अर्बुदविज्ञान : विविध ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्मघटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांतील) कोशिकांची अत्यधिक नवोत्पत्ती झाल्यामुळे शरीराला निरुपयोगी अशी जी गाठ उत्पन्न होते तिला ‘अर्बुद’, ‘नवरोह’ किंवा ‘विकृत नवोत्पत्ती’ असे म्हणतात. अर्बुदांची कारणे, गुणधर्म, विस्तार आणि चिकित्सा यांचा विचार ज्यात केला जातो त्या शास्त्राला अर्बुदविज्ञान असे म्हणतात.

 

अर्बुदांचे निश्चित कारण अजून पुष्कळसे अज्ञात आहे. अर्बुदे सर्व ऊतकांत होऊ शकतात त्यामुळे ती शरीरातील कोणत्याही भागात आढळतात.

 जखमा भरून येत असताना, ऊतकहानी झाली असताना आणि शोथ (दाहयुक्त सूज) झाला असतानाही ऊतकांतील कोशिकांचे प्रजनन (निर्मिती) होत असते परंतु ते विशिष्ट कार्य संपल्यावर ते प्रजनन थांबते. अर्बुदजनक कोशिकांचे प्रजनन मात्र सारखेच चालू असते. ही नवोत्पत्ती अनियमित वेगाची आणि अनिश्चित कालमर्यादेची असते. स्थलदृष्ट्या या नवोत्पत्तीचा आकार वाढता राहिला तरी ती शेजारच्या ऊतकांवर आक्रमण करीत नसेल तर तिला ‘सौम्य’ अर्बुदाचे स्वरूप येते. तसे आक्रमण होत असेल तर त्या अर्बुदाची स्थलमर्यादाही जाऊन ते ‘मारक’ अर्बुद बनते. अर्बुदकोशिकांची रचना, त्यांचे स्वरूप, रासायनिक चयापचय (शरीरात सतत होणाऱ्‍या रासायनिक प्रक्रिया) आणि अभिरंजनक्रिया (सूक्ष्मदर्शकाने सुलभपणे निरीक्षण करता येण्यासाठी कोशिका किंवा ऊतके योग्य रंजकद्रव्याने रंगविण्याची क्रिया) ही प्राकृत (सर्वसामान्य) कोशिकांपेक्षा निराळी असतात. प्राकृत अवस्थेतील कोशिकांचे कार्य आणि प्रजनन यांच्यावर सर्व देहाचे (समष्टीचे) नियंत्रण असते. तसे नियंत्रण अर्बुद-कोशिकांवर चालत नाही. अर्बुदकोशिका स्वायत्त असतात त्यामुळे अर्बुदे शरीराला निरुपयोगी व पुष्कळ वेळा हानिकारक होतात.

शरीर निर्माण होताना निसर्गतः कोशिकांना चिरंतन प्रजननशक्ती मिळालेली असते.एका निषेचित (शुक्राणू व अंडकोशिका यांचा संयोग झालेल्या) अंडकोशिकेपासून सर्व शरीर बनावयाचे असते. अंडकोशिकेच्या सुरुवातीच्या प्रजननामुळे जो सीताफळाच्या रूपाचा मूलपुंज (अंडकोशिका फुटून बनलेला कोशिकांचा समूह) बनतो त्यातील प्रत्येक कोशिकेपासून सर्व शरीर बनू शकते, म्हणून त्या कोशिकांना ‘सर्व-प्रसवी कोशिका’ असे म्हणतात. मूलपुंजातील काही कोशिका भ्रूणातच (बाल जीवाच्या विकासाच्या पूर्व अवस्थेतच) वेगळ्या झाल्या तर त्यांच्या प्रजननामुळे मूळ शरीराला जोडून अंतस्त्यसमूह (अंतर्गत इंद्रियांचा समूह) उत्पन्न झाला तर सबंध बालकच ‘विकट वा राक्षसगर्भ’ (नेहमीच्या शरीरक्रिया योग्य प्रकारे करू न शकणाऱ्‍या विकृत अवस्थेतील बालक) होतो. पण अपूर्ण विकासाने केवळ संमिश्र कोशिकापुंज झाला तर तो ‘गर्भार्बुद’ होतो.

 

मूलपुंजाचा विकास झाल्यानंतर त्यापासून तीन कलांचे (पातळ पापुद्र्यासारख्या भागांचे) बनलेले असे ‘गर्भबिंब’ बनते, त्या प्रत्येक कलेतील कोशिकांपासून वेगवेगळ्या जातीच्या कोशिकांची उत्पत्ती होते म्हणून त्यांना ‘अनेक-प्रसवी कोशिका’ असे म्हणतात. त्या कोशिकांपैकी काही कोशिका शरीरात तशाच सुप्तस्थितीत राहून गेल्यास त्यांना ‘कोशिका-नीड’ असे म्हणतात. कोशिका-नीडातील सुप्त कोशिका कालांतराने जागृत होऊन प्रजनन करू लागल्या तर त्यांच्यापासून विविध जातींच्या कोशिका उत्पन्न होतात. अशा विविध कोशिकांमुळे विविध ऊतकांचे बनलेले अर्बुद होऊ शकते. त्याला ‘बहूतक’ किंवा ‘भ्रूणकलार्बुद’ असे नाव आहे.

