अंत्यविधी व अंत्यसंस्कार : आज ज्ञात असलेल्या सर्व प्राथमिक व प्रौढ किंवा प्राचीन व अर्वाचीन संस्कृतामधील प्रत्येक माणसात मृत्यूसंबंधी परंपरागत कल्पनांचा वारसा प्राप्त झालेला असतो. मृत्यूनंतरच्या स्थितीसंबंधी व भवितव्यासंबंधी कल्पना असतात इतर संबंधित व्यक्तीच्या मृत्यूमुळे प्राप्त होणाऱ्या मृतविषयक कर्तव्यांचीही कल्पना प्रचलित असते. सर्व प्रकारच्या संस्कृतीमध्ये मृतसंबंधी कर्तव्याच्या मर्यादा आखलेल्या असतात. प्रेताची जपणूक करावी लागते, प्रेताला एक विशिष्ट नवे महत्त्व प्राप्त होते व ते संभाळावे लागते, मृताचे रिकामे झालेले विशिष्ट नवे महत्त्व प्राप्त होते व ते संभाळावे लागते, जबाबदारीचे स्थान भरून काढावे लागते आणि कुलगोत्राची एकता पुन्हा दृढ करावी लागते आणि शोकग्रस्त आप्तांचे दु:ख शांत करावे लागते. मृत्यूनंतर मृत व जिवंत आप्त यांचा विशिष्ट संबंध अस्तित्वात येत असतो, हे प्रत्येक संस्कृतीत गृहीत धरलेले असते व या संबंधाच्या दर्शक चालीरिती परंपरेने दृढ झालेल्या असतात. त्या मात्र एक प्रकारच्या नसतात. मृत व जिवंत यांच्या संबंधाचा भिन्न संस्कृतीत अनुकूल-प्रतिकूल, चांगला-वाईट असा भिन्न अर्थ असतो. त्याप्रमाणे चालीरीती भिन्न असतात. याच चालीरीतींचे प्रथम पर्व म्हणजे अंत्यविधी वा अंत्यसंस्कार होत.
अंत्यविधी व अंत्यसंस्कार यांच्या मुळाशी मानसिक व सामाजिक कारणे आहेत. मानवी जीवनाच्या अंताचा म्हणजे मृत्यूचा अनुभव हा मानवी मनावर खोल परिणाम करणारा अनुभव आहे. मृत्यू नकोच अशी निकराची वासना असते व उलट मृत्यू हा अपरिहार्य, नैसर्गिक व सार्वत्रिक आहे अशी दारूण जाणीव असते. मृत्यूचे भय व त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव यांचे मानवी वर्तनावर दूरगामी परिणाम झालेले असतात. मानवी वर्तन त्यामुळे सतत नियंत्रित होत असते.
मृत्यू घडतो तेव्हा जिवंत व्यक्तीच्या सामुदायिक अस्तित्वाचा एक भाग निखळून पडतो, परस्परांवर आधारलेल्या विविध सामाजिक संबंधांवर विलक्षण ताण मृत्यूमुळे निर्माण होतो, अनेक संबंधांचा विच्छेद होतो, त्यांची पुन्हा जुळवाजुळव लगेच करणे प्राप्त होते. कुटुंबप्रमुख, अधिपती, राजा, शास्ता, गुरू, पुत्रपौत्रादी अपेक्षित वारसदार इत्यादींची स्थाने रिकामी होतात. वैधव्य, विधुरता, अ
नाथता, निपुत्रिकता इ. आपत्ती येतात. संपत्तीच्या व अधिकाराच्या वाटणीचे प्रश्न सोडवावे लागतात. घडी विस्कटते व ती पुन्हा बसवावी लागते. जीवनमूल्ये, संस्था, सांस्कृतिक आचरणाचे सातत्य यांवर पुन्हा भर देण्याची आवश्यकता उत्पन्न होते.
