अलर्क रोग : (जलसंत्रास). हा पिसाळलेल्या श्वानवर्गी (कुत्र्याच्या वर्गातील) जनावरांच्या चावण्यामुळे निर्माण होणारा आशुकारी (तीव्र) विषाणुजन्य (व्हायरसजन्य,→ व्हायरस) सांसर्गिक रोग आहे. हा रोग असाध्य आहे. आजपर्यंत एकही ग्रस्त रोगी जगलेला नाही.

 

या रोगाच्या विषाणूंबद्दल अद्यापि विशेष माहिती नाही. कदाचित तो अतिसूक्ष्मदर्शीय व निस्यंदकामधून (गाळण्यामधून) पार जाणारा असा असावा. या रोगाचा प्रसार विशेषतः पाळीव कुत्रे तसेच लांडगे, कोल्हे, मुंगूस यांसारखी जंगली जनावरे यांच्या मार्फत होतो. काही ठिकाणी या रोगाचा प्रसार रक्तशोषक वटवाघुळांमार्फत होतो. पिसाळलेल्या जनावरांच्या लाळेत या रोगाचे विषाणू असतात. पिसाळलेले जनावर चावल्यास किंवा खरचटलेल्या ठिकाणी त्याने चाटल्यास, मनुष्यास हा रोग होतो.

 

अलर्क रोग हा फार पुरातन कालापासून माहीत आहे, एवढेच नव्हे, तर त्याचा पिसाळलेल्या जनावराशी संबंध आहे हेही माहीत होते. त्यावेळी पिसाळलेल्या जनावराने चावलेल्या ठिकाणी दाहकर्म (जाळून काढणे) करीत असत.

 

पिसाळलेले जनावर सुरुवातीच्या अवस्थेतच फार धोकादायक असते. कारण ते गरीब व निरोगी दिसले तरी साध्याही कारणाने चावा घेते. त्याचप्रमाणे जंगली जनावरे जर दिवसाउजेडी मनुष्यवस्तीच्या आसपास घुटमळत असतील तर ती पिसाळलेली आहेत असे समजतात.

 

कारणे : पिसाळलेल्या प्राण्यांच्या दंशामुळे या रोगाचे विषाणू जखमेमधून माणसाच्या शरीरात शिरतात व तेथून ते त्या भागाच्या परिघीय तंत्रिकेमार्गे (अवयवाच्या पृष्ठाजवळील मज्‍जातंतूमार्गे) मेंदूपर्यंत पोचतात. म्हणून मूळ जखम मेंदूपासून जितकी दूर तितका रोगाचा परिपाककालही (रोगविषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काल) दीर्घ असतो. पिसाळलेल्या प्राण्यांच्या मेंदूत दिसून येणारे ‘नेग्री-पिंड’(नेग्री नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले विशिष्ट पिंड) हे विशेषतः प्रमस्तिष्क विवराच्या (मोठ्या मेंदूच्या पोकळीच्या) व निमस्तिष्क बाह्यकाच्या (लहान मेंदूच्या पृष्टभागावरील करड्या थराच्या) तळाशी असलेल्या तंत्रिकाकेंद्रातील तंत्रिकाकोशिकांत (मज्‍जातंतूंच्या उगमस्थानांत) दिसून येतात पण हे नेग्री-पिंड म्हणजे विषाणूची एखादी अवस्था आहे का विषाणूमुळे निर्माण होणारी कोशिकांची प्रतिक्रिया आहे, याबद्दल निश्चित कल्पना नाही.

 

रोगाची सुरुवात सामान्यतः सहा आठवड्यांनी होते पण रोगाचा परिपाककाल आठ दिवस ते आठ महिनेही असतो.

