सॉक्रेटीस : ( इ. स. पू. सु. ४७०–३९९). थोर ग्रीक तत्त्वज्ञ. त्याच्या जीवनाविषयी आणि विचारांविषयी आपल्याला जी माहिती मिळते, ती मुख्यत: विख्यात ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ प्लेटो  ( इ. स. पू. सु. ४२८– सु. ३४८) ह्याच्या संवादांतून ( डायलॉग्ज ) आणि प्रसिद्घ ग्रीक इतिहासकार आणि सेनानी ⇨ झेनोफन( इ. स. पू. सु. 

सॉक्रेटीस४३०–३५५) ह्याच्या मेमोराबिलिया ह्या ग्रंथातून. सॉक्रेटीसने स्वत: काहीही लिहिलेले नाही. सॉक्रेटीसचा जन्म सामान्य कुटुंबात अथेन्समध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव सॉक्रोनिस्कस आईचे फीनारेती. प्लेटोने केलेल्या एका उल्लेखावरुन असे दिसते की, सॉक्रेटीसचे वडील शिल्पकार होते. त्याची आई सुईणीचे काम करीत असे. तो कुरुप होता. केसाळ भुवया, बटबटीत डोळे, जाड ओठ, दाढी, उत्तरायुष्यात पडलेले टक्कल व बुटकी सुद्दढ शरीरयष्टी ही त्याची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. त्याचा विवाह बराच उशिरा झाला. झांटिपी हे त्याच्या बायकोचे नाव. ती कजाग होती, अशी वदंता आहे. ही त्याची दुसरी बायको असण्याचीही शक्यता आहे. तिच्यापासून सॉक्रेटीसला तीन मुलगे झाले. ते सामान्य निघाले. तरुणपणी सॉक्रेटीसने अनेक लढायांत सैनिक म्हणून भाग घेतला होता. ग्रीसच्या स्वामित्वासाठी अथेन्स आणि स्पार्टा ह्या दोन प्रबल ग्रीक नगरराज्यांत झालेल्या ⇨ पेलोपनीशियन  युद्घात सॉक्रेटीस होता. त्याची इतर सामान्य सैनिकांपेक्षा भरपूर श्रम करण्याची व क्लेश भोगण्याची सहनशक्ती विलक्षण होती. विचार करता करता अचानक त्याची तंद्री लागे, ती तासन्‌तास अढळ राही. तो एक प्रामाणिक व नैसर्गिक बुद्घिमत्ता लाभलेला माणूस होता. कसल्याही पदाची वा नेतृत्वाची त्याला आकांक्षा नव्हती. धनवान बनण्याचा त्याला लोभ नव्हता. आनंदाच्या प्रसंगी लोकांच्या आनंदभावनेशी तो सहज समरसून जाई.

  

सॉक्रेटीसच्या चरित्राला ग्रीकांच्या राजकीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे. सिसिलियन ग्रीकांनी कार्थेजचा केलेला पराभव ( इ. स. पू. ४७९) आणि ग्रीसच्या मुख्य भूमीतील ग्रीकांनी पर्शियन साम्राज्याचा केलेला पराभव (इ. स. पू. ४८०) ह्या दोन महत्त्वपूर्ण घटनांनी ग्रीकांची ग्रीक म्हणून अस्मिता अधिक सखोल आणि द्दढ झाली होती. पर्शियन साम्राज्याचा पराभव करण्यात अथेन्सने मोलाची कामगिरी बजावलेली असल्यामुळे ह्या विजयानंतर अथेन्सच्या नगरराज्यात एक उत्कर्षपर्व सुरु झाले. उपर्युक्त दोन विजयानंतर अथेन्समध्ये ग्रीक अस्मितेची जी सखोल जाणीव निर्माण झाली, तिचा एक भाग आपल्या नगरराज्याशी एकनिष्ठ राहणे, स्थानिक देवदेवतांच्या उपासना, धार्मिक आचार आणि विधी, यात्रा, उत्सव ह्यांत सहभागी होणे हा होता. वडीलधाऱ्यांबाबत पूज्यभाव, आज्ञाधारक वृत्ती बाळगणे, ऋणानुबंध जपणे, स्वत:ची मनमानी न करणे हे धर्माचरण होते. शिवाय नगरासाठी लढले पाहिजे त्यात पौरुष आहे, अशीही धारणा होती. ह्या वातावरणाचे संस्कार सॉक्रेटीसवर झालेले होते. सॉक्रेटीसच्याच काळात अथेन्समध्ये लोकशाहीवादी व महाजनवादी यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. जीवघेणी सत्तास्पर्धा, धनसन्मानासाठी सुटलेली हाव, दडपणूक, शोषण यांतून नैतिकतेचा ऱ्हास होत होता. चर्चा-संवादांच्या माध्यमातून सॉक्रेटीसने मांडलेले तत्त्वज्ञान ही या नैतिकतेच्या ऱ्हासावरची एक प्रतिक्रिया होती. सॉक्रेटीसने एखादी तात्त्विक सिद्घांतप्रणाली मांडली का, हा प्रश्न विचारता येईल. खुद्द सॉक्रेटीसही आपले विचार प्रणालीबद्घ करण्यास नकार देत असे. सॉक्रेटीसचा त्याच्या अनुयायांवर पडलेला प्रभाव हा त्याच्या सिद्घांतांपेक्षाही त्याच्या तत्त्वचिंतनीय व्यक्तिमत्त्वामुळे जास्त होता. त्याच्या या तत्त्वचिंतनीय व्यक्तिमत्त्वात त्याने वापरलेली संवादपद्घती, जिला द्वंद्वात्मक ( डायलेक्टिकल ) पद्घती म्हटले जाते, ती कळीची भूमिका बजावते.

