अगरू : (हिं. अगर सं. अगरू इं. ॲलोवुड लॅ.ॲक्विलॅरिया ॲगॅलोचा कुल—थायमेलेसी).हा मध्यम उंचीची व सदापर्णी वृक्ष ब्रह्मदेश, पूर्व हिमालय, बंगाल, भूतान, आसाम इ. प्रदेशांत आढळतो. थायमेलेसी कुलात याचा अंतर्भाव असल्याने ⇨रामेठाशी काही शारीरिक लक्षणांत याचे साम्य आहे. पाने साधी, एकाआड एक चिवट फुले पांढरी व लहान असून त्यांचे रेश्मी चवरीसारखे (चामरकल्प) फुलोरे येतात. फळ (बोंड) ४-६ सेंमी., लवदार. याचे लाकूड फार सुगंधी व ‘अगरू’ या नावाने ओळखतात. ते राळयुक्त, काळपट, कठीण व जड असते. यापासून ऊर्ध्वपातनाने ‘अगरू’ नावाचा अत्यंत सुवासिक अर्क काढतात इतर सुगंधी तेलांत तो मिसळून वापरल्यामुळे अधिक टिकाऊ सुगंधी द्रव्य बनते. या झाडापासून गडद रंगाची राळ मिळते. लाकूड किंवा राळ ‘धूप’ व अगरबत्ती यांकरिता वापरतात. कीटकांना दूर ठेवण्यास हे लाकूड समर्थ असल्याने कपाटे, जडवाचे काम, जपमाळा, क्रुसावरील ख्रिस्तप्रतिमा वगैरेंकरिता वापरतात. सालीपासून नैसर्गिक कागद बनवून त्यावर पूर्वी पवित्र मंत्र लिहित. सालीपासून काढलेल्या धाग्याच्या दोऱ्या बनवितात. लाकूड व अर्क उत्तेजक, पौष्टिक, वाजीकर (कामोत्तेजक) आणि अतिसारात स्तंभक (आकुंचन करणारे) व वायुनाशी आहेत.
परांडेकर, शं. आ.