अंत्यविधी व अंत्यसंस्कार यांचे आकलन करण्याकरिता त्यांच्या मुळाशी असलेली वरील मानसिक व सामाजिक कारणे लक्षात घेणे जरूर आहे. त्या त्या विशिष्ट सांस्कृतिक परंपरेचे संस्कार प्राप्त झालेल्या मनात स्वाभाविक रीतीने ज्या भावनात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होतात, त्यांची कार्ये म्हणजे अंत्यविधी व अंत्यसंस्कार होत, अशी संस्कृतीची कार्यात्मक उपपत्ती (फंक्शनॅलिझम) काही मानवशास्त्रज्ञ देतात. विरह, शोक,हळहळ,भीती या भावनांचे आविष्कार म्हणजे विधी व संस्कार होत. त्यामुळे त्या भावनांचे शमनही होते, असे ही उपपत्ती मानते. परंतु ही उपपत्ती अपुरी आहे, हे विधी व हे संस्कार केवळ स्वाभाविक भावनांचे आविष्कार व शमनप्रकार नसून समाजाने निर्मिलेल्या विशिष्ट सामाजिक संस्थाच होत. मृत व जिवंत यांचे समाजनिर्मित नवे संबंध त्यांत निर्दिष्ट असतात. त्यांत निरनिराळ्या नव्या परंतु पूर्वसदृश भावना व्यक्त होतात, अशी रचनात्मक उपपत्ती (स्ट्रक्चरॅलिझम) काही मानवशास्त्रज्ञ सांगतात. सामाजिक संबंध व मूल्ये यांच्याशी ह्या भावना निगडीत असतात. मृत्यूने तुटलेल्या संबंधांची जुळणी व नवीकरण विधींनी व संस्कारांनी होते. अजाणपणे मनात वसणाऱ्या गरजांमुळे पापाची व पापनाशाची जाणीव उत्पन्न होते. मृताबद्दल आपुलकी, भय वा आदर अशा दुहेरी भावनांचे मिश्रण त्यात असते. मृत देह अपवित्र व त्याचे स्वकीय अपवित्र अशी कल्पना असते. मृताचे भय व त्याच्याशी मृत्यूनंतर संबंध कायम टिकवण्याची वासना असते त्यामुळे मृताच्या कल्पनानिर्मित गरजा लक्षात ठेवून, अन्नार्पण, जिवंतपणी संबंध असलेल्या वस्तूंचे अर्पण, प्रार्थनेने पापनिवारण व असेच अन्य विविध प्रकारचे कर्मकांड केले जाते. मृत हा भूत होऊन घुटमळू नये, त्याचा पुढील मार्ग व मुक्काम निर्वेध व्हावा, त्याने घरी परतून छळू नये, मृत्यूनंतरच्या स्थितीत त्याचे कल्याण व्हावे व जिवंत आप्तांचेही कल्याण करावे इ. गोष्टींची तरतूद मृतसंबंधी कर्मकांडात असते. अंत्यविधीचेच एक रूपांतर म्हणजे पितरांच्या पूजेचा संप्रदाय होय. अंत्यविधी व अंत्यसंस्कार यांसंबंधी अगणित प्रकारच्या चालीरीती भिन्न संस्कृतींमध्ये आढळतात. (१) मृत्यू जवळ ठेपलेला काल (२) मृत्यूचा समय (३) मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचा समय व (४) मृत शरीराची विल्हेवाट लावल्यानंतरचा शोककाल, याच्याशी संबद्ध अशा या चालीरीती असतात. संबंधित व्यक्ती मृत्यूच्या दारात आहे हे कळले म्हणजे आप्तसंबंधी मंडळी पुरोहितास, नातलगांना व इतर संबंधी जनांना कळवितात, मंत्रपाठ होतो व प्रार्थना म्हटल्या जातात. मुमूर्षूची शय्या बदलतात, वस्त्रालंकारांची व्यवस्था करतात, मृत्यूनंतर मृत देहास स्नान घालतात तैलादिकांनी अभ्यंग करतात, माला घालतात, वस्त्रे बदलतात, काही जमाती मुमूर्षाच्या जीवात्म्याला निघून जाण्याकरिता घरात एक विशिष्ट मार्ग तयार
करतात व मेल्यावर तो मार्ग, मृतात्मा परत घरात येऊ नये म्हणून बुजून टाकतात मृत शरीरास नेण्याकरिता लागणारे ताटी, पेटी, गाडी, पालखी वा अन्य प्रकारचे वाहन तयार करतात. आप्तेष्ट वा संबंधी बांधव कपडे बदलून एकत्र जमतात व प्रेतयात्रेत सामील होतात.
मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचे भिन्न भिन्न संस्कृतींत प्राथमिक अवस्थेपासून आजपर्यंत मान्य असलेले भिन्न प्रकार असतात. त्याप्रमाणे पूर्व तयारी सुरू असते. मृत देहाच्या विल्हेवाटीचे मुख्यतः सहा प्रकार प्रसिद्ध आहेत : (१) मृत देह व्यवस्थित पुरणे. स्वतःच्या घरात, घराच्या अंगणात, देवळाच्या परिसरात, शेतात, स्मशानभूमीत, दगडी गुहेत वा झाडाच्या ढोलीत मृतास बसवून वा निजवून पुरतात. पूर्वी मृताला जेथे पुरत तेथे त्याला जिवंतपणी लागणाऱ्या अन्न, मद्य, हत्यारे इ. वस्तू पुरत. मोठे सरदार पुरोहित वा सन्मान्यजन पुरले जात, तेव्हा त्यांचा दास, बायको, वाहन इत्यादीही पुरत असत. आता ही प्रथा लुप्तप्राय झाली आहे. (२) मृत देह जसाच्या तसाच टिकविण्यासाठी प्रथा. पाऊस पाणी नसलेल्या वाळवंटी प्रदेशातल्या जमाती कोरड्या वाळूत खड्डा खणून मृत देहाला ठेवीत. अशा स्थितीत देह बराच काळ टिकतो. ईजिप्तमध्ये प्राचीन काळी मोठे सरदार, राजे व राण्या यांच्या मृत देहांना टिकवण्याकरिता विशिष्ट प्रकारचे उटणे लावून ⇨ममी तयार करीत. ममी म्हणजे असे उटणे लावून टिकविलेले, सुकलेले, लाकूड बनलेले देह होत. सरदार, राजे, राण्या वा पुरोहित यांच्या मृत देहाजवळ त्यांच्या प्रिय वस्तू, हत्यारे, अलंकार व त्यांचा मनुष्यपरिवारही पुरत असत. (३) मृत देह जाळून टाकण्याची प्रथा. ग्रीक व रोमन, बौद्ध, हिंदू इ. समाजांमध्ये मृत देहाला अग्नी देण्याची प्रथा प्राचीन काळी होती. हिंदू व बौध्द यांच्यात हीच दहनाची प्रथा आजपर्यंत चालू आहे. दहन झाल्यानंतर जे अस्थी-अवशेष राहतात, त्यांना विधिपूर्वक पुरतात किंवा पवित्र स्थळी वा तीर्थात त्यांचे विसर्जन करतात. दहनानंतर राहिलेल्या अवशेषांना पुरण्याची प्रथा दहनाच्या चालीचीच पूरक प्रथा म्हणून सर्व दहन करणाऱ्या प्राचीन जमातींत मान्य होती. अर्वाचीन जमातींतही ती प्रथा चालू आहे. (४) जलात विसर्जन करण्याची प्रथा. पवित्र महानद्यांच्या काठी वसणाऱ्या मृत साधूसंन्याशांना, समुद्रप्रवासी अशा मृत खलाशांना, गुलाम, बेवारस विदेशी वा उपेक्षित मृत व्यक्तींना वस्त्र गुंडाळून, दगड बांधून किंवा अन्य प्रकारे नदीत वा समुद्रात टाकून देतात. (५) विहिरीत, मैदानात, जंगलात वा रचलेल्या वेदीवर मृत देहाचे विसर्जन करण्याची प्रथा. हिंस्त्र पक्ष्यांनी वा हिंस्त्र प्राण्यांनी प्रेत खाऊन टाकावे असा या प्रथेचा उद्देश असतो. बर्फाच्छादित प्रदेशात कायम राहणाऱ्या जमाती प्रेतास उंच जागेवर बांधून ठेवतात व बर्फ वितळल्यावर जमिनीत पुरून टाकतात. पारशी लोक ⇨ दख्म म्हणजे कोरड्या विहिरीत किंवा उंच बांधलेल्या वाटोळ्या व खोल मनोऱ्यात हिंस्त्र पक्ष्यांनी खाऊन टाकण्याकरिता प्रेत ठेवतात. (६) काही रानटी जमाती मृत नातेवाईकाच्या शरीराचे मांस समारंभाने भक्षण करून संपवितात. अशी चाल आस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका व आफ्रिका येथील काही वन्य जमातींत आढळते, असे संशोधक प्रवाशांनी नोंदले आहे. मृतनिर्हरणाचे हे सहा प्रकार सामान्य स्वरुपात भिन्न भिन्न मानवी समाजांमध्ये अस्तित्वात होते व अजूनही आहेत. प्रत्येक समाजात सर्व काळी एकाच प्रकारचे मृतनिर्हरण नव्हते. त्यांत परिवर्तने झालेली दिसतात.समाध्या, वृंदावने, थडगी, कबरी, देवळे, मूर्ती, स्तूप, स्तंभ इ. प्रकारची मृताबद्दल आदरदर्शक, मृताचा सामाजिक दर्जा दाखविणारी वा पूजनीय अशी स्मारके बांधतात. सांस्कृतिक प्रगतीप्रमाणे स्मारक उभारण्याची साधने व पद्धती यांत बदल होत गेले.
हिंदू : मरणोन्मुख हिंदूच्या जवळ बसून पवित्र स्तोत्रपाठ म्हणतात, त्याचे डोळे मिटवितात. तीर्थजल, गंगोदक, तुलसीपत्र इ. त्याच्या मुखात घालतात. मरणानंतर आप्तांनी दु:खाक्रोश करू नये असे धर्मशास्त्र असले, तरी आप्त दु:खाक्रोश करतात.कित्येक हिंदू जमातींत सामुदायिक आक्रोश करण्याची रूढी आहे. प्रेत उचलल्यावर मरणस्थान सारवून तेथे दहा दिवस दक्षिणाभिमुख असा दिवा, वस्त्र, पाण्याचे गाडगे व इतर पदार्थ ठेवतात.