जिथे काही माणसे जमलेली असतील, गप्पाटप्पा चाललेल्या असतील, अशा बाजारपेठेसारख्या सार्वजनिक ठिकाणी, तसेच विशेषत: जिथे तरुणवर्ग असेल, अशा व्यायामशाळांसारख्या ठिकाणी जाऊन तो प्रश्नोत्तरे करीत असे. आपल्याला ज्ञान नाही, पण ज्यांच्यापाशी ते आहे, त्यांच्याकडून आपल्याला ते शिकायचे आहे, अशी भूमिका घेऊन तो लोकांशी संवाद साधे, त्यांना प्रश्न विचारी आणि नैतिक संकल्पनांबद्दल आपल्याला पक्के ज्ञान आहे, अशा भ्रमात असणाऱ्यांना तो त्या संकल्पनांबद्दलचा त्यांचा वैचारिक गोंधळ दाखवून देई. उदा., धैर्य म्हणजे नेमके काय ? असा प्रश्न तो विचारी. त्यावर ज्यांना निश्चितपणे धैर्याची म्हणता येतील अशी कृत्ये सांगून त्यांच्या आधारे उत्तर देणारा श्रोता धैर्याची एक व्याख्या करी पण त्यावर ज्यांना धैर्याची कृत्ये असे निश्चितपणे म्हणता येणार नाही, अशी काही कृत्येही ह्या व्याख्येत बसतात, असे सॉक्रेटीस दाखवून देई. साहजिकच तो श्रोता आपल्या व्याख्येला योग्य ती मुरड घाली पण ही सुधारित व्याख्याही अडचणी निर्माण करते असे जेव्हा सॉक्रेटीस दाखवून देई, तेव्हा त्याही व्याख्येला मुरड घालावी लागे किंवा नवीन व्याख्या करावी लागे. अखेर ‘धैर्य’ ह्या संकल्पनेबाबत आपल्या मनात गोंधळ आहे, हे श्रोत्याच्या लक्षात येई. मानवी जीवन सफल करणारी काही वस्तुनिष्ठ मूल्ये आहेत. त्यांचे ज्ञान होऊ शकते, अशी त्याची धारणा होती पण त्यासाठी मन पूर्वग्रहदूषित असता कामा नये आणि स्वत:च्या मताची व इतरांच्या मतांची आपण चिकित्सक द्दष्टिकोनातून परीक्षा केली पाहिजे, असा चिकित्सक विचार करावयाला लोकांना प्रवृत्त करणे, हे सॉक्रेटीसचे जीवितकार्य होते. यासाठी त्याने उपरोधाचा, ‘सॉक्रेटिक आयरनी’ चा–म्हणजे श्रोत्यांच्या उलटतपासणीचा–प्रयोग केला. सॉक्रेटीस स्वत:कडे अज्ञानी माणसाची भूमिका घेऊन जे प्रश्नोत्तराचे तंत्र अवलंबीत होता, त्यालाच ‘सॉक्रेटीसचा उपरोध ’–‘सॉक्रेटिक आयरनी ’– असे म्हटले जाते. चेरफोन या सॉक्रेटीसच्या मित्राला एक डेल्फिक ओरॅकल ( दैवी संकेत ) प्राप्त झाला होता. ‘सॉक्रेटीसपेक्षा कोणीही माणूस शहाणा नाही’ असा तो संकेत होता. या संकेताची सत्यता पडताळण्यासाठी सॉक्रेटीसने समाजातील ज्ञानी म्हटल्या जाणाऱ्या अनेकांशी चर्चा केली. त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादा आणि त्यांच्या विचारातील दंभ उघड केले. त्याला खऱ्या अर्थाने शहाणा किंवा ज्ञानी असा कोणीच सापडला नाही. शेवटी या दैवी संकेताचा अर्थ त्याने असा लावला की, सॉक्रेटीसला कशाचेच ज्ञान नव्हते पण निदान ‘ आपल्याला कसलेच ज्ञान नाही ’ या गोष्टीचे त्याला ज्ञान होते. इतरांना मात्र स्वत:च्या अज्ञानाचे ज्ञान नव्हते. म्हणून सॉक्रेटीस सगळ्यांत शहाणा माणूस ठरला. हे सॉक्रेटिक उपरोधाचेच उदाहरण म्हणता येईल. पण त्याचबरोबर हेही खरे की, आपल्या जीवितकार्यामागे काही दैवी प्रेरणा आहे असे सॉक्रेटीसला निश्चितपणे वाटत होते आणि त्यातूनच त्याने तत्कालीन कवींच्या आणि धर्मपंडितांच्या लिखाणातून येणाऱ्या मिथ्यकथांवर टीका केली. युथिफ्रो   या संवादात त्याने पावित्र्याच्या पारंपरिक कल्पनेवर टीका केलेली दिसते. तो गूढवादी नव्हता. धर्माला त्याने नीतिशास्त्राचे अंग बनविले आणि पावित्र्याच्या बौद्घिक चिकित्सेतून धार्मिक सदाचरणाची पुनर्व्याख्या केली पाहिजे असे त्याने मानले.


