सिल्युसिडी वंश : नैर्ऋत्य आशियात इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस उदयाला आलेला एक राजवंश. पहिला सेल्युकस हा या घराण्याचा पहिला संस्थापक राजा असून त्याच्या नावावरुन या घराण्यास सिल्युसिडी हे नाव पडले. या राजवंशाने इ. स. पू. ३१२— ६४ दरम्यान राज्य केले. एके काळी या घराण्याच्या आधिपत्याखाली यूरोप खंडातील थ्रेसपासून उत्तर हिंदुस्थानातील सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश होता. ⇨ अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३५६— ३२३) याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंकित साम्राज्याचे अँटिगोनस, सेल्युकस, टॉलेमी, लायसिमाकस आदी त्याच्या सेनानी व प्रांताधिप (क्षत्रप) यांत विभाजन झाले. या विभाजनात सेल्युकसच्या वाटणीला बॅबिलोनिया हा प्रदेश आला परंतु त्यानंतर लगेचच सत्ता संघर्षास सुरुवात झाली आणि प्रत्येक क्षत्रप अलेक्झांडरच्या साम्राज्याचा आपला हक्क सांगू लागला. त्यातून यादवी युद्घाला तोंड फुटले. यांत सेल्युकसच वरचढ ठरला आणि त्याने स्वबळावर साम्राज्याची निर्मिती केली. त्याच्यानंतर या घराण्यात अनेक राजे झाले पण त्यांपैकी काही राजे वगळता उर्वरित फारसे कर्तृत्ववान व पराक्रमी नव्हते. त्यामुळे राज्याचा हळुहळू संकोच होऊन अखेरीस त्यास एका कमकुवत संस्थानाचा दर्जा प्राप्त झाला व तेही रोमनांच्या आक्रमणापुढे टिकले नाही. इ. स. पू. ६४ मध्ये सिल्युसिडी वंश संपुष्टात आला.
पहिला सेल्युकस निकेटर : (कार. इ. स. पू. ३१२— २८१) हा मॅसिडोनियाचा राजा दुसऱ्या फिलिपच्या अँटायओकस या सेनापतीचा मुलगा असून अलेक्झांडरच्या इराणवरील स्वारीत त्याचा एक अधिकारी व सेनानी म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर त्याने अलेक्झांडरच्या हिंदुस्थानातील स्वारीत पोरसविरुद्घच्या युद्घात मॅसिडोनियन सैन्याचे नेतृत्व केले. या युद्घात पोरसचा पराभव होऊन पुढे तो अलेक्झांडरचा मांडलिक झाला (इ. स. पू. ३२६). अलेक्झांडरने इराणमधील स्यूसा येथे इराणी व ग्रीक लोकांचे संघटन करण्यासाठी परस्परांत आंतरविवाहाचा मोठा समारंभ केला. त्याप्रसंगी स्पिटॅमीनीझ या बॅक्ट्रियाच्या राजाच्या अपमा या कन्येशी सेल्युकस विवाहबद्घ झाला. अन्य लोकांनी अलेक्झांडरच्या आपल्या मृत्यूनंतर पत्न्यांचा त्याग केला मात्र सेल्युकस हा एकमेव सेनानी असा होता की, त्याने अपमाबरोबर संसार केला. विभाजित साम्राज्यापैकी बॅबिलोनियाचे क्षत्रपपद त्याच्याकडे आले (इ. स. पू. ३२१) पण अँटिगोनसने त्याच्याकडे क्षत्रपपदाची खंडणी मागितली. ती त्याने नाकारली व कैद टाळण्यासाठी तो ईजिप्तच्या टॉलेमीकडे गेला. तिथे त्याने इ. स. पू.