सूतकताई : नैसर्गिक तंतूंचा पुंजका किंवा संश्लेषित बहुवारिक तंतुद्रव्याची राशी यांच्यापासून सूत काढण्याची (तयार करण्याची) प्रक्रिया म्हणजे सूतकताई होय. या प्रक्रियेत तंतू ओढले जाऊन त्यांची लांबी एकाच वेळी परस्परव्यापी होऊन त्यांना पीळ दिला जातो. यामुळे तंतू घट्टपणे एकत्र जोडले जाऊन एक अखंड धागा किंवा सूत तयार होते. याचा अर्थ सूतकताईमुळे तंतुखंडांपासून लांब व बळकट सूत तयार होते.[ज्या द्रव्यापासून सूत कातले जाते त्या द्रव्याला तंतुद्रव्य म्हणतात. तंतुद्रव्यापासून काढलेल्या अखंड धाग्याला तंतू (फिलॅमेंट), तंतूच्या तुकड्याला तंतुखंड (स्टेपल) व त्यांच्यापासून कातलेल्या धाग्याला सूत (यार्न) म्हणतात].
तंतुखंडांपासून विणकामाद्वारे वस्त्र तयार करण्याआधी सूतकताई ही आवश्यक प्रक्रिया आहे. सूतकताईचे तत्त्व अश्मयुगापासून ते अत्याधुनिक यंत्रसामग्रीपर्यंत एकच राहिले आहे. सूत, सूत्र, सुतळी, दोरा, रज्जू व दोर यांचा वस्तू बांधण्यासाठी उपयोग झाल्याने मानवी प्रगतीचे अनेक टप्पे गाठले गेले आहेत. आदिम उपकरणे, हत्यारे, शस्त्रे व घरे यांचे घटक बांधणे अवजड वस्तू उचलणे व हलविणे जहाजांवर विविध कामांसाठी दोरांचा उपयोग करणे इ. कामांसाठी सुताचा अप्रत्यक्ष वापर होत आला आहे. उष्ण व शीत ऋतूंत वापरावयाच्या वस्त्रांचा सूत हा मूलभूत घटक आहे. अशा वस्त्रांच्या कपड्यांमुळे मानव विविध प्रकारचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असलेल्या प्रदेशांमध्ये वस्ती करु शकला.
तंतूंना मांडीवर हाताने पीळ देऊन सूत तयार करणे ही सूतकताईची सर्वांत प्राचीन पद्घत आहे. मांडीवर तंतुद्रव्याला उजव्या हाताने पीळ देतात (वळतात) आणि डाव्या हाताने कापसासारखे तंतुद्रव्य वा त्याचा पेळू पुरवितात. काही ठिकाणी ही पद्घत अजून वापरतात. ईजिप्शियन लोक मांडीऐवजी त्या आकाराचा दगड सूतकताईसाठी वापरीत ग्रीक लोक यासाठी गुडघ्यावर वक्राकार फरशी ठेवीत, तर भारतात वातीवळण्यासाठी सहाणेचा उपयोग करतात.
प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंतच्या काळात टकळी, चाती वा चरकी व चरखा ही साधने सूतकताईसाठी वापरीत असत. तंतूंच्या पुंजक्यातून ओढून काढलेला लांब तंतू जड चातीला घट्ट बांधतात, नंतर कताई करणारा मुक्तपणे टांगत्या अवस्थेत असलेल्या चातीला हाताने वर्तुळाकार गती देतो. यामुळे पुंजक्यातून ओढून निघालेल्या तंतूंना पीळ दिला जातो. अशा रीतीने पुरेशा लांबीचे सूत तयार झाले की कताई थांबवितात आणि तयार झालेले सूत चातीवर गुंडाळतात. अशा प्रकारे सर्व क्रिया पुनः पुन्हा करुन सूत कातले जाते.
