ॲव्हेनझोअर : (१०९०—११६२). अरबी वैद्य. त्याचे संपूर्ण नाव ‘अबू मेरवान अब्दल मलीक इब्‍न झोअर’ असे होते. स्पेनमधील सेव्हिल गावी वैद्यकव्यवसाय करीत असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली. नुसत्या अनुभवापेक्षा आणि परंपरागत ज्ञानापेक्षा तर्कशुद्ध विचारसरणीवर त्यांचा भर असे म्हणून ⇨गेलेन  यांनी प्रतिपादिलेली मते तसेच अंधविश्वास आणि फलज्योतिष यांवर अवलंबून राहणाऱ्यांवर त्यांनी प्रखर टीका केली. खरजेच्या कृमीचे वर्णन त्यांनी प्रथम केले. तसेच मध्यकर्णशोथ (कान फुटणे), ग्रसनीचा अंगवध (घशाचा पक्षाघात), छातीच्या मध्यावकाशातील विद्रधी (गळू), परिहृदयशोथ (हृदयाभोवतालच्या पटलाची दाहयुक्त सूज) वगैरे विकारांचे तपशीलवार वर्णन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या तैसीर  या ग्रंथाचे १४९० मध्ये लॅटिन भाषेत भाषांतर झाले.

कानिटकर, बा. मो.