तोखारियन भाषा–साहित्य : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंडो–यूरोपियन भाषांचे जे वर्गीकरण करण्यात आले होते, ते अंतिम स्वरूपाचे आहे, त्यात भर पडण्याची कोणतीच शक्यता नाही, असे भाषेच्या अभ्यासकांना वाटू लागले होते. त्या काळी उपलब्ध असलेल्या या भाषाकुटुंबाच्या शाखा म्हणजे इंडो–इराणी (संस्कृत, इराणी इ.), ग्रीक, इटालिक (लॅटिन इ.), केल्टिक (आयरिश इ.), जर्मानिक (जर्मन, इंग्रजी इ.), स्लाव्हिक (रशियन इ.), बाल्टिक (लिथुएनिएन इ.), आर्मेनियन व अल्बेनियन या होत्या.

या शाखांचे दोन प्रमुख विभाग मानले जात. एक पूर्वेकडचा व दुसरा पश्चिमेकडचा. आद्य इंडो–यूरोपियनच्या पुनर्घटित * श च्या जागी पूर्वेकडील इंडो–इराणी, स्लाव्हिक, बाल्टिक इ. भाषांत किंवा येतो, तर पश्चिमेकडे त्या जागी मृदुतालव्य वर्ण येतो. याचे एक उदाहरण म्हणजे ‘शंभर’ व ‘दहा’ या अर्थाचे संस्कृत–इराणी शब्द व लॅटिन–ग्रीक शब्द. याचे कोष्टक असे :

सं. शतम् , द

इ. सतम् , दस

लॅ. केन्तुम् , देकेम्

ग्री. (हे) कांतोन्, देका

हा निष्कर्ष उपलब्ध पुराव्यावरून तौलनिक व्याकरणाच्या तत्त्वानुसार काढण्यात आलेला असल्यामुळे सर्वमान्य झाला होता.

परंतु काही पाश्चात्त्य संशोधकांनी मध्य आशियातील चिनी तुर्कस्तानच्या प्रदेशात विसाव्या शतकाच्या प्रारंभाला अतिशय विस्तृत प्रमाणावर केलेल्या संशोधनात भारतीय लिपीचा उपयोग करणारे, पण संस्कृतशी प्रत्यक्ष संबंध नसलेले, एका वेगळ्याच भाषेत लिहिलेले साहित्य उपलब्ध झाले. ते इसवी सनाच्या सातव्या शतकातील होते. ते बुद्धधर्मीय लोकांचे असून त्यातील बरेचसे बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतर असल्यामुळे त्याचा निश्चित अर्थ लावणे व त्यातील भाषेचा अभ्यास करणे शक्य व सोपे झाले. याशिवाय व्यापाऱ्यांचे हिशोब, परहद्दीत जाणाऱ्या किंवा स्वतःच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिलेले परवाने अशा प्रकारचे साहित्य त्यात आढळून आले.

विशेष संशोधनानंतर या नव्या भाषेत दोन भिन्न बोली आहे, असे सिद्ध झाले. त्यांपैकी पूर्वेकडील बोलीला ‘तोखारियन ए’ व पश्चिमेकडील बोलीला ‘तोखारियन बी’ अशी नावे ठरवण्यात आली. पण ज्या तोखारी लोकांच्या या बोली आहेत, असे गृहीत धरण्यात आले होते, त्यांची भाषा वेगळी होती, असे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे आधी दिलेली नावे बदलून पूर्वेकडील बोलीला ‘ॲग्‍नियन’ व पश्चिमेकडची  बोली कूचा या प्रदेशात बोलली जात असल्यामुळे तिला ‘कूचियन’ असे म्हणण्यात यावे, असे फ्रेंच पंडित सिल्व्हँ लेव्ही यांनी सुचवले. पण नाव देण्यात झालेली चूक लक्षात घेऊनही पूर्वी दिलेली नावे बदलणे गैरसोयीचे वाटल्यावरून तीच चालू ठेवण्यात आली.