भारतात हाताने सूत कातण्यासाठी टकळी व चरखा ही साधने वापरतात, असे सूत मुख्यतः खादीच्या कापडासाठी वापरतात [ → खादी उद्योग]. जानव्याच्या सुतासारखे सूत कातण्यासाठी खेड्यात अजूनही टकळी वापरतात. टकळीवरील सूतकताईची पद्घत चातीवरील सूतकताईसारखी आहे. एका टोकाशी काहीसा आकड्यासारखा आकार दिलेली जाडसर तार व दुसऱ्या टोकाजवळ बसविलेली वजनदार तबकडी असे टकळीचे स्वरुप असते. ही तबकडी ⇨ प्रचक्रा चे किंवा जड चक्राचे काम करते. डाव्या हातातील कापसाचा पुंजका वा पेळू टकळीच्या आकड्यासारख्या टोकाला अडकवून तो हात वर नेतात. यामुळे कापसाचे तंतू ओढले जाऊन त्यांची परस्परव्यापी, जवळजवळ समांतर मांडणी होऊन तंतूंची लांब रचना तयार होते. नंतर टकळी उजव्या हाताने वर्तुळाकार फिरवून तंतूंना थोडा पीळ देतात. यामुळे तंतूंची सैलसर वात तयार होते. नंतर टांगलेल्या मुक्त स्थितीत टकळी उजव्या हाताने जोराने फिरवितात. टकळीच्या वजनदार तबकडीला संवेग मिळून तंतूंना पीळ बसत असताना ते खाली खेचलेही जातात. अशा रीतीने पुरेशा लांबीचे म्हणजे हातभर सूत तयार झाले की ते टकळीच्या तारेवर गुंडाळतात. नंतर ही सर्व प्रक्रिया पुन:पुन्हा करुन सूत कातले जाते. हलक्या स्थितीतील टकळीचे वजन पेलू न शकणाऱ्या तंतूंच्या बाबतीत टकळी जमिनीवर टेकवून सूतकताई करतात. टकळी व चाती हजारो वर्षांपासून वापरली जात असून ईजिप्तमध्ये लिननचे सूत कातण्यासाठी, तर भारतात कच्चे सुती धागे कातण्यासाठी तिचा वापर होतो.
चरखा ही सूतकताईमधील टकळीनंतरची पायरी आहे. चरख्यात एका फळीवर टकळीची उभी दांडी चातीच्या रुपात आडवी बसविलेली असते. सूतकताईचा वेग वाढविण्यासाठी यात चाती फिरविण्यासाठी एक मोठे चाक बसविलेले असते. कताई करणारा हे चाक हस्तभुजेद्वारे हातानेच फिरवतो. या चाकाभोवतीच्या वादीद्वारे चाती फिरते. सूत कातणारा डाव्या हातातील पेळूतून चातीच्या टोकाला तंतू पुरवितो व उजव्या हाताने चाक फिरवितो. डावा हात वर नेऊन पेळूतील तंतू ओढले जातात व चाक फिरविल्याने त्यांना पीळ दिला जातो. हातभर सूत तयार झाले की, ते चातीवर गुंडाळतात. सूत गुंडाळताना सूत कातले जाण्याची क्रिया थांबविली जाते. नंतर या सर्व क्रिया पुनःपुन्हा करुन सूतकताई सुरु राहते. चरखा बहुधा सर्वप्रथम भारतात तयार झाला. भारतातून तो पौर्वात्य व पाश्चात्त्य देशांत गेला, तो चौदाव्या शतकात यूरोपमध्ये गेला. भारताप्रमाणेच इंडोनेशियातही कापूस व भरड रेशीम यांची सूतकताई करण्यासाठी चरखा वापरतात. सूतकताईसाठी भारतात खडा चरखा, किसान चरखा, पेटी चरखा व बांबूचा जनता चरखा यांचा वापर केला जातो. १९४९ मध्ये चार चात्यांचा अंबर चरखा तमिळनाडूमधील एकंबरनाथ यांनी तयार केला. १९५६ मध्ये अंबर चरख्यावरील सूतकताई सुरु झाली. [→ चरखा].
