अलाउद्दीन खल्जी : (१२६६?—२ जानेवारी १३१६). मध्ययुगीन भारतीय इतिहासातील १२९६ पासून १३१६ पर्यंत दिल्लीवर राज्य करणारा एक कर्तबगार सुलतान. त्याच्या आधीचा सुलतान जलालुद्दीन ह्याने आपल्या ह्या पुतण्याला जावई करून घेतले आणि त्याला कारा येथे सुभेदारीवर नेमले (१२९१). जलालुद्दीनाच्या कारकीर्दीत अलाउद्दीनाने १२९२ मध्ये माळवा व भेलसा येथे स्वारी करून तेथील अमाप लूट दिल्लीला आणली. या कामगिरीच्या मोबदल्यात चुलत्याने त्याला अयोध्येची सुभेदारी दिली. १२९४ मध्ये चुलत्यास न कळविता त्याने देवगिरीवर स्वारी करून तेथील राजा रामदेवराय याचा पराभव केला. अलोट संपत्ती लुटून आणि एलिचपूर (अचलपूर) व आसपासचा प्रांत बळकावून तो परत आपल्या सुभेदारीवर गेला. १२९६ मध्ये चुलत्याचा वध करून तो स्वतःच गादीवर बसला.
अलाउद्दीनाला प्रथम मोगल टोळ्यांशी झगडावे लागले. ह्या लोकांनी १२९६, १२९९, १३०४ व १३०७—०८ या साली दिल्लीवर स्वाऱ्या केल्या. अलाउद्दीनाने त्यांचे हल्ले परतवून त्यांच्या कायमच्या बंदोबस्तासाठी वायव्य सरहद्दीवर एक संरक्षणफळी उघडली. काही मोगल लोकांनी इस्लामी धर्म स्वीकारून दिल्लीजवळ कायमची वस्ती केली होती. त्यांच्यातील बहुतेकांची कत्तल करून त्याने दशहत बसविली.
अलाउद्दीनाने १२९८ मध्ये गुजरातच्या⇨करण वाघेलाच्या राज्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला. झालेल्या दंगलीत करणरायची राणी कमलदेवी व मुलगी देवलदेवी सुलतानाच्या हाती लागल्या. सुलतानाने कमलदेवीशी लग्न केले. कमलदेवी व देवलदेवी यांच्या कथेतील ऐतिहासिक सत्यतेविषयी मतभेद आहेत. गुजरातच्या स्वारीत त्याच्या सैन्याने⇨ सोमनाथचे देवालय लुटले (१२९९) व आतील मूर्तीही फोडल्या. ह्यानंतर अलाउद्दीनाने रणथंभोरचा किल्ला जिंकून १३०२ मध्ये चितोडचा राणा रतनसिंग याच्यावर चाल केली. ह्या लढाईत राजपूतांनी चांगल्या प्रकारे प्रतिकार केला. पण अखेरीस सुलतानाने चितोडगढ सर केला. रतनसिंग याची सुंदर बायको पद्मिनी हिच्या लोभाने सुलतानाने चितोडची स्वारी केली असे शाहिरी काव्यांत म्हटले आहे. पद्मिनीच्या हकीकतीविषयी जरी विश्वसनीय ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला, तरी केवळ एक दंतकथा म्हणून ती सोडून देता येणार नाही.
अलाउद्दीनाने उज्जैन, मांडू, धार, चंदेरी ही माळव्यातील शहरे हस्तगत करून राजपुतान्याचा बराचसा भाग जिंकला. १३०५ मध्ये जवळजवळ सबंध उत्तर हिंदुस्थान त्याच्या ताब्यात होता. यानंतर दक्षिण हिंदुस्थान
जिंकण्याकरिता त्याने मलिक काफूरची नेमणूक केली. मलिक काफूरने १३०३ व १३०९ मध्ये वरंगळच्या सत्तेविरुद्ध व १३०७ व १३११ मध्ये देवगिरीच्या सत्तेविरुद्ध मोहिमा काढून तेथील राजांस मांडलिकत्व पतकरावयास लावले. १३१० मध्ये होयसळांचे राज्यही खालसा केले गेले. ह्या स्वाऱ्यांत त्याने अनेक देवालयांचा विध्वंस केला. मलिक काफूरने दक्षिण काबीज करण्याचे सुलतानाचे मनोरथ बरेच तडीस नेले. अलाउद्दीन मलिक काफूरने केलेल्या विषप्रयोगात दिल्ली येथे मरण पावला.
अलाउद्दीनच्या स्वभावात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्तींचे मिश्रण झाले होते. तो पराक्रमी योद्धा व जुलमी पण कुशल व कर्तबगार राज्यकर्ता होता. राज्याच्या शासकीय व्यवस्थेसाठी उलेमांचा सल्ला न घेणारा हाच पहिला सुलतान. जिंकलेल्या प्रदेशांच्या सुव्यवस्थेसाठी त्याने अनेक उपाय योजले. राज्यात होणाऱ्या बंडांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने खड्या सैन्याची व्यवस्था ठेवली. राज्यातील सर्व प्रकारची माहिती कळण्यासाठी अलाउद्दीनाने ठिकठिकाणी हेर नेमले. त्याने अधिक कर बसवून राज्याचे उत्पन्न वाढविले व वस्तूंच्या भावांवर नियंत्रण घातले. जहागिऱ्या व इनामे जप्त करून त्याने सत्तेचे केंद्रीकरण केले. हिंदूंबाबतचे त्याचे धोरण मात्र पिळवणुकीचेच असे.
अलाउद्दीन स्वतः निरक्षर असला, तरी विद्वानांचा व कवींचा आश्रयदाता होता. सुप्रसिद्ध कवी अमीर खुसरौ, अमीर हसन देहलवी वगैरे व्यक्ती त्याच्या पदरी होत्या. अलाउद्दीनाला वास्तुशिल्पाची आवड होती. दिल्ली येथे कुतबुद्दीन ऐबकने बांधलेल्या कुवात-उल-इस्लाम मशिदीचा त्याने विस्तार केला.
⇨ कुतुबमीनारजवळ बांधलेला अलाई दरवाजा व निजाम-उद्दीन अव्लियाचा दर्गा अलाउद्दीनच्या कारकीर्दीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अलाई दरवाज्याचा आकार आयताकृती असून वरील घुमटावर कलशाची योजना प्रथमच केलेली दिसते. लाल दगडांत बांधलेल्या या वास्तूच्या कोरीव कामात संगमवराचा वापर केलेला दिसतो. या वास्तूंच्या आकारात व आलंकारिक शैलीत भारतीय इस्लामी पद्धतीचा आविष्कार प्रतीत होतो. अलाउद्दीनाने दिल्लीजवळ सिरी हे उपनगर बसविले.
संदर्भ : Lal, K. S. History of Khaljis, Bombay, 1967.
गोखले, कमल
“