३१६—३१२ दरम्यान सेवा केली. दक्षिण सिरियातील गाझाच्या युद्घात त्याने टॉलेमीच्या सैन्याचे नेतृत्व करुन लायसिमाकस व कॅसेंडर यांच्या मदतीने डीमीट्रिअस या अँटिगोनसच्या मुलाचा पराभव केला आणि बॅबिलोनियावर पुनःश्च वर्चस्व प्रस्थापिले (इ. स. पू. ३१२) आणि सिल्युसिडी साम्राज्याचा पाया घातला. यावेळेपासून सिल्युसिड कालगणना (७ ऑक्टोबर इ. स. पू. ३१२) सुरु झाली. त्यावेळी अँटिगोनसने निकेनॉर या सेनापतीस व डीमीट्रिअस या मुलास बॅबिलोनियावर आक्रमण करण्याची आज्ञा केली पण ती सफल झाली नाही. त्यानंतर सेल्युकसने राज्याचे संघटन करुन राज्यविस्ताराचे धोरण अंगीकारले. त्याने राजा हा किताब धारण केला आणि इराणमधून पूर्वेकडे हिंदुस्थानापर्यंत धडक मारली (इ. स. पू. ३०५) परंतु ⇨ चंद्रगुप्त मौर्या ने त्यास प्रतिकार केला व संधी (तह) होऊन ५०० हत्तींच्या बदल्यात त्याने माघार घेतली (इ. स. पू. ३०३). पुढे तो लायसिमाकस, टॉलेमी व कॅसेंडर यांना त्यांच्या अँटिगोनस व डीमीट्रिअस यांविरुद्घच्या संयुक्त फौजेस मिळाला. या संयुक्त सैन्याने इ. स. पू. ३०१ च्या इप्ससच्या युद्घात अँटिगोनसचा दारुण पराभव केला त्यानंतर अँटिगोनसचे निधन झाले. विजेत्यांनी त्याचे राज्य वाटून घेतले. त्यात सिरिया, आशिया मायनर सेल्युकसला मिळाला मात्र टॉलेमी यात सहभागी झाला नाही, तेव्हा सेल्युकसने टॉलेमीविरुद्घ मोहीम उघडली. त्याने आपली राजधानी सील्यूशियाहून नवीन वसविलेल्या अँटिऑक नगरीत नेली. या सुमारास इराण व सिरिया यांवर त्याची अधिसत्ता होती परंतु टॉलेमीने लायसिमाकसशी आपल्या कन्येचा विवाह करुन सेल्युकसवर दडपण आणले. त्यावेळी सेल्युकसने स्ट्रॅटोनीस या डीमीट्रिअसच्या कन्येबरोबर लग्न करुन मैत्री साधली मात्र सिलिशिया व टायर आणि सिडॉन या नगरांची सेल्युकसने मागणी करताच त्यांच्यातील मैत्री संपुष्टात आली (इ. स. पू. २९८). यानंतर त्याला अपमापासून झालेला अँटायओकस हा स्ट्रॅटोनीस या सावत्र आईच्या प्रेमात पडला आणि त्याची प्रकृती बिघडू लागली, तेव्हा सेल्युकसने त्यास स्ट्रॅटोनीस ही आपली पत्नी तर दिलीच पण त्याला उत्तरेकडील क्षत्रपांचा सरसेनापती केले व त्याची सहराज्यव्यवस्थापक (को-रिजंट) म्हणून नियुक्ती केली (इ. स. पू. २९४). त्यानंतर त्याने डीमीट्रिअसला पकडून तुरुंगात टाकले. तसेच लायसिमाकसचा कॉरपिडिमच्या युद्घात (इ. स. पू. २८३) पराभव करुन त्याचे राज्य बळकाविले आणि मॅसिडोनियात जाण्यासाठी त्याने यूरोपात प्रवेश केला परंतु याच मोहिमेत त्याचा टॉलेमी सेरौनस याने खून करविला.
सेल्युकस कार्यक्षम प्रशासक व कर्तृत्ववान राजा होता. त्याने सिरिया व आशिया मायनरमध्ये सील्यूशिया नावाची नगरी वसविली. त्यांपैकी पूर्वेकडील टायग्रिस नदीकाठच्या सील्यूशियात पूर्वेकडील क्षत्रपांसाठी राजधानी केली. या नगरांतून ग्रीक व मॅसिडोनियन वसाहती स्थापन केल्या आणि त्यांना नागरी स्वातंत्र्य दिले. या नगरांतून ग्रीक भाषेच्या अभिसरणास उत्तेजन दिले. तसेच शास्त्रीय संशोधनास प्रोत्साहन देऊन विद्वानांना राजाश्रय दिला. त्यांपैकी पेट्रोक्लिस या समन्वेषकाने कॅस्पियन समुद्राचा आणि मीगॅस्थिनीज याने गंगा नदीचा शोध लावला.
