सुब्बण्णा, कुंतगोड विभूति : (२० फेब्रुवारी १९३२–१६ जुलै २००५). कर्नाटकातील एक ख्यातकीर्त लेखक, कन्नड रंगभूमीचे प्रवर्तक व मागसायसाय पुरस्काराचे मानकरी. ते के. व्ही. या आद्याक्षरांनी विशेष परिचित होते. त्यांचा जन्म सधन शेतकरी कुटुंबात मुंडिगेसर (ता. सागर, जि. शिमोगा) या खेड्यात के. व्ही. रामाप्पा व सावित्री या दांपत्यापोटी झाला. त्यांचे बालपण व प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. नंतर ते सागरच्या शासकीय मिड्ल स्कूल व हायस्कूलमधून मॅट्रिक झाले (१९४८). या काळात त्यांनी इंग्रजीचा विशेष अभ्यास केला आणि शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांतून – मुख्यत्वे नाटकांमधून–भाग घेतला. यक्षगान हे पारंपरिक नाट्य तसेच काही व्यावसायिक नाटके पाहिली. त्यात सक्रिय सहभागही घेतला. यावेळी पारशी लोक अरेबियन नाईट्स व शेक्सस्पिअरची नाटके यांच्या आधारावर अतिनाट्ये (मेलोड्रामा) सादर करीत. त्याला चौकटमंच (प्रोसीनिअम) नाट्य म्हणत. शालेय शिक्षणानंतर त्यांनी अशोक हे साप्ताहिक काढले. या सुमारास यक्षगाना चे प्रयोग करणारा हेग्गोडूमधील (शिमोगा जिल्हा) नाट्यवृंद संपुष्टात आला होता. त्याची सुब्बण्णा व मित्रमंडळी यांनी श्री नीलकंठेश्वर नाट्यसेवा संघ (नीनासं) या नावाने रामाप्पांच्या अध्यक्षतेखाली पुनर्स्थापना केली (१९४९). या संस्थेच्या माध्यमातून सुब्बण्णांनी जीवनभर कन्नड रंगभूमी आणि अन्य प्रयोगीय कला यांचा लक्षणीय विकास केला. दोन वर्षांनी ते म्हैसूर विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दाखल झाले (१९५१) व बी.ए. (ऑनर्स) पदवी मिळविली (१९५५). विद्यार्थिदशेत त्यांनी हेन्रिक इब्सेन व बर्नार्ड शॉ यांची नाटके व शिवराम कारंथ यांच्या कादंबऱ्या वाचल्या. विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांनी भाग घेतला. म्हैसूरला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला (१९५२). त्यांत सुब्बण्णांनी काही दर्जेदार पाश्चात्त्य चित्रपट पाहिले. पदवी घेतल्यानंतर लवकरच ते शैलजा या युवतीबरोबर विवाहबद्ध झाले (१९५६). त्यांना अक्षर नावाचा मुलगा असून त्याने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून पुढे पदविका घेतली आणि सुब्बण्णांच्या नीनासं ह्या संस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली.
सुब्बण्णांनी ‘अक्षरा प्रकाशरा’ (अक्षर प्रकाशन) ही संस्था काढली (१९५८). त्यातून ते स्वतःचे अनुवाद व नवकवींच्या कविता, कादंबऱ्या, व विशेषतः कारंथ व अनंत मूर्ती या दिग्गजांचे वाङ्मय प्रसिद्घ करू लागले. हेग्गोडूमध्ये हायस्कूल आणि नंतर लालबहादूर महाविद्यालय स्थापन करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले (१९६३). ते या संस्थेचे सचिव होते. याच सुमारास त्यांनी साक्षी हे त्रैमासिक काढले (१९६३). महाविद्यालयात त्यांनी कलात्मक चित्रपट दाखविण्याची सोय केली (१९६६-६७). या सुमारास पुण्यात युनेस्कोतर्फे सहा आठवड्यांचा चित्रपटांचे रसग्रहण करणारा वर्ग आयोजित केला होता (१९६७). तो त्यांनी उपस्थित राहून पूर्ण केला. ते साहजिकच चित्रपटक्षेत्राकडे आकृष्ट झाले. त्यांनी अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स पुण्यातील चित्रपट अभिलेखागारातून आणून त्या कन्नडमध्ये डब (रुपांतरित) करुन नीनासंच्या माध्यमातून लोकांना दाखविल्या काहींची भाषांतरे करुन ती अक्षर प्रकाशनाद्वारे छापली. नीनासंच्या रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग होत असतानाच त्यांतून