काकिनोमोतो नो हिदोमारो : (इ.स.सातवे-आठवे शतक) एक प्रसिद्ध प्राचीन जपानी कवी. यामातो प्रदेशातील या कवीचे बालपण मीवा, युझुकिगाताके या पर्वतांच्या परिसरात गेले त्यामुळे त्याच्या काव्यात निसर्गयसौंदर्याची वर्णने विशेषत्वाने आढळतात. सम्राट जितो व मोम्मू (६८७-७०६) यांच्या दरबारी तो होता. राजघराण्यातील लोकांबरोबर त्याला दूरदूरचा प्रवास घडला. त्याचाही प्रभाव त्याच्या काव्यावर उमटला.

त्याच्या कविता मानियोशू या ७५९ नंतर केव्हातरी संपादित केलेल्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात आढळतात. त्यातील एकोणीस `चोका’ (दीर्घ कविता) आणि पंच्याहत्तर `वाका’ (ओवीसारख्या छंदातील स्फुट कविता) निश्चितपणे त्याच्या असाव्यात. याखेरीज ३७५ कवितांचा एक काव्यसंग्रहही हिदोमारोच्या नावावर आढहतो परंतु त्यात इतरांच्याही कविता मागाहून म्हणजे आठव्या शतकातील पुनर्संपादनाच्या वेळी समाविष्ट केल्या आहेत.

हिदोमारो हा `मानियोशू’ काव्यपरंपरेतील सर्वश्रेष्ठ कवी होय. चोका, वाका व `सेदोका’ (३८ वर्णाची ओवीसदृश रचना) हे सर्व रचनाप्रकार त्याने सफाईने हाताळले. प्रवासातील अनुभव, ताटातुटीचे प्रसंग, आपली बायको आणि राजघराण्यातील इतर व्यक्ती यांच्या निधनावरील विलापिका, विणकऱ्यांचा उत्सवप्रसंग, निर्जन नगर यांसारख्या विषयांवर त्याने काव्यरचना केली. जपानी पुराणकथांचे निर्देशही त्याच्या भावोत्कट विलापिकांत आढळतात. विरोधदर्शन व मानुषीकरण यांचाही अवलंब त्याने केला आहे. निसर्गकवी म्हणून तो प्रसिद्ध आहेच. यांबरोबरच रचनेची सफाई आणि भव्यता या इतर गुणांमुळेही तो जपानी काव्यातील एक मानदंड मानला जातो.

हिसामात्सु, सेन्-इचि (इं.) जाधव, रा. ग. (म).