चरख्याने (वा टकळीने) हातभर सूत कातल्यावर ते चातीवर गुंडाळताना कताई थांबवावी लागते. कातणे व गुंडाळणे या क्रिया एकाच वेळी करणारा चरखा १४५० सालाच्या सुमारास वापरात आला आणि एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंत त्याचा व्यापकपणे वापर होत होता. या चरख्यात चातीची दांडी एका अक्षाचे कार्य करते. त्याच्यावर रीळ व सुताला पीळ देणारी फिरती (फ्लायर) बसविलेली असते. इंग्रजी यू (U) अक्षराच्या आकाराच्या फिरतीचे दोन बाहू रुळाच्या पलीकडे विस्तारलेले असतात. चातीच्या टोकाशी असलेल्या नेढ्यातून पेळू जातो. त्या नेढ्याखाली फिरतीच्या भुजेवरील आकड्यावरुन पेळू खाली रिळाकडे जातो. चालक चक्रावरुन रीळ व फिरती यांच्याकडे स्वतंत्र वाद्या आलेल्या असतात. त्यावरील निरनिराळ्या व्यासांच्या कप्प्यांमुळे फिरती रिळापेक्षा अधिक जलद गतीने फिरते. फिरती फिरल्याने वातीला पीळ दिला जाऊन सूत तयार होते व त्याच वेळी ते कमी गतीने फिरणाऱ्या रिळावर गुंडाळले जाते. या चरख्यामुळे सुताचे उत्पादन वाढले. १५२४ मध्ये पायाने चालविता येणारा चरखा पुढे आला व सुताच्या उत्पादनात आणखी वाढ झाली. या चरख्यात पायटा, संयोग दांडा व भुजा हे भाग जोडलेले होते. चाक पायाने फिरविता येऊ लागल्याने चालकाचा उजवा हात मोकळा राहू लागला. या चरख्यामुळे सूतकताईचे यांत्रिकीकरण झाले. यात सूत तयार होताना त्यातील बारीक भागाला जास्त पीळ दिला जातो व सुताचा अधिक जाड भाग खेचला जातो. यामुळे एकसारख्या जाडीचे सूत मिळते. नंतर हा चरखा विविध प्रकारच्या चौकटीवर बसवून त्यात सुधारणा होत गेल्या. तथापि यातील फिरती, चाती, रीळ व पायटा हे आवश्यक भाग तसेच राहिले. उत्पादित सुताची राशी, सुतामधील एकसारखेपणा व सूतकताईची गती यांच्याविषयीच्या वाढत्या अपेक्षांमधून चरख्यातील चात्या व रीळ यांची संख्या वाढत गेली.
सूतकताईचे एक यंत्र लिओनार्दो दा व्हींची यांनी १४९० मध्ये तयार केले होते. यात चात्या व एकसारखे सूत गुंडाळणाऱ्या फिरत्या होत्या. त्याला हस्तभुजाही जोडली होती. यात कताईसाठी चात्या आणि पीळ देणे व गुंडाळणे यांसाठी अनेक फिरत्या होत्या. सोळाव्या शतकात सॅक्सनी चाकाच्या रुपात चरख्यात सुधारणा झाली. यामुळे भरड लोकरीची व सुती धाग्याची अखंडपणे सूतकताई करणे शक्य झाले. सूतकताईच्या गतीतही सुधारणा झाली. परिणामी एका मागावरील विणकामासाठी ३–५ चरखे सुताचा पुरवठा करु शकत. के धोट्याच्या मागामुळे (१७३३) सुताची व त्यामुळे सूतकताईच्या यंत्रसामग्रीची मागणी वाढली. मोठ्या प्रमाणावर सुताचे उत्पादन करणाऱ्या यंत्रांमध्ये अठराव्या शतकात सुधारणा करण्यात आल्या. यातून आधुनिक सूत-गिरण्यांमधील यांत्रिक कार्यपद्घती पुढे आली. यांपैकी जेम्स हार्ग्रीव्ह्ज व सर रिचर्ड आर्कराइट यांनी केलेल्या सुधारणा महत्त्वाच्या आहेत.
