अकबरनामा : मोगल (मुघल) सम्राट अकबराच्या दरबारातील ⇨अबुल फज्ल याने लिहिलेला ग्रंथ. मोगल कालखंडावरील मौल्यवान अशा ऐतिहासिक साधनग्रंथात याची गणना होते. याचे तीन भाग आहेत. पहिल्यात तैमूरपासून हुमायूनपर्यंतचा इतिहास असून दुसऱ्यात अकबराच्या कारकीर्दीतील अबुल फज्लच्या मृत्यूपर्यतच्या घटनांचे वर्णन आहे. तिसरा भाग ⇨आईन-इ-अकबरी म्हणून प्रसिद्ध आहे. आईन-इ-अकबरीचे पाच विभाग आहेत. पहिल्या दोन विभागांत बादशहा, त्याचे कुटुंब, दरबार, नोकरचाकर, त्यांची कामे, पगार इत्यादींचे वर्णन आहे. तिसऱ्या विभागात न्याय व जमाबंदी खात्याचे विवेचन केले असून चौथ्या भागात भारतीय जनतेचे, विशेषतः हिंदूचे, सामाजिक व सांस्कृतिक जीवन वर्णिलेले आहे. पाचवा भाग म्हणजे थोर पुरूषांच्या व कवींच्या स्फुट वचनांचा व म्हणींचा संग्रह आहे. 

अकबरनामा  हा अकबराच्या करकीर्दीवरील महत्त्वा‍चा साधनग्रंथ मानण्यात येतो. ह्याची लेखनशैली आकर्षक आहे.

खोडवे, अच्युत