अलंकार, साहित्यातील : शब्दांचे, अर्थाचे वा दोन्हींचे सौंदर्य वाढविणारी अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा आदी विशिष्ट शब्दार्थयोजना ‘अलंकार’ या नावाने ओळखली जाते. रस, गुण वा रीतीसुद्धा सौंदर्यकारक असली तरी त्याहून अलंकार भिन्न होत, असे अनेकांचे मत आहे. चमत्कृतिजनक शब्दार्थयोजना म्हणजे अलंकार, अशीही व्याख्या साहित्यशास्त्रकार करतात. शब्दार्थांच्या सौंदर्याचा प्रश्न मुख्यतः ललित साहित्यकृतींच्या संदर्भात येतो. त्यामुळे अलंकारांची चर्चा साहित्यशास्त्राला अपरिहार्य ठरते. ‘अलंकार’ या शब्दाचा मुख्यार्थ पाहिला तर दागिना किंवा शोभादायक वस्तू असा आहे. विविध प्रकारच्या दागिन्यांनी शरीर जसे सुशोभित होते, त्याचप्रमाणे निरनिराळ्या अलंकारांनी साहित्य सजविले जाते, अशी कल्पना हा शब्द साहित्याच्या संदर्भात वापरण्यामागे आहे. काही संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी शब्दार्थांना काव्याचे शरीर मानले. रीती अथवा विशिष्ट शब्दरचनेमुळे निर्माण होणारी भाषाशैली म्हणजे त्यांच्या मते या काव्यरूपी शरीराच्या अवयवांची ठेवण. श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सौकुमार्य, अर्थव्यक्ती, उदारता, ओजस्, कांती आणि समाधी ह्या निरनिराळ्या रीतींच्या दहा गुणांची तुलना त्यांनी शरीर धारण करणाऱ्या काव्यसुंदरीच्या स्वभावगुणांशी केली आणि अलंकार हे दागिन्यांप्रमाणे काव्यशरीरास शोभा देतात असे सांगितले. तथापि शरीरावरील अलंकार आणि काव्यालंकार यांची अशी तुलना करण्याने दिशाभूल होण्याची शक्यता आहे. भाषा ही शब्दार्थांनी घडते आणि काव्यालंकारही शब्दार्थांनीच घडलेले असतात म्हणून शरीरावरून दागिने जसे काढून ठेवता येतात तसे काव्यालंकार काव्यापासून वेगळे करता येत नाहीत. रा. श्री. जोग यांच्यासारख्या आधुनिक टीकाकारांनी
‘अलंकारांस काव्याचे विभ्रम म्हणावे ’ असे आग्रहाने प्रतिपादिले आहे. परंतु असे म्हणणेही आलंकारिक आहे शास्त्रीय नव्हे.
अलंकारांचे प्रकार : शब्दालंकार, अर्थालंकार आणि उभयालंकार असे अलंकाराचे एकूण तीन प्रकार मानले आहेत. शब्दालंकार हे विशिष्ट शब्दयोजनेवर आधारलेले असतात. त्यांचा अर्थाशी संबंध नसतो. उदा., अनुप्रास आणि यमक हे शब्दालंकार आहेत. अनुप्रासात विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती केली जाते आणि ती साधण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात. उदा., तांब्यांच्या पुढील ओळी:
कडकडा फोड नभ, उढव उडुमक्षिका
खडखडवी दिग्गजां, तुडव रविमालिका
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवी चहुंकडे या समुद्रा
या ओळींत ‘ड्’ या वर्णाची पुनरावृत्ती आहे.
अनुप्रासाचे छेकानुप्रास, वृत्त्यनुप्रास, लाटानुप्रास, श्रुत्यनुप्रास यांसारखे प्रकार आहेत. तथापि एका किंवा अनेक वर्णांची पुनरावृत्ती हा त्या सर्व प्रकारांतील समान दुवा आहे. अनुप्रास हा एक शब्दालंकार असला, तरी उत्तम काव्यात तो अर्थपूर्ण होऊ शकतो. वरील ओळींत ‘ड्’ या वर्णाच्या पुनरावृत्तीतून तांडवनृत्याचा आभास निर्माण केला आहे आणि कवितेच्या आशयाला तो पूरक ठरला आहे. केवळ शब्दचमत्कृतीसाठी जेव्हा अनुप्रासाचा वापर करण्यात येतो, तेव्हा त्यातील निरर्थकता प्रकर्षाने जाणवते.
वंशी नादनटी तिला कटितटीं खोवोनी पोटीं पटीं।
कक्षे वामपुटीं स्वशृंगनिकटीं वेताटिही गोमटी।।
जेवी नीरतटीं तरू तळवटीं श्रीश्यामदेहीं उटी।
दाटी व्योमघटीं सुरां सुखलुटी घेती जटी धूर्जटी।।
या वामनाच्या रचनेतील ‘ट्’ या वर्णाची पुनरावृत्ती अशीच आहे.
यमकात वर्णांची पुनरावृत्ती होते तथापि तिचे स्वरूप अनुप्रासात होणाऱ्या वर्णांच्या पुनरावृत्तीहून भिन्न असते. काहींच्या मते यमक हा अनुप्रासाचाच एक प्रकार होय. यमकात वर्णावृत्ती विशिष्ट स्थानी होत असते. ही स्थाने लक्षात घेऊन यमकांचे विविध प्रकार मानलेले आहेत. त्या प्रकारांपैकी अंत्ययमक हा प्रकार मराठी कवितेला अत्यंत जवळचा होय. बराच काळ तो मराठी कवितेचा अपरिहार्य घटक मानला जाई. अंत्ययमकात एका चरणाच्या शेवटी आलेला एक वर्ण उपांत्य स्वरासहित दुसऱ्या चरणाच्या शेवटी यावा, ही किमान अपेक्षा असते. तसेच यमकासाठी वापरलेल्या शब्दांचा अर्थ भिन्न असला पाहिजे. अनेक मराठी कवींनी हा नियम काटेकोरपणे पाळलेला नसला, तरी मोरोपंतांसारख्या कवींनी मात्र एकाहून अधिक वर्णांची यमके अर्थभेदासह साधलेली आहेत असे दिसून येते. उदा.,
देउनि उत्साह मला श्रीभागवतार्थ वदविला साचा
आनंद यापुढें तो तुच्छ ब्रह्मादि पदविलासाचा.
अर्थालंकार अर्थावर अधिष्ठित असतात. शब्दालंकारांत विशिष्ट शब्दांतील विशिष्ट वर्णाक्षरे महत्त्वाची असतात, हे अनुप्रास आणि यमक यांच्या वर दिलेल्या उदाहरणांवरून दिसून येईल. बहुसंख्य अलंकार अर्थांवरच आधारलेले आहेत. अर्थालंकार कसे निर्माण होतात, याचा विचार करून निरनिराळ्या तत्त्वांवर त्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न साहित्यशास्त्रकारांनी केलेला आहे. त्यांतील अमुक एक वर्गीकरण सर्वस्वी ग्राह्य आहे, असे म्हणता येत नाही. एखाद्या अलंकाराचे एक वैशिष्ट्य ध्यानात घेऊन त्याला एका विशिष्ट वर्गात टाकले असता, त्याच्या दुसऱ्या एखाद्या वैशिष्ट्यानुसार तो दुसऱ्या एखाद्या वर्गातही बसू शकेल, असेही केव्हा केव्हा लक्षात येते. अलंकारांचे रेखीव आणि सर्वस्वी बंदिस्त असे वर्गीकरण करणे यामुळे अत्यंत अवघड होऊन बसते. तथापि अलंकारांच्या वर्गीकरणाचे एक उदाहरण म्हणून रुय्यकाच्या अलंकार-सर्वस्व या ग्रंथातील अलंकारांचे हेर्मान याकोबी यांनी दाखविलेले वर्गीकरण पाहण्यासारखे आहे. हे वर्गीकरण नऊ तत्त्वांवर करण्यात आले असून ती नऊ तत्त्वे व त्यांवर आधारलेले अर्थालंकार खालीलप्रमाणे आहेत.