मात्र ज्या ध्वनींच्या आधारावर पूर्व व पश्चिम इंडो–यूरोपियन असे वर्गीकरण करण्यात आले होते, त्याला ही पूर्वेकडची भाषा पोषक नव्हती. कारण ‘शंभर’ व ‘दहा’ या अर्थाचे शब्द तोखारियनमध्ये पुढीलप्रमाणे आहेत :

 

‘शंभर’ 

तो. ए 

कंन्त् 

तो. बी 

कंन्ते 

 
 

‘दहा’

 

शक्

 

शक्

 

म्हणजे पहिल्या व दुसऱ्या शब्दातील संस्कृत या वर्णाच्या जागी इथे स्पष्टपणे हा वर्ण आलेला आहे. यावरून असा तर्क करण्यात आला, की इंडो–यूरोपियनचे शतम्–केन्तुम् हे विभाजन होण्यापूर्वी तिच्यातला एक भाषिक गट मध्य आशियात जाऊन स्थायिक झाला होता आणि या गटाच्या बोलण्यात केन्तुम्‌ला पोषक अशी प्रवृत्ती असून योग्य काळी तिचे परिवर्तन आज दिसते तसे झाले.


हिटाइटप्रमाणे या दोन्ही बोली कित्येक शतकांपासून संपूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.

ध्वनी  : तोखारियनची ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे

   

स्वर:

(शुद्ध) अ, आ, अं, ओ, ए, इ, ई, उ, ऊ.

 
     

(मिश्र) तो. ए – ए, ओतो. बी – ऐ, औ.

 
   

अर्धस्वर: 

य, व.

 
   

व्यंजने:

(शुद्ध) प, त, क.

 
     

म, न, ङ, ँ

 
     

र, ल.

 
     

ष, स.

 
   

(तालव्यीकृत)

च, च़, त्स. 

 
     

 
     

ल्य

 
     

ष 

 

अं हा इतर स्वरांचा संकोच होऊन मिळालेला स्वर आहे. तो फार मोठ्या प्रमाणात आढळतो.

व्याकरण :नामात स्त्री, पुररुष व नपुंसक ही लिंगे, एकवचन, द्विवचन व अनेकवचन ही वचने आणि संस्कृतप्रमाणे सात विभक्त्या व संबोधन आहेत.

सर्वनामांची रचनाही संस्कृतप्रमाणेच आहे. उदा., प्रथमपुरुषी एकवचनी तो. एमध्ये नंशँ (पु.) ञॅूक (स्री) ही रूपे असून ती संस्कृतमधील पर्यायी रूपांशी  (न:इ.) मिळती आहेत. प्रश्नवाचक, संबंधी व अनिश्चित सर्वनामे असून सर्वनामात्मक विशेषणेही आहेत.

संख्यावाचकात संख्या, क्रम व वाटणी दर्शवणारी रूपे आहेत.

विकाररहित शब्दात अव्यय, उपसर्ग, प्रत्यय इ. दाखवणारी स्वतंत्र रूपे आहेत.

क्रियापदांच्या प्रक्रियेत बराच फरक पडला असला, तरी त्यांचे ग्रीक व संस्कृतशी साधर्म्य स्पष्ट आहे.

धातू, नाम इत्यादींना प्रत्यय लागून नवे शब्द बनवण्याची क्षमता संस्कृतप्रमाणेच आहे. संस्कृतप्रमाणेच दोन शब्दांचा समास आढळतो.

तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यावर तोखारियनचे इतर इंडो–यूरोपियन भाषांशी असलेले साम्य लक्षात आल्याखेरीज राहत नाही. पण त्याबरोबरच ध्वनी व व्याकरण यांच्या दृष्टीने आढळणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे तोखारियनचे एक स्वतंत्र भाषा म्हणून स्थान स्पष्ट होते.

संदर्भ : 1. Cohen Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris. 1952.

           2. Meillet, Antoine, Introduction a Ièetude Comparative des langues indo-europèennes, Paris, 1937. 

           3. Van Windekens, A. J. Morphologie compareè du tokharien, Louvain, 1944.

कालेलकर, ना. गो.