 

शरीराचा संपूर्ण विकास झाल्यानंतर विशिष्ट कोशिकांच्या प्रजननामुळे त्या त्या विशिष्ट जातीच्याच कोशिका उत्पन्न होऊ शकतात. त्यांना ‘विशिष्ट-प्रसवी कोशिका’ असे म्हणतात. या कोशिकांच्या प्रजननामुळे ऊतकहानी भरून येते परंतु जर काही नैसर्गिक, अकल्पित अथवा अजून अज्ञात असलेल्या कारणांमुळे या एक-ऊतकी कोशिका अनियमित आणि अत्यधिक प्रजनन करू लागल्या तर त्यांच्यापासून अर्बुद होऊ शकते. त्याला ‘विशिष्ट अर्बुद’ असे म्हणतात.

 

प्रौढ शरीरातील सर्व कोशिकासुद्धा प्रजननशील असतात. परंतु ऊतकांतील कोशिका शेजारच्या कोशिकांवर जरुरीप्रमाणे उत्तेजक किंवा दमनक क्रिया करीत असतात, त्यामुळे कोशिकांचे प्रजनन मर्यादित राहून शरीरातील निरनिराळ्या अवयवांची व इंद्रियांची रचना योग्य अशीच राहते. कोठेही अनियमित अथवा अत्यधिक प्रजनन होत नाही, त्यामुळे प्राकृत अवस्थेत अर्बुद बनत नाही.

 

अर्बुदप्रवृत्ती असलेल्या कोशिका स्वयंप्रेरणेने अथवा बाह्य प्रेरणेमुळे प्रजननशील बनतात. मूलतः अर्बुदप्रवृत्ती नसलेल्या प्राकृत कोशिकाही काही ज्ञात अथवा अज्ञात बाह्य प्रेरणांमुळे अर्बुदप्रवृत्त बनतात. त्यांच्या प्रजननामुळे अर्बुदोत्पत्ती होते.

 

अर्बुदे कोणत्याही वयात आणि शरीरातील कोणत्याही भागात होऊ शकतात. बालवयात भ्रूणकोशिका आणि भ्रूणाच्या मध्यस्तरातील कोशिका अधिक प्रजननशील असल्यामुळे अस्थी, उपास्थी (एक प्रकारचे संयोजी ऊतक), लसीकापिंड [→ लसीका तंत्र] आणि तंत्वात्मक ऊतके वगैरे मध्यस्तरजनित ऊतकांच्या अर्बुदांचे प्रमाण लहान वयात अधिक दिसते. ग्रंथी, तंतू, वसा (चरबी) वगैरे ऊतकांपासून उत्पन्न होणारी सौम्य अर्बुदे तारुण्याच्या सुरुवातीपासूनच दिसू लागतात. बाह्य उद्दीपनामुळे उत्पन्न होणारी त्वचेची, आतड्याच्या नलिकेची आणि गर्भाशयाची मारक अर्बुदे उतारवयात अधिक दिसतात. वयोमर्यादेबद्दलची ही विधाने सर्वसाधारण मानाने केलेली आहेत. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची अर्बुदे कोणत्याही वयात होऊ शकतात.

 

अर्बुदांचे प्रकार : कोशिकांची रचना व प्रकार आणि अर्बुदातील त्यांची प्रजननशक्ती यावरून अर्बुदांचे ‘सौम्य’ आणि ‘मारक’ असे दोन मुख्य प्रकार दिसतात.


(१) सौम्य अर्बुदे : ही अर्बुदे मंद गतीने वाढत जातात, ती विशिष्ट स्थानातच कायम राहतात आणि त्याच स्थानी परिसीमित असतात. त्यांतील कोशिका विशिष्ट जातीच्या आणि सापेक्षतेने व्यवस्थित आणि प्राकृत रचनेच्या असतात. त्यांच्या भोवती बहुधा तंत्वात्मक आवरण असते. काही सौम्य अर्बुदे मूळ ऊतकाशी देठासारख्या बारीक भागाने जोडलेली असतात. सौम्य अर्बुदे भोवतालच्या ऊतकात रुतून बसल्यासारखी नसल्यामुळे ती चाल्य (इतरत्र जाऊ शकणारी) असतात. ती शरीराला अपाय न करता पुष्कळ काळपर्यंत राहू शकतात. शस्त्रक्रियेने काढून टाकली असता ती पुन्हा उद्भवत नाहीत. ज्या ऊतकांपासून सौम्य अर्बुदांची उत्पत्ती होते त्यांच्या नावापुढे ‘अर्बुद’ असा प्रत्यय लावून त्यांचे नाव ठरविण्यात येते. उदा., वसार्बुद, तंत्वार्बुद, स्‍नाय्वार्बुद वगैरे. ‘आवाळू’ या नावाने व्यवहारात ओळखले जाणारे सौम्य अर्बुद बहुशः वसार्बुद व क्वचित तंत्वार्बुद असते.

(२)मारक अर्बुदे : ही त्वरित वाढत जातात. ही उत्पत्तिस्थानापासून दूरवर पसरू शकतात. ही अर्बुदे सीमाबद्ध नसून त्यांच्याभोवती तंत्वात्मक आवरण नसते. मारक अर्बुदे भोवतालच्या ऊतकांत रुतून बसल्याने ती अचाल्य असतात. मारक अर्बुदांतील कोशिका प्राकृत कोशिकांपेक्षा निराळ्या रचनेच्या असून त्यांची घटना अव्यवस्थित असते. त्यांचा आकार, आकारमान आणि स्थान ही सर्व अनियमित असून त्यांची अभिरंजनक्रियाही निराळीच असते. मारक अर्बुदे प्रसारक्षम असल्यामुळे त्यांच्यापासून निघणारे तणावे लांबवर पसरून भोवतालच्या ऊतकांत घट्ट रुतून बसतात. या तणाव्यांची रचना खेकड्याच्या (कर्क) आकड्यासारखी असल्यामुळे मारक अर्बुदांना ‘कर्क’ असे म्हणतात. कर्कार्बुद त्वरेने वाढत असल्यामुळे ते भोवतालच्या ऊतकांत पसरते तसेच रक्त आणि लसीका-वाहिन्यांवाटे त्याच्या कोशिका शरीरात इतरत्र पसरून तेथेही उपकर्क उत्पन्न करतात. अशा उपकर्कांना ‘प्रक्षेप’ किंवा ‘कर्कक्षेप’ अथवा ‘दूरगत कर्क’ असे म्हणतात.

