सिरियाक भाषा-साहित्य : भाषाकुले आणि त्यांमधील उपकुले या वर्गीकरणाच्या दृष्टीने विचार करता सिरियाक भाषा ही आफ्रो-एशियाटिक भाषाकुलामधील पश्चिमी सेमिटिक उपकुलातील पूर्व आर्माइक या गटातील भाषा आहे. तिची स्वतःची सिरियाक ही लिपीही आहे मात्र आज लोप पावत चाललेल्या भाषांपैकी ती एक भाषा आहे. सिरिया या देशाची प्रमुख भाषा म्हणजे सिरियाक भाषा, अशी परिस्थिती नाही. त्या देशाची अधिकृत शासकीय भाषा ही आज अरबीच आहे परंतु मध्य आशियातील सिरिया, लेबानन, तुर्कस्तान, इराक, इराण, पॅलेस्टाइन, इझ्राएल, आर्मेनिया, जॉर्जिया आणि आझरबैजान या देशांमधील छोट्या आणि विखुरलेल्या ख्रिस्ती समाजसमूहामध्ये ही भाषा मातृभाषा म्हणून बोलली जाते. सिरियाक भाषा बोलणारे काही छोटे ख्रिस्ती समाजसमूह यूरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही स्थायिक झालेले आहेत.

सिरियाक भाषेचा इतिहास बराच गुंतागुंतीचा आहे. उत्तर मेसोपोटेमियामध्ये प्राचीन आर्माइक भाषा वापरल्या जात. त्यांमधील एक बोली म्हणून बहुधा इ. स. पू. पाचव्या शतकापासून सिरियाक भाषा अस्तित्वात असावी. साधारणपणे रोमन साम्राज्य आणि पार्थिअन साम्राज्य यांच्या मधल्या भूभागामध्ये ही बोली पसरलेली होती. अलेक्झांडर याने सिरिया आणि मेसोपोटेमियावर कबजा मिळविल्यानंतर ग्रीक प्रभावाला शह देण्यासाठी सिरियाक आणि इतर आर्माइक बोली भाषांचे लेखन होऊ लागले आणि सिरियाक लिपी अस्तित्वात आली. सिरियाक भाषेचा हा प्राचीन टप्पा ख्रिस्ती धर्माशी निगडित नाही. ‘फर्टाइल क्रेसेंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम आशियाई प्रदेशात एक महत्त्वाची बोली म्हणून सिरियाक भाषा या टप्प्यावर विकसित होत होती.

ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर मात्र इ. स. तिसऱ्या शतकापासून त्या प्रदेशातील ख्रिस्ती धर्माच्या लोकांची ती धर्मविधींसाठी वापरली जाणारी भाषा झाली. अरब आणि पर्शियन लोकांनीही ही भाषा वापरलेली असली, तरी संपूर्ण आशिया खंडात (अगदी दक्षिण भारतातील मलबार प्रांतामध्ये आणि चीनमध्येही) ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी ही भाषा वापरली गेली व त्यामुळे इ. स. सु. ३— १२ हा तिचा दुसरा टप्पा ख्रिस्ती धर्माशी (विशेषतः पूर्वेकडील देशांमधील ख्रिस्ती धर्माशी) फार जवळून निगडित आहे. तुर्कस्तानातील इडेसा या ख्रिस्ती प्रांताची अधिकृत शासकीय भाषा म्हणून सिरियाक भाषेला मान्यता मिळाली आणि ती बाराव्या शतकापर्यंत चालू होती.

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत ही भाषा मध्य आशियामध्ये एक महत्त्वाची धार्मिक विधि-भाषा आणि साहित्यिक भाषा म्हणून प्रचलित होती. पेशित्ता  या नावाने ओळखले जाणारे बायबल चे सिरियाक भाषेत झालेले अधिकृत भाषांतर हा या मध्यकाळातील महत्त्वाचा टप्पा होता. आर्माइक भाषांपैकी साहित्य दृष्ट्या सर्वांत अधिक समृद्घ भाषा म्हणून सिरियाक भाषेचा उल्लेख केला जातो मात्र या भाषेतील काव्य, धार्मिक वाङ्‌मय, इतिहास, वैद्यक व इतर शास्त्रे हे सर्व साहित्य आधुनिक भाषांमध्ये आजही उपलब्ध नाही.