‘प्रेत’ म्हणजे निघून गेलेला (जीवात्मा) हा मूळ अर्थ पण तो शब्द आता ‘मृत देह’ या अर्थी आहे. मृत देह अत्यंत अपवित्र व अस्पृश्य मानतात. दक्षिण या यम-दिशेकडे तोंड करून प्रेतस्नान झाल्यावर, ते कोऱ्या वस्त्राने वेष्टितात. साधुसंन्यासी व तीन वर्षापर्यंतचीलहानअर्भके यांना पुरतात. इतर मृतांना पुष्पमाला, गुलाल, बुक्का वा गंध लावून स्मशानात नेऊन चितेवर जाळतात. हा विधी मृताचे जवळचे नातेवाईक असल्यास समंत्रक व नसल्यास अमंत्रक होतो. बांबू व गवत यांच्या तिरडीवर घालून प्रेत स्मशानात नेतात. नेताना मुख झाकलेले किंवा उघडे ठेवण्याची चाली आहेत. आप्तेष्टमित्र तिरडी वाहतात. पुत्र वा आप्त क्षौर करतो व अग्नी मडक्यात ठेवून, ते मडके शिंक्यात घेऊन प्रेतयात्रेत अग्रभागी चालतो. श्राद्धाचा अधिकारी आप्त नसल्यास समंत्रक दहन न करता अमंत्रक अग्नी देतात. त्यास ‘भडाग्नी’ म्हणतात. मृतासमवेत पत्नीचा सौभाग्यालंकार जाळतात. पत्नीने चितेत जाळून घेण्याची म्हणजे ⇨ सती जाण्याची चाल ब्रिटीश सत्तेपूर्वी होती. धर्मशास्त्राप्रमाणे सती जाणे ऐच्छिक असले, तरी उच्च हिंदू जमातींत ती चाल सक्तीची झाली होती, मात्र ती मृताच्या सर्व बायकांना लागू नव्हती. पुरूषाला डोक्याकडून व स्त्रीला पायाकडून आप्त अग्नी देतो. नंतर तो पाण्याने भरलेले गाडगे खांद्यावर घेतो. दगडाने गाडग्याला भोक पाडतात, पाण्याची धार तो चितेभोवती फिरवीत तीन प्रदक्षिणा घालतो. त्याच दगडावर गाडगे फोडतो. दहा दिवसांनी त्या दगडावर तिलांजली दिल्यावर स्नान करतात या दगडाला ‘अश्मा’ म्हणतात.
मृताच्या अग्निसंस्कारास ‘अंत्येष्टी’ म्हणतात. मृत अग्निहोत्र्याचे दहन त्याच्या श्रौताग्नीमध्ये यज्ञपात्रासह करतात. वेदकाळी अग्निहोत्री मृताची गाय मारून, तिचे मांस प्रेतावर पसरून प्रेताला जाळीत. अंत्ययात्रेतील पुत्र, आप्त व अन्य सहचारी परतल्यावर लगेच अंगावरील वस्त्रांसह स्नान करतात. दहनोत्तर चिता थंड झाल्यावर अस्थी व राख बांधून आणतात व नदीत वा विहिरीत विसर्जन करतात. ऐपत असणारे तीर्थक्षेत्री जाऊन विसर्जन करतात. पतीच्या मरणानंतर हिंदू स्त्रिया आपले कुंकू पुसून पुन्हा ते लावीत नाहीत. वैधव्याचे व्रत आमरण पाळणे हा धर्म मानतात. संन्याशाचा मृत देह स्नान घालून अलंकृत करून पुरण्याच्या स्थळी नेतात व त्याची पूजा करतात. पुरण्यापूर्वी शंखाने वा शस्त्राने मस्तक फोडतात व देह पुरतात. संन्याशाचा देह तीर्थात टाकण्याचीही चाल आहे. त्याला ‘जलसमाधी’ म्हणतात. दहा दिवस समाधिस्थानपूजा, पायसबलिदान,दीपदान व शंखोदकतर्पण होते. अकराव्याला पार्वणश्राद्ध, बाराव्याला नारायणबली व नंतर समाराधन होते. यानंतर संन्याशाची समाधी बांधतात संन्याशाचे पिंडदान नसते.
इतरांच्या संबंधात एक ते अकरापर्यंत विषम दिनी श्राद्धे होतात. अकराव्याला होमपूर्वक दोन वर्षाचा बैल मोकळा सोडण्याचा विधी, म्हणजे ‘वृषोत्सर्ग’ करतात. सामर्थ्य नसल्यास मृतिका वा पिष्ट यांचा बैल करतात.जवळचे आप्त दहा दिवस व दूरचे तीन दिवस सुतक पाळतात. दहाव्या दिवशी उघड्यावर मातीच्या उदकुंभावर पिंडदान करतात. पिंडाला कावळा शिवावा अशी अपेक्षा असते. बाराव्या दिवशी श्राद्ध करतात. बाराव्या-तेराव्या दिवशी ब्राह्मणभोजनाची व आप्तेष्टभोजनाची चाल आहे. त्या दिवसापासून प्रेतात्मा पितर बनतो. शस्त्र, सर्प, विष व अग्नीने मृत झाल्यास नारायणबली व ⇨प्रायश्चिते करतात. मृतांच्या निमित्ताने विविध प्रकारची दाने करण्याची प्रथा आहे. मृतांची वृंदावन किंवा इतर प्रकारची स्मारके उभारण्याची चाल वेदकालापासून चालू आहे.