(१) सादृश्य : (अ) भेदाभेदतुल्यप्रधान : (१) उपमा, (२) अनन्वय, (३) उपमेयोपमा, (४) स्मरण. (आ) अभेदप्रधान : आरोपगर्भ – (१) रूपक, (२) परिणाम, (३) संदेह, (४) भ्रांतिमान्, (५) उल्लेख, (६) अपन्हुती. अध्यवसायगर्भ – (१) उत्प्रेक्षा, (२) अतिशयोक्ती. गम्यमानौपम्यमूलक – (१) तुल्ययोगिता, (२) दीपक,
(३) प्रतिवस्तूपमा, (४) दृष्टांत, (५) निदर्शना. (इ) भेदप्रधान – (१) व्यतिरेक, (२) सहोक्ती, (३) विनोक्ती.
(२) गम्यत्व : (१) समासोक्ती, (२) परिकर, (३) श्लेष, (४) अप्रस्तुतप्रशंसा, (५) अर्थांतरन्यास,
(६) पर्यायोक्त, (७) व्याजस्तुती, (८) आक्षेप.
(३) विरोध : (१) विरोधाभास, (२) विभावना, (३) विशेषोक्ती, (४) अतिशयोक्ती, (५) असंगती,
(६) विषम, (७) सम, (८) विचित्र, (९) अधिक, (१०) अन्योन्य, (११) विशेष, (१२) व्याघात.
(४) शृंखलाबंधत्व : (१) कारणमाला, (२) एकावली, (३) माला-दीपक, (४) उदार.
(५) तर्कन्यायमूलत्व : (१) काव्यलिंग, (२) अनुमान.
(६) वाक्यन्यायमूलत्व : (१) यथासंख्य, (२) पर्याय, (३) परिवृत्ती, (४) परिसंख्या, (५) अर्थापत्ती,
(६) विकल्प, (७) समुच्चय, (८) समाधी.
(७) लोकन्यायमूलत्व :(१) प्रत्यनीक, (२) प्रतीप, (३) मीलित, (४) सामान्य, (५) तद्गुण,
(६) अतद्गुण, (७) उत्तर.
(८) गूढार्थप्रतीती : (१) सूक्ष्म, (२) व्याजोक्ती, (३) वक्रोक्ती, (४) स्वभावोक्ती, (५) भाविक,
(६) उदात्त.
(९) रसाश्रय : (१) रसवत्, (२) प्रेयान्, (३) ऊर्जस्वी, (४) समाहित, (५) भावोदय, (६) भावसंधी,
(७) भावशबल, (८) संसृष्टी, (९) संकर.
अर्थालंकार कसे निर्माण होतात, हे जाणून घेण्याच्या दिशेने एक प्रयत्न म्हणून या नऊ तत्त्वांचे स्पष्टीकरण त्यांवर आधारलेल्या अलंकारांपैकी एकेका अलंकाराचे उदाहरण देऊन करता येईल.
(१) साधर्म्यावर आधारलेल्या अलंकारांपैकी ‘उपमा’ या अलंकाराचे महत्त्व मोठे आहे. उपमा हा एक अत्यंत प्राचीन अलंकार आहे. उपमेचा उल्लेख यास्काच्या निरुक्तातही आढळतो. ऋग्वेदातही उपमा आहेत. सर्व अर्थालंकार म्हणजे एका उपमेचीच विविध रूपे आहेत, असा विचारही संस्कृत साहित्यशास्त्रात मांडला गेला आहे. भिन्न वस्तूंमधील साधर्म्य दाखवून उपमा हा अलंकार साधला जातो. मात्र हे साधर्म्य दाखवून देत असतानाच त्या वस्तूंमधील भिन्नत्वाची जाणीवही कवीच्या मनात असतेच.
गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसापरी डोळे
या चंद्रशेखरांच्या काव्यपंक्तीत एक स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन आले आहे. त्या स्त्रीच्या डोळ्यांचे हरणाच्या पाडसाच्या डोळ्यांशी साधर्म्य दाखविले आहे. ज्या वस्तूचे वर्णन उपमेच्या साहाय्याने करावयाचे त्या वस्तूस‘उपमेय’ किंवा ‘प्रस्तुत’असे म्हणतात.
या उपमेयास वा प्रस्तुतास ज्याची उपमा द्यावयाची त्यास ‘उपमान’ अथवा ‘अप्रस्तुत’ असे म्हणतात. दोन भिन्न वस्तूंमधील साधर्म्य दाखवून उपमा निर्माण करण्यासाठी परी, जेवी, जैसी, जैसे यांसारखे उपमाप्रतिपादक शब्द वापरले जातात. उपमेचे पूर्णोपमा, लुप्तोपमा, मालोपमा असे अनेक प्रकार आहेत.
(२) साधर्म्यानंतर विरोध हे अलंकारनिर्मितीचे आणखी एक महत्त्वाचे तत्त्व होय. मात्र विरोधाधिष्ठित अलंकारांमधून जो विरोध दाखविण्यात येतो, तो वस्तुतः कविप्रतिभेने निर्माण केलेला विरोधाचा आभास असतो. अशा अलंकारांपैकी एका अलंकारास तर ‘विरोधाभास’ असेच नाव देण्यात आले आहे.
वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि
लोकोत्तराणां चेतांसि को नु विज्ञातुमर्हति
हा भवभूतीच्या उत्तररामचरितामधील श्लोक विरोधाभासाचे उत्तम उदाहरण आहे. लोकोत्तर व्यक्तींची मने वज्राहून कठोर आणि फुलांहून मृदू असतात, असे कवीने सांगितले आहे. कठोरपणा आणि मृदुत्व हे धर्म एकमेकांशी विरोधी असूनही एकाच वस्तूत नांदत आहेत, असे सांगितल्यानंतर या सांगण्यात एकदम विरोध आणि विसंगती जाणवते. परंतु ही विसंगती केवळ वरवरची आहे, हेही ताबडतोब लक्षात येते. काही विशिष्ट प्रसंगी लोकोत्तर माणसे कठोरपणे वागली तरी एरव्ही त्यांचे मन फुलांसारख्या मृदू भावनांनी ओथंबलेले असते, हा कवीचा अभिप्राय लक्षात येतो.
(३) गम्यत्व किंवा सूचकता हे काही अलंकारांचे वैशिष्ट्य असते. जी गोष्ट सांगावयाची, ती सरळ सरळ न सांगता ध्वनीने अथवा सूचकतेने सांगितल्यामुळे अशा अलंकारांना अलंकारत्व प्राप्त झालेले असते. ‘अप्रस्तुतप्रशंसा’ हा अलंकार याचे उदाहरण म्हणून पाहण्यासारखा आहे. या अलंकारात जो विषय सांगावयाचा असतो, त्याचे वर्णन करण्याऐवजी दुसऱ्या कोणत्या तरी विषयाचे वर्णन करून तो सूचित केला जातो. उदा.,
येथें समस्त बहिरे वसताति लोक
कां भाषणें मधुर तूं करिशी अनेक.
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक,
वर्णावरून तुजला गणतील काक.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या या ओळींत कोकिळ या पक्ष्यास उद्देशून भाषण केलेले दिसते. त्याच्या मधुर गाण्याची ज्यांना पर्वा नाही अशा म्हणजेच बहिऱ्या, माणसांसमोर त्याने कूजन केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा वरवरचा आशय. तथापि कवीला येथे कलावंत व अरसिक अभिप्रेत आहेत. वरील उदाहरण अप्रस्तुतप्रशंसा या अलंकाराच्या एका विशिष्ट प्रकाराचे असून त्या प्रकारास मराठीत ‘अन्योक्ति’ हे नाव प्राप्त झाले आहे.
(४) शृंखलाबंधत्वावर आधारलेल्या अलंकारांत एखादे पद अथवा वाक्य शृंखलेप्रमाणे दुसऱ्या पदाशी वा वाक्याशी संबद्ध झालेले असते. उदा., ‘कारणमाला’ हा अलंकार. या अलंकारात कार्यकारणांची साखळी असते. या अलंकाराचे उत्तम उदाहरण श्रीभद्भगवद्गीतेत सापडते.