 

काही अर्बुदे कायम सौम्यच राहतात, काही प्रथम सौम्य व नंतर मारक होतात आणि काही प्रथमपासूनच मारक असतात.

 

हे अर्बुदप्रकार ग्रस्त ऊतकाच्या गुणधर्मांवर, बाह्य उद्दीपक पदार्थावर, त्या पदार्थाच्या मात्रेवर आणि कालावधीवर अवलंबून असतात. साधारणपणे असे दिसते की, भ्रूणाच्या आंतर आणि बाह्य स्तरांतील कोशिकांपासून उत्पन्न होणाऱ्‍या अर्बुदाची म्हणजे मुख, आंत्र (आतडे ), श्वासनलिका, त्वचा, केस, नखे, स्तन, ज्ञानेंद्रिये आणि तंत्रिका तंत्र (मज्जातंतूंचा व्यूह) यांतील अर्बुदांची प्रवृत्ती सौम्याकडून मारकतेकडे असते. भ्रूणाच्या मध्यस्तरातील कोशिकांपासून उत्पन्न होणारी अर्बुदे म्हणजे रक्तवाहिन्या, कंकाल तंत्र (शरीराला आधार देणारा व मुख्यतः हाडांचा बनलेला सांगाडा, → कंकाल तंत्र) इ. ऊतकांतील अर्बुदे सौम्य असतात अथवा सुरुवातीपासूनच मारक असतात.

 

रक्तातील श्वेतकोशिकांच्या अतिप्रजननामुळे होणाऱ्‍या विकाराचाही तात्त्विक दृष्ट्या अर्बुदांतच समावेश केला पाहिजे. मात्र त्यात पुढे वर्णन करण्यात आलेले धारणोतक (अर्बुदातील कोशिकांचे पोषण करणारे व त्यांना आधार देणारे ऊतक) असत नाही.

 

अर्बुद-उत्पत्ती : अर्बुदांसंबंधीचे – विशेषतः मारक अर्बुदांसंबंधीचे – ज्ञान अलीकडे पुष्कळ प्रगत झाले आहे. हे ज्ञान वनस्पती आणि प्राणी यांमध्ये झालेल्या अर्बुदांच्या अभ्यासाने आणि प्रयोगशाळेतील जनावरांवर प्रयोग करून मिळविण्यात आलेले आहे. त्यावरून असे निश्चितपणे म्हणता येते की, बाह्य उद्दीपक आणि दाहक पदार्थाच्या क्रियेमुळे काही अर्बुदे उत्पन्न होत असली पाहिजेत. अशा बाह्य पदार्थाची क्रिया जवळजवळ एकाच दिशेने होते. हे उद्दीपक पदार्थ ज्या ऊतकांवर क्रिया करतात त्यांत ते प्रथम विनाशाची क्षेत्रे उत्पन्न करतात. असा विनाश कधी एकदाच पण विस्तृत क्षेत्रात तर कधी दीर्घ काल परंतु मर्यादित क्षेत्रात होतो.उद्दीपकाच्या या दाहक गुणधर्मामुळे ऊतकांतील प्रधान कोशिकांचा नाश होतो. नंतर त्या कोशिकांची जागा भोवतालच्या कोशिकांच्या प्रजननाने भरून येते. त्याच वेळी ग्रस्त ऊतकांतील संयोजी ऊतकापासून बनलेल्या सुघटित धारणोतकांचाही नाश होतो व त्यांच्या जागी मोकळ्या आणि अव्यवस्थित अशा कणांकुरांचे (दाणेदार ऊतकांचे) व श्वेततंतूंचे पुंजके बनतात. धारणोतकांचा काचेसारख्या ठिसूळ किंवा कलिलासारख्या (पदार्थाच्या द्रव आणि घन या अवस्थांच्या मधील एका अवस्थेसारख्या,→ कलिल) अवस्थेत ऱ्हास झाल्यामुळे धारकाची विरोधशक्ती कमी पडते. या कारणाने प्रधान कोशिकांचे हळूहळू पण अमर्याद प्रजनन होण्यास सुरुवात होते. धारणोतकांचा कमी होत जाणारा विरोध आणि प्रधान कोशिकांचे वाढते प्रजनन यांच्या संयुक्त क्रियेमुळे अर्बुदोत्पत्ती होते.

आघात, उष्णता, सूर्यकिरणे, क्ष-किरणे, किरणोत्सर्गी द्रव्ये (किरण वा कण बाहेर टाकणारी द्रव्ये ), रसायने आणि विषाणू (व्हायरस) यांच्यामुळे अर्बुदे, विशेषतः कर्कविकार उद्भवतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या व अशीच क्रिया असलेल्या पदार्थांना किंवा ऊर्जा-उत्सर्गकांना ‘ कर्कजन ‘ अशी संज्ञा आहे. वस्तुतः विषाणू हेच कर्करोगाचे कारण असून इतर कर्कजनांमुळे त्या विषाणूंच्या आक्रमणाला सुयोग्य भूमी निर्माण होते असे अनेक शास्त्रज्ञाचे मत आहे. सर्वच कर्कार्बुदांत अजून विषाणू सापडले नाहीत त्यामुळे हे मत अजून सर्वमान्य झालेले नाही.