प्रेताबरोबर शिजवलेला भात घरातून नेणे, प्रेताच्या तोंडावर तो ठेवून त्यावर सर्वांनी उदक सोडणे अशी चाल काही ब्राह्मणेतरांत आहे. प्रेताचे पाय दक्षिणेकडे करण्याप्रमाणे तेथे दक्षिणाभिमुख दीप ठेवण्याची चाल सर्व हिंदूंत आहे. विधवा व निपुत्रिक यांची प्रेते तोंड झाकून नेतात. काही ब्राह्मणेतर जातींत सुपात कोणतेतरी धान्य घेऊन ते प्रेतमार्गावर टाकीत जाण्याची चाल आहे. ऋग्वेदात (१०.१८.११-१३) प्रेत पुरण्याच्या चालीचा उल्लेख आहे. अग्निदहन-प्रथा नंतर सुरू झाली. ऋग्वेदातच ‘अग्निदग्ध’ व ‘अनग्निदहध’ असे उल्लेख आहेत. त्यांवरून दोन्ही रीती चालू होत्या असे दिसते.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
बौद्ध : बौद्धांत भिक्षू व पूज्य पुरूष यांचे दहन असते. थायलंड व कंबोडिया या देशात बौद्ध प्रेते कित्येक दिवस पडवीमध्ये किंवा खोलीत ठेवतात. राजघराण्यातील प्रेते दोनतीन वा अधिक महिने ठेवतात. पेटीत ठेवलेल्या प्रेताजवळ धर्मपाठ चालतात व नंतर दहन होते. कंबोडियात, त्याज्य मानलेले मृत कैदी तसेच आत्महत्या, अपघात व खुनाने मेलेले यांना पुरतात. जपानी बौद्धांतही प्रेतदहन आहे. तिबेटात वरिष्ठ लामांची प्रेते ध्यानस्थ बुद्धाप्रमाणे बसवून जाळतात इतरांची पुरतात. चिनी बौद्ध भिक्षु-भिक्षुणींना जाळतात व इतर मृतांना पुरतात. महान भिक्षूंच्या अस्थी, केश, पात्रे, वस्त्रे इत्यादींवर स्तूप उभारीत. एके काळी प्रेते जंगलात फेकली जात असावी, असे निकायासारख्या ग्रंथावरून दिसते. मरणोन्मुख माणसापुढे धार्मिक ग्रंथपाठ करतात. याचा हेतु असा, की त्यामुळे त्याला पुढील चांगल्या जन्माचे ‘विज्ञान’ व्हावे. जपानातील बौद्धांत पुरोहिताच्या समक्ष प्रेतमुंडन होते. दहनास योग्य असे विशिष्ट दिवस असतात. नोकर प्रेतापुढे जेवण ठेवतात, वस्त्रांनी आच्छादतात एका पिशवीत पुढील प्रवासोपयुक्त नाणी, वस्तु इ. ठेवतात. त्यांसह दहन होते. बौद्ध पंथभेदानुसार चालींमध्ये काही फरक आहेत. दहनानंतर अस्थी गोळा करून आणतात व त्या पुरतात.
बापट, पु. वि.
जैन : जैनांत प्रेताला स्नान व कपडे घालून प्रेतयात्रेने स्मशानात नेतात. पूर्ण दहन होईपर्यंत सर्व तेथे थांबतात. तिसरे दिवशी रक्षा नदीत टाकतात व जिनालयात जाऊन जिनपूजा करतात. नंतर उपाश्रयात जैन श्रमण त्यांना शरीरनश्चरत्व पटवून देतो. दहा दिवस ⇨आशौच पाळतात. क्रियाकर्मोतर नसते पण मृत्यूपूर्वी व नंतरही आप्त दानधर्म करतात. या चालींमध्ये प्रदेशपरत्वे काही अंशांनी भिन्नता आढळते.
केळकर, ग. वि.
शीख : शीख धर्मात खास अंत्यविधी नमूद केलेले नाहीत परंतु अंत्यसमयी म्हणावयाच्या काही धार्मिक प्रार्थना निवडलेल्या आहेत. मृतासंबंधी विलाप करणे व ऊर बडवून आक्रोश करणे मात्र निषिद्ध मानले आहे. मृताशेजारी बसून धार्मिक प्रार्थना म्हणतात. प्रेत दहनास नेण्यापूर्वी प्रेताला स्नान घालून धर्मविहित पोषाख चढवितात. हिंदूंप्रमाणेच ते प्रेताचे दहन करतात. मृताचा मुलगा अथवा जवळचा आप्त चिता पेटवितो. नंतर चितेतील रक्षा नदीत टाकतात. शक्य असेल, तर ही रक्षा कर्तारपूरजवळ बिआस नदीत टाकतात. मृताची स्मारके बांधणे ते निषिद्ध मानतात. त्यांच्यात पुण्यतिथी साजरी करण्याचीही प्रथा नाही. मृताच्या वयोमानानुसार चारपासून दहा दिवसांपर्यंत कमीअधिक दिवस सुतक पाळतात. सुतकाच्या काळात घरातील लोक जमिनीवरच बसतात व झोपतात. सुतकाच्या शेवटच्या दिवशी आप्त मृताघरी जमून ग्रंथासाहिबातील ठराविक उताऱ्यांचे पठण करतात. कुटुंबप्रमुख मृत झाल्यास त्याच्या ज्येष्ठ मुलास ह्या दिवशी सर्वासमक्ष फेटा बांधतात व नवा कुटुंबप्रमुख म्हणून मान्यता देतात.
सुर्वे, भा. ग.
