सूस : ट्युनिशियातील एक नैसर्गिक बंदर व औद्योगिक शहर. प्राचीन काळी ते हॅड्रमिटम व सुसाह या नावांनी प्रसिद्घ होते. लोकसंख्या ५,७९,००० (२००७) अंदाजे. ते भूमध्य समुद्राच्या एका शाखेतील हेम्मामेत आखाताच्या पूर्व किनाऱ्यावर मॉनस्तिरच्या नैर्ऋत्येस सु. २२ किमी. व कार्थेजच्या दक्षिणेस सु. १६० किमी.वर वसले आहे. हॅड्रमिटम ही उत्तर आफ्रिकेमधील कार्थेजियन भूक्षेत्रातील एक महत्त्वाची, इ. स. पू. नवव्या शतकातील, फिनिशियन वसाहत होय. त्यांनीच हे नगर वसविले. त्याचे बंदर साहेल या सुपीक प्रदेशाच्या आसमंतात होते. तिसऱ्या प्यूनिक युद्घात (इ. स. पू. १४९–१४६) हॅड्रमिटमच्या शासनाने रोमची बाजू घेतली. त्यावेळी त्यांना काही प्रमाणात रोमन नागरिकत्व देण्यात आले. पुढे त्यांनी रोमनांच्या यादवी युद्घात पॉम्पी या रोमन सेनापतीस साहाय्य केल्यामुळे सीझर नाराज झाला. त्याने थॅपससच्या युद्घात (इ. स. पू. ४६) विजय संपादन केल्यानंतर हॅड्रमिटमच्या शासनकर्त्यांना दंडात्मक शिक्षा केली. पुढे येजन (कार. ९८–११७) या रोमन सम्राटाने हॅड्रमिटमला रोमन वसाहतीचा दर्जा दिला. त्यामुळे हे नगर तत्कालीन रोमन साम्राज्याचे एक प्रमुख प्रशासकीय केंद्र बनले. नंतर डायोक्लिशन (कार. २८४–३०५) या सम्राटाने बॅझेशिअम प्रांताचे ते मुख्यालय (राजधानी) केले. मधल्या काळात व्हँडॉलांनी ते ४३४ मध्ये उद्ध्वस्त केले. पहिला जस्टिनियन (४८३–५६५) या सम्राटाने आफ्रिका पादाक्रांत केल्यानंतर त्याची पुनर्निर्मिती केली (५३३) आणि या नगराला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. अरबांच्या आक्रमणापूर्वीच आधुनिक सूसचा उदय झाला. अरबांनंतर तुर्की, स्पॅनिश वगैरेंच्या अंमलाखाली ते होते. १८८१ ते १९५६ दरम्यान ते फ्रेंचांच्या आधिपत्याखाली गेले व ट्युनिशियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर (१९५६) सूसचा विशेषतः बंदराचा विकास झाला.
हे प्रामुख्याने मच्छिमारी बंदर असून येथून मासे, ऑलिव्ह तेल व द्राक्षांची दारु ह्यांची विशेषत्वाने निर्यात होते. शहरात ऑलिव्ह तेल, कापड व कपडे, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रॉनीय व इलेक्ट्रिक वस्तू यांच्या निर्मितीचे प्रमुख उद्योग असून फळे, भाजीपाला, मासे डबाबंद करणे हाही व्यवसाय चालतो. शहराच्या परिसरात गहू, बार्ली, ऑलिव्ह, द्राक्षे, लिंबू, संत्री, भाजीपाला वगैरे पिके येतात. त्यामुळे सूस ही या भागातील मोठी बाजारपेठ आहे. बार्लीपासून बीअर व द्राक्षांपासून मद्यार्क यांचे निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. सूस हे एस्पार्टो गवताचे केंद्र आहे.
सूसचे वस्तुसंग्रहालय प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्घ आहे. या संग्रहालयात इ. स. पू. सहाव्या शतकापासून ते इ. स. बाराव्या शतकापर्यंतच्या वास्तुशिल्पांचे नमुने आहेत. याशिवाय शहरात काही ठिकाणी ख्रिस्ती कॅटकोमज आढळतात. येथील सुंदर पुळणी हे हौशी प्रवाशांचे आकर्षण होय. दर वर्षी शहरात व्यापारी जत्रा भरते. ते देशांतर्गत शहरांशी लोहमार्ग व सडकेने जोडले आहे. शिवाय बंदरातून बोटींद्वारे इतर देशांशी ते जोडले गेले आहे.
निगडे, रेखा