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।
क्रोधामुळे मोह निर्माण होतो या मोहातून स्मृतिभ्रम होतो हा स्मृतिभ्रमच पुढे बुद्धिनाशाला कारणीभूत होतो आणि बुद्धिनाश सर्वनाशाकडे नेतो. कार्यकारणांच्या साखळीमुळे या ओळींना अलंकारत्व प्राप्त झाले आहे.
(५) तर्कन्यायाधिष्ठित अलंकारांत वर्ण्य विषयाची मांडणी तार्किक स्वरूपाची असते.
तर्कशास्त्र आणि काव्य यांची क्षेत्रे आणि पद्धती भिन्न आहेत. तथापि काव्यात येणारा हा तर्क रूक्ष नसून काव्याला उपकारक असाच असतो. अशा अलंकारांपैकी एकाचे नावच ‘अनुमान’ असे आहे. संस्कृत दर्शनांमधील प्रमाण-विचारात अनुमान-प्रमाणाचा विचार येतो. दोन गोष्टींच्या नियत साहचर्यावरून काही अनुमान काढता येते. उदा., अग्नी आणि धूर यांचे नियत साहचर्य. ते ध्यानात घेऊन जेथे धूर असतो तेथे अग्नीचे अस्तित्वही असते, असे अनुमान काढता येते. तर्कशास्त्रातील परिभाषेनुसार या अनुमानवाचक विधानात धूर हे साधन आणि अग्नी हे साध्य होय. म्हणजेच अनुमान ज्यावर आधारलेले असते ते साधन आणि ज्याच्यासंबंधी अनुमान केले जाते ते साध्य. अनुमान या अलंकारात असे साधन आणि साध्य यांचे विधान असते.
जेथें नेत्रकटाक्ष चारुललना स्वच्छंद या फेकिती,
तेथें हे पडती सदैव शर जे मर्मास कीं भेदिती,
क्रोधाविष्ट पहा सदा मदन हा योजून चापीं शरा,
अग्रे धांवुन शासना करितसे, हा दास त्यांचा खरा.
ज्या अर्थी सुंदर स्त्रिया आपले कटाक्ष जेथे टाकतात, तेथेच मदनाचे मर्मभेदी बाण येऊन रुततात, त्या अर्थी मदन धावत असला पाहिजे, आणि त्या डोळ्यांनी खुणावतील तेथे तो आपले बाण सोडीत असला पाहिजे, असा कवीचा आशय आहे. या ठिकाणी ‘सुंदर स्त्रिया जेथे आपले कटाक्ष टाकतात तेथे मदनाचे बाण येऊन रुततात’ हे साधन आहे. या साधनाच्या आधारे ‘मदन हा त्या स्त्रियांचा दास असला पाहिजे’ वगैरे साध्याविषयी अनुमान केलेले आहे.
(६) काही अलंकार वाक्यन्यायमूलक असतात. वाक्यातील पदांचा आणि अर्थाचा विशिष्ट क्रम किंवा वैशिष्ट्यपूर्ण वाक्यार्थ यांवर हे अलंकार आधारित असतात. ‘यथासंख्य’ या अलंकारात पदांचा क्रम विशिष्ट प्रकारचा असतो. वाक्यातल्या एका पदावलीत काही पदार्थ विशिष्ट क्रमाने येतात, तर दुसऱ्या पदावलीत या पदार्थांशी अन्वित होणारे पदार्थ त्याच क्रमाने येतात. उदा., तांब्यांच्या खालील ओळी :
वाटे स्त्रीच सुधा, हलाहलहि ती, ती वारुणी दारुण,
दृष्टिक्षेप पुरे, उठे मृत, मरे प्राणी, पडे झिंगुन.
पहिल्या ओळीत कवी ‘स्त्री म्हणजे सुधा, हलाहल आणि वारुणी होय’ असे सांगतो. दुसऱ्या ओळीत स्त्रीचा दृष्टिक्षेप होताच काय होते हे सांगितले आहे. स्त्री म्हणजे सुधा, हलाहल आणि वारुणी असल्यामुळे या तिन्ही वस्तूंचे जे परिणाम होतात, तेच तिच्या दृष्टिक्षेपामुळेही होतात. या वस्तूंचे परिणाम कथन करीत असता कवी सुधा, हलाहल आणि वारुणी हा पहिल्या वाक्यात सांगितलेला क्रम सोडीत नाही, हे लक्षात येईल.
(७) ‘लोकन्याय’ हे तत्त्व काही अलंकारांच्या अधिष्ठानी असते. ‘प्रत्यनीक’ हा अलंकार याचे उत्तम उदाहरण आहे. लोकस्वभावाच्या एका वैशिष्ट्यावर हा अलंकार आधारलेला आहे. एखाद्या दुबळ्या व्यक्तीचे एखाद्या बलवान व्यक्तीशी वैर असल्यास ही दुबळी व्यक्ती त्या समर्थ शत्रूशी उघड सामना न देता त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या कुठल्या तरी दुर्बल व्यक्तीला छळून अप्रत्यक्षपणे सूडाचे समाधान मिळविते. ह्या जनरीतीचा आधार घेऊन कविप्रतिभा अशाच प्रकारची कल्पित परिस्थिती मांडते, तेव्हा हा अलंकार होतो. उदा.,
पूर्वीं कुठें कधी काळीं केलें दग्ध शिवें तुला,
शिवभक्त म्हणूनी का मदना छळिसी मला.
शंकराने मदनाला जाळून टाकले, या पौराणिक कथेवर आधारलेली एक कल्पित परिस्थिती कवीने येथे मांडली आहे. प्रणयभावनेने तळमळणारा
कवी शिवभक्त असल्यामुळे मदन त्याचा सूड उगवतो आहे, अशी कल्पना.
काही अलंकार गूढार्थप्रतीतीमुळे होतात. ‘सूक्ष्म’ हा असा अलंकार आहे. सर्वसामान्यांना कळणार नाही असा गूढार्थ किंवा सूक्ष्मार्थ चातुर्याने सूचित करण्याने हा अलंकार होतो. उदा.,
प्रश्नार्थक तयाची ती मुद्रा पाहूनिया तिने
लीला-कमल हातींचे हळूं हासत झांकिलें.
येथे प्रियकराच्या मनातला प्रश्न ओळखून प्रेयसीने त्याला चातुर्याने आपल्या मनातला भाव एका गूढ खुणेने सूचित केला आहे. हातातले लीलाकमल सस्मित मुद्रेने मिटवून तिने कमळे मिटण्याच्या वेळी, म्हणजे सूर्यास्त झाल्यावर, आपण भेटू असे त्याला सुचविले.
(९) त्यानंतर रसाश्रयी म्हणून मानले गेलेले रसवत्, प्रेयान्, ऊर्जस्वी यांसारखे अलंकार येतात. जेव्हा एखादा विशिष्ट रस दुसऱ्या रसाचा अंगभूत म्हणून काव्यात येतो, तेव्हा ‘रसवत्’ नावाचा अलंकार मानावा, असे काही अलंकारवेत्ते मानतात. उदा., महाभारतात भूरिश्रव्याच्या मृत्यूचा प्रसंग आहे. रणांगणावर तो ठार झाल्यानंतर त्याची पत्नी विलाप करीत असते. त्याचा तुटका हात पाहून त्या हाताने केलेल्या शृंगारचेष्टा तिला आठवतात. या शृंगारचेष्टांच्या वर्णनामुळे शृंगाररसाची प्रतीती येतेच पण हा शृंगाररस येथे प्रधान नसून करुणरसाला साहाय्यकारी अथवा अंगभूत म्हणून आलेला आहे, हेही आपणास जाणवते. येथे ‘रसवत्’ अलंकार झाला आहे. तथापि अशा अलंकारांना स्वतंत्र अलंकार मानावेत हे मम्मटासारख्या साहित्यशास्त्रकारांना मुळीच मान्य नाही.
