सुब्रह्मण्यशास्त्री, श्रीपाद : (२३ एप्रिल १८९१– १९६१). तेलुगू साहित्यिक. प्रामुख्याने कथाकार, कादंबरीकार व नाटककार म्हणून ते विशेष प्रसिद्घ आहेत. त्यांचा जन्म पोलमुरु (पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश) येथे झाला. वेदवाङ्मय, ज्योतिष, संस्कृत अभिजात साहित्य यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचे वडील लक्ष्मीपती शास्त्री हे कर्मठ सनातनी वृत्तीचे वेदान्ती पंडित होते. त्यांनी सुब्रह्मण्यशास्त्रींना इंग्रजी शिकण्यास विरोध केला. सुब्रह्मण्यशास्त्रींनी वडिलांच्या विरोधाला न जुमानता काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांनी नाटके लिहिली व नाटकांतून अभिनयही केला. त्यांच्या गावातील नाट्यचळवळीच्या केंद्रस्थानी ते होते. त्यांनी सुरुवातीची नाटके ‘ग्रांथिक’(वाङ्मयीन) शैलीत लिहिली. उदा., वरकांता (१९०९), रामदेव विजयमु आणि साहसिक राजपुत्रमु (१९१३). शास्त्रींनी सुरुवातीच्या काळात कविताही लिहिल्या आणि ‘अष्टावधानमु’ (आठ प्रश्नकर्त्यांना एकाच वेळी उत्तरे देत केलेली समयस्फूर्त, छंदोबद्घ शीघ्र काव्यरचना व काव्यपठन) प्रयोग केले. पीठापुरम्च्या वेंकट रामकृष्ण कवुलूच्या पालकत्वाखाली त्यांनी हे अष्टावधानी काव्यरचनेचे प्रयोग केले. पण त्यांच्या गुरुंनी ‘व्यावहारिक’ (बोली) भाषेकडे असलेला त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना ग्रांथिक शैलीतील छंदोबद्घ काव्यरचनेचा खटाटोप सोडून देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शास्त्रींनी लोकांच्या प्रचलित जिवंत बोली भाषेत कथा, कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच सर्वोत्कृष्ट गद्य शैलीकार व भाषाप्रभू लेखक असा लौकिक संपादन केला. त्यांनी १९१४ मध्ये आंध्र साहित्याच्या विकासासाठी साहित्य संस्था स्थापन केली व तिच्या मार्फत आपली पहिली कादंबरी मिथुननुरगम् प्रकाशित केली. त्यानंतर त्यांच्या संस्थेचे नामकरण ‘कलाभिवर्धिनी परिषद’ असे करण्यात आले व तिच्यातर्फे त्यांची दुसरी कादंबरी स्मशानवाटिका १९१७ मध्ये प्रकाशित करण्यात आली. पुढे या कादंबरीची सुधारित आवृत्ती विष भुजंगम् या नावाने १९५३ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर अनंथबालिका (१९२४) व रक्षाबंधनम् (१९२५) ह्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्घ झाल्या. शास्त्रींनी प्रबुद्घांध्र हे पाक्षिक सुरु केले, ते सप्टेंबर १९३९ पर्यंत चालले. नंतर त्याचे रूपांतर मासिकात झाले.
तेलुगू साहित्यातील कथा या वाङ्मयप्रकाराचा विकास घडवून आणण्यात शास्त्रींच्या लघुकथांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. पुलदंडा (१९२५) हा त्यांचा एकोणीस कथांचा पहिला संग्रह त्यांच्या सामाजिक सुधारणांविषयक सखोल व उत्कट आस्थेचे दर्शन घडविणारा आहे. जुन्या गतार्थ सामाजिक रुढी व अंधश्रद्घा यांच्या ते विरोधात होते. प्रबुद्घांध्र, आंध्र पत्रिका, रेड्डीराणी इ. नियतकालिकांतून प्रसिद्घ झालेल्या त्यांच्या कथाकादंबऱ्यांतून पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रण त्यांनी केले. भ्रष्टाचारी अधिकारी, निराधार स्त्रिया, कौटुंबिक कलह व जीवनाची क्षुद्रता यांसारख्या विषयांचे व व्यक्तींचे चित्रण त्यांनी सौम्य विनोदी शैलीत केले. त्यांचा उदार मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्या लिखाणात प्रतिबिंबित झाला आहे. त्यांनी समर्थपणे रेखाटलेली तरुण तसेच वृद्घ स्त्रियांची व्यक्तिचित्रे ही त्यांची खासीयत होय. वडला-गिंजालु व गुलाबी अत्तरू (१९४७) ह्या त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कथा होत. जमीनदार मुलुखातील जीवन व वातावरण त्यांनी अतिशय अस्सलपणे व सजीवपणे उभे केले. जुन्या सरंजामशाही जगाविषयीची स्मरणरंजनात्मक ओढ त्यांच्या साहित्यातून जाणवते. आत्मबली (१९४२), नील सुंदरी (१९६१) व क्षीरसागरमधनम् (१९६१) ह्या त्यांच्या उत्तरकालीन कादंबऱ्यांतून त्यांच्या प्रगल्भ मानसशास्त्रीय जाणिवांचे दर्शन जसे घडते, तसेच आयुष्याच्या सखोल व प्रगाढ अनुभूतींचे चित्रणही आढळते. नंतरच्या काळात त्यांनी लिहिलेली राजा-राजु (१९४४) व निघाला बंधनमु (१९५१) ही नाटके त्यांच्या उत्कृष्ट वाङ्मयात मोडतात. त्यांनी काही नाटिका (रुपिकळु) लिहिल्या, त्या कलम-पोटु (१९५५) व टी-पार्टी (१९६१) ह्या दोन खंडांत संकलित करून प्रकाशित करण्यात आल्या. शास्त्रींच्या लघुकथा ‘कलाभिवर्धिनी परिषद’, राजमहेंद्री या संस्थेने बारा छोटया खंडांत प्रकाशित केल्या (१९३९–६१). शास्त्रींनी आपल्या आत्मचरित्रवजा आठवणी अनुभवलु-ज्ञापकळु या नावाने तीन खंडांत (१९५५, १९५८ व १९६६) प्रकाशित केल्या. वाल्मिकिरामायणाचे त्यांनी नितळ, गद्य तेलुगू शैलीत भाषांतर केले व त्याद्वारे एक आदर्श मानदंड निर्माण केला.
संदर्भ : Kanakayya chamarti, A Critique of Sripada Subramanya sastri’s short Stories, 1978
इनामदार, श्री. दे.