 

लक्षणे : मनुष्यातील अलर्क रोगाची लक्षणे ही सामान्यतः पिसाळलेल्या प्राण्यांतील लक्षणांसारखीच असतात. दंश केलेल्या ठिकाणची जखम बरीही झालेली असते. परिपाककाल संपल्यावर रोगाची लक्षणे दिसावयास लागतात. दंशाच्या व्रणाच्या ठिकाणी क्षोभ किंवा वेदना व्हावयास लागतात. रोगी चिडखोर बनतो व त्याचा आवाज घोगरा होतो. थोडा तापही असतो. गिळण्याच्या क्रियेच्या व श्वासोच्छ्‍वासाच्या स्‍नायूंत वेदनायुक्त आचके यावयास लागतात. गिळण्यामुळे किंवा अन्न व पाणी यांच्या दर्शनाने किंवा त्यांच्या विचारानेही या आवेगाची (क्षोभाची) तीव्रता वाढते, म्हणूनच याला ‘जलसंत्रास’ असेही म्हणतात. ताप ३८·३से. पर्यंत चढतो. तोंडातून लाळ गळावयास लागते. ही अवस्था २ ते ३ दिवस राहते. पुढे रोगी पूर्ण थकून जातो. स्‍नायूंचा अंगवध (लुळे पडणे) होतो, ताप उतरतो, रोगी पूर्ण बेशुद्ध पडतो व थोड्याच वेळात मृत्यू पावतो.

 

निदान: पिसाळलेल्या प्राण्याचा दंश झाल्याचे पूर्ववृत्त, रोगाची विशिष्ट लक्षणे दिसणे व पिसाळलेल्या प्राण्याची शवपरीक्षा केल्यास त्याच्या मेंदूत नेग्री-पिंड सापडणे यावरून निदान होते. दंश करणारा प्राणी चावल्यानंतर दहा दिवसांनंतरही जिवंत असेल, तर रोग अलर्क रोग नव्हे असे धरून चालावयास हरकत नाही.

शरीरावरील एका ठिकाणच्या दंशापेक्षा अनेक ठिकाणी केलेले दंश हे जास्त धोकादायक असतात त्याचप्रमाणे हातापायांवर केलेल्या दंशापेक्षा डोके व चेहरा यांवरील दंशामुळे रोग फार जलद जडतो. जर रोगावर परिपाककालात प्रतिबंधक उपाय केला नाही, तर तो मारक ठरतो.

 

चिकित्सा : (प्रतिबंधक). साथ असलेल्या भागातील कुत्र्यांच्या तोंडाला मुसकी बांधली पाहिजेत. बाहेरून आलेल्या कुत्र्यांना सहा महिने संक्रमणकालातील विलग्नवासात (रोगप्रसार करण्याच्या अवस्थेत दूर ठेवणे, क्वारंटाइन) ठेवतात. सर्व कुत्र्यांना प्रतिबंधक लस टोचतात. चावलेल्या ठिकाणच्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ देतात. नंतर जखम १,००० : १ या प्रमाणात बनविलेल्या परक्लोराइड ऑफ मर्क्युरीच्या विद्रावाने धुवून काढतात व जखमेवर तीव्र नायट्रिक अम्‍लाचे दाहकर्म करतात. रोग्याला ७ ते १४ दिवस प्रतिबंधक लस टोचतात. ही लस कुत्रे चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर (५ दिवसांच्या आत) टोचण्यास सुरूवात करतात. लस तयार करण्याकरिता सशाच्या मेंदूत अलर्क रोग-विषाणू टोचून काही दिवसांनी त्याला मारून त्याचा मेंदू वाळवितात व त्या वाळविलेल्या मेंदूचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्‍या दोन द्रवांचे मिश्रण,→ पायस) तयार करतात त्या पायसाची विशिष्ट मात्रा सुमारे १४ दिवस लस म्हणून वापरतात. काही वेळा या लशीमुळे परिघीय तंत्रिकाशोथ,(मज्‍जातंतूला येणारी सूज), अधिहृषता [→ ॲलर्जी], मस्तिष्कशोथ (मेंदूला येणारी सूज) असे क्वचित होणारे उपद्रव होऊ शकतात.

पशुवैद्य व कुत्री पकडणारे लोक यांनाही प्रतिबंधक लस टोचणे अवश्य असते.

 

रानडे, म. आ.

