ॲल्बट्रॉस : सगळ्या समुद्रवासी पक्ष्यांत हा पक्षी मोठा आणि उड्डाणाच्या असामान्य सामर्थ्याबद्दल प्रसिद्ध आहे. हे पक्षी मुख्यतः दक्षिण गोलार्धातले रहिवासी आहेत, परंतु काही जाती उत्तर पॅसिफिकमध्येही आढळतात. यांच्या १२ जाती आहेत. दिवसाचा बराच वेळ ते समुद्रावरच घिरट्या घालीत असतात. समुद्रातले लहान प्राणी त्यांचे भक्ष्य असल्यामुळे ते (भक्ष्य) मिळविण्याकरिता ते समुद्रावर उतरतात. रात्री ते पाण्यावरच झोपतात.

डायोमीडिया एक्झुलान्स  ही ॲल्बट्रॉसची सामान्य जाती असून सगळ्यांत मोठी आहे. ही जाती भटकणारी असल्यामुळे सर्वत्र आढळते. हिचा पक्ष-विस्तार सु. चार मी. असतो. शरीर मजबूत, डोके मोठे व चोच आकडे- दार असते पाय काहीसे आखूड व बोटे पातळ त्वचेने जोडलेली असतात पिसे पांढरी किंवा तपकिरी असून बहुधा पाठ व शेपूट यांवर थोडासा गर्द तपकिरी किंवा काळा रंग असतो शेपूट आखूड असते व आवाज मोठा आणि कर्कश असतो.

काही जातींत नर आणि मादी यांची जोडी आयुष्यभर टिकते. डायोमीडिया एक्झुलान्स  दक्षिणेकडे राहत असल्यामुळे या भागातील बेटांवर यांची वीण होते. वीण दर दोन वर्षांनी एकदा होते. मादी दर खेपेला एकच अंडे घालते. पिल्लू दोनतीन महिन्यांनी बाहेर पडते. अंडे उबविण्याचे आणि पिल्लाच्या संगोपनाचे काम दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.