अलवर : राजस्थान राज्याच्या अलवर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आणि पूर्वीच्या अलवर संस्थानची राजधानी. लोकसंख्या १,०७,७९१ (१९७१). हे पश्चिम रेल्वेवर दिल्लीच्या आग्नेयीस १५८ किमी. असून दिल्ली—जयपूर या राष्ट्रीय हमरस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. अरवली पर्वतश्रेणीमधील म्हणून ‘अरवलीपूर ’ आणि ‘मजबूत ’ या अर्थाने ‘ अलपूर ’अशी अलवरची नामांतरे आढळतात. अरवलीच्या अलवर शाखेतील एका शंक्वाकृती टेकडीवर अलवरचा किल्ला आहे. शहराभोवती तट आणि खंदक आहेत. कच्छवाह रजपुतांनी जयपूरपासून फुटून अलवरचे वेगळे राज्य बनविले. शहरात वेगवेगळ्या बांधणीचे अनेक राजवाडे व छत्र्या बांधल्या गेल्या. येथील ग्रंथालय आणि शस्त्रागार प्रसिद्ध आहे. हातमागावर कापड विणणे, तेलाच्या व पिठाच्या गिरण्या चालविणे हे येथील प्रमुख व्यवसाय होत. पुरजनविहार हे सार्वजनिक उद्यान, शहाजहानचा मंत्री फत्तेजंग याचा दर्गा, शहराबाहेरील बिन्नीविलास प्रासाद, ९—१० किमी. आग्नेयीस असलेला सिलिसेर तलाव इ. स्थळे प्रेक्षणीय आहेत. किल्ल्याच्या वरपर्यंत जाण्यासाठी अलीकडे मोटार-रस्ता झाला आहे. किल्ल्यावरून शहराची व आजूबाजूची शोभा छान दिसते .
दातार, नीला
“