सुएझ प्रश्न : मध्यपूर्वेतील सुएझ कालवा या आंतरराष्ट्रीय जलमार्गाच्या संदर्भात १९५६ मध्ये उद्‌भवलेला गहन प्रश्न. सुएझ कालवा हा फ्रान्सने बांधला व त्याचे काम १८६९ मध्ये पूर्ण झाले. तत्पूर्वी सुएझ कालव्याचा प्रवर्तक फर्दिनान्द द लेसेप्स याने ईजिप्तच्या राज्यपालाकडून दोन अटी मान्य करून घेतल्या. एक, या कालव्याची मालकी सुएझ कॅनल कंपनीकडे राहील व तो सर्व देशांसाठी खुला असेल आणि दोन, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ९९ वर्षे हा करार विधिग्राह्य राहील. यामुळे यूरोपीय देश आणि पूर्वेकडील देश यांमधील सर्वांत जवळचा हा जलमार्ग ठरला. पुढे कॉन्स्टँटिनोपल अभिसंधीने (कराराने) सर्व देशांच्या बोटींना शांततेच्या व युद्घकाळात त्याचा वापर करण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार १८८८ मध्ये प्राप्त झाले. या अभिसंधीवर ऑस्ट्रिया, हंगेरी, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, इटली, नेदर्लंड्स, रशिया, स्पेन आणि तुर्कस्तान या देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी त्यास तात्त्विक अनुमती दिली. पुढे विसाव्या शतकात संयुक्त राष्ट्र संघटनेने सुरक्षा समितीत १९५१ मध्ये त्यास मान्यता दिली तथापि ईजिप्तने नवनिर्मित इझ्राएलला सुएझ कालव्यातून बोटी नेण्यास प्रतिबंध केला. ईजिप्त लष्करी दृष्ट्या बलवान व्हावा म्हणून गमाल अब्दुल नासर या राष्ट्राध्यक्षाने चेकोस्लोव्हाकियाशी गुप्त लष्करी करार केला. तसेच सोव्हिएट संघाबरोबर हितसंबंध वाढविले. इंग्लंड-अमेरिकेला ही साम्यवादी देशांबरोबरची मैत्री त्रासदायक वाटू लागली. म्हणून त्यांनी आस्वान धरणासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देऊनही ती मदत २० जुलै १९५६ रोजी रद्द केली तेव्हा नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण (२६ जुलै १९५६) केले आणि कालव्याच्या परिक्षेत्रात लष्करी कायदा जारी केला व सुएझ कॅनल कंपनीचे नियंत्रण रद्दबातल करून कालव्यातून ये-जा करणाऱ्या बोटींकडून जमा होणारा जकात कर आस्वान धरणाच्या बांधकामासाठी भविष्यात सु. पाच वर्षे वापरण्याचा अध्यादेश काढला. इंग्लंड-फ्रान्स या देशांनी समझोत्याचे केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स यांनी इझ्राएलच्या मदतीने लष्करी कृतीची योजना आखली. २९ ऑक्टोबर १९५६ रोजी इझ्राएलने कालव्याच्या परिसरात हल्ले केले. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाने ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांनी शस्त्रसंधी करावा म्हणून आवाहन केले. ईजिप्तमधील लोकक्षोभ, संयुक्त राष्ट्रसंघाचा दबाव आणि सोव्हिएट संघाची युद्घात पडण्याची धमकी यांमुळे अँग्लो-फ्रेंच लष्करी मोहीम थंडावली. परिणामतः ब्रिटिश व फ्रेंच पलटणी माघारी फिरल्या आणि इझ्राएलचे सैन्य मार्च १९५७ मध्ये स्वदेशी परतले. नासरची लोकप्रियता वाढली. अन्य देशांना कालव्यातून जाण्याची परवानगी मिळाली पण इझ्राएलला बंदी होती. या घटनेमुळे सुएझ कालव्यावरील इंग्लंड-फ्रान्सचे वर्चस्व संपुष्टात आले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अरब-इझ्राएल संघर्ष उद्‌भवला. त्यावेळी ईजिप्तने पुन्हा जून १९६७ मध्ये पाश्चात्त्य देशांवर दबाव आणण्यासाठी कालवा सार्वजनिक वाहतुकीस बंद केला. अखेर इझ्राएल-ईजिप्तमध्ये २५ एप्रिल १९७९ रोजी शांतता तह होऊन तो वाहतुकीस खुला करण्यात आला आणि प्रथम इझ्राएलच्या बोटी सुएझ कालव्यातून पार झाल्या.

गायकवाड, कृ. म.