अलगर्द : (हायड्रस ). दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह. ३०० उ. अक्षांशाच्या पलीकडे हा दिसत नाही. यात एकही मोठा तारा नाही. सर्वांत मोठ्या आल्फा ताऱ्याची प्रत (ताऱ्यांचा तेजस्वीपणा मोजण्याचे माप,→ प्रत) तीन आहे. यमुना (इरिडानस) या समूहातील अग्रनद (आचर्नार) या पहिल्या प्रतीच्या ताऱ्याच्या आग्नेयीस हा तारकासमूह येतो. या समूहाच्या पूर्वेस मोठा मॅगेलनी मेघ व मलयाचल (मेन्सा), पश्चिमेस कारंडव (तुकाना) व छोटा मॅगेलनी मेघ, उत्तरेस जालक (रेटिक्युलम) आणि दक्षिणेस अष्टक (ऑक्टन्स) असे समूह आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात दक्षिण क्षितिजाजवळ ताऱ्यांच्या नकाशाच्या मदतीने यातील आल्फा तारा पाहणे शक्य होते.
कोळेकर, वा. मो.
“