सूतकताईचे सुधारित यंत्र इंग्लंडमधील लुईस पॉल यांनी १७३८ मध्ये तयार केले. यात लोकर किंवा कापूस यांचे तंतू पेळूतून ओढून पीळ देण्याची क्रिया अगदी वेगळ्या तत्त्वानुसार होते. पूर्वी कताई करणारा कापूस व लोकरीचा पुंजका हातात धरुन हात लांब नेत असे. या यंत्रात हे तंतू ओढण्याचे काम यंत्रामार्फत होते. ओढण्याची ही क्रिया साध्य होण्यासाठी या यंत्रात पेळू रुळांच्या काही जोड्यांमधून नेला जातो. रुळांच्या पुढील जोडीची गती मागच्या जोडीपेक्षा जास्त असते. गतींमधील या फरकामुळे तंतू ओढला जातो. थोडक्यात, पेळूतील तंतू आपोआप पुढे जाणे, फिरतीमार्फत पीळ दिला जाणे आणि सूत गुंडाळणे या क्रिया यात होतात. सुताची चाती (वा कांडी ) आपोआप खालीवर होण्याची सोय झाल्यावर चातीच्या पूर्ण लांबीभर सूत थरामागून थर असे एकसारखे गुंडाळले जाऊ लागले.
जेम्स हार्ग्रीव्ह्ज यांनी १७६४ मध्ये स्पिनिंग जेनी नावाचे सूतकताई यंत्र तयार केले. या यंत्रात एकाच चक्राद्वारे अनेक चात्या फिरविल्या जातात. हे यंत्र चालविणारा कामगार एका हाताने चाक फिरवितो आणि सर्व चात्यांवर सूत एकसारखे गुंडाळण्यासाठी दुसऱ्या हातातील पट्टीचा उपयोग करतो. या यंत्रावर कातलेले सूत विणकामात फक्त बाण्यासाठी वापरण्यायोग्य असे होते. कारण ताण्यासाठी अधिक बळकट सुताची गरज असते. [ →तंत्रविद्या].
सर रिचर्ड आर्कराइट यांनी १७६७ मध्ये जलचौकट (वॉटर फ्रेम) नावाचे सूतकताई यंत्र तयार केले. १७७० पासून ते सर्वत्र वापरले जाऊ लागले. या यंत्रात आधीच्या सर्व शोधांचा व सुधारणांचा अंतर्भाव केलेला होता. यात एकाच वेळी चार पेळूंपासून सूत कातले जाते. हे चालविण्यासाठी जलशक्ती वापरता येत असल्याने याचे जलचौकट नाव पडले. कताई करणारा चात्यांवर सूत गुंडाळण्याचे काम करतो आणि सूत एकसारखे गुंडाळण्याचे काम तो हातानेच करतो. यावर अधिक जाड, चांगला पीळ दिलेले व बळकट सूत तयार होते आणि ते ताण्यासाठी वापरता येते. बाण्यासाठी इतर यंत्रांवर कातलेले सूत वापरले जाते. यात सुधारणा करुन सॅम्युएल क्रॉम्प्टन यांनी १७७४– ७९ या पाच वर्षांत नवीन सूतकताई यंत्र तयार केले. त्यात त्यांनी जलचौकट व सूतकताई जेनी या यंत्रांमधील तत्त्वांचा एकत्रितपणे उपयोग केला होता, म्हणून या संकरित यंत्राला म्यूल (खेचर) हे अन्वर्थक नाव पडले. यात पुढेमागे जाणारा एक गाडा होता. तो एका दिशेने जाताना सुताला पीळ दिला जातो व तो उलट दिशेत जाताना सूत कांडीवर गुंडाळले जाते. यावर विविध प्रकारची सुते जलदपणे व सफाईदार रीतीने तयार होतात. यामुळे सुताची उत्पादनक्षमता वाढली.