इ. स. ४८९ मध्ये सिरियन ख्रिश्चन समाजामध्ये एक मोठी फूट पडली. पर्शियामधील नेस्टोरिअस (कार. इ. स. सु. ४२८– ४३१) याचे अनुयायी आणि इडेसामधील जेकब याचे अनुयायी यांच्यातील ही फूट धार्मिक तत्त्वांवरुन पडली होती आणि त्यातून सिरियाक भाषेमध्ये आणि मुख्यतः लिपीमधील चिन्हांमध्ये भेद निर्माण झाले. नेस्टोरिअन लिपी आणि जेकबाइट लिपी (हिला सेर्टो असेही नाव आहे) हा सिरियाक लिपीमधील भेद त्यातूनच निर्माण झाला.

इ. स. सातव्या शतकापासून सिरियाक भाषेची जागा अरबी भाषेने घेतली. धार्मिक विधींसाठीही अनेक ठिकाणी सिरियाकऐवजी अरबी वापरली जाऊ लागली. भारतातील सिरियन ख्रिश्चन केरळी चर्चमधून बहुतेक ठिकाणी मलयाळम्‌चा वापर होऊ लागलेला आहे. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे काही छोट्या तुरळक समाजगटांपुरतीच सिरियाक ही भाषा आज मर्यादित आहे.

सिरियाक ही भाषा सेमिटिक उपकुलातील भाषा आहे, हे आपण प्रारंभी म्हटलेच आहे. सेमिटिक भाषांच्या ध्वनिव्यवस्थांमध्ये व्यंजनांचे प्राबल्य असते आणि स्वर हे प्रामुख्याने व्याकरणाच्या संदर्भात, उदा., वचन, काळ इत्यादींचे भेद दर्शविण्यासाठी वापरले जातात. मराठीमध्ये कळ-काळ-केळ-कूळ या शब्दांमध्ये स्वरांमुळे जसा अर्थाचा भेद होतो, तसा या भाषांमध्ये होत नाही. गेला-गेली-गेले यांमध्ये किंवा मुलगा-मुलगी-मुलगे यांमध्ये स्वरांमुळे व्याकरणाच्या संदर्भात भेद होतो, तेवढाच या भाषांमध्ये होतो. त्यामुळे या भाषांच्या लिपींमध्येसुद्घा केवळ व्यंजनांसाठीच स्वतंत्र चिन्हे असतात. स्वरांसाठी स्वतंत्र चिन्हे नसून व्यंजनचिन्हांबरोबर काही खाणाखुणा (डायक्रिटिकल मार्क्‌स) जोडून स्वर दाखविले जातात. या भाषांच्या वर्णमाला म्हणजे व्यंजनमालाच असतात. अशा लिप्यांना अ-ब्-ज्-ड् (abjd) पद्घतीची लिपी असे म्हटले जाते. (अरबी लिपीमधील अ-ब्-ज्-ड् या वर्णालेवरुन हे नाव घेतलेले आहे). सिरियाक लिपी ही या पद्घतीची लिपी आहे.

वस्तुतः सिरियाक भाषेच्या ऐतिहासिक विकासामध्ये विविध टप्प्यांवर तीन लिप्या निर्माण झाल्या. प्राचीन काळातील एस्ट्रांजेलो  ही सिरियाक लिपी आज लोप पावलेली आहे. मध्ययुगात निर्माण झालेल्या नेस्टोरिअन आणि जेकबाइट या सिरियाक लिप्या मात्र आजही अस्तित्वात आहेत. या दोन लिप्यांमध्ये चिन्हभेद निर्माण झालेले असले, तरी लिपीचा मूळ ढाचा कायम राहिलेला आहे. मूळ २२ व्यंजनचिन्हे आहेत आणि स्वरांसाठी खुणा आहेत. या लिप्यांचे लेखन आडव्या रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे होते. आकड्यासाठी स्वतंत्र चिन्हे नसून व्यंजनचिन्हांनाच अंकमूल्य दिलेले आहे. सिरियाक लिपीमधूनच चिन्हांची उसनवारी करुन नेबॅटिअन ही लिपी निर्माण झाली व तिच्यातून अरबी लिपी निर्माण झाली. त्यामुळे अरबी लिपीच्या घडणीमागे सिरियाक लिपी आहे. मध्ययुगीन पर्शियन भाषेसाठी वापरल्या गेलेल्या पार्थिअन आणि पेहेलवी या लिप्यांचे मूळही सिरियाक लिपीतच असलेले आढळते.