 सॉक्रेटीसने प्रणालीबद्घ तत्त्वज्ञान मांडले असे म्हणता येत नसले, तरी सैद्घांतिक तत्त्वज्ञानाला त्याने दिलेले योगदान अभूतपूर्व होते. ते थोडक्यात असे सांगता येईल :

(१) ‘फिलॉसॉफी ’ या शब्दात अंतर्भूत असलेल्या ‘सोफिया’ ह्या शब्दाला त्याने नवा अर्थ प्राप्त करुन दिला. शहाणपणाच्या त्याच्या संकल्पनेत नैतिकता गाभ्याच्या स्थानी होती.

(२) ‘स्वतःला जाण ’ या बोधवाक्याचा त्याने पुरस्कार केला. अंतर्मुख चिंतनातून माणसाला स्वत:च्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान होईल असे त्याने मानले. खरे सौख्य हे बाह्य किंवा भौतिक परिस्थितीवर अवलंबून नसते, तर जाणीवपूर्वक केलेल्या सुयोग्य आचरणावर अवलंबून असते. त्याच्या मते सद्‌गुण अनेक असले, तरी खरा सद्‌गुण एकरुप आहे आणि ते एक प्रकारचे ज्ञान आहे.

(३) भौतिकशास्त्र व सैद्घांतिक गणितशास्त्राला त्याने गौण ठरविले व माणसाच्या व्यावहारिक जीवनोद्दिष्टांना महत्त्व दिले. त्यातही आत्मसंयमनाला त्याने मध्यवर्ती स्थान दिले. विवेकाच्या साहाय्याने माणूस स्वत:चे, स्वत:च्या आचारांचे नियंत्रण करु शकतो. आचरणातील चूक ही मुळात बौद्घिक आकलनातील चूक असते असे त्याने सांगितले. अशा सदाचाराविषयीचे निदार्ष विज्ञान हा सॉक्रेटीसच्या शोधाचा विषय होता.