 

कर्कजनांच्या क्रियेमुळे कोशिका आपले प्राकृत कार्य सोडून देऊन केवळ प्रजनन व त्या प्रजननाला साहाय्यक होईल असाच चयापचय करू लागतात. असा विकृत चयापचय आणि भ्रूणकोशिकांतील चयापचय यांमध्ये पुष्कळ साम्य असल्यामुळे या कोशिका-विकृतीला ‘परावर्तन’ अथवा ‘भ्रूण स्थितीकडे प्रत्यावर्तन ‘ असे म्हणतात. काही कर्कजने कोशिकाभित्तीवर आणि कोशिका-जीवद्रव्यातील (सजीवांच्या मूलभूत आधारद्रव्यातील) विशिष्ट तंतुकणांवर नाशक कार्य करतात, त्यामुळे कोशिकाभित्तीच्या अभिशोषण व उत्सर्जन क्रियेत बिघाड उत्पन्न होतो. कोशिकांचा आकार आणि आकारमान यांमध्ये बदल होऊन त्यांच्यामध्ये चाललेली रासायनिक घडामोड अनैसर्गिक होऊ लागते. काही अर्बुदकोशिकांत मधुजनाचा (एक प्रकारच्या स्टार्चचा, ग्‍लायकोजेनाचा) संचय होतो. ऑक्सिजन कमी असताना अथवा मुळीच नसताना कोशिका शर्करा-विघटन करतात. प्रथिनांच्या आणि वसाभ पदार्थांच्या चयापचयातही बिघाड होऊन रिबोन्यूक्लिइक अम्‍ल (आरएनए) आणि डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्‍ल (डीएनए) [→ न्यूक्लिइक अम्‍ले] योग्य प्रकारे बनत नसल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारी गुणसूत्रे (एका पिढीतून दुसऱ्‍या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक, → गुणसूत्र) व जीन (गुणसूत्रीय सिद्धांतात लक्षणे निदर्शित करणारी गुणसूत्रावरील गृहीत धरलेली एकके,→ जीन) विकृत बनतात व अर्बुदकोशिकानिर्मिती होते. प्राकृत कोशिका आणि अर्बुद-कोशिका यांमध्ये हाच महत्त्वाचा फरक पडतो.

 

कर्कजन : आरएनए आणि डीएनए या कोशिका-केंद्रकातील अम्‍लांचे हे विकृत स्वरूप काही रासायनिक द्रव्यांमुळे होते. त्यांना ‘कर्कजन पदार्थ’ म्हणतात. त्यांमध्ये बेंझोपायरीन आणि फेनँथ्रेसीन हे डामरामध्ये असलेले पदार्थ मुख्य होत. त्याशिवाय स्त्रीमदजन-प्रवर्तक (इस्ट्रोजेन,→ हॉर्मोने) गर्भकोशिकांचा आणि कृमींच्या अंड्यांचा अर्क, गव्हाच्या अंकुरांचे तेल, अतितप्त वसा आणि कापसाच्या धाग्यावरील वसामय पदार्थ या सर्वांमध्ये असे कर्कजन पदार्थ असतात. सूर्यप्रकाश, उष्णता वगैरे कारणांनी ऊतकांत चिरकारी (दीर्घकालिक) शोथ झाल्यास तेथील कोशिकांतही अशा कर्कजनांची उत्पत्ती होते.

 

अणुकेंद्रीय विक्रियांमध्ये होणारा किरणोत्सर्ग (अणुकेंद्र फुटून किरण वा कण बाहेर पडणे, → किरणोत्सर्ग) तसेच विषाणू हेही कर्कजन आहेत. परंतु त्यांची क्रिया मात्र इतर कर्कजनांच्या उलट दिशेने होते असे दिसते.हे पदार्थ प्रथम कोशिकांच्या केंद्रकात घुसून तेथील गुणसूत्रांवर आक्रमण करतात. गुणसूत्रांची रचना व स्वरूप बदलून गेल्यामुळे त्यांचा परस्परसंबंध, स्थान व लांबी यांत फरक पडतो त्यामुळे जीनांचीही जागा बदलून त्यांचे प्रतिरूप बदलते. असे झाले म्हणजे कोशिकांच्या प्रजननाचा क्रम बदलून कोशिकेच्या चयापचयावरील केंद्रकाचे नियंत्रण विकृत होते. केंद्रकातील अम्‍लांचे विकृत घटक कोशिका जीवद्रव्यात जाऊन केंद्रकाच्या विकृतीमुळे कोशिकेची चयापचय-क्रिया विकृत होते.

 

