सुब्बराव, नायनि : (२९ ऑक्टोबर १८९९–१९७८). तेलुगू कवी. त्यांचा जन्म उच्च वाङ्मयीन अभिरुचिसंपन्न कुटुंबात पोडिली (जि. नेल्लोर) येथे झाला. त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी त्यांना काव्यलेखनास प्रोत्साहन दिले. लहानपणी कविता पठन करताना त्यांतील ‘प्रास’ (अनुप्रास) विशेषत्वाने त्यांचे चित्त वेधून घेत असत. काव्यरचनेतील यती व प्रास यांच्यातील सायुज्याने त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा दिली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना व नंतरच्या काळातही अनेक मोठमोठ्या साहित्यिकांचा प्रेरक सहवास त्यांना लाभला. उदा., विश्वनाथ सत्यनारायण, रायप्रोलू सुब्बराव, पिंगली लक्ष्मीकांतम्, काटुरी वेंकटेश्वरराव, नंदुरी सुब्बराव, अडिवी बापिराजू, देवुलपल्ली वेंकटकृष्णशास्त्री इ. साहित्यिकांच्या प्रत्यक्ष सहवासातून व प्रभावातून त्यांची काव्यशैली घडत गेली. नायनींची गांधीवादी विचारसरणीवर नितांत श्रद्घा होती. बी.ए.च्या वर्गात ते शिकत असताना १९२१ मध्ये त्यांनी वर्गावर बहिष्कार टाकला होता. हंगामी दुय्यम निबंधक पदावर काम करीत असताना भ्रष्टाचाराविरुद्घ निषेध नोंदविण्यासाठी त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. ते मद्रास व आंध्र विद्यापीठांतून बी.ए., बी.एड्. झाले. १९२८ पासून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारुन विद्यादानाचे कार्य केले व अखेर मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी १९५७ पर्यंत अध्यापन केले.
नायनी हे प्रामुख्याने ‘भाव कवी’ म्हणून ओळखले जात असले, तरी अशा प्रकारची सांप्रदायिकता त्यांना मान्य नव्हती. संप्रदायाच्या बंधनातून मुक्त होऊन त्यांना काव्यनिर्मिती करावयाची होती. कोवेला सुप्रसन्नाचार्युलु यांनी नायनींचे काव्य नव-अभिजाततावादी असल्याचे म्हटले आहे. अंतःस्फूर्तता हा त्यांच्या काव्याचा आत्मा होता. त्यांची प्रेयसी, जी पुढे त्यांची पत्नी झाली, तिच्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी सौभद्रुनी प्रणययात्रा (१९३५) हे उत्कट, चिरंतन प्रेमाची महती गाणारे प्रणयकाव्य रचले. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांची जी शोकाकुल मनःस्थिती झाली, तिचे चित्रण त्यांनी मातृगीतमुलु (१९३९) या काव्यात केले, तर त्यांचा एकुलता एक मुलगा मोहनराव याच्या मृत्यूनंतरच्या विलापाचे वर्णन त्यांनी विषाद मोहनमु ह्या काव्यात केले. त्यांच्या नातवाच्या बाळलीलांचे व खोडकर क्रीडांचे चित्रण त्यांनी अभिनव कृष्ण लीलाळु ह्या काव्यात केले. तसेच त्यांनी वयाच्या साठाव्या जन्मदिनी षष्ठिहयन मातृका हे काव्य रचले. नायनींनी काव्याचे वेगवेगळे प्रकार समर्थपणे हाताळले. उदा., त्यांची सौभद्रुनी प्रणययात्रा व फलश्रुति ही प्रणयकाव्ये आहेत, तर मातृगीतमुलु व विषाद मोहनमु ह्या त्यांनी रचलेल्या विलापिका आहेत. सौंदर्यलहरी आणि वेदना वासुदेवमु ही त्यांची भक्तिकाव्ये आहेत तर जन्मभूमी व भाग्यनगर कोकिळ ही त्यांची देशभक्तिपर काव्ये आहेत.
नायनी सुब्बराव हे आंध्र प्रदेश साहित्य अकादेमीचे तिच्या स्थापनेपासूनचे सदस्य होते. नंतर त्यांना त्या अकादेमीतर्फे सन्माननीय अधिछात्रवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
संदर्भ : 1. Bhoomaiah Anumandla Nayani Subha Rao Krutulu : Parisilana, Hanumankonda, 1981.
इनामदार, श्री. दे.