सीग्बान, कार्ल मान्ने येऑऱ्य : (३ डिसेंबर १८८६— २६ सप्टेंबर १९७८). स्वीडिश भौतिकीविज्ञ. ⇨ क्ष-किरण वर्णपटविज्ञानासंबंधी केलेल्या महत्त्वाच्या संशोधनाकरिता व नवीन लावलेल्या शोधांबद्दल त्यांना १९२४ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचा जन्म अरब्रू येथे झाला. त्यांनी लुंड विद्यापीठाची एम्.एस्. आणि डी.एस्‌सी. (१९११) या पदव्या संपादन केल्या. याच विद्यापीठात ते भौतिकीचे अधिव्याख्याते (१९११— २०) आणि प्राध्यापक (१९२०— २३) होते. अप्साला विद्यापीठात प्राध्यापक (१९२४—३७) म्हणून काम केल्यानंतर ते स्टॉकहोम येथील नोबेल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स या संस्थेचे संचालक होते (१९३७— ७५). त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेत अणुकेंद्रीय भौतिकीसंबंधी महत्त्वाचे संशोधनकार्य झाले.

सीग्बान यांनी क्ष-किरण वर्णपटलेखकाचे नवीन प्रकार विकसित केले आणि क्ष-किरण नलिकांमध्ये सुधारणा केल्या. या बिनचूक उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक काटेकोर मापने केली. १९१६ मध्ये त्यांनी क्ष-किरण उत्सर्जन वर्णपटामधील तरंगलांबींच्या एका नवीन गटाचा (दीर्घ तरंगीय M−रेषांचा) शोध लावला. त्यांनी ⇨ ऑगे नील्स बोर यांच्या अणुसिद्घांताशी समन्वय साधणारा क्ष-किरणांसंबंधीचा एक सिद्घांत मांडला. १९२४ मध्ये त्यांनी व सहकाऱ्यांनी असे सिद्घ केले की, प्रकाशकिरणांप्रमाणे क्ष-किरणही लोलकामधून गेल्यास त्यांचे वक्रीभवन होते. तथापि हा परिणाम क्ष-किरणांचे शोषण झाल्यामुळे अस्पष्ट दिसतो. सीग्बान यांनी वर्णपटाच्या जंबुपार भागाजवळ आढळणाऱ्या दुर्बल क्ष-किरणांचेही अन्वेषण केले.

सीग्बान यांना लंडनच्या रॉयल सोसायटीची ह्यूज (१९३४) व रम्फर्ड (१९४०) ही पदके व फिजिकल सोसायटीचे डड्‌डेल (१९४८) हे पदक मिळाले. क्ष-किरणाच्या तरंगलांबीचे वर्णन करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्रमाणित लांबीला (१०-११ सेंमी.) सीग्बान एकक म्हणतात. सीग्बान यांचे पुत्र काई यांना इलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानाचा विकास केल्याबद्दल १९८१ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले [→ सीग्बान, काई मान्ने].

कार्ल सीग्बान यांचे स्टॉकहोम येथे निधन झाले.

भदे, व. ग.