आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण : राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय. दोन महायुद्धांनी लष्करी संघर्षामुळे होणारे अनिष्ट परिणाम प्रत्ययास आले. तिसरे महायुद्ध झाले तर मानवी संस्कृती नष्ट होईल, अशी भीती विचारवंतांना वाटत आहे. युध्दांचा उगम भावनेत असतो, म्हणून द्वेषभावना थोपवून धरून सदिच्छेचे बीजारोपण करणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मूलत: सर्व मानवजात एकरूप आहे. भिन्न देशांत अन्न,वस्त्र, चालीरीती इ. बाबतींत भेद दिसत असले, तरी सर्वत्र मानवाच्या आशाआकांक्षा, गुणदोष, सुखदु:खे समान आहेत. सर्वत्र मानव पूर्णतेसाठी झटत आला आहे. व या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे आजची उन्नत मानवी संस्कृती होय. या संस्कृतीचे जतन करणे सर्व मानवांचे कर्तव्य आहे. युद्धांनी भांडणे मिटत नाहीत, हानी मात्र होते. क्षयादी रोग, धरणीकंपादी उत्पात, अज्ञान व अंधश्रद्धा हे सर्व मानवजातीचे शत्रू असून त्यांना तोंड देण्यासाठी सहकार्याची अभेद्य फळी निर्माण करणे श्रेयस्कर आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना सर्व धर्मांच्या तत्त्वप्रणालीत अंतर्भूत असली, तरी ही भावना रूजविण्याचे महत्त्व पहिल्या महायुद्धानंतर जाणवू लागले. त्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली व राष्ट्रांतील तंटे समजुतीने सोडविण्याचे तत्त्व मान्य करण्यात आले. यासाठी खाजगी प्रयत्नही झाले १९२४ साली विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करून रवींद्रनाथ टागोर यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या शिक्षणास जोराची चालना दिली. हे प्रयत्न निष्फळ झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी सामंजस्याची आवश्यकता अधिकच तीव्रपणे भासू लागली. या तीव्र जाणिवेतून संयुक्त राष्ट्रे ही संघटना निर्माण झाली. तिचे मुख्य उद्दिष्ट मानवी समतेवर आधारलेले स्नेहसंबंध सर्व राष्ट्रांत निर्माण करणे हे आहे.

शिक्षणांचे स्वरूप : आंतरराष्ट्रीय पातळीवर सामंजस्याचे शिक्षण देण्याचे कार्य संयुक्त राष्ट्रांची एक प्रमुख शाखा ⇨ यूनेस्को करीत आहे. यूनेस्कोच्या प्रेरणेने सभासदराष्ट्रे परराष्ट्रांतील अध्यापक व विद्यार्थी यांना शिष्यवृत्या व प्रवासवृत्या देतात. अशा रीतीने भिन्नदेशीय अध्यापकांचा व विद्यार्थ्यांचा परिचय होऊन परकीय जीवनाचे व संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडते. तसेच यूनेस्कोच्या प्रेरणेने विविध राष्ट्रे आपली सांस्कृतिक शिष्टमंडळे व कलापथके परदेशात पाठवितात व त्यांच्या द्वारा लोकांना मानवी संस्कृतीच्या विविधतेतील एकात्मतेचा प्रत्यय येतो.

यूनेस्कोशी सहकार्य करणारी भारतीय राष्ट्रीय आयोग ही सरकारी यंत्रणा दिल्लीत आहे. प्रशिक्षण-विद्यालये व माध्यमिक शाळा यांतून सामंजस्याचे शिक्षण देण्याचे कार्य ही यंत्रणा करते. या कार्याचे स्वरूप शिक्षकांसाठी सत्रे भरविणे व शाळांमधून प्रकल्प तयार करून घेणे असे असते. अशा स्वरूपाचे कार्य राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळाच्या विस्तार सेवा विभागामार्फतही चालते. माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जो अभ्यासक्रम आखलेला आहे, त्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.

शाळामधून होणाऱ्या सामंजस्याच्या शिक्षणात अध्यापकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याची वृत्ती आंतरराष्ट्रीय असेल व सर्व वादग्रस्त प्रश्नांकडे संकुचित राष्ट्रीय दृष्टीकोनातून न पाहता विशाल मानवी दृष्टीकोनातून तो पाहील, तर त्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात सामंजस्याचे बीजारोपण करता येईल. भाषा, इतिहास, विज्ञान इ. विषय शिकविताना मानवी उन्नतीस निरनिराळ्या देशांच्या व वंशांच्या लोकांनी कसा हातभार लावला, याचे चित्र उभे करता येईल व मानवाचे हित सहकार्यातूनच साधेल, हे पटवून सद्भावनेचे बीजारोपण करता येईल. सामंजस्याच्या शिक्षणाचे आणखी एक महत्त्वाचे साधन म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून लिहिलेली पाठ्यपुस्तके होते. वेगवेगळ्या देशांतील इतिहासाची पाठ्यपुस्तके तपासून त्यांतील अन्य देशांविषयी गैरसमज पसरविणारी विधाने काढून टाकण्याचा सल्ला यूनेस्कोने दिला आहे.

सामंजस्य निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखांमार्फत विशेषत: मागसलेला देशांतील जनतेच्या हिताचे जे बहुमोल कार्य चालू आहे त्याचा चांगला उपयोग होतो. आरोग्यसंघटनेमार्फत रोगनिवारणाचे काम फार मोठ्या प्रमाणात चालते. कर्करोग, कुष्ठरोग, क्षय इ. रोगांवर संशोधन चालू असून प्रतिकारक औषधांचा पुरवठा करण्यात येतो. तसेच यूनेस्कोमार्फत नवोदित राष्ट्रांमध्ये मूलभूत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भरघोस साहाय्य देण्यात येते. या कार्याचे ज्ञान होण्यासाठी शाळांमधून संयुक्तराष्ट्र-दिन, मानवी-हक्क-दिन व जागतिक-आरोग्य-दिन साजरे केले जातात.

सामंजस्य निर्माण करण्याचा आणखी एक उपाय परकीय वाङ्मयाचा अभ्यास होय. भाषांतरद्वारा जरी चांगल्या परभाषिक वाङ्मयाचा परिचय झाला, तरी त्यामधून मानवाच्या भावनिक एकात्मतेचा प्रत्यय येतो व आपपरभाव नाहीसा होऊन सामंजस्य निर्माण होते. असाच उपयोग निरनिराळ्या देशांतील विद्यार्थ्यांमध्ये पत्रमैत्री वाढीस लावण्याने होतो.

संदर्भ : 1. Indian National Commission for UNESCO,Report of the National Seminar on International Understanding, New Delhi, 1965.

         2. UNESCO.Education for International Understanding, Paris, 1964.

 पारसनीस, न. रा.