(४) नीतिविषयक विज्ञानाचा शोध घ्यावयाचा, तर नैतिक संकल्पनांचे नेमकेपणाने आकलन झाले पाहिजे, त्यासाठी नैतिक पदांच्या बिनचूक व्याख्या करता आल्या पाहिजेत असे त्याने मानले. नैतिक पदांच्या सामान्य, सुस्पष्ट व्याख्या करण्यासाठी सॉक्रेटीसने जी रीत वापरली, तिला ‘विगामी रीत’ (इंडक्टिव्ह मेथड ) म्हणतात. ह्या पद्घतीत ज्या नैतिक संकल्पनेची व्याख्या करायची तिच्याशी निगडित अशा सर्वमान्य कृत्यांची उदाहरणे घेऊन त्यांच्यातले समान सूत्र शोधायचे. त्यानंतर तशा कृत्यांची सर्वमान्य अशी अन्य उदाहरणे घेऊन त्या सूत्रात ती बसतात की नाही ते पहायचे. तसे न झाल्यास आणखी सुधारित व्याख्या करायची. ती व्याख्याही पुन्हा तपासायची. ह्या अशा प्रक्रियेतून समाधानकारक व्याख्या मिळवायची.

(५) चिकित्सक विचार आणि सुजीवन यांच्यातील अभेद्य नाते त्याने स्पष्ट केले. ‘विचारांनी तपासून न घेतलेले जीवन जगण्यायोग्य नसते’ असे तो म्हणाला.

सॉक्रेटीसबद्दल गैरसमजही होते ⇨ ॲरिस्टोफेनीस सारख्या ( इ. स. पू. सु. ४४८– ३८०) समकालीन ग्रीक नाटककाराला तो ⇨ सॉफिस्टां पैकीच एक आहे असे वाटे, तर झेनोफनला तो परंपराप्रिय आणि किंचित विक्षिप्त माणूस वाटे. खरे तर पारंपरिक नीतीविरुद्घ बंड करुन उठलेल्या तरुणांच्याही विचारांतला गोंधळ सॉक्रेटीसने दाखवून दिला होता. त्याला प्रामाणिक चिकित्सा हवी होती. सॉफिस्ट आणि सॉक्रेटीस ह्यांच्यांतही महत्त्वाचे भेद होते. सॉफिस्टांच्या मते सद्‌गुण म्हणजे आपला स्वार्थ यशस्वी रीतीने साधण्याचे तंत्र. अथेन्सच्या नगरराज्यात हा स्वार्थ साधायचा, तर प्रभावी वक्तृत्व आणि युक्तिवाद ह्यांच्या आधारे लोकांना अनुकूल करुन घेणे आपल्याला हवे ते प्राप्त करुन घेणे हे साधले म्हणजे आपले आयुष्य यशस्वी झाले. ते साधण्याची वक्तृत्व-युक्तिवादाची तंत्रे आपण शिकवितो असा सॉफिस्टांचा दावा होता मात्र आपल्याला हवी असलेली गोष्ट आणि आपल्या कल्याणाची गोष्ट ह्यांत भेद केला पाहिजे, असे सॉक्रेटीसचे मत होते. एका जीवनव्यवस्थेच्या वा जीवनरीतीच्या संदर्भात आपल्या मनात वेगवेगळ्या इच्छा जाग्या होतात. अशा जीवनव्यवस्थेशी सुसंगत अशा इच्छा चांगल्या विसंगत वा प्रतिकूल त्या वाईट. जीवनव्यवस्था केवळ व्यक्तिजीवनाची व्यवस्था नसते, कारण ही जीवनव्यवस्था घालून देणाऱ्या नियमसंकल्पना व्यक्तिगत अनुभवांच्या पलीकडे जाणाऱ्या असतात. व्यक्तिजीवनाची व्यवस्था ही सामाजिक जीवनव्यवस्थेचा एक भाग असते. सामाजिक जीवनव्यवस्था ही अर्थातच आदर्श असली पाहिजे. पण ह्या आदर्श जीवनव्यवस्थेचे स्वरुप काय असू शकते ? आणि तिचा एक भाग असलेल्या व्यक्तिगत जीवनव्यवस्थेचे स्वरुप काय असू शकते ? सॉक्रेटीसने उपस्थित केलेल्या अशा प्रश्नांचा विचार प्लेटोच्या द रिपब्लिक  ह्या संवादात केलेला आढळतो.

