सामारांग : इंडोनेशियातील एक औद्योगिक शहर व बंदर. त्याची लोकसंख्या १५,७२,७९५ (२०१२) होती. ते सामारांग नदीमुखाजवळ मध्य जावा प्रांतात उत्तर समुद्रकिनाऱ्यावर अनुकमे जाकार्ताच्या पूर्वेस सु. ४८५ किमी. व सुराबायाच्या पश्चिमेस सु. २६० किमी.वर वसले आहे. येथील बंदरास तांजुंग मास म्हणतात. येथे मध्य जावा प्रांताची राजधानी आहे. शहराचा समुद्रकिनारा आणि उंगरान पर्वतश्रेणी यांमध्ये वस्ती असून त्यातही जुनी-नवी वस्ती असे दोन भाग आहेत. बंदराजवळील पाणथळ भागात जुनी वस्ती असून नवी वस्ती सस.पासून १५० मी. उंचीवर उंगरान डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. या आधुनिक वस्तीस चंडी म्हणतात. पूर्वी डिसेंबर ते मार्च दरम्यान वाहणाऱ्या जोरदार मान्सून वाऱ्यामुळे बंदरातील वाहतूक ठप्प होत असे आणि मोठ्या बोटी समुद्रात ६-७ किमी. वर नांगरुन ठेवाव्या लागत मात्र १९८० मध्ये तिथे ५,१०० मी. लांबीची काँक्रीट भिंत (धक्का) बांधल्यामुळे ती गैरसोय दूर झाली आहे (१९८५). त्यामुळे तांजुंग मास हे बंदर देशातील पाचव्या कमांकाचे सुरक्षित व मोठे बंदर झाले आहे.
स्थानिक परंपरेनुसार चेंग हो नावाचा चिनी लष्करी सेनापती सामारांगपासून गलबतातून जात असताना ते उत्तर किनाऱ्यावर बुडाले (१४३३). तेव्हा चिनी लोकांनी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ सॅम पोकाँग हे मंदिर बांधले आणि त्यात त्याच्या गलबतातील तो असावा, अशा श्रद्घेने एक नांगर तिथे ठेवला. सामारांगच्या पूर्वेस २५ किमी. वर डेमाक नावाचे गाव आहे. तिथे इ. स. १५०० ते १५४६ दरम्यान मुस्लिम सत्ता होती. त्या ठिकाणी इंडोनेशियातील सर्वांत जुनी व सर्वांना पूज्य असलेली एक मशीद आहे. ती वाली संग या नऊ गुरुंनी बांधली असून त्यांनी जावात इस्लाम धर्माचा प्रसार-प्रचार केला, अशी मुस्लिमांची श्रद्घा आहे. डचांनी व्यापाराच्या निमित्ताने १७४८ मध्ये सामारांगात प्रवेश केला. दुसऱ्या महायुद्घातील जपानी आक्र मणापर्यंत (१९४१–४५) ते नेदर्लंड्सच्या आधिपत्याखाली होते. महायुद्घानंतर (१९४६) हे शहर इंडोनेशियन प्रजासत्ताकात समाविष्ट करण्यात आले.
सामारांगमध्ये जड उद्योगधंदे नाहीत परंतु काही कारखाने असून त्यांतून काचेच्या वस्तू, छत्र्या, वजनमापे, वस्त्रे वगैरेंची निर्मिती होते. याशिवाय येथील शेती उत्पन्नातून लवंग, ताग, तंबाखू, साखर, मिरी वगैरे मिळतात. सामारांग हे तंबाखूपासून तयार होणाऱ्या सिगारेटसाठी प्रसिद्घ आहे. त्यांतील क्रेटेक सिगारेट हा प्रकार वैशिष्टय्पूर्ण असून त्यात लवंगेचा अंश असतो आणि सिगारेट जळताना तडतड असा ध्वनी उमटतो. याशिवाय मच्छीमारीचा धंदाही येथे चालतो. येथील बंदरातून मसाल्याचे पदार्थ–विशेषतः लवंग-मिरी–यांची निर्यात होते.
सामारांगमधील सर्प उद्यान (तामन हिबुरन रक्यत) प्रसिद्घ असून सामारांगच्या परिसरात काही हिंदू मंदिरे आहेत.
देशपांडे. सु. र.