लिंगायत : लिंगायत (शैव वा वीरशैव) यांच्यामध्ये मृतांना पुरण्याची चाल आहे. त्यांच्या गळ्यात नित्य असलेले शिवलिंग सर्व अपवित्राचा नाश करते व अग्नी जाळण्यासारखे अपवित्र काही उरत नाही म्हणून अग्निसंस्कार नाही, असे सांगितले जाते. मिठामध्ये जमिनीत बसलेल्या स्थितीतच प्रेत पुरण्यात येते. तिरडीवरून प्रेत नेण्याची चाल नाही. मनुष्य मृत झाला म्हणजे घरीच त्याच्या मृत्युशय्येभोवती सर्व आप्तेष्ट वर्तुळाकार बसून भोजन करतात. मग बैलगाडीतून प्रेतयात्रा निघते. बरोबरच दोन पोती मीठ वाहून नेतात. त्यांच्यात सुतक पाळीत नाहीत.
पारशी : पारशी समाजात मृत देह घरात स्वच्छ केलेल्या खोलीत ठेवतात. त्याला स्नान घालून पांढरे कपडे घालतात. त्याच्याभोवती नातलग विशिष्ट मंत्र म्हणत पवित्र दोर बांधतो. मृताच्या कानापाशी एक मंत्र म्हणतात. ‘दख्म’ म्हणजे एका उंच बुरुजापर्यंत, विशिष्ट शुभ्रवस्त्राच्छादित प्रेतवाहक दिवसा प्रेत नेतात. भुते उत्तर दिशेला म्हणून तिकडे प्रेतमुख करीत नाहीत. बुरुजातील वर्तुळाकार स्थानात मृताचा नग्न देह टाकतात. तो गिधडांनी खाऊन झाल्यावर अस्थी एका विहिरीत टाकतात. पुरोहित त्या त्या वेळी विशिष्ट धार्मिक मंत्र म्हणत असतात.
ज्यू : यहुदी किंवा ज्यू लोकांमध्ये पुनर्जन्म-कल्पना नाही. मृत आपल्या पितराकडे जातो असे ते मानतात. अनेक देवदूतांपैकी सॅम्युएल हा मृत्यूचा देवदूत (एंजल) आहे. त्यांच्यात प्रेतदहन नाही. मोठ्या संपन्न कुटंबात घरालगत प्रेते पुरण्याचे अंगण असते. सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक दफनस्थळे असतात. प्रेताच्छादनासाठी आवरण व विशिष्ट प्रकारचे कपडे असतात. काही थोरांची वा धर्मप्रमुखांची थडगी पूज्य व आदरणीय मानतात पण सामान्यतः दफनभूमीत मृतांची भूते वावरतात, म्हणून ती थडगी अनिष्ट मानली जातात. शोकाचे वा सुतकाचे सामान्यतः सात दिवस असतात. दफनाच्या दिवशी नातलग उपास करतात. दुसरे दिवशी इष्टमित्रांसह चांगले भोजन होते. मृताचा पुत्र ज्यू धर्मग्रंथातील ‘कादिश’ मंत्राचा जप ओळीने अकरा महिने व नंतर पुण्यतिथीच्या दिवशी करतो. त्यायोगे मृताला सद्गती मिळते, अशी समजूत आहे.
केतकर, ग. वि.
ख्रिस्ती : प्रेतांना पुरण्याची चाल सार्वत्रिक आहे. त्यांच्यात पूनर्जन्माची कल्पना नाही. प्रथम ख्रिस्ती लोक ज्यूप्रमाणेच अंत्यसंस्कार करीत. नंतर पुनरुत्थान व पवित्र आत्म्याचे शरीरातील वास्तव्य यांवरील विश्वास, ह्यामुळे त्यात बदल होत गेला. पुरण्याची जागा नैसर्गिक गुहा किंवा खडकाळ टेकडीत खोदलेली कबर या स्वरूपात शहराच्या बाहेर असे. त्यात पुष्कळ प्रेतांची सोय असे. अगदी पूर्वी ख्रिस्ती संतांचा झालेला अनन्वित छळ व त्यांनी पतकरलेले हौतात्म्य, ह्यांमुळे अशा संतांच्या कबरी लोकांची उपासनाकेंद्रे बनली. रोमच्या आसपास अशा जागा आढळतात. जमिनीत खोदून बंदिस्त केलेल्या कबरी, हुतात्म्यांची प्रेते सुरक्षित रहावी व श्रद्धाळू लोकांना निर्धोकपणे त्यांचे दर्शन घेता यावे म्हणून निर्माण झाल्या. नंतर पाश्चिमात्य चर्चने प्रेते पुरण्याची सोय चर्चच्या आवारातच करण्यास सुरूवात केली. रोमन काळातील अंतयात्रेमध्ये किंवा मृताच्या स्मरणार्थ झालेल्या मेजवान्यांमध्ये अंत्यसंस्कारगीते (डर्ज) म्हणण्याची प्रथा होती. एलिझाबेथ काळात इंग्रजीत अनेक दर्जेदार अंत्यसंस्कारगीते लिहिली गेली. त्यांत मृत्यूची अनिवार्यता, जीवनाची क्षणभुंगरता, दु:ख, विलाप हे प्रमुख विषय आणि शोकानुकूल गेयता असते.