नंतर पुढे आलेल्या सूतकताईच्या आधुनिक यंत्रसामग्रीत वर उल्लेख केलेल्या यंत्रांमधील मूलभूत तत्त्वे वापरली जातात. मात्र आधुनिक सूतकताई यंत्रांचे स्वरुप व कार्यपद्घती खूप वेगळ्या आहेत. या यंत्रसामग्रीत पेळू वा वाती लाटण यंत्रामार्फत आत जातात. नंतर यंत्राद्वारे पेड वा पदर ओढले जाऊन ते लांब व बारीक होतात. हे तंतू एकत्र धरुन ठेवले जाण्यासाठी त्यांना चातीने आवश्यक तेवढा पीळ दिला जातो. पिळाच्या घट्टपणावर सुताचे बळ अवलंबून असते. मात्र जादा पीळ दिल्यास सूत कमकुवत होऊन तुटू शकते. घड्याळातील काट्यांच्या दिशेत दिलेल्या म्हणजे घटिवत पिळाला Z (इंग्रजी झेड अक्षर) पीळ म्हणतात. याउलट म्हणजे प्रतिघटिवत पिळाला S (इंग्रजी एस अक्षर) पीळ म्हणतात. उच्च प्रतीचा पीळ दिलेल्या सुताला क्रेप सूत म्हणतात. क्रेप सुतामुळे वस्त्राला चुणीदार स्वरुप प्राप्त होते. विरुद्घ पीळ दिलेली सुते वापरल्यास वस्त्रामध्ये छाया (धूपछाव) परिणाम निर्माण होतो. कारण अशा वस्त्रावरुनप्रकाशाचे असमान परावर्तन होते.
कापूस, लिनन व लोकर यांचे नैसर्गिक तंतू सर्वसाधारणपणे आखूड व गुंत्याच्या रुपात असतात. आखूड तंतूंचा हा गुंता सोडविण्यासाठी या कच्च्या मालावर पिंजण्याची क्रिया करतात. नंतर हे तंतू ओढले जाऊन परस्परव्यापी रुपात काहीसे एका ओळीत मांडून त्यांना पीळ देतात. यामुळे या आखूड तंतूंमध्ये यांत्रिक अंतर्बंधन (गुंफण) निर्माण होते आणि बळकट व अखंड सूत तयार होते.
कापसाचे ४ – ८ पेळू एकत्र करुन त्यांची जाडसर व बिन पिळाची वात तयार होते. यामुळे कापसाचे तंतू काही प्रमाणात समांतर होतात, नंतर त्यांना थोडा पीळ दिल्याने ते एकत्र राहतात. परिणामी ते ताणले जाऊन टप्प्याटप्प्याने इष्ट जाडीचे बारीक सूत तयार होते. सूतगिरणीत या सर्व क्रिया करणारी यंत्रसामग्री बसविलेली असते. विशेषतः कोरड्या हवेत कापसाची सूतकताई केल्यास घर्षणाने सुतावर विद्युत् भार निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे सुताला चांगला पीळ बसत नाही पीळ देताना सूत वारंवार तुटते. आर्द्र हवेत असे होत नाही, म्हणून अशा सूतगिरण्यांमध्ये कृत्रिम रीतीने आर्द्रतेचे प्रमाण वाढवितात किंवा आर्द्रतेचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी (उदा., मुंबई) त्या उभारतात.