शब्दालंकार आणि अर्थालंकार यांच्याखेरीज ‘उभयालंकार’ असा अलंकारांचा स्वतंत्र वर्ग मानण्यात आला आहे. ज्या अलंकारांत शब्द आणि अर्थ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या अलंकारांस ‘उभयालंकार’ असे म्हणतात. रुय्यकाच्या अलंकार-वर्गीकरणात उभयालंकार दाखविलेले नाहीत. सर्वसाधारणतः उभयालंकार म्हणून मानला गेलेला पुनरुक्तवदाभास हा अलंकारही त्याने शब्दालंकार म्हणूनच गणला आहे. अर्थालंकारांच्या मानाने शब्दालंकार आणि उभयालंकार फारच कमी आहेत. उभयालंकार नेमके किती मानावेत, याबद्दलही साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांत मतभेद आहेत, असे दिसते. काहींच्या मते पुनरुक्तवदाभास, श्लिष्ट उपमा, परंपरितरूपक आणि विरोधाभासासारखा अलंकारही उभयालंकार होय. काही पुनरुक्तवदाभास आणि श्लेष यांना उभयालंकार मानतात. काहींना श्लेष हा एकच उभयालंकार आहे, असे वाटते. तथापि ‘पुनरुक्तवदाभास’ हा बहुतेकांनी उभयालंकार मानला आहे. या अलंकारात पुनरुक्तीचा आभास होतो. एकाच अर्थाचे वाटणारे दोन शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत, असा आभास काही वेळा निर्माण होतो. वस्तुतः ते शब्द भिन्न अर्थांनी वापरलेले असतात आणि हे ध्यानात आल्यावर एक प्रकारच्या चमत्कृतीचा अनुभव येतो. वामनाने वर्णिलेल्या ‘लोपामुद्रासंवादा’तले उदाहरण या दृष्टीने पाहण्यासारखे आहे.
जाय तो रडत दाटत कंठ,
प्राप्त होय मजला दशकंठ
पद्मिनी उपडितो गज हस्तीं
ने तसा उचलुनी मज हस्तीं.
आपल्याला रावणाने कसे पळविले, हे सीता लोपामुद्रेस सांगत आहे. येथे तिसऱ्या ओळीत गज आणि हस्तीं असे दोन शब्द जवळजवळ आले आहेत. दोन्ही शब्दांचा ‘हत्ती’ असा अर्थ घेण्याकडे एकदम कल होतो. हत्ती जसा कमळ उपटून नेतो तसे रावणाने मला नेले, असे सीतेला सांगावयाचे आहे. ह्या आशयाचा पूर्वार्ध ‘पद्मिनी उपडितो गज’ किंवा ‘पद्मिनी उपडितो हस्तीं’ एवढ्याच शब्दांत व्यक्त होऊ शकत असताना गज आणि हस्तीं या दोन शब्दांची आवश्यकताच काय, अशी शंका येते. पण ‘हस्तीं’ या शब्दाचा अर्थ ‘सोंडेने’ असा होतो व कवीला येथे तो अभिप्रेत आहे, हे ध्यानात आल्यानंतर पुनरुक्तीच्या या आभासाची गंमत वाटते. या अलंकारात शब्द आणि अर्थ हे दोन्ही महत्त्वाचे आहेत.
अलंकारांसंबंधीच्या या विवेचनावरून शब्दांच्या, अर्थाच्या किंवा शब्द आणि अर्थ या दोहोंच्या कोणत्या ना कोणत्या चमत्कृतीखेरीज अलंकार अस्तित्वात येऊ शकत नाहीत, हे दिसून येईल. तथापि शब्दांची वा अर्थाची कोणतीही विशेष चमत्कृती नसताना अलंकारत्व पावणारा ‘स्वभावोक्ती’ हा अलंकार आहे. स्वभावोक्तीमध्ये वस्तूचे यथार्थ वर्णन अपेक्षित असते. कविकल्पनांचा आश्रय न करता साधे परंतु वास्तव असे वर्णन कमालीचे प्रत्ययकारी असू शकते. उदा., ना. वा. टिळकांच्या या ओळी :
मातीत ते पसरले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला श्रमही निवाले.
पारध्याचा बाण लागून मरण पावलेल्या एका पक्षिणीचे हे वर्णन आहे. या वर्णनात कसलीही विशेष चमत्कृती नाही. पण त्या पक्षिणीच्या मरणसमयीच्या अवस्थेचे हुबेहूब चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभे करण्याचे सामर्थ्य या ओळींत निश्चितपणे आहे. संस्कृत साहित्यशास्त्राप्रमाणे बालक, स्त्रिया, पशुपक्षी, वृक्षलता इत्यादिकांच्या क्रियास्वरूपाचे वर्णन म्हणजे ‘स्वभावोक्ती’ होय. कुंतकाने स्वभावोक्तीला अलंकार मानले नाही.
संस्कृतातील अलंकारविचार : संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी निरनिराळे अलंकार, त्यांच्या निर्मितीमागील तत्त्वे, त्यांची लक्षणे, त्यांचे वर्गीकरण इत्यादींसंबंधी सखोल चिंतन केलेले आहे. अलंकारांसंबंधीचे सर्वांत प्राचीन विवेचन आपणास भरताच्या⇨नाट्यशास्त्रात (इ. स. पू. २०० ते इ. स. २००) पाहावयास मिळते. तथापि भरतापूर्वीही अलंकारचर्चा होत असली पाहिजे कारण ‘अन्ये’, ‘अन्यैस्तु’ अशा शब्दांनी अन्य साहित्यशास्त्रकारांचे उल्लेख भरताने केले आहेत. या शास्त्रकारांचे ग्रंथ मात्र आपणास उपलब्ध झालेले नाहीत. नाट्यशास्त्रात उपमा, रूपक, दीपक आणि यमक असे फक्त चार अलंकार सांगितले आहेत. तसेच छत्तीस काव्यलक्षणे दिली आहेत. या काव्यलक्षणांचेच पुढे काव्यालंकारांत परिवर्तन झाले, असे मत काही विद्वानांनी मांडले आहे.
भरताच्या नाट्यशास्त्रानंतर भामहाच्या (सु. ६०० ते ७५० दरम्यान) काव्यालंकार या ग्रंथात अलंकारचर्चा पाहावयास मिळते. भरत ते भामह यांच्या दरम्यान अनेक आलंकारिक झाले असले पाहिजेत. त्यांच्यापैकी मेधावी नावाच्या आलंकारिकाचा भामहाने उल्लेखच केला आहे. भामहापूर्वी सांगितल्या गेलेल्या अलंकारांत मेधावीने ‘यथासंख्य’ या अलंकाराची भर घातली, असे भामह सांगतो. मेधावीसारख्या पूर्वसूरींचा भामहाला स्वतःच्या अलंकारविवेचनासाठी निश्चितच उपयोग झाला असावा. परंपरेने भामह हा अलंकारमताचा प्रवर्तक मानला जातो. भामहाने ३९ अलंकारांचा परामर्श घेतला आहे. अलंकारांचे नुसतेच विवेचन करून भामह थांबला नाही, तर काव्यशास्त्रात अलंकारांची स्वतंत्रपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे, हे त्याने दाखवून दिले. भामहाच्या मते प्रत्येक अलंकारात वक्रोक्ती असते. वक्रोक्ती हा शब्द त्याने ‘अतिशयोक्ती’ या अर्थी वापरलेला आहे. भामहानंतर दंडीचे (सु. ६०० ते ७५० दरम्यान) अलंकारविवेचन येते. काव्यादर्श या आपल्या ग्रंथात त्याने ३५ अर्थालंकार विवेचिले आहेत. सारे साहित्य वक्रोक्ती आणि स्वभावोक्ती या दोन विभागांत विभागले गेले असून अलंकारांचेही असे दोन वर्ग केले पाहिजेत, असे दंडीचे मत आहे.
