अल्गाँक्वियन भाषासमूह : अमेरिकन इंडियन लोकांच्या भाषांपैकी अल्गाँक्वियन आणि तिच्याशी संबंधीत भाषांचे कुल. मुख्यत्वे कॅनडा आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पंचमहासरोवरांभोवतालचा बराच मोठा भाग, यूरोपीय वसाहती होऊ लागल्या, त्या वेळी ह्या कुलातील भाषांनी व्यापला होता. काही जमाती नामशेष झाल्या आहेत, तर काहींनी आपल्या बोली टाकून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. सु. एक लक्ष लोक ह्या समूहातील बोली बोलतात. तीन उपकुलांतील काही बोली पुढीलप्रमाणे : (१) मध्यवर्ती — ओजिब्वे, अल्गाँक्वियन, क्री, फॉक्स, मेनोमिनी, पोतावातोमी, शॉनी, डलावेअर (इलिनॉय). (२) पूर्व — आब्‍नाकी, पेनेब्स्कॉट, मॅलसीट, मिक्मॅक (मॅसॅचूसेट्स, मोहिकन).  (३) पश्चिम — ब्‍लॅक्फुट, चेयेन, आरापाहो. कंसात उल्लेखिलेल्या बोली नामशेष झाल्या आहेत. इंडो-यूरोपियनसारख्या लिखित परंपरा लाभलेल्या भाषासमूहांचा ज्याप्रमाणे तौलनिक पद्धतीने अभ्यास करता येतो, त्याप्रमाणे तो इतर पूर्वेतिहास उपलब्ध नसलेल्या भाषासमूहांचासुद्धा करता येईल, हा विचार सुरुवातीला ह्या भाषासमूहाला लावला गेला. इंग्‍लिश भाषेला Chipmunk, Moose, Raccoon इ. प्राणिनामेhickory, squash इ. वनस्पतिनामे Moccasin, squaw, totem, wigwam इ. इतर शब्दConnecticut इ. स्थलनामे ह्यांची देणगी ह्याच भाषांनी दिली. ह्या बोलींचा एक लक्षणीय व्याकरणविशेष म्हणजे धातूपासून पूर्व प्रत्ययांनी आणि परप्रत्ययांनी अर्थदृष्ट्या सर्वसमावेशक क्रियापदांची सिद्धी हा होय. उदा., पोतावातोमीमध्ये Wap∂m (∂= उलटी e, उच्चार ‘अ’) धातूपासून पुढील वाक्य तयार होऊ शकते : K-Wapm-∂k-ssi-wa-p∂nin-∂k याचा अर्थ :‘त्यांनी तुम्हा लोकांना पाहिले नाही’. अल्गाँक्वियन भाषांपासून स्वरूपदृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या दूर असलेल्या वायॉट, यूरॉक इ. बोली आणि मस्कोगियन, वाकाशन इ. भाषासमूह ह्यांच्याशी त्यांचे दूरचे नाते असावे असे दिसते. 

पहा : अमेरिकन इंडियन भाषासमूह.

संदर्भ : 1. Voegelin, C. F. Voegelin, F. M. “Languages of the World”, Anthropological Linguisitics, 6, Bloomington (Indiana), 6 June, 1964.

           2. Kelkar, Ashok R. “Participant Placement in Algonquian and Georgian, ”International Journal of American Linguistics, 31, Baltomore, 3 July, 1965. 

केळकर, अशोक रा.