लोकरीचे सूत काढण्याची प्रक्रिया कापसाच्या सूतकताईसारखीच असते. मात्र या दोन तंतूंमधील फरक लक्षात घेऊन लोकरीच्या सूतकताईची यंत्रसामग्री तयार केलेली असते. रेशमाचा मूळ तंतूच लांब असतो, म्हणून त्याला आवश्यक तेवढा पीळ देऊन रेशमाचे सूत तयार करतात. रेशमाचे सूत एकपदरी वा बहुपदरी असू शकते, याद्वारेते हव्या त्या जाडीचे बनविता येते. ताग, वाख इ. वनस्पतिज नैसर्गिक तंतू जाड व लांब असतात म्हणून त्यांच्यापासून जाड सूत मिळते. त्यांच्या सूतकताईची प्रक्रिया व यंत्रे साधीच असतात. सुंभाला पीळ देऊन त्यापासून एकसारख्या जाडीचा काथ्या (सूत) तयार करण्यासाठी हातकताई तसेच चरखा वा यंत्राने कताई करतात.
संश्लेषित बहुवारिकांपासून एकपदरी सूत तयार करण्याच्या क्रियेलाही सूतकताई म्हणतात. पॉलिअमाइडे किंवा नायलॉन, पॉलिएस्टरे किंवा ॲक्रिलिक द्रव्ये ही संश्लेषित बहुवारिके असून सेल्युलोज रेयॉनासारखी परिवर्तित नैसर्गिक बहुवारिके यांची अशी सूतकताई करतात. वितळलेले द्रव्य, विद्राव किंवा रासायनिक मध्यस्थ पदार्थ यांसारखा दाब दिलेला द्रायू (द्रव अथवा वायुरुप द्रव्य) तनित्राच्या अनेक बारीक छिद्रांतून जोराने रेटून पाठविला जातो. नंतर तनित्रातून बाहेर पडणारे एकपदरी तंतू थंड करुन, सुकवून किंवा साखळवून घनरुप करतात. या तंतूंचे बल वाढविण्यासाठी ते सामान्यपणे ताणतात. कारण ताणामुळे त्यांच्यामधील रेणूंची दिक्स्थिती सुधारली जाण्यास चालना मिळते आणि रेणू सुस्थापित होतात, नंतर हे सूत रिळांवर गुंडाळतात.
अशा प्रकारे बहुवारिकांसारख्या तंतुद्रव्यापासून वितळ कताई, ओली कताई किंवा शुष्क कताई करुन कृत्रिम तंतू तयार केले जातात. हे तंतू हजारो मीटर लांबीचे असू शकतात. त्यामुळे थेट दोरा, रज्जू, दोर इ. तयार करण्यासाठी ते वापरता येतात. गरजेनुसार त्यांचे दोन, तीन इ. पदर एकत्र करुन व त्यांना पीळ देऊन बहुपदरी सुते तयार करतात. हे सूत सामान्यपणे साध्या व सुयांच्या विणकामासाठी वापरतात. पुष्कळदा या कृत्रिम तंतूंचे तुकडे करुन सापेक्षतः आखूड तंतुखंड तयार करतात. नंतर हे तंतुखंड एकमेकांमध्ये तसेच कापूस, लोकर, रेशीम इ. नैसर्गिक तंतुखंडांमध्ये मिसळतात. या तंतुखंडांच्या मिश्रपुंजक्यापासून सूत काततात. या सूतकताईची यंत्रे बहुधा कापसाच्या सूतकताई यंत्रांसारखी असतात. स्पर्श, पोत, दिसणे इ. इष्ट गुणधर्मांची वस्त्रे, वस्त्रोत्पादने इ. तयार करण्यासाठी अशा सुधारित मिश्र सुतांचा उपयोग करतात.
