सुरंगी : (गोडी उंडी, पुन्नाग हिं. नागकेसर, सुरंगी गु. रतिनागकेसर क. गार्दुंडी, पुने सं. पुन्नाग, नागकेसर लॅ. ऑक्रोकार्पस लाँगिफोलियस कुल-गटिफेरी ). सुमारे १२–१८ मी. उंचीचा (घेर साधारण 1·8 मी.) हा सदापर्णी वृक्ष पश्चिम भारतातील गर्द जंगलांत खंडाळा ते दक्षिणेस मलबार व कोईमतूरपर्यंत (सस.पासून सु. ६०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. तो ओडिशा, बिहार तसेच मादागास्कर, न्यू गिनी, आफ्रिका व फिजी येथील प्रदेशांत लावलेला आढळतो. साल विटकरी रंगाची, जाड, खवलेदार व काळसर ठिपक्यांची असून त्यातून लालसर डिंक स्रवतो. पाने साधी, मोठी, रुंद, अंडाकृती, संमुख, चिवट, तीक्ष्णाग्र, कडा किंचित तरंगित फुले (फेब्रुवारी-मार्चमध्ये येणारी) कक्षास्थ, बहुयुतिक, पांढरी व त्यावर नारिंगी रेषा, सुगंधी, साधारण१·७ सेंमी. व्यास असलेली व झुबक्यांनी येतात. संदले २, प्रदले ४ व लवकर गळणारी केसरदले असंख्य स्त्री-पुष्पात वंध्यकेसरदल किंजपुटात दोन कप्पे मृदुफळे पावसाळ्यात पिकतात. ती रसाळ व खाद्य असतात. फळ साधारण गोल व तीक्ष्णाग्र असते बिया १–४. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे  ⇨ गटिफेरी (कोकम) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळाच्या पिवळट सोनेरी रंगावरुन या झाडाचे लॅटिन प्रजातिवाचक नाव (ऑक्रो –पिवळे कार्पस –फळ) पडले आहे.  

सुकलेल्या कळ्या रेशमाला लाल रंग देण्यास वापरतात त्यांना ‘तांबडा नागकेसर’ असे व्यापारी नाव आहे. सुवासिक फुले पूजेसाठी व शरीर सुशोभित करण्यास वापरतात तसेच त्यापासून अत्तर काढतात. लाकूड लाल, कठीण व टिकाऊ असल्याने घरबांधणीस उपयुक्त असते. ताज्या कळ्या सौम्य उत्तेजक, वायुसारक आणि स्तंभक असून अग्निमांद्य व मूळव्याधीवर गुणकारी असतात.

महाजन, मु. का.