आइसलँडिक भाषा : आइसलँडिक ही इंडो-यूरोपीयन कुटुंबाच्या ⇨जर्मानिक भाषासमूहाच्या अगदी उत्तरेकडील अशा स्कँडिनेव्हियन शाखेची भाषा आहे. ती उत्तर अटलांटिकमधील आइसलँड या बेटात बोलली जाते. या बेटाचे बहुसंख्य रहिवासी स्कँडिनेव्हियन आहेत. या बेटाची लोकसंख्या २,०२,१९१ (१९६८) असून सर्व लोक आइसलँडिक बोलणारे आहेत.

मध्ययुगात आइसलँडिक ही सर्वांत संपन्न अशी स्कँडिनेव्हियन भाषा होती. दहाव्या शतकापासून तिच्यात झालेली साहित्यनिर्मिती नजरेत भरणारी आहे. दरबारी काव्य, वीररसप्रधान व पौराणिक काव्य, कायदेविषयक ग्रंथ आणि अप्रतिम गद्यशैलीत लिहिलेली थोर पुरुषांची चरित्रे ही त्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. अजूनही या भाषेतील साहित्यनिर्मिती चालू असून ती महत्त्वपूर्ण आहे. 

बाह्यसंपर्कापासून अलिप्त राहिलेली ही भाषा आठदहा शतकांत फारशी परिवर्तन पावलेली नाही. विशेष उल्लेखनीय अशा पोटभाषाही तिच्यात नाहीत.

आज वापरण्यात येणारी या भाषेही लिपी रोमन लिपीवर आधारलेली आहे. त्यापूर्वी रूनिक लिपीचा उपयोग केला जाई, असे प्राचीन केरीव लेख व हस्तलिखिते यांवरून दिसून येते. लेखनपरंपरा अखंडित असल्यामुळे व प्राचीन काळापासून या भाषेबाबतचे साहित्य उपलब्ध असल्यामुळे या भाषेचा इतिहास लिहिपे सोपे झाले आहे.

आइसलँडिकची ध्वनिपद्धती स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : आ, इ, ए,ऍ, उ, ओ.

व्यंजने : स्फोटक : प,ट,क ब,ड,ग.

घर्षक : फ़, .थ, .व, .ध.

अनुनासिक : म, न.

ऊष्म : स.

कंपक : र.

अर्धस्वर : य.

महाप्राण : ह.

 

खुलासा—ऍचा उच्चार ए उच्चारताना ओठ गोलाकृती केल्याने मिळतो. आघात नेहमी शब्दाच्या आद्य अवयवावर असतो.

 

आइसलँडिकमध्ये तीन लिंगे आणि प्रथमा, द्वितीया, चतुर्थी व षष्ठी या विभक्ती आहेत. उदा.,

ए. व.

अ. व.

प्रथमा

डागुर्‌ (दिवस)

डागार्‌

द्वितीया

डाक्‌ 

डागा 

चतुर्थी 

डेगि 

डेॅगुम्‌ 

षष्ठी 

डाक्स 

डागा 

निश्चायक विशेषण नामाच्या शेवटी येते व त्याचीही विभक्तिरूपे होतात. अनिश्चायक विशेषण नाही.

सर्वनामात द्विवचन आहे.

क्रियापदांची पद्धती बरीचशी इतर जर्मानिक भाषांप्रमाणे आहे.

संदर्भ : Einarsson, Stefan, Icelandic : Grammar, Text, Glossary, Baltimore, 1949.

राघवन्, वीणा (इं.) कालेलकर, ना. गो. (म.)