सुगम शास्त्रीय संगीत : एक संगीतप्रकार. हा प्रकार नावाप्रमाणे सुगम संगीत व शास्त्रीय रागदारी संगीत यांच्यातील विशिष्ट सौंदर्यगुण घेऊन निर्माण झालेला सुगम संगीत व शास्त्रीय संगीत या दोन संगीतप्रकारांच्या दरम्यानची अवस्था असलेला, संगीताचा प्रकार आहे. शास्त्रीय संगीतामध्ये स्वर आणि लय यांच्या साहाय्याने रागरूपाचा आविष्कार हे महत्त्वाचे तत्त्व आहे, तर सुगम संगीतामध्ये स्वर आणि लय यांच्या मदतीने काव्यरचनेतील अर्थ व भाव व्यक्त करणे हा महत्त्वाचा भाग आहे. या दरम्यानची अवस्था म्हणजे शास्त्रीय संगीताच्या मानाने सुगम, पण सुगम संगीताच्या मानाने अधिक सांगीतिक गुण असलेला असा हा सुगम शास्त्रीय संगीताचा प्रकार आहे. ‘ उपशास्त्रीय संगीत‘ असेही दुसरे नाव या प्रकाराला आहे. ⇨ ध्रुपद-धमार, ⇨ख्याल वगैरे शास्त्रीय रागदारी संगीतातल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रचनांच्या नंतर ⇨टप्पा, ⇨ठुमरी, दादरा, कजरी (कजली), चैती, कहरवा, होली, मांड, ⇨भजन, ⇨गझल, ⇨नाट्यसंगीत वगैरे निरनिराळ्या प्रकारांच्या रचनांचा सुगम शास्त्रीय संगीताच्या विभागात समावेश होतो. यांतील काही मांडप्रकार, भजने, गझल किंवा नाट्यसंगीत हे प्रकार, त्या रचना ज्या तऱ्हेने गायिल्या जातात, त्यांच्या गायकी अंगावरून सुगम शास्त्रीय संगीतात किंवा सुगम संगीतात समाविष्ट केले जातात. यानंतर सुगम संगीताचा प्रांत सुरू होतो, ज्यामध्ये ⇨गीत, ⇨भावगीत, भजन, ⇨चित्रपटसंगीत वगैरे साहित्यप्रधान, काव्यार्थाला प्राधान्य देणाऱ्या रचनांचा समावेश होतो.
सुगम शास्त्रीय संगीतातील टप्पा ही रचना वगळून, बाकीच्या संगीतरचनांची गायनशैली ठुमरी अंगाची असते. मराठी नाट्यसंगीत हा सुगम शास्त्रीय संगीतातील प्रकार, बंदिशीच्या ठुमरी गायकीच्या अंगाने गायिला जात असून त्यात मध्य लयीच्या ख्याल गायनाची शैलीसुद्घा बऱ्याच प्रमाणात शिरली आहे. टप्पा हा सुगम शास्त्रीय संगीतामधील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. टप्पा ही रचना गेल्या सवाशे, दीडशे वर्षांपूर्वी निर्माण झाली असे मानले जाते व लखनौचे एक कलावंत ⇨मियाँ शौरी (मूळ नाव गुलाम नबी) हे टप्पा या प्रकाराचे मूळ प्रवर्तक आहेत, असे म्हणतात. टप्पे हे बहुधा पंजाबी भाषेत असून पंजाबातील ⇨लोकगीतां पासून प्रेरणा घेऊन त्यांच्या स्वरूपावर आधारित असे असतात. विशिष्ट तालांत आणि विशिष्ट रागांत टप्पे आढळतात. मुरकीच्या ताना, झमझमा हे अलंकार, टप्प्याटप्प्याने तानांच्या लडींचा वापर हे टप्पा या संगीत-प्रकाराचे वैशिष्ट्य आहे. टप्पा गाणारे कलावंत कमी प्रमाणात आढळतात. कारण यात गळा हलका असावा लागतो व त्यावर चांगले प्रभुत्व असण्याची जरूरीही असते.
सुगम शास्त्रीय संगीतात ठुमरी हा प्रकार अत्यंत लोकप्रिय असून ठुमरी गायकीच्या अंगानेच दादरा, कजरी, चैती, होली वगैरे संगीतप्रकार गायिले जातात. ठुमरी व दादरा वगैरे इतर प्रकारांत तालाचा फरक असतो. त्याप्रमाणे रचनांमध्ये वर्णित विषयांचाही फरक असतो. गायकीच्या दृष्टीने ठुमरी ही अधिक संथ, भारदस्त आणि वजनदार असून त्यामानाने दादरा, कजरी, चैती, होली वगैरे प्रकार अधिक चंचल प्रकृतीचे आहेत. दादरा आणि कहरवा हे दोन्ही प्रकार चंचल असले तरी, कहरवा त्यातल्यात्यात गायकीच्या दृष्टीने आणि विषयाच्या दृष्टीने अधिक उथळ व क्षुद्र प्रकृतीचा आहे. कजरी, चैती, होली हे प्रकार म्हणजे ठुमरी अंगाने गायिली जाणारी ऋतुगीतेच असून कजरी वर्षा ऋतूशी, चैती चैत्राशी व होली होळीच्या उत्सवाशी संबंधित आहेत. होरी या नावाने दुसरा एक प्रकार शास्त्रीय संगीतात रूढ आहे. त्याला होरीधमार किंवा पक्की होरी असेही म्हणतात. सुगम शास्त्रीय संगीतातील होळी किंवा होरी ही सुगम प्रकृतीची असून तिला कच्ची होरी असेही म्हणतात. सुगम शास्त्रीय संगीतप्रकारांतील टप्पा व नाट्यसंगीत वगळून बाकीच्या गीतप्रकारांच्या गायनशैलीला ठुमरी गायकी असे म्हटले जाते. मराठी नाट्यसंगीताने मात्र स्वतःची अशी वेगळी गायनशैली निर्माण केली आहे. भजन, गझल व मांड हे गीतप्रकार, सुगम शास्त्रीय व सुगम संगीत यांच्या काठावर असलेले प्रकार आहेत. त्यांच्या गायनशैलीच्या स्वरूपाप्रमाणे त्यांचा समावेश या दोन संगीतविभागात केला जातो. सुगम शास्त्रीय संगीतात, काव्यार्थ आणि सांगीतिक गुण या दोहोंना समप्रमाणांत महत्त्व असते आणि म्हणून शास्त्रीय संगीतातील सांगीतिक गुण व सुगम संगीतातील काव्यसौंदर्य या दोन तत्त्वांचा मिलाफ साधणारा असा हा सुगम शास्त्रीय संगीतप्रकार आहे.
पहा : संगीत संगीत, हिंदुस्थानी.
आठवले, वि. रा.