अक्कलकारा : (हिं. अकरकारू गु. अक्कलकरो क. आकळकरि सं. अक्कलक इ. पॅरा क्रेस, पेलिटरी लॅ.स्पिलॅंथस ॲक्मेला कुल—कंपॉझिटी). या वर्षायू औषधीचा प्रसार सर्व उष्ण देशांत, श्रीलंका व भारत यांतील जंगलात सर्वत्र असून बागेतूनही ती लावतात. खोड व फांद्या केसाळ पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती फुलांचे लंबगोल, पिवळट लाल फुलोरे (स्तबके, → पुष्पबंध) एकेकटे किंवा परिमंजरीप्रमाणे, नोव्हेंबर- डिसेंबरात येतात. त्यांमध्ये भोवतालचा किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके व्दिलिंगी असून केसाळ संवर्त नसतो कृत्स्नफळ (शुष्क व एकबीजी, → फळ) चपटे व लांबट असते.
स्तबकांना झोंबणारा वास असून त्यांची चव तिखट असल्यामुळे चघळल्यास लाळ सुटते. जिभेच्या विकारांवर उपयुक्त. आसामात स्त्रियांना प्रसूतीनंतर देतात. पुरळ उठून खाज सुटल्यास पाने अंगास चोळतात. तोंडास कोरड पडल्यास बिया चघळतात. इंडोचायनात ही वनस्पती पाण्यात उकळून आमांशावर देतात फिलिपीन्समध्ये मुळांचा काढा रेचक म्हणून वापरतात. पानांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) तसेच खडा (अश्मरी) विरघळण्यास चांगला संधिवातावर शेकण्यास व खरूज आणि कंडू धुण्यास तो वापरतात. स्तबकांचा अर्क दाढदुखीवर लावतात.
पहा : कंपॉझिटी.
जमदाडे, ज. वि.
“