अली बंधु :शौकत अली (१० मार्च १८७३—२७ नोव्हेंबर १९३८), महंमद अली (१० डिसेंबर १८७८—४ जानेवारी १९३१) : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात महंमद अली व शौकत अली या दोघांची नावे जोडीने घेतली जातात. त्यांचे वडील रामपूरच्या नबाबाच्या पदरी मोठ्या हुद्दयावर होते. ते अलीबंधु लहान असतानाच वारल्यामुळे त्यांचे संगोपन व शिक्षण आईने केले. अलीगढ विद्यापीठात त्या दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. महंमद अली हे फार बुद्धिमान होते. ते पुढील शिक्षणाकरिता इंग्‍लंडला गेले. ते आय. सी. एस.मध्ये यशस्वी झाले नाहीत पण बॅरिस्टर झाले. शौकत अलींनी नोकरी धरली व भावाच्या शिक्षणाला मदत केली. ते क्रिकेट व अन्य खेळांचे शौकीन होते. महंमद अली १९०२ मध्ये भारतात परतले व बडोदे संस्थानात त्यांनी नोकरी पतकरली. महंमद अलींनी कलकत्त्याला सुरू केलेले कॉम्रेड (१९१०) हे पत्र फार प्रसिद्धीला आले. १९१२ साली महंमद अली हे पत्र दिल्ली येथून काढू लागले. ते आपल्या पत्रातून जातीय ऐक्याचा पुरस्कार करीत. १९०६ साली स्थापन झालेल्या मुस्लिम लीगच्या संस्थापकांत महंमद अली हे एक होते. त्यांनी उर्दूमध्येही हमदर्द पत्र सुरू केले. पहिल्या महायुद्धकालात ⇨ खिलाफत चळवळ उद्भवली. त्यांच्या पत्रातून सरकारवर भयंकर टीका सुरू झाली. लढाऊ सैनिकांवर त्याचा परिणाम होईल, म्हणून सरकारने त्यांच्या पत्रांवर बंदी घालून दोघाही भावांना १९१५ च्या मेमध्ये अटकेत टाकले. युद्धसमाप्तीनंतर १९१९ च्या अखेरीस त्यांना सोडण्यात आले. मुक्त होताच ते अमृतसर काँग्रेस अधिवेशनात (२६ डिसेंबर १९१९) हजर झाले नंतर ते म. गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत सामील झाले. काँग्रेस, मुस्लिम लीग या दोन्ही संघटनांत ते अग्रेसर होते. ह्याच सुमारास कराचीला भरलेल्या खिलाफत परिषदेत ‘सच्च्या मुसलमानांनी सरकारी नोकरी करणे हे पाप आहे’ असा ठराव पास करण्यात आला. त्यावरून १९२१ मध्ये महंमद अली व शौकत अली ह्या दोघांनाही अटक करण्यात आली. दोन वर्षांच्या शिक्षेनंतर १९२३ मध्ये त्यांना सोडण्यात आले. त्याच वर्षीच्या कोकोनाडा काँग्रेसचे महंमद अली अध्यक्ष झाले (२८ डिसेंबर १९२३). परंतु ह्यानंतर दोघेही बंधू फार दिवस काँग्रेसमध्ये राहिले नाहीत. महंमद अली इंग्‍लंडमध्ये मरण पावले व त्यानंतर सात वर्षांनी शौकत अली निधन पावले.

देवगिरीकर, त्र्यं. र.