अर्बुद-कोशिकांचे स्वरूप : कोशिकांचे कार्य विकृत झाले म्हणजे त्यांचे स्वरूपही बदलते. निरनिराळ्या अर्बुदांत हा बदल निरनिराळ्या प्रकारचा व प्रमाणाचा दिसतो. काही अर्बुद-कोशिका प्राकृत कोशिकांसारख्याच दिसतात तर काहींचे संपूर्ण परावर्तन होते. अनेक अर्बुदकोशिका या दोन टोकांमध्ये असलेल्या विविध टप्प्यांवर असतात. केव्हा कोशिकांमध्ये जीवद्रव्य साठून राहिल्यामुळे त्या मोठ्या व फुगीर दिसतात तर केव्हा कोशिकांमधील जीवद्रव्य कमी झाल्यामुळे त्या अगदी लहान, फक्त केंद्रकमय असल्यासारख्याच दिसतात. कोशिकांच्या जीवद्रव्यात श्लेष्म (एक प्रकारचा बुळबुळीत पदार्थ), अन्नकण आणि विशिष्ट रसायने तयार होत नसल्यामुळे त्यांची अभिरंजनक्रिया बदलते. प्राकृत कोशिकांप्रमाणे त्यांच्या जीवद्रव्यात विशिष्ट कण, श्लेष्म आणि वसा यांच्या रिक्तिका (कोशिकेच्या जीवद्रव्यातील द्रवाने भरलेल्या पोकळ्या) दिसत नाहीत. अभिरंजित अर्बुद-कोशिका फिकट निळ्या रंगाच्या दिसतात त्यांचे आकार चपटे, स्तंभाकार, घनाकार किंवा तर्कुरूप (विटीसारखा) न राहून सर्व कोशिका आदिम आकाराच्या म्हणजे गोल दिसू लागतात.

 

अर्बुद-कोशिकांच्या या स्वरूपांतराप्रमाणेच त्यांच्यातील केंद्रकांचे स्वरूपही हळूहळू बदलते. ती केंद्रके फुगीर व फिकट रंग घेणाऱ्‍या केंद्रक-द्रव्याने भरलेली दिसू लागतात. त्यांतील गुणसूत्रे खडबडीत आणि विषम आकाराची होतात. त्यांचा सुघटित असा गोल न बनता विस्कळित आकार बनतो. अर्बुद-कोशिकांचे प्रजनन त्वरेने व अनियमित होत असल्यामुळे केव्हा केव्हा केंद्रकाचे विभाजन विकृत होते. केंद्रकाच्या विभाजनाबरोबर कोशिकांचे विभाजन झाले नाही तर केव्हा केव्हा अशा कोशिकांपासून बहुकेंद्रकी कोशिका (कोशिकाभित्ती नसलेले व अनेक केंद्रकयुक्त जीवद्रव्य असलेले ऊतक) बनते, अथवा त्या ‘राक्षसी कोशिका’ असे स्वरूप घेतात.

 


धारणोतक : अर्बुदांमध्ये दोन ऊतके दिसतात. पहिले ऊतक म्हणजे अर्बुदातील प्रधान कोशिका असलेले व दुसरे म्हणजे त्या कोशिकांचे पोषण करणारे आणि त्यांना आधार देणारे ऊतक होय. प्रधान कोशिकांच्या स्वरूपात पडणारा फरक वर वर्णन केलेला आहेच. पोषण करणारे आणि आधार देणारे ऊतक संयोजी ऊतकाचा प्रकार असून त्याला ‘धारणोतक’ असे नाव आहे. हे धारणोतक जवळपासच्या संयोजी ऊतकांपासून उत्पन्न झालेल्या कणसदृश अंकुरापासून उत्पन्न होऊन ते अर्बुदाबरोबरच वाढत जाते. या धारणोतकातूनच अर्बुदाला रक्ताचा पुरवठा आणि आधार मिळतो.

 प्राकृत अवस्थेतील कणसदृश अंकुरांचे कार्य निक्षेपणाचे म्हणजे ऊतकांतील निरुपयोगी, हानिकारक आणि मृत पदार्थांचे शोषण करून ते नाहीसे करणे व शक्य तर प्रधान कोशिकांना पुन्हा जागा करून देणे किंवा ती हानिकारक नसलेल्या तंत्वात्मक ऊतकाने भरून काढणे हे असते परंतु अर्बुद-कोशिका निरुपयोगी व हानिकारक असल्या तरी त्यांचे निक्षेपण होऊ शकत नाही. म्हणजे शरीराची निक्षेपणाची शक्ती अर्बुदाच्या बाबतीत बहुधा निरुपयोगी ठरते. क्वचित धारणोतकाचा अर्बुद-कोशिकांभोवती फास पडून धारणोतक अर्बुदाला निरोधक ठरते.

 

अर्बुदाच्या प्रकाराप्रमाणे त्यातील धारणोतक कमीजास्त प्रमाणात विकसित असते. सावकाश वाढणाऱ्‍या आणि विकसित कोशिकांच्या बनलेल्या अर्बुदातील धारणोतक पूर्ण विकास झालेल्या प्राकृत धारणोतकासारखे प्रमाणबद्ध असून त्यातील वाहिन्यांच्या भित्ती सुसंघटित असतात. त्वरेने वाढणाऱ्‍या अर्बुदातील धारणोतकांतील वाहिन्या अविकसित असून त्यांच्या भित्ती ढिल्या बांधणीच्या असल्यामुळे कोठे त्या फुगीर तर कोठे चिंचोळ्या दिसतात. अशा विकृत रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह मंद होऊन रक्ताचा अर्बुदात संचय झाल्यामुळे अरुंद भागात रक्त क्लथित (गुठळी) होते. त्याचा परिणाम म्हणून कित्येक वेळा अर्बुदांत रक्तस्राव आणि शोफ (सूज) होतो. अर्बुद-कोशिका आक्रमक असल्यामुळे कित्येक वेळा त्या वाहिनी-भित्तीचा भेद करून रक्तात घुसतात त्यामुळे अर्बुदांचे कर्कक्षेप अथवा प्रक्षेप होऊ शकतात.

