीण असल्याने ही चिकित्सा अवघड व दुष्कर असते.

इ.स. १९४५ नंतर पुष्कळ हिस्टामीन-प्रतिबंधक औषधे व पुढे काही वर्षांनी ⇨अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातील कॉर्टिसोन हे प्रवर्तक (उत्तेजक स्राव, हॉर्मोन) वापरण्यात येऊ लागले. यांच्या उपयोगाने लक्षणांत सुधारणा होते, परंतु प्रत्यक्ष अधिहृषता मात्र नाहीशी होत नाही.

पहा : अपायिता प्रतिकारक्षमता.

कापडी, रा. सी.