नवीन कलाकारांना–विशेषतः अभिनेत्रींना– उत्तेजन दिले. नीनासंचा व्याप वाढला, तसे प्रेक्षागृहाची निकड निर्माण झाली. म्हणून त्यांनी हेग्गोडूमध्ये शिवराम कारंथ रंगमंदिर या नावाचे भव्य व प्रशस्त प्रेक्षागृह बांधले (१९७२). त्यास कर्नाटक शासनानेही मदत केली. यातून नाटकांबरोबरच विविध चित्रपटांचे प्रसारण होई. याकरिता फिल्म सोसायटी स्थापन केली. त्यांनी चित्रपट महोत्सव आयोजित करुन (१९७८) दर्जेदार व कलात्मक चित्रपट कन्नडमध्ये डब करुन दाखविले. पुढील वर्षी त्यांनी दहा दिवसांचा चित्रपट रसग्रहण वर्ग घेतला. त्यासाठी पुण्याहून प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षकांना बोलाविले. सुमारे ८० चित्रपटांच्या कथा कन्नडमध्ये संक्षिप्त (सिनॉप्सिस) स्वरूपात अनुवादून त्या प्रकाशित केल्या. अशा प्रकारे चित्रपटांची भरभराट होत असताना त्यांनी पुन्हा रंगभूमीकडे लक्ष केंद्रित केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (नवी दिल्ली) च्या धर्तीवर नाट्यक्षेत्रात प्रशिक्षण देणारी ‘नीनासं थिएटर इन्स्टिट्यूट’ स्थापन केली (१९८०). त्याचे चालकत्व मुलाकडे (अक्षर) दिले व आपण मार्गदर्शकाची भूमिका अंगीकारली. तिला शासकीय अनुदान मिळू लागले. पुढे फोर्ड फाउंडेशननेही मदतीचा हात दिला. त्यातून नीनासंने राज्यभर कार्यशाळा आयोजित केल्या. नीनासंने ‘जनस्पंदन’हा सामाजिक कार्यक्रम हाती घेतला आणि रंगभूमीचा प्रसार खेड्यापाड्यांतून करण्याचे व्रत घेतले (१९८३). तसेच १९९०-९१ दरम्यान शालरंग कार्यक्रम आयोजित केला. सर्वसामान्यांमध्ये संगीत, नाटक, साहित्य यांची जाण निर्माण करण्याची चळवळ या कार्यक्रमाद्वारे १९९२ मध्ये धुमधडाक्याने सुरु झाली. तत्पूर्वी त्यांनी शिबिरांच्या माध्यमातून निवडक कलाकारांत जागृती निर्माण केली होतीच. त्यांची मदत या चळवळीत अपरिहार्य ठरली. फोर्ड फाउंडेशनच्या अनुदानातून त्यांनी सहा रंगभूमी बँकांची स्थापना विविध शहरांतून केली. नीनासं तिरुगत ह्या व्यावसायिक फिरत्या नाटगृहाची निर्मिती करुन त्यांनी जुन्या यक्षगाना ला संजीवनी दिली आणि संगीत लोकशाकुंतला च्या प्रयोगाबरोबरच अन्य नाटके सादर केली. या नीनासं अंतर्गत संस्थांचा व्याप जसा वाढला, तसा तिच्या अनेक वास्तू हेग्गोडूमध्ये उभ्या राहिल्या. त्यांतून ग्रंथालय, कार्यालय, प्रेक्षागृह, चित्रपटगृह आणि त्यासाठीच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या.
त्यांनी बहुतेक सर्व लेखन कन्नडमध्ये केले. त्यांत कथा व मुख्यत्वे अनुवाद आहेत. त्यांच्या साहित्यकृतींपैकी हुवू चेल्लिद हडियाळी (१९५७ काव्यसंग्रह), गॉर्किया कथेगलू (मॅक्झिम गॉर्कीच्या कथांचा कन्नड अनुवाद १९५४), अभिसार (१९५५), भागवद्ज्जुकिया मट्टू सुले-संन्यासी (१९७८ नाटक), दशरुपक (अनुवाद१९७८), बागिना (एन्. व्ही. रंगण्णांचा गौरवग्रंथ-संपादन१९५३) वगैरे उल्लेखनीय होत.
सुब्बणांनी नीनासं या प्रतिष्ठानसदृश संस्थेच्या अंतर्गत विविध संस्था स्थापून साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, रंगभूमी यांचा प्रसार-प्रचार कर्नाटक राज्यात–विशेषत: ग्रामीण–भागात केला. त्यांच्या साहित्यिक, रंगभूमीविषयक आणि सर्जनशील कला संचारणातील बहुविध कार्याचा उचित गौरव त्यांना अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला. त्या पुरस्कारांपैकी रामॉन मागसायसाय (१९९१), संगीत नाटक अकादेमी (१९९४), साहित्य अकादेमी (२००३), पद्मश्री (२००४) हे विशेष महत्त्वाचे होत.
अल्पशा आजाराने त्यांचे हेग्गोडू येथे निधन झाले.
मिठारी, सरोजकुमार