 

धारणोतकातील तंतू शरीरातील जालिका-अंतःस्तर तंत्रातील (जाळीसारखी रचना व शरीरातील विविध पोकळ्यांच्या अस्तरातील कोशिका यांच्या व्यूहातील) गोल आणि तारकाकार कोशिकांपासून उत्पन्न झालेले असतात. त्यांचा विकासही अर्बुदाच्या प्रकाराच्या व विस्ताराच्या त्वरेवर अवलंबून असतो. मंद गतीने वाढणाऱ्‍या अर्बुदांतील तंतू पूर्ण वाढू शकतात व त्यांच्यापासून अर्बुदांतील श्वेततंतु-ऊतक निर्माण होते परंतु त्वरेने वाढणा‍ऱ्या अर्बुदांतील तंतूंचा पूर्ण विकास झालेला नसल्यामुळे ते तर्कूच्या आकाराचे किंवा गोलाकार दिसतात. या तंतूंमुळे सौम्य अर्बुदांना वेष्टन मिळते. कित्येक वेळा त्यांच्यामुळे अर्बुदाचे कप्पे पडल्यासारखे दिसतात, तर कित्येक वेळा त्या तंतुमय देठाने अर्बुद मूळ ऊतकाला लटकून राहते.

 ‘रक्तकर्क’ अथवा⇨ श्वेतकोशिकार्बुद हा एक मारक अर्बुदाचाच प्रकार आहे, परंतु त्यातील विकृती रक्तासारख्या द्रव पदार्थात होत असल्यामुळे तेथे धारणोतक व तंतूंची उत्पत्ती होत नाही. परंतु या रोगातही यकृतात झालेल्या प्रक्षेपात अशा तंतूंची उत्पत्ती होते.

 

लक्षणे : सौम्य अर्बुदांमुळे होणारी लक्षणे, त्यांचा दाब आजूबाजूच्या इंद्रियांवर पडल्यामुळे उत्पन्न होतात तसेच त्यांच्या वजनामुळे ग्रस्त व्यक्तीस त्रास होतो. ही अर्बुदे अगदी मंद गतीने वाढत असल्यामुळे त्यांचा दाब आणि वजन यांची शरीरास हळूहळू सवय होत जाते. विशिष्ट ग्रस्त भागाच्या आकारात होणाऱ्‍या बदलाशिवाय इतर लक्षणे विशेष नसतात.

 मारक अर्बुदे म्हणजेच कर्करोग. त्यामुळे होणाऱ्‍या लक्षणांचे वर्णन कर्करोगाखाली दिले आहे

[→ कर्करोग].

 

काही सौम्य वाटणारी अर्बुदे सूक्ष्मदर्शकाने परीक्षण केल्यास मारक असलेली आढळतात. काहींच्यामध्ये प्रक्षेपणसामर्थ्य असते तर काहींचे मारकत्वात परिवर्तन होऊ शकते. याउलट लक्षणांवरून मारक वाटणाऱ्‍या काही अर्बुदांचे सूक्ष्मदर्शकाने परीक्षण केल्यास ती सौम्यच असल्याचे आढळते.

 

कुठल्याही कोशिकापासून सौम्य किंवा मारक अर्बुद बनू शकते. मूळ कोशिकेच्या नावापुढे अर्बुद अथवा कर्क हा शब्द जोडून त्या कोशिकेच्या अनुक्रमे सौम्य अथवा मारक अर्बुदाला नाव दिले जाते. उदा., तंतूपासून तंतु-अर्बुद, तंतुकर्क स्‍नायूपासून स्‍नायुअर्बुद, स्‍नायुकर्क.

 

चिकित्सा : सौम्य अर्बुदे शस्त्रक्रियेने काढून टाकतात. संपूर्णपणे काढून टाकली तर पुन्हा उद्भवत नाहीत.

 

मारक अर्बुदांची चिकित्सा शस्त्रक्रिया, क्ष-किरण किंवा रेडियम व कोबाल्ट असल्या किरणोत्सर्गी धातूंच्या उपायांनी करतात.

 

पहा : अणुऊर्जेचे शांततामय उपयोग किरणोत्सर्ग.

 

मनोहर, कमलाकर

 

 

 अर्बुद (पशूंतील) : सर्व पाळीव प्राण्यांत मारक आणि सौम्य अर्बुदे होतात.

 

ग्रंथि-अर्बुद : हे घोड्यामध्ये उदर, आंत्र,⇨अवटुग्रंथी, वृक्क (मूत्रपिंड) व क्वचित यकृतामध्ये आढळते. मेंढीमध्ये काही वेळा यकृतात तर इतर वेळा वृक्क व अग्निपिंड (पचन तंत्रातील एक महत्त्वाची ग्रंथी )यांत झालेले आढळते. कुत्र्यात जठरांत्र-मार्ग, गुदभाग व कधीकधी स्तन आणि गर्भाशय या अवयवांत होते, शिवाय अवटुग्रंथी व वृक्क यांमध्येही ह्या प्रकारचे अर्बुद आढळते.

 

अर्बुदाची रचना ग्रंथीच्या रचनेप्रमाणेच असते. श्लेष्मकला (एक प्रकारचा ओलसर ऊतकांचा थर) आदिम प्रकारची (नवकोशिकांची) असून विकसनशील किंवा क्रियाविरहित अवस्थेतील ग्रंथि-ऊतकाच्या बरहुकूम असते. मूल कलांवर कोशिकांचा एकच थर आढळतो. त्यात स्राव होत नाही व स्राव साठण्याची जागाही नसते. तंतुमय कोशिका श्लेष्मकला-कोशिकांना आधारभूत ठरतात. त्यात पूर्ण विकसित रक्तवाहिन्या असतात पण प्रावरण आढळत नाही. अशा प्रकाराचे विशिष्ट अर्बुद कुत्र्याच्या गुदद्वाराजवळील ग्रंथि-अर्बुदांत आढळते.