चौथ्या शतकापासून कबरी खोदणारे, मृत्युलेख खोदणारे, दगडकाम करणारे असे तज्ञ लोक निर्माण झाले. ख्रिस्ती धर्माला राजमान्यता मिळाल्यावर राजाश्रय, पैसा ह्यांच्या साह्याने संतांच्या व प्रेषितांच्या कबरी भव्य व सुंदर उपासनाकेंद्रे बनली व वास्तु-शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने तयार झाले. अलीकडे मृताच्या वा त्याच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार प्रेतास अग्नीही दिला जातो.
आयरन, जे. डब्ल्यू.
इस्लामी: मुसलमानांमध्ये अंत्यसमयी ‘कलिमा’ (ईश्वर एकमेव आहे इ.) उच्चारील तो स्वर्गात जातो. मरणोन्मुख मनुष्याभोवती याच कलिमांचा उच्चार इतर करतात. मृत्यूनंतर ⇨कुराणामधील छत्तीसाचा सुरा, ‘सुरे या सिन’ हा म्हणावा असे परंपरेने विहित आहे. आसन्नमरण माणसाचा देह मक्केच्या दिशेकडे तोंड करून ठेवतात. मृताचे कपडे बदलतात, तोंड मिटून डोक्यावरून पट्टी बांधतात व पायही एकत्र बांधतात. भारतात शवाला पांढऱ्या कापडाने झाकतात, इतरत्र हिरव्या कापडाने झाकण्याची चाल आहे. दफनयात्रेत भारतात स्त्रिया जात नाहीत, इतरत्र कोठेकोठे जातात. ही यात्रा जात असता वाटेत येणारे मुसलमान उभे राहून प्रार्थनामंत्र म्हणतात. शवाला खांदा देणेही कर्तव्य मानतात. मशिदीत जमिनीवर तिरडी, पूर्वांग मक्केकडे करून ठेवतात. तेथे इमाम प्रार्थना म्हणतो. भोवती असलेल्या आप्तेष्टांना, ‘याच्यासंबंधाने तुमची साक्ष सांगा’ असे इमाम म्हणताच ‘तो धर्मनिष्ठ होता’ असे सर्व म्हणतात. नंतर प्रेत दफनास नेतात. प्रेत उजव्या बाजूस कलते, मक्केकडे तोंड करून ठेवतात व कबर बंद करतात. नंतर तेथे एक फकीर बसून, देवाकडून मृताला केल्या जाणाऱ्या पाच प्रश्नांना बरोबर उत्तरे जावीत म्हणून ती तो उच्चारतो, ‘माझा ईश्वर अल्ला, माझा प्रेषित मुहंमद, माझा धर्म इस्लाम, धर्मग्रंथ कुराण व काबा हा किल्बा (प्रार्थनामंदिर) होय,’ अशा अर्थाची ती उत्तरे आहेत. नंतर प्रेत आणणारे ‘फतीहा’ म्हणून परततात. ‘फतीहा’ म्हणजे कुरणाचा छोटा प्रथमाध्याय. नंतर मृताच्या खोलीत फकीर कुराणातील विशिष्ट अध्याय म्हणतात व मोठी जपमाळ घेऊन कलिमाचा खूप जप करतात.
इतर भारतीय जातिजमाती व संप्रदाय : आदिवासी अनार्य जमातींमध्ये मृत्यूला कारण होणारा रोग, पशू वा अपघात हा कोणा भूतपिशाचादिकांकडून होतो, असे मानतात. प्राण ही एक सूक्ष्म व्यक्ती असते व चांगल्या माणसाचा प्राण मुखनेत्रादिकांतून, तर वाईट माणसाचा गुदमूत्रद्वारांतून बाहेर पडतो, असे मानतात. काही जातींत एका देहात अनेक आत्मे मानून मृत्यूस्थळी, पुरणाच्या स्थळी व इतरत्र अन्नबलिदान होते. बहुतेक जमातींत फक्त मेलेल्याच्या पुरते विधी होतात. मृतात्मा काही काळ कृमिकीटकांत असतो, म्हणून मरणस्थानी राख वा पीठ पसरून, त्यावर कोणा प्राण्याचे पाय उठलेले दिसतात, हे पाहण्याची चाल काहीमध्ये आहे. पश्चिम भारतातील प्रेतदहन करणाऱ्या जमातींमध्ये जीव दगडामध्ये जातो अशा समजुतीने दहनभूमीवरून ‘जीव-खडा’ उचलून आणतात व त्याला उदक देतात. काही जमातीत मरणोत्तर जीव झाडामध्ये जातो असे मानतात. नागा व माडिया गोंड हे झाडामध्ये मृत देह गाडतात. तर खासी जमातीत झाडाच्या ढोलीत प्रेत ठेवतात. सर्व जमातीत आपल्या कुलातले मृतात्मे उपकारी व इतर कुलांतले अनिष्ट समजतात. उपकारी मृतात्म्यांना गृहरक्षणार्थ परत येण्याचे आवाहन करतात. घरात अगर पुरलेल्या जागी दिवा लावण्याची चाल बहुतेकांत आहे. कोठे कोठे मृतात्म्यांना पूर्वमृतांत पोचवण्याचे विधी आहेत. मणिपूरव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या