म्हणूनच आपल्या अलंकारविवेचनात प्रथम स्वभावोक्तीचा परामर्श घेऊन नंतर त्याने वक्रोक्तियुक्त अलंकारांचा विचार केला असावा. काव्यगुणांनाही दंडीने अलंकारच मानले आहे. भामह आणि दंडी या दोघांनीही अलंकारचर्चा केली. परंतु उद्भटाने (सु. ८००) अलंकारचर्चेला प्रथमच शास्त्रीय स्वरूप दिले. एकूण ४१ अलंकारांची त्याने चर्चा केली. छेकानुप्रास आणि लाटानुप्रास हे अनुप्रासाचेच प्रकार त्याने स्वतंत्र अलंकार म्हणून सांगितले आहेत. भामहाने सांगितलेले यमक, उपमारूपक आणि उत्प्रेक्षावयव हे तीन अलंकार त्याने आपल्या अलंकारविवेचनात घेतले नाहीत. तथापि पुनरुक्तवदाभास, संकर, काव्यलिंग आणि दृष्टांत या अलंकारांची त्याने भर घातली. श्लेष ह्या अलंकाराविषयी उद्भटाने मांडलेला विचार महत्त्वाचा आहे. उद्भटाच्या मते शब्दश्लेष आणि अर्थश्लेष हे दोन्ही अर्थालंकारच होत. श्लेषातील दोन शब्द दिसावयास सारखे दिसले, तरी त्यांचे अर्थ भिन्न असल्यामुळे त्यांस दोन वेगळेच शब्द मानावयास हवे, असे उद्भटाचे मत आहे.
उद्भटानंतर वामनाच्या (सु. ८००) काव्यालंकारसूत्राचा विचार करावयास हवा. वामन रीतिमताचा प्रवर्तक. रीती हा त्याने काव्याचा आत्मा मानला. वामनाच्या मतानुसार ‘रीती’ म्हणजे ‘गुणविशेषयुक्त पदरचना’ होय. गुण आणि अलंकार यांतील भेद वामनाने स्पष्ट केला आहे. गुण हे रीतीचे अपरिहार्य घटक असल्यामुळे ते नित्य आहेत. या गुणांमुळेच काव्यात सौंदर्य निर्माण होते. अलंकार फक्त हे सौंदर्य वाढवितात. त्यामुळे अलंकार अनित्य होत, असे वामनाचे प्रतिपादन आहे. सर्व अर्थालंकार उपमेतूनच निर्माण होतात असा विचार सांगून उपमेचे ‘लौकिक’ आणि ‘कल्पित’ असे दोन भेद त्याने विवेचिले आहेत. सतत वापरल्या गेल्यामुळे नावीन्यशून्य झालेल्या उपमा त्याच्या मते लौकिक होत. कल्पित उपमेत कवींच्या तरल कल्पनाशक्तीचे प्रत्यंतर येते. अगदी नवीन असे उपमान योजून कवी रसिकाला चकित करतो. ज्याने नुकतीच आपली दाढी घोटली आहे आणि जो मद्य प्याला आहे, अशा हूणाच्या गालांशी नारिंगाच्या लालीची तुलना केल्याचे दाखवून वामनाने कल्पित उपमेचे उदाहरण दिले आहे. वामनाने एकूण ३३ अलंकार सांगितले. सर्व अर्थालंकार उपमेतूनच निर्माण होतात, असे त्याचे मत असल्यामुळे पर्यायोक्त, भाविक, सूक्ष्म यांसारखे साधर्म्यावर न आधारलेले अलंकार त्याने मानले नाहीत. वामनानंतर झालेल्या रुद्रटाने (नवव्या शतकाचा पूर्वार्ध) काव्यालंकार हा ग्रंथ लिहून अलंकारचर्चेत महत्त्वाची भर घातली. विद्याधर, विद्यानाथ, अप्पय्य दीक्षित इ. पुढील काळातील साहित्यशास्त्रकारही या ग्रंथातील विचारांनी प्रभावित झालेले दिसतात. रुद्रटाने एकूण ७२ अलंकार सांगितले. अलंकारांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्नही त्याचाच. वास्तव्य, औपम्य, अतिशय आणि श्लेष असे अलंकारांचे चार वर्ग त्याने केले. रसवत्, प्रेयस् यांसारखे अलंकार त्याला अमान्य होते.
यानंतर आनंदवर्धनाचा (नववे शतक)⇨ध्वन्यालोक अवतरला आणि गुण व अलंकार काव्यातील ‘ध्वनी’च्या मानाने गौण ठरले. रसाला प्रतिकूल ठरणारे यमकासारखे शब्दालंकार त्याने मानले नाहीत आणि रसाला उपकारक अलंकार कोणते यासंबंधीचे मार्गदर्शन केले. आनंदवर्धनानंतर वक्रोक्तिजीवितकार कुंतक (९२५ ते १०२५ दरम्यान) झाला. कुंतकाच्या मते सर्व अलंकारांचा आत्मा वक्रोक्ती हाच होय. म्हणूनच स्वभावोक्तीला अलंकार मानावयास तो तयार नाही. वक्रतेचे सहा प्रकार सांगून कुंतकाने उपमेसारखे बरेच अलंकार वाक्यवक्रतेत समाविष्ट केले आहेत.⇨मम्मटाने (सु. ११००) आपल्या ⇨काव्यप्रकाशात ६ शब्दालंकार आणि ६१ अर्थालंकार असे एकूण ६७ अलंकार सांगितले. मम्मटानंतर रुय्यकाच्या (सु. ११५०)अलंकारसर्वस्व या ग्रंथाचा विचार येतो. रुय्यकाने सु. ८१ अलंकार विवेचिले. त्यांचे वर्गीकरणही केले. रुय्यकानंतरच्या बहुतेक आलंकारिकांनी सर्वसाधारणपणे हेच वर्गीकरण मान्य केले आहे. रुय्यकानंतर हेमचंद्र, जयदेव, विद्याधर, विद्यानाथ, वाग्भट, विश्वनाथ, केशवमिश्र, अप्पय्य दीक्षित आणि जगन्नाथपंडित इ. साहित्यशास्त्रकारांनी आपापल्या ग्रंथांतून अलंकारांचे विवेचन केले आहे.⇨ अप्पय्य दीक्षितांच्या चित्रमीमांसा या ग्रंथात जास्तीत जास्त, म्हणजे एकूण १२४ अलंकार सांगितले आहेत. महामहोपाध्याय पां. वा. काणे ह्यांच्या मते ही संख्या ११५ आहे. अलंकारांची संख्या हळूहळू कशी वाढत गेली हे यावरून दिसून येईल.
पश्चिमी अलंकारविचार : प्राचीन काळी ग्रीस आणि रोम या देशांमध्ये वक्तृत्वशास्त्राच्या अनुषंगाने अलंकारांचा विचार केला गेला. सॉफिस्टांना आपल्या वादपटुत्वासाठी निरनिराळे भाषालंकार उपयोगी पडत. पहिल्या शतकात ⇨ क्विंटिल्यनने Institutio Oratoria या ग्रंथात अलंकारांची एक सूची दिलेली आहे. पाश्चिमात्यांच्या अलंकारविचाराकडे पाहिले, तर शब्दालंकार आणि अर्थालंकार असे भेद त्यांनीही मानलेले दिसतात. त्यांना अनुक्रमे ‘स्कीम्स’ आणि ‘ट्रोप्स’ अशी नावे आहेत. आपणाकडील उपमा-रूपकांसारखे अलंकार त्यांच्याकडेही मानलेले आहेत. तसेच इंग्रजी साहित्याच्या परिचयामुळे, संस्कृत साहित्यशास्त्रात न सांगितलेले परंतु पाश्चिमात्य साहित्यशास्त्राने मानलेले असे काही अलंकार आपल्या परिचयाचे झालेले आहेत. उदा., अँटिथिसीस, ॲपोस्ट्रॉफी, इन्व्हर्शन, आयरनी, लिटोट्स, मेटॉनिमी, ऑनोमॅटोपीआ, ऑक्सिमोरॉन, पर्सॉनिफिकेशन, सिनेक्डॉकी इत्यादी. या अलंकारांच्या स्वरूपाचा आता विचार करू.
‘अँटिथिसीस’ या अलंकारात परस्परविरोधी असलेल्या दोन कल्पनांमधील विरोध दाखवणारे परस्परविरोधी शब्द वाक्यात विशिष्ट स्थानी योजून तो विरोध विशेष प्रभावीपणे मांडला जातो. जसे, ‘ Not that I loved Caesar less but I loved Rome more.’ या अलंकाराशी जवळचा संबंध असलेला ‘ऑक्सिमोरॉन’ हा अलंकारही येथे सांगावयास हवा. ऑक्सिमोरॉनमध्ये सुभाषिताचा परिणाम साधण्यासाठी परस्परविसंगत कल्पना आणल्या जातात. उदा., Cruel kindness, faith unfaithful इत्यादी.
