अंजदीव: कर्नाटक राज्यातील कारवार बंदराच्या आठ किमी नैर्ऋत्येस, अक्षांश १४० ४५’ उ. व रेखांश ७४० १०’ पू. या ठिकाणी सव्वा चौ. किमी. क्षेत्रफळ असलेले बेट. १९६१ पर्यंत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. दक्षिणोत्तर १,६०० मी. व पूर्वश्चिम २६८ मी.पसरलेले हे वेड्यावाकड्या आकाराचे बेट अत्यंत वाईट हवामानामुळे जवळजवळ निर्मनुष्य आहे. बेटाच्या पूर्वेकडील किनारा किंचित दंतुर असल्याने हजार टनांपर्यंतच्या छोट्या बोटी येथे थांबू शकतात. ग्रॅनाइट व जांभ्या दगडाने बनलेल्या या बेटावर पोर्तुगीजांनी एक किल्ला बांधून दारूगोळा ठेवला होता. येथून नारळ व सुपारीचे थोडे उत्पन्न काढले जात असे.
टॉलेमीने उल्लेखिलेले Aigidioi बहुतेक हेच असावे. पेरिप्लसमध्येही याचा उल्लेख आढळतो. १३४२ मध्ये या बेटावर स्वत: येऊन गेल्याचा इब्न बतूतानेही उल्लेख केला आहे. पंधराव्या शतकात अरब व्यापारी या बेटाचा उपयोग करीत. विजयनगराच्या साम्राज्यातून त्यांनी ते जिंकून घेतले असावे, असा समज आहे. १४९८ मध्ये वास्को द गामाने या बेटास भेट दिली. १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधण्यास सुरूवात केली व त्यानंतर बहुतेक काळ हे पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले. परंतु हवामानामुळे येथे प्रगती होऊ शकली नाही. १६६१ मध्ये इंग्रजांना मुबई आंदण मिळाली व तिचा ताबा घेण्याकरिता आलेल्या इंग्रज सेनापतीस काही दिवस येथे रहावे लागले, त्या वेळी वाईट हवामानामुळे ५०० पैकी ३६१ माणसे वर्षाभरात मृत्युमुखी पडल्याचा दाखला आहे. म्हणूनच पुढे पोर्तुगीजांनीही काळ्या पाण्याच्या शिक्षेकरिता या बेटाचा उपयोग केला. १९६१ मध्ये भारताने गोव्यावर चाल केली असता या बेटाच्या आधारे पोर्तुगीजांनी थोडा वेळ लढा दिला होता. भारताच्या ताब्यात आल्यानंतर हे बेट सध्या गोव्याच्या राज्यात सामील केले असून तेथे सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
शाह, र. रू.