नागांमध्ये ज्या भूतपिशाचाने मृत्यू आणला, त्याला शाप देऊन भाल्याने धमकावण्याची चाल आहे. मृतात्म्यांना अन्नोदक देतात. त्यांची शस्त्रे त्यांच्याबरोबरच पुरतात. गारोंमध्ये कुत्रा मारून पुरण्याची व गोंडांमध्ये थडग्यावर मातीची अश्वप्रतिमा ठेवण्याची चाल आहे. छोटा नागपूरमधील कोळी व तत्सम, आसामातील नागा व खासी, मृताला पुरलेल्या जागेवर वर्तुळाकार दगड ठेवतात. पहाडिया व नागा त्याज्य स्थितीत मेलेल्यांना पशुपक्ष्यांसाठी अरण्यात टाकतात. बंगालमधील काही लोकांत प्रेते जलप्रवाहामध्ये टाकतात. सर्वांमध्ये प्रेतस्पर्शकांना वेगवेगळे शुद्धीचे विधी आहेत. नातलगांचे मुंडण करण्याची व मृताबरोबरच केस पुरण्याची चाल पुष्कळ जमातीत आहे. दक्षिणेत मुंबईकडील भागात कानफाटे किंवा गोरखपंथी या संप्रदायांमध्ये मृताला बसलेल्या स्थितीत जमिनीत पुरण्याची चाल आहे. काशीतील कानफाटे मृतांना घरामध्येच पुरतात. मुंबई ते दक्षिण हैदराबादपर्यंतच्या प्रदेशातील तेलंगी लोक कोणाही आप्तेष्टाने मृत्यूसाठी रडावयाचे नाही असे नियम पाळतात. प्रेताला अग्निसंस्कार होतो. तत्पूर्वी दोन गाडगी भरून शिंदीची दारू आणून सर्व आप्तेष्ट प्राशन करतात. अग्नी देण्यापूर्वी प्रेताभोवती सर्व नाचतात.
चीन व जपान : चीनमध्ये निरनिराळ्या भागांत मृत देहाच्या विसर्जनाबाबत अनेक रूढी आहेत. मातीत मृताला गाडण्याची सर्वत्र चाल आहे. केवळ खड्डा खणून प्रेत टाकत नाहीत, तर प्रेताभोवती आणि वरही मातीचा ढीग रचतात. बौद्ध धर्म आल्यावर भिक्षू आणि भिक्षूणी यांच्या प्रेतांचे दहन केले जाऊ लागले. राजाच्या प्रेताभोवती अनेक गुलाम जिवंत पुरण्याची चाल प्राचीन काळी होती. सतराव्या शतकातही तसे उदारण सापडते. आता मात्र नोकराचाकरांच्या कागदाच्या आकृती करून पुरतात वा जाळतात. लहान मुले व अविवाहित तरुण यांना पुरण्याच्या संबंधात विशेष विधी नसतात. मोठ्या माणसांना मृत्यूसमयी बसवितात कारण प्राण अधोमार्गाने न जाता ऊर्ध्व जावा प्रेतवाहक पेटी व त्यातील वस्तू यासंबंधीच्या विविध चाली आहेत. उत्तरक्रियेचा अधिकार ज्येष्ठ पुत्राचा असतो. वयस्क माणसाच्या मृत्यूनंतर शोक न करता सर्व शांत राहतात. ⇨ कन्फ्यूशसने जुन्या चाली चालवण्याचा उपदेश केला. म्हणून चीनमध्ये ⇨ताओमताचे जुने विधी व बौद्धविधी प्रचलित आहेत.
जपानमध्ये अनेक बौद्ध पंथ व ⇨शिंतोधर्मयांच्यात प्रेतवाहक पेटी वापरात आहे. प्रेताला स्नान घालण्याची व क्वचित ओल्या फडक्याने पुसण्याची चाल आहे. मरणापासून पुरण्यापर्यंत मृतात्मा असतो, असे मानून प्रेतापुढे खाद्यपेये ठेवण्याची व त्याच्याशी बोलण्याची चाल सर्वांमध्ये आहे. बौद्धांमध्ये अंत्यविधीत पुरोहिताचा आवश्यक भाग असतो.
केतकर, ग. वि.
पहा : श्राद्धविधि पितर पितृपूजा.
संदर्भ: 1. Bendann, Effie, An Analytical study of Burial Rites, New York, 1930.
2. Budge, E. A. W.The Mummy, London, 1925.
3. Durkheim Emile, The Elementary Forms of the Religious Life, Londan, 1954.
4. Frazer, J. G. The Belief in immortality and the Worship of the Dead, 3 vols., 1913-1924.
5. Habenstein, R. W. Lamers, W. M. Funeral Customs the World Over, Milwaukee, 1961.
6. Hastings, James, Ed. Encyclopaedia of Religion And Ethies, vol. IV, New York, 1959.
7. Polson, C. J. The Disposal of the Dead, New York, 1953.
8. Puckle, B. Funeral Customs, 1926.
9. Taylor, E. B. Primitive Cultare, 2 Vols., Londan, 1929.