कीट्सच्या एका कवितेत नीरव शांततेचे वर्णन पुढीलप्रमाणे आलेले आहे.
…And then there crept
A little noiseless noise among the leaves
Born of the very sigh that silence heaves.
नाद हा कधीच नादशून्य नसतो, परंतु noiseless noise हे दोन शब्द एकत्र आल्याने शांततेचे वर्णन अधिक प्रत्ययकारी झालेले आहे. Sigh that silence heaves हे शब्दही याच हेतूने वापरलेले आहेत.
‘इन्व्हर्शन’ या अलंकारामध्ये शब्दांचा नेहमीचा क्रम मुद्दाम सोडून देण्यात येतो. शेक्सपिअरच्या एका सुनीतात ‘That time of year thou may’st in me behold’ अशी ओळ आहे. सर्वसाधारण क्रम पाहिला तर ही ओळ ‘ Thou may’st behold in me that time of year ’ अशी असावयास हवी होती. परंतु यामुळे ती ओळ विशेष काव्यमय मात्र झाली नसती.
‘ॲपोस्ट्रॉफी’ म्हणजे एक किंवा अनेक व्यक्तींना अथवा वस्तूंना उद्देशून केलेले भाषण. या व्यक्ती किंवा वस्तू भाषणकर्त्यासमोर उपस्थित असल्याच पाहिजेत असे नाही. पुष्कळ वेळा असे भाषण एखाद्या अमूर्त कल्पेनला उद्देशून केलेलेही आढळते. जेव्हा वस्तूंना आणि अमूर्त कल्पनांना उद्देशून भाषण केले जाते, तेव्हा त्यांच्यावर जिवंतपणाचा आणि मानवी भावभावनांचा आरोप केला जातो. हे भाषण बहुधा उद्गारवाचक
असते. उदा., वर्ड्स्वर्थच्या ‘सॉलिटरी रीपर’ या कवितेत तो वाचकाला उद्देशून बोलत आहे :
Behold her, single in the field,
Yon solitary Highland lass!
Reaping and singing by herself
Stop here, or gently pass!
मराठीतले उदाहरण घ्यावयाचे झाल्यास केशवसुतांच्या ‘आम्ही कोण ?’ या कवितेचे घेता येईल. ‘आम्ही कोण म्हणून काय पुसता…’. असा सवाला कवीची महती सांगण्यासाठी कवी नसलेल्यांना उद्देशून केलेला आहे. फिलिप सिडनीच्या ‘With how sad steps, O moon, thou climb’st the skies!’ या ओळीत चंद्रावर जिवंतपणाचा व मानवी भावभावनांचा आरोप केलेला आहे. ‘पर्सॉनिफिकेशन’ या अलंकाराचे हेच वैशिष्ट्य असल्यामुळे येथे ॲपोस्ट्रॉफीबरोबरच पर्सॉनिफिकेशन हा अलंकारही झाला आहे. अशी उदाहरणे संस्कृत साहित्यातही आढळतात. मेघदूत हे खंडकाव्य या दृष्टीने पाहण्यासारखे आहे. त्यात मेघावर जिवंतपणाचा आणि मानवी भावनांचा आरोप करून विरही यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला संदेश देण्यासाठी दूत म्हणून त्याची योजना केली आहे. आपली पत्नी राहत असलेल्या नगरीला कसे जायचे हे तो मेघाला सांगत आहे. सावरकरांची ‘सागरास-’ही कविताही ॲपोस्ट्रॉफी आणि पर्सॉनिफिकेशनचे उत्तम उदाहरण आहे.
‘आयरनी’ चे ‘विधानातील आयरनी’ व ‘परिस्थितीतील आयरनी’ असे दोन प्रकार आहेत (आयरनी ऑफ स्टेटमेंट व आयरनी ऑफ सिच्युएशन). विधानातील आयरनीमध्ये विधानाचा वाच्यार्थ एक असून त्याचा खरा अर्थ मात्र त्या वाच्यार्थाच्या अगदी विरुद्ध असतो. उदा., शेक्सपिअरच्या ज्यूलियस सीझर या नाटकातील खालील वाक्ये :
Here, under leave of Brutus and the rest, —
For Brutus is an honourable man
So are they all, all honourable men,
Come I to speak in Caesar’s Funeral.
He was my friend, faithful and just to me:
But Brutus says he was ambitious
And Brutus is an honourable man.
या ओळींत वस्तुतः ब्रूटसची निंदाच आहे.
परिस्थितिजन्य आयरनीमध्ये अपेक्षाभंग असतो. एडविन रॉबिन्सनच्या एका कवितेत रिचर्ड कॉरी नावाच्या एका गृहस्थाचे वर्णन आलेले आहे. हा श्रीमंत गृहस्थ देखणा आणि सौजन्यशील होता. भारी किंमतीचे कपडे घालून तो रस्त्याने जाऊ लागला, की लोक त्याच्याकडे बघत. त्यांना त्याचा हेवा वाटायचा. सुखाने जगण्यासाठी आवश्यक ते सगळे त्याच्याकडे आहे असे त्यांना वाटायचे. ही कविता म्हणजे असे वाटणाऱ्या एका माणसाचेच निवेदन आहे. रिचर्ड कॉरीने एके दिवशी मस्तकात गोळी झाडून आत्महत्या केली एवढेच शेवटी हा माणूस सांगतो, आणि त्याच्या निवेदनाला कलाटणी मिळते. रिचर्ड कॉरीजवळ जगण्यासारखे खूप आहे, त्याची जीवनलालसा मोठी असली पाहिजे, या अपेक्षेला मोठा धक्का बसून त्या माणसाचे दुःख नेमके काय असावे आणि मृत्यूला जवळ करण्याची इच्छा त्याला का व्हावी, याचाच मन विचार करू लागते. आयरनीचा उपयोग जीवनातील अनेक विसंगती परिणामकारकरीत्या दाखविण्यासाठी होऊ शकतो.
‘मेटॉनिमी’ हाही एक वैशिष्ट्यपूर्ण अलंकार आहे. हा अलंकार साहचर्यावर आधारलेला आहे. एखाद्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख करण्याऐवजी ह्या गोष्टीशी साहचर्याने संबंधित असलेल्या गोष्टीचा उल्लेख करून हा अलंकार साधता येतो. या अलंकाराची साधी उदाहरणे नित्याच्या जीवनातही पाहावयास मिळतात. उदा., राजाला ‘King’ म्हणण्याऐवजी ‘The Crown’ म्हणणे, ‘I have not read Milton’ असे म्हणून मिल्टनचे ग्रंथ आपण वाचले नसल्याचे सांगणे, इत्यादी. काव्यातले उदाहरण घ्यावयाचे तर कीट्सची पुढील ओळ पाहावी :
And noon lay heavy on flower and tree
माध्यान्हीच्या भारामुळे फुले आणि वृक्ष जडावले होते, असे कीट्स म्हणतो. येथे दुपारच्या उन्हामुळे फुले व झाडे विकल झाल्यासारखी वाटत होती. परंतु उन्हाचा उल्लेख न करता कवी त्याच्याशी साहचर्याने निगडित झालेली दुपार झाडाफुलांवर पसरल्यामुळे ती जडावली, असे सांगतो. ‘सिनेक्डॉकी’ या अलंकारात एखादी गोष्ट पूर्णत्वाने दिग्दर्शित करण्यासाठी तिच्या फक्त एखाद्या अंशाचा उल्लेख केला जातो किंवा एखाद्या गोष्टीच्या अंशाकडे लक्ष वेधण्यासाठी तिचा पूर्णत्वाने उल्लेख केला जातो. शेक्सपिअरच्या एका सुनीतातील खालील ओळींत सिनेक्डॉकीचे उदाहरण पाहावयास मिळते :
Nay, if you read this line, remember not
The hand that writ it.
या ठिकाणी hand हा शब्द एका व्यक्तीचा वाचक आहे. तसेच ‘The smiling year brought blossoms of many a flower’ या ओळीत smiling year या शब्दांनी वसंत ऋतू, म्हणजे सबंध वर्षाचा एक भागच, निर्देशिला आहे. सिनेक्डॉकीची उदाहरणे आपल्या दैनंदिन जीवनातील भाषेतही आढळतात. उदा., ‘Keep this in your coat’ असे आपण म्हणतो, तेव्हा सबंध कोट अभिप्रेत नसून त्या कोटाचा खिसा अभिप्रेत असतो.