 

दुसऱ्या प्रकारात उपकला पूर्णपणे विकसित असून स्राव साठवण्याची जागाही आढळते. कधीकधी स्राव जास्त प्रमाणात होतो व जागा भरून गेल्याने फुगते व त्यामुळे द्रवपूरित ग्रंथि-अर्बुद होते, पण स्राववाहिनी नसते. अशा प्रकारचे अर्बुद स्तन, अवटुग्रंथी, वृक्क व अंडकोश यांमध्ये होते.

 

स्तंभाकारी कोशिकायुक्त श्लेष्मकलार्बुद जठरांत्र-मार्गात आढळणारे एक विशिष्ट प्रकारचे ग्रंथि-अर्बुद आहे.

 


अस्थि-अर्बुद : हे अस्थींमध्ये वाढणारे असले तरी संपूर्णपणे अस्थिकोशिकांचे बनलेले नसून इतर प्रकारच्या कोशिकाही त्यात आढळतात, म्हणून त्याला ‘मिश्र-अर्बुद’ म्हणतात. ही अर्बुदे सर्वसाधारण जनावरांत फासळ्यांवर, परिहृदयावर (हृदयावरील आवरणासारख्या कलेवर) व मेंदूत, आणि मेंढीत ही वपाजालेत (उदर-पोकळीला अस्तरासारख्या असलेल्या व अन्नमार्गाच्या दोन वा अधिक घड्या जोडणाऱ्‍या संयोजी ऊतकयुक्त नाजूक कलेत) व घोड्याच्या वृषणावर (अंडावर) तसेच फुप्फुसात व महारोहिणीतही होतात.

 

उपास्थि-अर्बुद : मुख्यतः उपास्थींचे बनलेले अर्बुदांचे दोन प्रकार असतात (१) काचाभ, (२) तंतुमय. क्वचित दोन्हींचा मिश्र प्रकारही असतो. अर्बुदे वसा-ऊतकांत रूपांतरित होऊ शकतात किंवा त्यांचे कॅल्सीकरण (कोशिकाभित्तींत किंवा त्यांच्यावर कॅल्शियम कार्बोनेट साचणे) व अस्थीकरण होते. ही बहुधा वृषण, अनुकर्णग्रंथी व अंडकोश ह्यांत होतात. गर्भाशयशोथ झालेल्या कुत्रीपासून जन्मलेल्या किंवा ज्यांना पूर्वी असा विकार झाला होता अशा वृद्ध (मादी) कुत्र्यांत लहान गोटीच्या आकारापासून मोठ्या अक्रोडाच्या आकारांची अर्बुदे स्तनात जास्त आढळतात. शरीराच्या ज्या भागात अस्थी वा उपास्थी असते अशाच जागी ही अर्बुदे आढळतात.

 

स्‍नायु-अर्बुद : या प्रकारची अर्बुदे बहुतकरून अनैच्छिक स्‍नायुऊतकांवर वाढत असली तरी ऐच्छिक स्‍नायु-ऊतकांवरही वाढू शकतात. सामान्यतः गर्भाशय व मूत्रवाहिनी यांच्या आणि कुत्र्याच्या बाबतीत आंत्राच्या स्‍नायूंवर वाढतात.

 

वसा-अर्बुद : हे अर्बुद प्रामुख्याने वसा-ऊतकांचे बनलेले असते. सामान्यपणे ते घोड्यात तसेच कुत्र्यात आढळते. घोड्यात वपाजाल तसेच आंत्रभित्तीला लागून पर्युदरेखाली (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थराखाली) आढळते. कुत्र्यात पोट, पुठ्ठे किंवा खांदे यांच्या त्वचेखाली क्वचित झालेले असते. ही अर्बुदे सामान्यतः एकेरी, सुव्यक्त, देठ (वृंत) असलेली असतात. प्राणी जिवंत असताना ती हाताला मऊ लागतात. तथापि मरणोत्तर परीक्षेत ती कठीण लागतात. सर्वसाधारणपणे मुसुंब्याच्या आकाराची असतात तरी कुत्र्यात फार मोठ्या आकाराची, क्वचित कुत्र्याच्या वजनापेक्षाही जास्त वजनाची झालेली, आढळली आहेत. गाईबैलांत उदरातील एका किंवा अधिक अवयवांभोवती पसरलेले असेही अर्बुद कधीकधी आढळले आहे. गुदांत्र वा त्यानजीकच्या आंत्रभागात १० सेंमी. जाड, लंबवर्तुळाकार वसेने अवगुंठित झालेले अर्बुद असू शकते.

 

तंतु-अर्बुद : ही अर्बुदे तंतुमय-कोशिकांच्या ऊतकांवर असून ती टणक वा मऊ असू शकतात. बहुतेक सर्व प्राण्यांत आढळत असली तरी विशेषतः घोड्यात होतात. त्वचेखाली होणारी, त्वचेखालून विशिष्ट मर्यादेत सरकणारी व कापून पाहिली म्हणजे तंतुमय कोशिकांची बनलेली आढळतात. वृषणावर, मांडीच्या आतल्या भागावर वा पुठ्ठ्याच्या मध्यभागी होतात. ही बहुधा मारक प्रकाराची असतात व क्वचितच निरुपद्रवी असतात. कधीकधी अशा अर्बुदांत कॅल्शियमाचा थर साठून ती कठीण बनतात व आकाराने मोठी होतात.

