ॲरेमाइक भाषा : ॲरेमाइक ही मूळ ॲरेमियन लोकांकडून बोलली जाणारी सेमिटो-हॅमिटिक कुलातील सेमिटिक समूहाच्या उत्तरेकडील शाखेची एक प्राचीन भाषा. आज ती जवळजवळ नष्ट झालेली आहे. इ.स.पू. आठव्या शतकाच्या सुमाराला ॲरेमियन लोकांचे वर्चस्व मेसोपोटेमियात वाढू लागले आणि कालांतराने अकेडियन, फिनिशियन, हिब्रू या भाषांना बाजूला सारून ती उत्तरेकडील प्रमुख सेमिटिक भाषा बनली. प्राचीन इराणी साम्राज्याची तर ती राजभाषाही होती.
ख्रिस्ताच्या काळी ती पॅलेस्टाइनची भाषा होती आणि जुना करार या धर्मग्रंथाचा काही भाग ॲरेमाइकमध्ये लिहिलेला असून ती येशू ख्रिस्ताची मातृभाषा होती, असे मानायला जागा आहे. सिरियन भाषा म्हणजे ॲरेमाइकचेच उत्तरकालीन रूप असून अनेक ख्रिस्ती धर्मग्रंथांचे भाषांतर तिच्यांतही झाले आहे. राजकीय वर्चस्व व सांस्कृतिक प्रतिष्ठा यांच्यामुळे या भाषेने ग्रीक भाषेचे पूर्वेकडील आक्रमण थोपवून धरले. इ.स.पू. ३०० ते इ.स. ६५० यांमधील जवळजवळ एक हजार वर्षांच्या कालखंडात ॲरेमाइकचे वर्चस्व सर्वांत मोठे होते परंतु इस्लामी संस्कृतीचे वाहन ठरलेल्या अरबी भाषेच्या प्रभावी आक्रमणापुढे ॲरेमाइकचा निभाव लागू शकला नाही.
तीन सेमिटिक भाषा पश्चिम आशियात क्रमाने श्रेष्ठ सांस्कृतिक भाषा म्हणून मान्यता पावल्या : इ.स.पू. १५०० ते ८०० ॲसिरियन भाषा, इ.स.पू ३०० ते इ.स. ६५० ॲरेमाइक भाषा आणि त्यानंतर अरबी भाषा [→ सेमिटिक भाषासमूह].
ॲरेमाइकच्या स्थैर्याचे व श्रेष्ठतेचे एक कारण म्हणजे तिची लिपी. मूळ चित्रलिपीतून उत्क्रांत झालेली ही अक्षरलिपी व्यंजनलेखनात्मक होती तरीही त्या काळी तिचा प्रसार सर्वत्र झाला. अरबी व ग्रीक लिपींचे तर ती उगमस्थान आहेच पण ब्राह्मी लिपीही मुळात तिच्यावरून आली आहे, असे एक मत आहे. ग्रीक व अरबी भाषांत तिच्या अक्षरांना असलेली नावे चित्रदर्शक आहेत, हे संशोधकांनी दाखवून दिले आहे. या लिपीतील इ.स.पू. नवव्या शतकापासूनचे कोरीव लेख उपलब्ध आहेत.
संदर्भ : 1. Stevenson, W. B. Grammar of Palestinian Jewish Aramic, New York, 1924.
2. Turner, J. B. Ed. Manual of Aramic Language of the Palestinian Talmud, London, 1929.
कालेलकर, ना. गो.