जे सांगायचे ते नकारात्मक पद्धतीने सांगून ‘लिटोट्स’ हा अलंकार साधतात. ‘He is no fool’ ‘He is a citizen of no mean’ ही अशीच काही उदाहरणे. मिल्टनच्या पॅरडाइस लॉस्टमध्ये ईव्ह सापाला बोलताना पाहते असा प्रसंग आहे. या ठिकाणी ईव्ह अत्यंत आश्चर्यचकित होते. परंतु हा आशय मिल्टन असा व्यक्त करतो :
. . . at length
Not unamazed she thus in answer spake.
जी गोष्ट सांगावयाची ती तिच्याविरुद्ध असलेली गोष्ट नाकारून अधिक जोरदारपणे सांगणे, हा या अलंकाराचा उद्देश आहे. ‘क्लायमॅक्स’ या अलंकारात काही कल्पना महत्त्वसापेक्षतेनुसार चढत्या क्रमाने सांगितल्या जातात. उदा.,
What a piece of work is man! How noble
in reason, how infinite in faculties!
In action, how like an angel!
In apprehension, how like a god!
माणसाच्या गुणवर्णनाची एक एक पायरी चढत शेवटी माणसाला येथे परमेश्वराच्या स्थानी नेऊन बसविले आहे.
क्लायमॅक्सच्या उलट ‘अँटिक्लायमॅक्स‘ हा अलंकार असतो. यातही काही कल्पना चढत्या क्रमाने नेल्या जातात. परंतु शेवटी आलेली कल्पना मात्र एवढी क्षुल्लक असते, की त्या कल्पना ज्या विषयाच्या वर्णनासाठी आलेल्या असतात, तो एकूण विषयच हास्यास्पद व्हावा. उदा.,
Here thou, great Anna! Whom three realms obey,
Dost sometimes counsel take — and sometimes tea.
‘ऑनोमॅटोपीआ’मध्ये वर्ण्य विषयाशी संबंधित असलेल्या नादाचे अनुकरण करणारी शब्दयोजना असते. हे तत्त्व भाषेच्या विकासातही आपणास दिसते. ‘झुळझुळणारा झरा’, ‘घोंगावणारा वारा’, ‘खणखणीत नाणे’ असे शब्दप्रयोग याच तत्त्वानुसार होतात. काव्यातला आशय अधिक जिवंतपणे मांडला जावा ह्या हेतूने याचा उपयोग होतो. ब्राउनिंगच्या ‘अँड्रिआ डेल सार्टो’ या कवितेतील ‘There’s the bell clinking from the chapel-top’ यात घंटेच्या आवाजाचे
‘clinking’ या शब्दाने अनुकरण केले आहे. तांब्यांच्या ‘रुद्रास आवाहन’ या कवितेतील ‘डमडमत डमरु ये’ ‘खणखणत शूल ये’ इ. ओळींतही हा अलंकार आपणास दिसेल.
पाश्चिमात्यांच्या अलंकारविचारात रूपक (मेटॅफर) या अलंकारास मात्र फार महत्त्व आहे. रूपक हा मूलभूत स्वरूपाचा अलंकार आहे, असे ते मानतात. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनीही रूपकाचा एक महत्त्वपूर्ण अलंकार म्हणूनच विचार केला आहे. भरताने चारच अलंकार सांगितले. परंतु त्यांतही रूपक आहे. मात्र रूपकापेक्षा उपमेचे महत्त्व संस्कृत साहित्यशास्त्रात अधिक आहे. ‘सर्व अर्थालंकार केवळ उपमेतूनच निर्माण झाले आहेत’ हे वामनाचे मत यापूर्वी सांगितलेच आहे. उपमेप्रमाणे रूपकही साधर्म्यावर आधारलेले असते. तथापि उपमेत उपमेय आणि उपमान यांतील भेदाची जाणीव नष्ट झालेली नसते. ‘तिचा चेहरा सूर्यफुलासारखा सतेज आणि टवटवीत आहे’ असे म्हणताना ‘सारखा’ हा शब्द वापरून सूर्यफुल आणि वर्ण्य स्त्रीचा चेहरा या दोन गोष्टी एक नव्हेत, याची जाणीव दिलेली आहे. रूपकात उपमानाचा उपमेयावर आरोप करून त्या दोहोंत अभेद दाखविलेला असतो. ‘ओठांतुन या उडून गेलीं शब्दांचीं पाखरें’ या ओळीत शब्दांवर पाखरांचे आरोपण केले आहे, शब्द आणि पाखरें भिन्न असल्याचे दाखविलेले नाही म्हणूनच हे रूपकालंकाराचे उदाहरण आहे. रूपकाचे अनेक प्रकार संस्कृत साहित्यशास्त्रानेही सांगितले आहेत.
ॲरिस्टॉटलच्या मते उत्तम रूपक सुचणे हे कवीच्या श्रेष्ठ प्रतिभेचे गमक होय. ‘थोडक्या शब्दांत, पण अचूक वर्णन करावयाचा प्रयत्न करताच विचार रूपकाच्या माध्यमातून पुढे सरकू लागतात’ अशा आशयाचा विचार मिड्लटन मरीने मांडलेला आहे. गुंतागुंतीचा आशय रूपकांचा आश्रय घेताच सुबोध होतो. रूपकांना भाषाशास्त्रीय महत्त्व आहे, असे मत आय्. ए. रिचर्ड्सने व्यक्त केले आहे. आपल्या नित्याच्या भाषेचा विचार केला तरी आपणास अनेक रूपके आढळतील. ‘टेबलाचे पाय’, ‘खुर्चीचे हात’, ‘करवतीचे दात’ ही सर्व रूपकेच आहेत. भाषेत अनेकवार वापरून त्यांचे अलंकारत्व नष्ट झाले. पुष्कळशा अमूर्त कल्पना रूपक सहज साकार करते.
‘In headaches and in worry
Vaguely life leaks away….’
असे जेव्हा ऑडनसारखा कवी म्हणतो, तेव्हा रूपकाच्या आधारे गळक्या भांड्याची प्रतिमा निर्माण करून जीवनाच्या क्षणभंगुर आणि संदिग्ध अशा दोन्ही रूपांची कल्पना तो अत्यंत स्पष्टपणे मांडू शकतो. रूपक हा काव्याचा प्राण होय, असे सी. डी. लेविसने म्हटले आहे.
मराठीतील अलंकारविचार : ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंतच्या मराठी संतकवींनी आपल्या काव्यात वेळोवेळी केलेल्या साहित्यविषयक उल्लेखांतून मराठीच्या स्वतंत्र साहित्यशास्त्राचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉ. मा. गो. देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या मते ‘उपमा’, ‘वर्णक’ आणि ‘श्लेष’ हे प्राचीन मराठी कवींनी सांगितलेले अलंकार आहेत व ते पारंपरिक साहित्यशास्त्रातील अलंकारांहून वेगळे आहेत. त्यांची उपमा आणि त्यांचा श्लेष पाहता, या दोन्ही अलंकारांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी संस्कृत आलंकारिकांहून वेगळी असल्याचे दिसते, असे देशमुखांचे मत आहे. कोणत्याही दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखविणे हे संस्कृत साहित्यशास्त्रात सांगितलेले उपमेचे कार्य. तथापि प्राचीन मराठी कवी साधर्म्याचे तीन भेद सांगतात.
जेव्हा दोन तुल्यबल वस्तूंमधील साधर्म्य दाखविले जाते तेव्हा त्या अलंकारास उपमा म्हणावे. जेव्हा एखाद्या वस्तूचे तुलनेने श्रेष्ठ असलेल्या वस्तूशी साधर्म्य दाखविण्यात येते (जेथे उपमान श्रेष्ठ असते) तेव्हा तेथे वर्णक हा अलंकार होतो. उदा., ‘स्त्रीचे मुख चंद्रासारखे आहे’ असे म्हणणे. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या थोर वस्तूची तुलना पात्रतेने कनिष्ठ असलेल्या वस्तूशी केली जाते (जेथे उपमान कनिष्ठ असते) तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार समजावा.उदा., ‘राजाचा खांदा हा वृषभाच्या खांद्यासारखा आहे’ असे म्हणणे. प्राचीन मराठी कवींचा हा अभिप्राय ध्यानात घेणे आवश्यक आहे, असे मत देखमुख यांनी मांडले आहे.