इलेक्ट्रॉनीय चरखा : चरखा व विद्युत् जनित्र (डायनामो) यांचे एकत्रीकरण किंवा संयुग्मीकरण म्हणजे हा इलेक्ट्रॉनीय किंवा ई-चरखा होय. या उपकरणांद्वारे सूतकताई करताना वीजनिर्मिती होते. बंगलोरच्या आर्. एस्. हिरेमठ यांनी हे उपकरण तयार केले आहे. चरख्याच्या मूलभूत तत्त्वांबरोबर त्यांनी यात विद्युत् जनित्रातील वीजनिर्मितीची सांगड घातली आहे. यामुळे सूतकताई होताना दिवा प्रज्वलित होतो.
सूतकताईसाठी हाताने फिरवायचे चाक या ई-चरख्यात असून त्याद्वारेच त्याच्या परिभ्रमण ऊर्जेचे विजेत परिवर्तन होते. सुमारे १० मिनिटे यावर सूतकताई केल्यास सु. १० चौ. मी. क्षेत्रफळाची खोली जवळजवळ तासभर प्रकाशित होते. म्यानमार, बांगला देश, नेपाळ व दक्षिण आफ्रिका या देशांतील विजेचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागांत ई-चरख्याची चाचणी घेतली जात आहे. आंध्र प्रदेशात परंपरागत उद्योगांच्या पुनर्जनन निधींतून ई-चरख्याच्या वाटपाची योजना आखली जात आहे. यामुळे खेड्यांतील घरांत विजेचे दिवे वापरता येतील. खादी व ग्रामोद्योग आयोगानेही ई-चरखा खरेदी व वाटप यांसाठी निधी मंजूर केला आहे.
वीज नसलेल्या विजापुरातील वास्तव्यात हिरेमठ यांनी विद्युत् जनित्रावर लागणारा दिवा असलेली वडिलांची सायकल व आजोबांचा चरखा यांचे एकत्रीकरण करण्याचे ठरविले. कर्नाटकातील गुलबर्गा एंजिनिअरिंग महाविद्यालयात असताना १९८१–८३ दरम्यान यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र सदर उपकरण बोजड होते. अनेक चाचण्या व अभिकल्पातील बदल करुन त्यांनी यात सुधारणा केल्या. दिव्यासाठीच्या घटकाच्या जागी प्रकाश उत्सर्जक द्विप्रस्थ घटक आणि सायकलीवरील विद्युत् जनित्राच्या जागी विरल मृत्तिका चुंबक वापरणाऱ्या उच्च कार्यक्षमतेचे प्रत्यावर्ती त्रिकला विद्युत् जनित्र वापरुन त्यांनी उपकरणात सुधारणा केल्या. अशा सुधारित दोन चात्यांच्या ई-चरख्याचे वजन १०–१२ किग्रॅ. व किंमत रु. ४,००० आणि आठ चात्यांच्या चरख्याची किंमत १०–१२ हजार रुपये होती (२००९). त्यांनी ई-चरख्याला छोटा ट्रँझिस्टर जोडून संगीत श्रवणाची सोय केली आहे.
पहा : आर्कराईट, सर रिचर्ड काथ्या कापड उद्योग क्रॉम्प्टन, सॅम्युएल खादी उद्योग गालिचे चरखा तंतु, कृत्रिम तंतु, नैसर्गिक तंत्रविद्या ताग दोर दोरा –२ वस्त्रे सूत.
संदर्भ : 1. Cook, J. Gordon, Handbook of Textile Fibres : Science and Technology, 2 Vols., 1984.
2. Hatch, K. H. Textile Science, 1993.
3. Jerde, Judith, Encyclopaedia of Textiles, 1992.
4. Mark, H. F. Atlas, S. M. Cernia, E. Eds., Man-Made Fibers : Scienceand Technology, 3 Vols., 1967-68.
5. Rahel, M. Ed., Modern Textile Characterization Methods, 1996.
6. Tubbs, M. C. Danies, P. N. Eds., Textile Terms and Definitions, 1991.
7. Wulfhorst, B. Gries, T. Veit, D. Textile Technology, 2006.
ठाकूर, अ. ना.
“