 

आयुर्वेदीय चिकित्सा : पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणाऱ्‍या विषलक्षणांवर पुढील चिकित्सा करतात. असा कुत्रा चावताच दंशाचा व्रण कढत तुपाचे थेंब त्यावर टाकून जाळावा व त्यावर आघाड्याचा रस चोपडावा आणि जुने तूप पाजावे तीळ, गुग्गुळ, दूर्वा, डाळी व गुळ यांचा पुनःपुन्हा लेप करावा महाळुंगाची पाने दातांनी चावून ती व्रणावर बांधावीत नंतर रुईचे दूध घालून रेचक द्यावे अंकोलाच्या उत्तरेकडील मुळाचा काढा तूप घालून किंवा पांढऱ्‍या पुनर्नवेचा काढा धोतऱ्‍याच्या फळाचे चूर्ण घालून पाजावा. जलवेतसाची पाने, साल व मूळ यांचा काढा किंवा त्याने सिद्ध केलेले तुपाचे पान, त्या तुपाचे अभ्यंग, लेप व ते तूप नाकात घालण्याने विष-हरण करते. हा योग फार उपयुक्त आहे. ‘भीमरुद्र रुस’ नावाने औषध उपयुक्त आहे. ते कोल्हा चावल्याने होणाऱ्या विषबाधेवरही उपयोगी आहे. साठे तांदूळ, तांबसाळ, जव, उडीद, कुळीथ, तूप, दूध यांचा आहारात उपयोग करावा. मंतरलेल्या औषधी, रत्‍ने धारण करावीत त्यांच्या पाण्याने स्‍नान करावे थंड व पाणी नसलेल्या घरात रोग्यास ठेवावे. ओजाचे नवे घटक निर्माण व्हावेत म्हणून गाईचे दूध व तूप यांचाच आहार घ्यावा वा त्यांचा भरपूर उपयोग आहारात करावा.

 

जोशी, वेणीमाधवशास्त्री

 


पशूंतील अलर्क रोग : हा विशिष्ट प्रकारचा मस्तिष्कशोथ, तंत्रिकाकोशिकांमध्येच वाढ होणाऱ्या तसेच तंत्रिका–ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचे) विशेष आकर्षण असलेल्या विषाणूंमुळे होतो. पिसाळलेल्या प्राण्याच्या चावण्याने जखमेतून विषाणूंचा प्रवेश होऊन रोग संभवतो. विषाणू जखमेतील तंत्रिका-ऊतकांच्या संपर्कात आल्यानंतर तंत्रिकाग्राच्या मार्गाने मेरुरज्‍जूत (मणक्याच्या आतील पोकळीतील तंत्रिका-रज्‍जूत) व मस्तिष्कात पोहोचतो. तो क्वचितच रक्तात आढळतो व आढळला तरी तेथे फार वेळपर्यंत नसतो. केंद्रीयतंत्रिका-तंत्रात [→ तंत्रिका तंत्र] विशिष्ट मस्तिष्कशोथ झाल्यामुळे प्राण्याची शुद्धी हरपून प्रेरक तंत्रिकांचा अंगवध होऊन शेवटी मृत्यू ओढवतो.

 

 ऑस्ट्रेलियाशिवाय सर्व देशांत हा रोग आढळत असला तरी इंग्‍लंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क व हॉलंड या देशांत मात्र प्रतिबंधक कायद्यांच्या साहाय्याने या रोगाचा नायनाट झालेला आहे. रोग पुन्हा उद्भवू नये म्हणून परदेशांतून येणाऱ्या कुत्र्यांना सहा महिने संक्रमणकालातील विलग्नवासामध्ये ठेवतात.

 

परिपाककाल : कुत्री, शेळ्या, मेंढ्या, डुकर या प्राण्यांत  परिपाककाल १५ ते ६० दिवस व गाई, म्हशी व घोडे यांत ३० ते ९० दिवस असतो.

 

कुत्र्यांतील प्रकार : कुत्र्यांत या रोगाचे दोन प्रकार आढळतात : (१) उग्र व (२) मूक (मंद). लक्षणे प्रकाराप्रमाणे निरनिराळी आढळतात.