 मालशे, मिलिंद 


साहित्य : तुर्कस्तानातील इडेसा ह्या ख्रिस्ती प्रांताची अधिकृत भाषा म्हणून सिरियाक भाषेला मान्यता मिळाल्यानंतर सिरियाक साहित्याची निर्मिती तेथे होऊ लागली. इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत ही साहित्यनिर्मिती चालू होती. सेंट ईफ्रेएम सायरस (इ. स. चौथे शतक) ह्याचे ग्रंथ ह्या साहित्याच्या आरंभीच्या काळातले. तो धर्मोपदेशक होता. बायबल वर आणि ईश्वरविद्येवर त्याने भाष्ये लिहिली. त्याने लिहिलेल्या काही युक्तिवादात्मक (पॉलेमिकल) ग्रंथांचा ग्रीक आणि लॅटिन चर्चवर (चर्चेस) फार मोठा प्रभाव पडला. इडेसाच्या ॲकॅडेमीत तो अध्यापनही करत असे. त्याचे जन्मस्थळ निसिबिन, मेसोपोटेमिया हे इ. स. ३६३ मध्ये पर्शियनांच्या ताब्यात गेले. त्या संदर्भातल्या घटना त्याने ‘साँग्ज ऑफ निसिबिन’ (इं. अर्थ) ह्या त्याच्या काव्यातून वर्णन केलेल्या आहेत. तो इतिहास समजून घेण्याचे एक साधन म्हणून हे काव्य महत्त्वाचे मानले जाते. काव्य हा त्याचा आवडता साहित्यप्रकार होता म्हणून त्याने काव्यातच त्याची प्रवचने, स्तोत्रे, विवेचक निबंध असे साहित्य लिहिले. त्याच्या काळातल्या प्रमुख पाखंडी मतांवरही त्याने लिहिले आहे. ह्या पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या अस्तित्वाच्या सातत्याचे दर्शन चर्चच्या रुपाने घडते, अशी त्याची धारणा होती. त्याने आपल्या लेखनातून केलेले स्वर्गाचे आणि नरकाचे तपशीलवार वर्णन ⇨ दान्ते ला आपल्या ⇨ दिव्हीना कोम्मेदीआ   ह्या जगप्रसिद्घ काव्यासाठी प्रेरणादायी ठरले. नरसाई (मृ. सु.– ५०३) हा पूर्व सिरियनांचा सर्वश्रेष्ठ कवी. त्याच्या सुंदर कवितांनी त्याला ‘पवित्र आत्म्याची वीणा’ अशी उपाधी त्याच्या समकालीनांनी दिली. पहिला पॅट्रीआर्क मायकेल ह्याने २१ भागांत लिहिलेल्या इतिवृत्तात (क्रॉनिकल) ११९५ पर्यंतचा चर्च आणि लौकिक जीवन ह्यांचा इतिहास सांगितला आहे. ऐतिहासिक साधनांच्या आणि अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने हे इतिवृत्त अतिशय महत्त्वाचे आहे.

ग्रीक ख्रिस्ती साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनेही सिरियाक भाषांतरांच्या माध्यमातून सिरियाक साहित्याचे आरंभीचे वाङ्‌मयीन प्रयत्न झाले. मूळ आणि अनुपलब्ध अशा ग्रीक ख्रिस्ती साहित्याचे स्वरुप जाणून घेण्याच्या दृष्टीने ह्या भाषांतरांचे महत्त्व मोठे आहे. ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल आणि अन्य प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ ह्यांचे तसेच प्राचीन ग्रीकांचे वैद्यक व अन्य शास्त्रे ह्यांवरील साहित्यही अनुवादरुपाने सिरियाक भाषेत आणले गेले. हे सर्व साहित्य ग्रीकमधून अरबी भाषेत आणण्यापेक्षा सिरियाक भाषेतून अरबीमध्ये आणणे अधिक सोपे असल्यामुळे त्याचा लाभ इस्लामी संस्कृतीलाही झाला. उदा., गालेन (इ. स. दुसरे शतक) ह्या ग्रीक वैद्याच्या ग्रंथाची थेट ग्रीक सिरियाक भाषेतून अरबी भाषेत १३०, तर थेट ग्रीकमधून अरबी भाषेत केवळ ९ भाषांतरे झाली. सिरियाक भाषेच्या माध्यमातून ग्रीकांच्या ज्ञानग्रंथांचा प्रभाव इस्लामी जगावर पडला.

कुलकर्णी, अ. र.