सुंदरदास : (१५९६–१६८९). मध्ययुगीन हिंदी संतकवी. दौसा ( राजस्थान ) येथे खंडेलवाल वैश्य परिवारात जन्म. त्यांच्या वडिलांचे नाव परमानंद व आईचे नाव सती. ते संत ⇨दादूदयाल यांचे शिष्य होते. ते रुपाने सुंदर असल्याने दादूदयाल यांनीच त्यांचे ‘सुंदरदास’ असे नामकरण केले. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी संत दादूदयालांनी त्यांना आपल्या पंथाची मंत्रदीक्षा दिली व शिष्यत्व बहाल केले. वयाच्या अकराव्या वर्षी ते विद्याध्ययनासाठी वाराणसीला गेले व तेथे त्यांनी अठरा वर्षे राहून वेदान्त, शास्त्रपुराणे, तत्त्वज्ञान, संस्कृत भाषा-साहित्य, व्याकरण यांचे सखोल अध्ययन केले. त्यानंतर फतेहपूर (शेखावती) येथे राहून त्यांनी बारा वर्षे योगाभ्यास केला. या काळात तत्त्वज्ञानाचा गाढा व्यासंग असलेले विद्वान म्हणून त्यांना मानमान्यता लाभली. अद्वैत तत्त्वज्ञानाकडे त्यांचा विशेष ओढा होता. त्यांचा इराणी भाषेचाही अभ्यास होता. फतेहपूरचा नवाब अलिफ खान सुंदरदासांच्या विद्वत्तेने व आध्यात्मिक अधिकाराने प्रभावित झाला. त्याचा सुंदरदासांवर विशेष लोभ जडला. त्यानंतर सुंदरदासांनी पंजाब, उत्तर प्रदेश, सौराष्ट्र, राजस्थान इ. प्रदेशांत धर्म-तत्त्वज्ञानाच्या प्रचारार्थ भ्रमंती केली. अनेक ठिकाणी तीर्थयात्रा केल्या. तीर्थाटणानंतर ते फतेहपूरला स्थायिक झाले व तेथे त्यांनी अनेक मौलिक अध्यात्मपर ग्रंथांची रचना केली. त्यांनी एकूण ४२ ग्रंथ लिहिले, असे मानले जाते. ज्ञानसमुद्र, सुंदरविलास, सर्वांगयोग प्रदीपिका, पंचेंद्रियचरित्र, सुखसमाधी, अद्भुत उपदेश, स्वप्नप्रबोध, वेद विचार, उक्त-अनूप, पंच प्रभाव, ज्ञान झूलना, सहजानंद हे त्यांतील काही प्रमुख ग्रंथ होत. त्यांतही ज्ञानसमुद्र व सुंदरविलास हे अत्यंत लोकप्रिय झाले. पुरोहित हरिनारायण शर्मा यांनी सुंदरदासांचे समग्र साहित्य संकलित-संपादित करून ते सुंदर ग्रंथावली (१९३६) या नावाने दोन भागांमध्ये प्रसिद्घ केले.
निर्गुणोपासक संतकवींमध्ये शास्त्रांचा सखोल व परिपूर्ण व्यासंग केलेले सुंदरदास हे एकमेव संतकवी होत. ⇨दादू पंथातील संतकवींमध्ये सुंदरदास यांचे भक्तिकाव्य उत्कृष्ट काव्यगुणांनी व रचनाकौशल्याने मंडित असल्याने सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यांचे काव्य त्यातील भक्तिभाव, नैतिक शहाणपण व अध्यात्मज्ञान या गुणांमुळे श्रेष्ठ दर्जाचे ठरले आहे. त्यांची भाषा दृष्टांतसमृद्घ, व्याकरणनिष्ठ, सोपी व रसाळ आहे. नित्यपरिचयातील दृष्टांत देऊन ते आपले तात्त्विक निरुपण सोपे करतात. ते योगमार्गाचे समर्थक होते व त्यांची अद्वैत वेदान्तावर पूर्ण श्रद्घा होती. ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. ते अध्यात्ममार्गी कवी असले तरी सर्वसामान्यांच्या जीवनात, संसारिक विवंचनांमध्ये त्यांना रस व जिव्हाळा होता. त्यांच्या कल्याणासाठी, सुखसमाधानासाठी ते अविरत झटले. त्यामुळे बहुजनांचे कवी म्हणून त्यांना मान्यता मिळाली. वेगवेगळ्या, दूरदूरच्या प्रदेशांतील लोकजीवनावर त्यांनी सूक्ष्म निरीक्षणातून केलेली भाष्ये पाहता, ह्या दूरवरच्या लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क आला होता, ह्याची साक्ष पटते. काव्यातून उच्च कोटीचे गांभीर्य व भावनांची सखोलता प्रतीत झाली पाहिजे, ही त्यांची काव्यविषयक भूमिका त्यांच्या प्रगल्भतेची द्योतक आहे. त्यांच्या ग्रंथनिर्मितीत दादू पंथाविषयी अनेक पुस्तके आहेत. मात्र त्यांना ज्या सुंदरविलास काव्यग्रंथामुळे खरी लोकप्रियता लाभली, ते सवैय्या छंदात रचले असून अलंकार, रीती व ध्वनी यांचे उत्कृष्ट नमुने त्यात आढळतात. काव्यात्मघाटाचे व रचनासौष्ठवाचे इतके अप्रतिम उदाहरण अन्य संतकवींमध्ये अभावानेच आढळते.
सांगानेर येथे त्यांचा मृत्यू झाला.
सारडा, निर्मला