सॉक्रेटीसला त्याच्या आयुष्यात अनेक शत्रू निर्माण झाले होते. अनेक प्रतिष्ठितांचे अज्ञान त्याने उघडकीला आणले होते. सत्ताधारीही दुखावले गेले होते. त्यामुळे त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप ठेवून त्याला देहान्त शासन करण्यात आले. अथेन्सच्या लोकशाही संस्थांना न जुमानणे, तेथील तरुणांना आचारभ्रष्ट करणे आणि अथेन्सच्या दैवतांविषयी अश्रद्घा निर्माण करणे, तसेच नवीन ईश्वरकल्पना प्रसृत करणे अशा आरोपांचा त्यांत समावेश होता. आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी सॉक्रेटीसने सादर केलेली कैफियत प्लेटोच्या द अपॉलॉजी ऑफ सॉक्रेटीस  ह्या संवादात आली आहे. तीनुसार सॉक्रेटीसने कुठेही बचावात्मक पवित्रा घेतला नाही आव्हानाचाच सूर ठेवला असे दिसते पण अथेन्सच्या पाचशे नागरिकांच्या निवाडा मंडळाने ( ज्यूरी ) त्याला बहुताने दोषी ठरविले (२२१ जणांनी त्याला निर्दोष ठरविले होते ). तुरुंगातून पळून जाण्याची त्याला संधी दिली असतानासुद्घा तिचा अव्हेर करुन अविचल मनाने सॉक्रेटीस मृत्यूला सामोरा गेला आणि त्याने विषाचा पेला ग्रहण केला.

सॉक्रेटीसच्या विचारसरणीचा प्रभाव नंतरच्या तत्त्ववेत्त्यांवर –विशेषत: प्रथम ग्रीक व रोमनांवर –पडला तथापि मध्ययुगात ख्रिस्ती धर्माच्या ऊर्जितावस्थेत त्याचे विचार काहीसे मागे पडले. त्यानंतर प्रबोधनकालात प्लेटो, झेनोफन वगैरेंचे साहित्य उपलब्ध झाल्यानंतर यूरोपीय तत्त्वज्ञानात सॉक्रेटीसचे महत्त्व वाढले आणि पाश्चात्त्य विचारांच्या उत्क्रांतीत त्यास बीजरुप प्राप्त झाले. व्हिक्टोरिया राणीच्या काळात (१८१९–१९०१) इंग्लंडमधील उपयुक्ततावादी विचारवंतांनी येशू ख्रिस्ताच्या हौतात्म्याशी त्याच्या हौतात्म्याचे साधर्म्य दर्शविले आणि सॉक्रेटीसने आधुनिक बुद्घिप्रामाण्यवादी, शास्त्रशुद्घ जागतिक द्दष्टिकोनाचा पाया घातला असे मत प्रतिपादिले. विसाव्या शतकातील अस्तित्ववादी जर्मन तत्त्वज्ञ ⇨ कार्ल यास्पर्स   याने‘ अनुकरणार्ह व्यक्ती ’ असे संबोधून सॉक्रेटीसची तुलना ⇨बुद्घ, कन्फ्यूशस   व   ⇨ येशू ख्रिस्त  या महामानवांशी केली. दरवर्षी ३० नोव्हेंबर हा दिवस त्याच्या स्मरणार्थ ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

पहा: अरिस्टॉटल ग्रीक तत्त्वज्ञान प्लेटो सॉफिस्ट्स.

संदर्भ : 1. Brickhouse, Thomas C. Smith, Nicholas, D. The Philosophy of Socrates, 2000.

    2. Chroust, Anton-Herwann, Socrates : Man and Myth, 1957.

    3. Kelly, Eugene, Ed. New Essays on Socrates, 1985.

    4. Santas, Greasimos Xenophon, Socrates, 1999.

    5. Strauss, Leo, Xenophon’s Socrates, 1998.

    6. Tayler, C. C. W. Hare, R. M. Barnes and Jonathan, Greek Philosophers : Socrates, Plato and Aristotle, 1999.

   ७. पळशीकर, वसंत, सत्याग्रही सॉक्रेटीसचे वीरमरण, पुणे, १९९६.

   ८. रेगे, मे. पुं. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७४.

गोखले, प्रदीप कुलकर्णी, अ. र.