 

तंत्रिका-अर्बुद : तंत्रिका-कोशिकांवर वाढणारी अर्बुदे प्राण्यांत क्वचितच आढळतात असे मानले जाते, कारण प्राण्यांच्या मरणोत्तर तपासणीत ह्यासंबंधी योग्य दखल न घेण्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. मेंदूच्या भागातं वाढलेली अर्बुदे मेंदूच्या कार्यात व्यत्यय आणतात व पाय तसेच अग्रभागांचा अंगवध (लुळे पडणे) होतो.

 

 वाहिनी-अर्बुद : रक्त व लसीका किंवा नुसती लसीका ज्या भागातून वाहतात किंवा लहान रक्तवाहिन्यांचा पुंज जेथे बनतो तेथे वाहिनी-अर्बुद होते. ह्या प्रकारचे अर्बुद गाईबैलांच्या यकृतामध्ये आढळते.

 

दुसऱ्या प्रकारात रक्ताऐवजी अर्बुदाच्या पोकळीत लसीका वाहत असते त्याला ‘लसीकाकणार्बुद’ म्हणतात. असे अर्बुद कुत्र्यांमध्ये जबड्याखाली झालेले आढळते व परिणामी परिवर्ती प्रकारची (आकार बदलणारी) सूज येते. ही सूज विदारण पावून (फुटून) कष्टदायी बनते व लसीका एकसारखी वाहू लागते.

 

अंकुरक-अर्बुद : (गाईम्हशींतील चामखीळ). लहान वासरांत व दोन वर्षांखालील गुरांत ही पुष्कळ वेळा होतात. हिवाळ्यामध्ये जनावरे दाटीवाटीने ठेवलेली असतात तेव्हा या प्रकारची अर्बुदे होतात. विशेषतः डोळ्याजवळील भागावर व डोक्यावर ही होत असली तरी मानेच्या दोन्ही बाजूंस व कमीअधिक प्रमाणात शरीराच्या इतर भागांवरही आढळतात. सहसा पायावर आढळत नाहीत. सुरुवातीला लहानशी ग्रंथिमय वाढ दिसते व नंतर हळूहळू मोठी होत जाऊन शुष्क, शृंगी, पांढऱ्या रंगाचे कॉलिफ्लॉवरसारखे (फुलकोबीसारखे) पुंज बनून, सरतेशेवटी तिच्या मुळाशीच ऊतकमृत्यू झाल्यामुळे गळून पडते. कधीकधी वासराच्या अंगभर असे शेकडो पुंज आढळतात. लहान वाटाण्याच्या आकारापासून काही मिलिमीटर व्यास आकाराचे पुंज बनू शकतात. ग्रीवानीलेतून (मानेतील मुख्य शिरेतून) रक्त काढण्यासाठी वापरलेली सुई संसर्गजन्यत्वामुळे संक्रामी ठरली तर त्या जागी चामखिळी होतात. कळपातील जनावरांच्या नाकातही त्या होतात, कारण ही जनावरे हाताळणाऱ्‍याच्या बोटामार्फत किंवा वळू बैलांना काबूत ठेवण्यासाठी वापरलेल्या नाकातील वेसणीमुळे संसर्ग पसरतो.

 

चामखिळीमुळे आर्थिक नुकसान पुष्कळच होते. लहान वासरांची वाढ खुंटते. कातड्यास झालेल्या हानीमुळे रोगी जनावरांच्या कत्तलीनंतर कातड्यास किंमत येत नाही. शुद्ध प्रजननपद्धतीने उत्पादन केलेल्या पण चामखीळग्रस्त जनावरांची विक्रीची किंमत कमी येण्यामुळेही मालकांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

विशिष्ट रीतीने तयार केलेली लस त्वचेतून किंवा त्वचेखालून टोचतात. लस एकदाच टोचल्याने रोग हटतो.

शेळ्यामेंढ्यांमध्ये रोग कमी प्रमाणात आढळला तरीही साथीच्या स्वरूपात उद्भवल्याची नोंद आहे. निरनिराळ्या भागांवरील त्वचेवर गुरांप्रमाणेच अर्बुदे आढळतात.

 

कुत्र्यांमध्ये ‘चामखीळ’ नावाने ओळखली जाणारी सौम्य उपकलेची वाढ सापडते. अर्बुदे कुत्र्याच्या ओठांच्या बाजूंवर व तोंडातही आढळतात. रोगावस्था भयंकर व संसर्गजन्य असल्यामुळे रोगप्रसार झपाट्याने होतो. एकदा रोग झालेल्यांना पुन्हा तो होत नाही.

 कुत्र्यांच्या बाबतीतही गुरांच्या लसीसारखीच लस उपयोगात आणतात.

 

बापट, श्री. ह.

 

अर्बुद (आयुर्वेद) : एका विशिष्ट स्थानात दोष संचित होऊन गाठीसारखा होणारा विकार. अर्बुदे मुळाशी पसरट, वर गोल, काही अंकुरयुक्त, काही दगडासारखा, काही सारखा रक्तस्राव होणारी असतात. ही पिकत नाहीत दीर्घकाल असतात वेदना असतात. एका स्थानात अर्बुद झाल्यानंतर दुसऱ्या स्थानातही होते किंवा त्या स्थानात त्याच अर्बुदावर ते होते. त्याला ‘द्विरर्बुद’ म्हणतात. रक्तार्बुद व मांसार्बुद ही असाध्य असतात. अर्बुदाच्या आयुर्वेदीय चिकित्सेकरिता शल्यतंत्र व शल्यशालाक्य या नोंदीतील अर्बुदासंबंधीची माहिती पहावी.

 

जोशी, वेणीमाधवशास्त्री

 

संदर्भ : 1. Boyd, W. Textbook of Pathaology, Philadelphia, 1961.

         2. Hunter, D. Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1959.