सुनिदर्शन : ( इलस्ट्रेशन ). लिखित संहितेचे चित्राद्वारा वा अन्य दृक्साधनांद्वारा केले जाणारे विशदीकरण. आशयाचे स्पष्टीकरण आणि मजकुराचे सुशोभन अशा दुहेरी उद्दिष्टांनी सुनिदर्शन केले जाते. चित्रे (रेखाचित्रे, रंगचित्रे, छायाचित्रे), आकृत्या, कोष्टके, तक्ते, ⇨आलेख, ⇨नकाशे इ. अनेकविध दृक्साधनांचा सुनिदर्शनात समावेश होतो. हस्तलिखिताची वा छापील ग्रंथाची संहिता व तिचे सुनिदर्शन हे परस्परांना पूरक ठरणारे घटक आहेत. महत्त्वाची माहिती एका दृष्टिक्षेपात कळावी हा तक्ते वा कोष्टके यांचा हेतू असतो. ग्रंथात एकरंगी वा रंगीत चित्रे, छायाचित्रे ही मजकुराबरोबर दिली जातात वा स्वतंत्र चित्रपत्रावर (आर्टप्लेट) दिली जातात. त्यायोगे मजकुराच्या आकलनात भर पडते, तसेच मजकुराची आकर्षक सजावटही केली जाते. त्यामुळे संहिता नेत्रसुखद ठरते, तिला सौंदर्यमूल्य प्राप्त होते. आकृत्या, आलेख, कोष्टके इ. संहितापूरक दृक्साधने विज्ञानविषयक, तसेच माहिती-तंत्रज्ञानविषयक संदर्भग्रंथांत मजकुराचे आकलन व स्पष्टीकरण होण्याच्या दृष्टीने उपयुक्त व अनिवार्य ठरतात. ज्ञानविज्ञानाची बहुतेक क्षेत्रे अशी आहेत, की त्यांच्याशी संबंधित असे विषय अभ्यासकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यासाठी विवेचन आणि सुनिदर्शन ह्यांची अत्यंत स्वाभाविक, एकात्म मांडणी करावी लागते. भौगोलिक व ऐतिहासिक वर्णनात्मक माहितीला अनेकदा स्थल-काल-संदर्भनिदर्शक नकाशांची जोड देणे आवश्यक व अटळ ठरते. संहितागत आशयाचा अत्यंत कल्पक व सर्जनशील विस्तार कित्येकदा सुनिदर्शनात दिसून येतो.
प्राचीन काळापासून लिखित शब्द व चित्र ही साधने आशयाच्या विवरणासाठी मानवाने प्रभावीपणे वापरली, असे दिसून येते. इ. स. चौथ्या शतकातील अवशिष्ट रोमन हस्तलिखितांत संहितेच्या चित्ररुप प्रतिरुपणाला केवळ सजावटीपेक्षा अर्थविवरणदृष्ट्या अधिक महत्त्व होते, असे दिसून येते मात्र मध्ययुगीन शोभित हस्तलिखितांमध्ये सुनिदर्शनाचा अलंकरणदृष्ट्या परमोच्च व समृद्घ आविष्कार पाहावयास मिळतो. हस्तलिखित ग्रंथ व पोथ्या यांच्या सजावटीत सोनेरी वा चंदेरी वर्ख वापरुन चमक आणली जात असे. ग्रंथशोभन (इल्युमिनेशन) व सुनिदर्शन (इलस्ट्रेशन) या साधर्म्यदर्शक प्रक्रियांमधला फरकही या