मराठीत विपुल काव्यरचना झाली आहे. प्रथम संस्कृत साहित्यशास्त्राच्या प्रभावाखाली मराठी कविता होती. इंग्रजीचा परिचय झाल्यावर ती नव्या रूपात अवतीर्ण झाली. तेव्हापासून तिचे स्वरूप नित्यशः बदलत आहे. अभिव्यक्तीचे नवे नवे प्रकार ती स्वीकारीत आहे. अशा परिस्थितीत नव्या अलंकारांचा शोध घेतल्यास तो प्रयत्न स्वागतार्हच ठरेल. रा. अ. काळेले यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केशवसुत व त्यांच्यानंतरचे मराठी कवी यांच्या काव्यांतून काही नवे अलंकार शोधून काढले आहेत. शिवाय ‘प्रकरणालंकार’ हा अलंकारांचा एक नवा वर्ग त्यांनी मानला आहे. काळेले यांनी एकूण २६ अलंकार सांगितले असून ते पुढीलप्रमाणे आहेत : (१) अनुलेखन, (२) अनुनाद, (३) आवर्तन, (४) भाषामिश्र, (५) विपर्यय,
(६) शब्दानुमान, (७) संयोग, (८) अविषय, (९) अंशभक्ती, (१०) उपदेशापदेश, (११) एकोन,
(१२) कविकथा, (१३) तर्क, (१४) निपात, (१५) निर्देश, (१६) निक्षेप, (१७) पुनरुक्ती, (१८) प्रत्ययांतर, (१९) प्रमादस्वीकार, (२०) व्यस्त, (२१) श्रेयःसंधी, (२२) समांतिक, (२३) सह्य, (२४) दारुण,
(२५) पताका, (२६) भंग.
वरील अलंकारांपैकी काही इंग्रजीतून मराठीत आलेले आहेत. उदा., अनुनाद, विपर्यय, अविषय, अंशभक्ती, निपात, निर्देश, दारुण हे अलंकार इंग्रजीतील अनुक्रमे ऑनोमॅटोपीआ, स्पूनरिझम, ब्रोकन मेटॅफर, सिनेक्डॉकी, अँटी-क्लायमॅक्स, ॲल्यूजन आणि आयरनी या अलंकारांवरून आलेले आहेत. उरलेल्या अलंकारांपैकी सह्य, श्रेयःसंधी, निक्षेप यांसारख्या काही अलंकारांतील चमत्कृती विशेष नावीन्यपूर्ण म्हणून गणल्या गेल्या आहेत.
जी हवी असे उत्कटपणे वाटते अशी अप्राप्य वस्तू काही आपत्तिकारक निमित्ताने मिळाली तर ती आपत्तीही सहन करण्याची तयारी दर्शविली असता, ‘सह्य’ हा अलंकार होतो. उदा., ज्याची आई निवर्तली आहे तो आईला उद्देशून-
ये रागवावयाही।
परि येइ येइ वेगें। (यशवंत )
असे म्हणतो.
वाईटाशी चातुर्याने काही चांगले साधणे याला ‘श्रेयःसंधी’ म्हणतात.
हें सुरू जाहलें युद्ध आणखी आतां —
ना मिळे कुणाला कागद लिहिण्यापुरता
आपत्ति अशी देखून हळहळे जनता
एवढीच जागा उरे समाधानास
हो स्थगित कवींच्या काव्याची पैदास (वि. म. कुलकर्णी )
दोन किंवा अधिक वस्तू चतुराईने एका जागी ठेवणे यास ‘निक्षेप’ म्हणतात. उदा.,
हृदय जिथें ठेवलें
तिथेंच शिरही ठेवतों
असो शरीरहि तेथें
जिथें आत्मा खेळतो (अनिल )
यांशिवाय प्रामुख्याने गडकऱ्यांच्या नाटकांतून आढळणाऱ्या ‘सोयीचे बोलणे — बोलण्याची सोय’ ‘प्रेमावाचून परदेशी होण्यापेक्षा प्रेमासाठी परदेशी होणे’ अशा प्रकारच्या वाक्यरचनांतून काळेल्यांनी ‘विपर्यय’ हा अलंकार शोधला आहे. जुन्या वचनांत फेरफार करून वेगळाच आशय सांगणाऱ्या ओळीही ते ह्यात अलंकारात बसवितात. उदा.,
डोळे हे जुल्मि गडे रोखुनि मज पाहुं नका (तांबे)
डोळे हे फिल्मि गडे खोकुनि मज दावुं नका (मर्ढेकर)
निरनिराळ्या साहित्यकृतींचा अभ्यास करीत असता, संस्कृत साहित्यशास्त्रकारांना शब्दार्थचमत्कृतींची जी विलोभनीय रूपे गवसली त्यांचा त्यांनी अलंकारांत अंतर्भाव केला. त्या रूपांचे विश्लेषण करून त्यांची लक्षणे ठरविली व त्यांचे वर्ग निर्माण केले. मराठीपुरते बोलावयाचे झाल्यास आज अनेक वर्षे संस्कृतबरोबरच इंग्रजी साहित्याचा अभ्यास होत आहे. त्याचप्रमाणे अन्य भाषांतील साहित्यकृतीही अनुवादाच्या द्वारे आपल्या वाचनात येत आहेत. उपलब्ध झालेल्या या सारस्वतातून नव्या अलंकारांचा शोध घेणे, संस्कृत साहित्यशास्त्रातून आलेल्या अलंकारांशी त्यांची तुलना करून शक्य असल्यास त्यांच्यात नाते प्रस्थापित करणे, मराठीने असे नवे अलंकार कितपत आणि कसे आत्मसात केले आहेत हे पाहणे इ. कार्ये व्यापक प्रमाणावर झाल्यास साहित्याच्या अभ्यासकांना ती उपकारकच ठरतील. मराठीचे स्वतंत्र साहित्यशास्त्र निर्माण करण्याची आवश्यकता अनेक समीक्षकांना वाटते. असे साहित्यशास्त्र निर्माण झाल्यास त्यातील अलंकारविचार कोणत्या स्वरूपाचा असू शकेल, हा प्रश्नही विचार करण्यासारखा आहे. आधुनिक काळात अलंकारदृष्टी ही काव्यदृष्टीचा अविभाज्य घटक नसल्याचे दिसून येते. म्हणूनच अलंकारचर्चेचा उपयोग वाङ्मयीन आकलनास व मूल्यमापनास एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होऊ शकेल. आधुनिक पाश्चिमात्य साहित्यसमीक्षेतून पुढे आलेला प्रतिमाविचार बऱ्याच समीक्षकांना महत्त्वाचा वाटतो. अलंकार आणि प्रतिमा यांतील भेद त्यांनी दाखवून दिला आहे. या प्रतिमाविचारामुळे अलंकारांकडे पाहण्याच्या एकूण दृष्टीकोनात महत्त्वाचे फेरबदल घडून येत आहेत.
संदर्भ : 1. Kane, P. V. History of Sanskrit Poetics, New Delhi, 1961.
2. Kreuzer, James, Elements of Poetry, New York, 1959.
३. अर्जुनवाडकर, ह. श्री. मंगरूळकर, अरविंद, संपा. मम्मटभट्टविरचित काव्यप्रकाश, पुणे, १९६२.
४. काळेले, रा. अ. नवे अलंकार, पुणे, १९६३.
५. जोग, रा. श्री. काव्यविभ्रम, पुणे, १९६२.
६. देशपांडे, ग. त्र्यं.भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई, १९५८.
७. देशमुख, मा. गो. मराठीचे साहित्यशास्त्र, पुणे, १९४०.
८. धोंड, म. वा. काव्याची भूषणे, पुणे, १९४८.
९. वाळिंबे, रा. शं. साहित्यमीमांसा, पुणे, १९५५.
कुलकर्णी, अ. र.
“