 

(१) उग्र प्रकार : पिसाळलेला कुत्रा एक-दोन दिवसांनंतर खाणे खात नाही. दगड, कोळसा, गवत, बैठकीचे बसकर यांपैकी मिळेल ते चावून खाण्याचा प्रयत्‍न करतो. पिंजऱ्‍यामध्ये बंद करून ठेवला असता सळ्या चावण्याचा प्रयत्‍न करतो. मोकळा असल्यास समोर दिसेल त्या रस्त्याने धावत सुटतो. सहसा कोणाच्याही अंगावर जात नसला तरी वाटेत आडवे येईल त्याला चावतो. एक-दोन दिवसांनंतर अशक्त होऊन लटपटल्यासारखा करतो. पुष्कळ वेळा खाली पडतो, पुन्हा उठण्यासाठी धडपडतो. सुरुवातीस उठू शकला तरी काही तासांनंतर त्याला उठवत नाही. नंतर पडून राहतो व एक–दोन दिवसांत मृत्यू पावतो. हा प्रकार बेवारशी मोकाट कुत्र्यांत विशेषकरून आढळतो.

 

(२) मूक प्रकार : यात कुत्र्याच्या तोंडाचा जबडा उघडा राहतो, जीभ बाहेर पडते व आत घेता येत नाही. घसा व स्वरयंत्र यांच्या स्‍नायूंवरून वारे गेल्यामुळे कुत्र्याला आवाज करता येत नाही. लाळ बाहेर पडते, जीभ मातीत लोळत राहिल्यास काळी पडते. मल-मूत्र-विसर्जनावर ताबा राहत नाही. रोगी एकसारखा पडून राहून एक-दोन दिवसांतच मृत्यू पावतो. हा प्रकार पाळलेली कुत्री तसेच लहान कुत्री यांत विशेषकरून आढळतो.

 

शवपरीक्षा : पहिल्या प्रकारात मेलेल्या कुत्र्याच्या पोटात दगड, कोळसा वा अन्य गिळलेल्या वस्तू आढळतात. इतर कोणत्याही अवयवांत बदल झालेला आढळत नाही. मेलेल्या कुत्र्याचा मेंदू ताबडतोब काढून सूक्ष्मदर्शकाखाली तपासला असता नेग्री-पिंड आढळतात. मेंदूचा विद्राव उंदराला टोचला, तर उंदराच्या मेंदूतही नेग्री-पिंड आढळतात.

 

मांजर : या प्राण्यात हा रोग उग्र प्रकारचा होतो. रोगी मांजर समोरच्या प्रत्येक वस्तूवर वा माणसावर हल्ला करून पंजाने किंवा दाताने जखमा करते. मांजरात रोगाचे प्रमाण कमी असले तरी प्रकार उग्रच असतो.

 

गाय-म्हैस : ह्यांना पिसाळलेले कुत्रे चावले तर यांनाही रोग होतो. तो उग्र प्रकारचा असतो. जनावर गव्हाणीत डोके आपटू लागते, उठबस करते, खात नाही, तोंडातून लाळ गळू लागते, त्याच्यासमोर गेल्यास मारण्यास धावते, डोळे लाल होतात, एकसारखे लघवीला होते, जोरजोराने हंबरते व आवाज निराळा असतो. मोकळे असल्यास इतर जनावरांना मारते व आजूबाजूच्या इतर वस्तूंस किंवा झाडांस धडक देते. एक-दोन दिवसांत जमिनीवर पडते, थकलेभागलेले होऊन त्याला अशक्तपणा येतो. रोगाची मुदत ३ ते ६ दिवस असते.

 

शेळीमेंढी : रोगाची लक्षणे गाई—म्हशींतील रोगलक्षणांप्रमाणेच असतात, पण रोगाची मुदत मात्र २ ते ४ दिवसच असते.

 

घोडा : उग्र प्रकारची लक्षणे असली तरी नासधूस करण्याची प्रवृत्ती कमी असते. तबेल्यात समोर दिसणाऱ्‍या वस्तू चावणे, तसेच जखम झालेल्या जागी वा इतर ठिकाणी ओरबाडणे, तहान लागणे, एकसारखे पाणी पिण्यासाठी प्रयत्‍न करूनही गिळता न येणे, खाता न येणे अशी लक्षणे आढळतात.