काळात स्पष्ट होत गेला. रंग व धातू यांनी उजाळा दिलेले हस्तलिखित हा अर्थ ग्रंथशोभनाला प्राप्त झाला. शोभन हे चमकदार रंगसंगती व अन्य अलंकरणघटक वापरुन ग्रंथाचे दृश्य सौंदर्य वाढविण्यावर भर देते, तर सुनिदर्शन हे ग्रंथातील मजकुराच्या स्पष्टीकरणार्थ, विशदीकरणार्थ, मुख्यतः एक प्रकारची गरज म्हणून योजिले जाते. पंधराव्या शतकातील हस्तलिखितांच्या सजावटीत तत्कालीन नामवंत चित्रकारांचा वाटा मोठा आहे. लिम्बर्ख बंधूंनी रंगविलेले ‘बेरीच्या ड्यूकचा वैभवसंपन्न काळ ‘ (सु. १४१३–१६) हे सर्वोत्कृष्ट हस्तलिखित गॉथिक शैलीतील सुंदर सुनिदर्शनासाठी प्रसिद्घ आहे. त्यात दरबारी जीवनातील दृश्ये व निसर्गचित्रे आहेत. इस्लामी संस्कृतीत कुराणाच्या लेखन व सजावटीच्या अनुषंगाने सुलेखनाचे नानाविध प्रकार व शैली उदयास आल्या. इस्लामी कलावंतांनी मजकुराभोवती विविध वेलबुट्या, भौमितिक आकृत्या आणि अन्य अलंकरणप्रकार योजून कुराणाचे सुनिदर्शन केले. अन्य काव्यग्रंथांचे सुनिदर्शनही तत्कालीन इस्लामी शोभनकारांनी केले (उदा., फिरदौसीचा शाहनामा ). तसेच बोस्तान व गुलिस्ताँ, कलिला वा दिम्ना इ. गद्यग्रंथांची सुनिदर्शनेही वैशिष्ट्यपूर्ण होती.
भारतीय चित्रकलेची विविधता हस्तलिखित ग्रंथांच्या सुनिदर्शनातून प्रकटली आहे. हस्तलिखित ग्रंथांच्या सुनिदर्शनात लघुचित्रशैलीची विविध रुपे दिसतात. पंधराव्या शतकातील कल्पसूत्र हे जैन हस्तलिखित कलात्मक सुनिदर्शनाचा उत्तम नमुना मानले जाते. गुजरात, राजस्थान या भागांत तयार झालेली सचित्र जैन हस्तलिखिते (अकरावे – पंधरावे शतक ) उत्कृष्ट सुनिदर्शनांसाठी विशेषत्वाने प्रसिद्घ असून, ती भारतीय कलेचे वैभव मानली जातात. मोगलकालीन (१६५३–१७०७) ⇨निकोलाव मनुची (१६३९–१७१७) या इटालियन प्रवाशाने लिहिलेल्या स्तोरिआ दो मोगोर या आठवणीवजा प्रवासवृत्तांतपर ग्रंथात तत्कालीन राज्यकर्त्यांसंबंधी–विशेषतः औरंगजेब, छ. शिवाजी महाराज, राजा जयसिंग, बहादूरखान, राजा जसवंतसिंग, शाइस्तेखान, शाह आलम, दिलेरखान इ. प्रसिद्घ व्यक्तींसंबंधी-अस्सल प्रसंगचित्रे आढळतात. ही व्यक्तिचित्रे तत्कालीन प्रसिद्घ चित्रकारांनी काढलेली असल्यामुळे त्यांचे ऐतिहासिक वास्तवदर्शी मूल्य वादातीत आहे. हा एक सुनिदर्शनाचा उत्तम नमुना होय.
