अमरुशतक : संस्कृतातील एक प्रसिद्ध शृंगारकाव्य. यांच्या कर्त्याचा उल्लेख अमरू, अमरूक, अशा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. या कवीचा काल आणि जीवन यांसंबंधी माहिती मिळत नाही. तथापिकाव्यालंकारसूत्रकार वामनाने (सु. ८००) अमरुशतकातील तीन पद्ये त्याच्या कर्त्याचा उल्लेख न करता उद्‌‌धृत केली आहेत. याच्या नावाचा पहिला उल्लेख आनंदवर्धनाने (नववे शतक) केलेला आढळतो. आनंदवर्धनाने आणि अभिनवगुप्ताने (सु. ९५०-सु. १०२०) त्याच्या काव्याचा महिमाही सांगितला आहे. आद्य शंकराचार्यांनी अमरुनामक एका राजाच्या देहात प्रवेश करून त्याच्या अंतःपुरातील स्त्रियांशी शृंगार केला आणि शृंगाराचे ज्ञान मिळवून अमरुशतक लिहिले, अशी एका आख्यायिका आहे. रविचंद्राने अमरुशतकावरील कामदा या आपल्या टिकेत हे काव्य आद्य शंकराचार्यांनीच लिहिले हे सिद्ध करण्यासाठी त्यांतील पद्यांचा अर्थ वैराग्यपरही होऊ शकतो, असे दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे. या काव्याच्या नावानुसार त्यात वस्तुतः १०० पद्ये पाहिजेत. तथापि निरनिराळ्या हस्तलिखितांतून ९० ते ११५ पद्ये आढळतात. या काव्याचे एकूण चार पाठ आहेत : (१) दक्षिणेकडील वेमभूपालमान्य, (२) बंगालकडील रविचंद्रमान्य, (३) पश्चिम भारतातील अर्जुनवर्मदेवमान्य आणि (४) रामरुद्र-व रुद्रदेवमान्य. या पाठांत पद्यसंख्या, त्यांचा क्रम, पाठभेद इ. बाबतींत पुष्कळ फरक असून सर्व पाठांना समान अशी फक्त ५१ पद्ये आढळतात. या सर्व पाठांत अर्जुनवर्मदेवमान्य पाठ जुना असून तोच विद्वानांत विशेष मान्यता पावला आहे.

प्राकृतातील हालाच्या ð गाहासत्तसई(गाथासप्तशती) प्रमाणेच यातील प्रत्येक पद्य म्हणजे एक स्वयंपूर्ण कविताच असून ते शृंगाराचे कोणते-ना-कोणते विलोभनीय रूप दाखविणाऱ्या लघूचित्रासारखे वाटते. प्रणयाचे विविध पैलू रंगवण्यात कालिदास आणि भर्तृहरी यांची बरोबरी या कवीने केली आहे, असे अनेक समीक्षकांनी मान्य केले आहे. अमरुशतकात स्त्रीचे प्रेम पवित्र, अविचल आणि निःस्वार्थी असल्याचे दाखवून तिची सहनशीलता आणि सौहार्द यांवर विशेष भर दिला आहे. भावनोत्कटता, रसमाधुर्य, पदलालित्य आणि प्रसाद यांनी हे काव्य नटलेले आहे. संस्कृत साहित्यकारांनी ध्वनिकाव्याची उदाहरणे म्हणून या काव्यातील अनेक पदे उद्‌‌धृत केली आहेत. खालील पद्यावरून अमरुशतकातील प्रणयभावनेच्या रम्याविष्काराची कल्पना येऊ शकेल.

 

दंपत्योर्निशि जल्पतोर्गृहशुकेनाकर्णितं यद्वच-

स्तत्प्रातर्गुरुसंनिधौ निगदतः श्रुत्वैव तारं वधूः ।

कर्णालम्बितपद्मरागशकलं विन्यस्य चञ्च्वाःपुरो

व्रीडार्ता प्रकरोति दाडिमफलव्याजेन वाग्बन्धनम् ।।

(रात्री प्रेमी युग्माचे प्रेमसंवाद घरातील पोपटाने ऐकले. पोपट त्यांतील ऐकलेली वाक्ये सकाळी वडील मंडळी भोवती असताना मोठ्याने बोलत आहे, हे ऐकून प्रिया खूप लाजली आणि त्याचे तोंड बंद करण्याकरिता तिने आपल्या कानातील पद्मरागमणी डाळिंबाचा दाणा म्हणून त्याच्या चोचीपुढे ठेवला.)

 मरुशतकावर अनेक टीका असून त्यांपैकी अर्जुनवर्मदेवकृत रसिकसंजीवनी, वेमभूपालाचीशृंगारदीपिका आणि रविचंद्राची कामदा या विशेष प्रसिद्ध आहेत. अमरुशतकातील पद्ये जर्मन भाषेतही अनुवादित झालेली आहे.  

कुलकर्णी, वा. म.