 

डुकर : लक्षणे कुत्र्याच्या लक्षणांसारखीच असतात.

 

वटवाघूळ : डेस्मोडस रोटंडस म्युरिन या जातीच्या वटवाघुळामुळे एका प्रकारच्या अलर्क रोगाला ‘अंगवधी अलर्क रोग’, ‘अंशघाती  अलर्क रोग’ वगैरे नावे दिलेली आहेत. कुत्र्यामुळे होणाऱ्‍या रोगाच्या लक्षणांपेक्षा या प्रकारात लक्षणे भिन्न असली, तरी एकाच रोगाचा तो भिन्न प्रकार आहे. यात रोगसंक्रमण लालाग्रंथीपुरतेच मर्यादित असल्यामुळे कोठलीही लक्षणे नसली तरी हा प्राणी कित्येक महिनेपर्यंत रोग उत्पन्न करू शकतो. ही वटवाघुळे रक्तावरच जगणारी असून आपल्या तीक्ष्ण, दंतूर दातांनी वाटीच्या आकाराच्या जखमा करतात. त्यांतील रक्त चावून तसेच चाटून ती स्वतःचे पोषण करतात. त्याच वेळी लाळेवाटे आपोआप रोगप्रसार होतो. ही वटवाघुळे मेक्सिको, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिका येथेच आढळतात.

 ब्राझील, त्रिनिदाद व मेक्सिको येथे कुत्र्यांचा अलर्क रोग नव्हता. परंतु त्या देशांत गुरांमध्ये अलर्क रोगाच्या साथी आढळल्यामुळे १९१३ — ४४ ह्या मुदतीत रोगाचे कारण शोधण्याची संधी मिळाली. ह्या कामासाठी उत्तेजन मिळाल्यामुळे परिणामी ह्या प्रदेशात अलर्क रोग वटवाघुळांत सार्वकालिक कारणाच्या स्वरूपात असल्याचे सिद्ध झाले.

 

 फळे व कीटक खाणाऱ्‍या वटवाघुळांमध्येही अलर्क रोग आढळतो. भर दिवसा उडणारे तसेच हल्ला करून चावणारे वटवाघूळ रोगसंक्रामित असण्याची शक्यता असते.

 


चिकित्सा : पिसाळलेला कुत्रा किंवा जनावर चावल्यामुळे आजारी झालेल्या जनावरावर कोणताही उपचार लागू पडत नाही. जखमेच्या जागेवर दाहक औषधाने डागणी करतात व लस ठराविक मात्रेत व ठराविक दिवसपर्यंत टोचतात. पिसाळलेल्या कुत्र्याची किंवा जनावराची लाळ शरीरावर कोठेही लागली असली, तरीसुद्धा जनावरांना लस टोचण्याची आवश्यकता असते.

 

जनावर

मात्रा (मिलि.) 

मुदत (दिवस) 

कुत्रा 

३ 

७ 

शेळी,मेंढी 

५ 

१४ 

तट्टू 

१॰ 

१४ 

गाय, बैल, म्हैस, घोडा 

२० 

१४ 

 

रोगप्रतिबंधक :कुत्रा पिसाळू नये यासाठी तो चार महिन्यांचा झाल्यावर विशिष्ट प्रतिबंधक लस टोचतात. नंतर दर सहा महिन्यांनी टोचतात. 

 

अलीकडे जिवंत विषाणूंपासून लस तयार करण्यात आलेली असून या लशीने कुत्र्यांची रोगप्रतिकारशक्ती तीन वर्षांपर्यंत टिकविली जाते.

 

बापट, श्री. ह.

 

संदर्भ : 1. Boyd, W. Textbook of Pathology, Philadelphia, 1961.

          2. Harrison, T. R. Adams, R. D. Bennett, I. L. Resnik, W. H. Thorn, G. W. Wintrobe,  M. M. Principles of Internal Medicine,Tokyo, 1961.