पंधराव्या शतकात मुद्रणाचा शोध लागल्यानंतर सुनिदर्शने ग्रंथात छापील स्वरूपात अवतरली. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात छापील सुनिदर्शने असलेली पुस्तके प्रथमतः दिसू लागली. या पुस्तकांना ‘ब्लॉक बुक्स’ असे संबोधिले जाई कारण त्याच्या छपाईमध्ये काष्ठठशांचा वापर केला जाई. सुरुवातीच्या छापील सुनिदर्शनांमध्ये कारागीर हातांनी रंग भरत असत. जर्मन मुद्रक आल्ब्रेक्त फिस्टीर ( मृ. १४६६ पूर्वी ) अशा सुनिदर्शित पुस्तकांचा आद्य जनक मानला जातो. प्रख्यात जर्मन चित्रकार ⇨आल्ब्रेक्त ड्यूरर (१४७१–१५२८) याने सुनिदर्शित केलेले द शिप ऑफ फूल्स हे आद्य ‘ब्लॉक बुक्स’ प्रकारातले प्रसिद्घ उदाहरण होय. हान्स होलबाइन, द यंगर याने सुनिदर्शित केलेले डान्स ऑफ डेथ हे पुस्तकही उल्लेखनीय आहे. या पुस्तकांतील सुनिदर्शने कागदाच्या एकाच बाजूला छापलेली असत. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनी व व्हेनिस येथे मुद्रक काष्ठठशांचा वैपुल्याने व प्राचुर्याने वापर करीत. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात ताम्रपत्रावरील उत्कीर्णनप्रक्रियेने काष्ठठशांची जागा घेतली व सुनिदर्शनाच्या छपाईसाठी हे तंत्र वापरले जाऊ लागले. पुढे मुद्रणतंत्रात व मुद्राक्षरविद्येत उत्तरोत्तर जी प्रगती होत गेली, त्याचे प्रतिबिंब सुनिदर्शनांतही दिसू लागले. आज संहितेच्या गरजां-नुसार सुनिदर्शनांतही बहुविधता व आकर्षक रंगसंगती दिसून येते. ⇨बालवाङ्मया त चित्रसजावटीला विशेष महत्त्व असते. नव्यानेच अक्षरओळख झालेल्या मुलाला शब्दापेक्षा चित्रासारख्या दृश्य माध्यमातून आशयाचे आकलन प्रभावीपणे, आकर्षक रीत्या व चित्र पाहताक्षणी तत्काळ होऊ शकते. मुलांच्या मनावर कथात्मक आशय परिणामकारक रीत्या ठसविण्यासाठी शब्दांपेक्षा चित्रेच अधिक उपयुक्त ठरतात, म्हणून बालवाङ्मय सचित्र असावे लागते. चित्रे बोलकी असतात व ती शब्दांवाचूनही आशय कथन करु शकतात. विंदा करंदीकरांच्या एटू लोकांचा देश (१९६३) या बालगीतसंग्रहाची चित्रकार वसंत सरवटे यांनी केलेली चित्रसजावट मुलांप्रमाणेच प्रौढांनाही आकर्षित करणारी आहे. सुनिदर्शनाचे मराठी बालवाङ्मयातील हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. बालवाङ्मयाचे मुलांच्या वेगवेगळ्या वयोगटांनुसार भिन्नभिन्न प्रकार पडतात (शिशुवाङ्मय, बालवाङ्मय, कुमार व किशोर गटांतील मुलांचे वाङ्मय इ.) व त्यांनुसार चित्रसजावटीचे स्वरूप, मजकुराशी चित्रांचे असलेले प्रमाण इ. बदलत जाते. अगदी प्रारंभिक बालवाङ्मय म्हणजे संपूर्ण चित्रकथाच असतात. पुढे मुलांच्या वाढत्या वयात चित्रांचे प्रमाण कमी व मजकुराचे प्रमाण जास्त होत जाते. कधीकधी चित्रसजावट व लिखित शाब्दिक मजकूर यांचे प्रमाण समसमान असते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कुमार विश्वकोश प्रकल्पात संहिता व चित्रसजावट यांना साधारण निम्मी-निम्मी पृष्ठे देण्याचे तसेच मुलांना नोंदी आकलनसुलभ व आकर्षक वाटाव्यात, या दृष्टीने चित्रे शक्यतो रंगीत व विपुल प्रमाणात देण्याचे धोरण अनुसरले आहे.
पहा : विश्वकोश (सुनिदर्शने) शोभित हस्तलिखिते सुलेखनकला हस्तलिखिते.
इनामदार, श्री. दे.