सेल्युकसनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला अँटायओकस सोटर (कार. २८१— २६१), दुसरा अँटायओकस (कार. २६१— २४३), दुसरा सेल्युकस (कार. २४६— २२५) व तिसरा सेल्युकस हे सत्तारुढ झाले. त्यांना ईजिप्तचा राजा टॉलेमी यांच्याबरोबर पॅलेस्टाइनच्या वर्चस्वासाठी युद्घे करावी लागली. तसेच इराण गमवावा लागला. या युद्घांत यश आले नाही तथापि उर्वरित प्रदेश त्यांनी सांभाळला. त्यांच्यानंतर सम्राट झालेल्या तिसऱ्या अँटायओकस द ग्रेट (कार. २२३— १८७) याने इराणचा प्रदेश पुन्हा जिंकून घेऊन हिंदुस्थानपर्यंत धडक मारली व राज्य ईजिप्तच्या सीमेपर्यंत भिडविले परंतु रोमच्या वाढत्या सामर्थ्यामुळे ग्रीस पादाक्रांत करण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. शिवाय टॉरस पर्वतश्रेणीच्या पलीकडचा प्रदेश सोडावा लागला आणि मोठी युद्घखंडणी रोमला द्यावी लागली. त्याने आपल्या युद्घतंत्रात हत्तींचा चपखल उपयोग केला. पुढे हत्ती हे सिल्युसिडींचे बोधचिन्ह बनले आणि त्यांच्या नाण्यांवरही त्यास स्थान मिळाले. ऑरांटीझ नदीकाठी ॲपमीआ येथे हत्तींचे युद्घप्रवण प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. तिथे त्यांचे संगोपन-संवर्धन केले जाई. हत्ती प्रामुख्याने हिंदुस्थानातून आयात करीत. अँटायओकसने प्रशासनव्यवस्थेत अलेक्झांडरने आत्मसात केलेल्या प्राचीन इराणी प्रशासकीय व्यवस्थेचे आधुनिकीकरण करुन द्विराज्यपद्धती नष्ट केली आणि प्रांतिक क्षत्रपांना नागरी व लष्करी अधिकार प्रदान केले. त्याचे व्यवस्थापनाचे पूर्वेकडील केंद्र टायग्रिस नदीकाठी असलेल्या सील्यूशियात, तर पश्चिमेकडील सार्डीझ येथे होते. त्याने मध्यपूर्वेत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापिले. त्याने भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यापासून निघून हिंदुस्थान व मध्य आशियापर्यंत जाणारे मार्ग आपल्या नियंत्रणाखाली ठेवले होते. त्यामुळे आशिया आणि यूरोप यांमधील भूमार्गाने होणारा व्यापार त्याच्या नियंत्रणाखाली आला. साहजिकच पश्चिम आशियातील सिल्युसिडी सम्राटांना व्यापार हे मोठेच वरदान ठरले.
अँटायओकस द ग्रेट नंतरच्या सु. सव्वीस राजांपैकी चौथा अँटायओकस एपि फेनस (कार. इ. स. पू. १७५— १६३) याने इ. स. पू. १६९ मध्ये ईजिप्तवर आक्रमण करुन त्याचा दक्षिण भाग घेतला आणि पॅलेस्टाइनमधील ज्यूंवर ग्रीकांश संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर रीतिरिवाजांबरोबरच ग्रीक भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी ग्रीक भाषक मॅसिडोनियन धुरीणत्वास उत्तेजन दिले व अभिजनवर्गाचे वर्चस्व निर्माण केले. जेरुसलेम येथील मंदिरात झ्यूस देवतेच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. परिणामतः मॅक्केबीज युद्घमालिका उद्भवली (इ. स. पू. १६७— १६०). त्यातून ज्यूडिओ, पार्थिया, आर्मेनिया व बॅक्ट्रिया यांनी सिल्युसिडी सत्ता झुगारुन देऊन स्वायत्तता मिळविली. कॅपडोशिया व परगमम या नगरांनी स्वातंत्र्य मिळविले. त्यानंतरचा पाचवा अँटायओकस हा दुबळा व भ्रष्ट होता, तर अलेक्झांडर बॅलस व्यसनी व विषयी होता आणि दुसरा डीमीट्रिअस निकेटर (कार. इ. स. पू. १४५— १३९) याचा पार्थियाविरुद्घच्या लढाईत दारुण पराभव झाला व त्याला ज्यूंबरोबर संघर्ष करावा लागला. इ. स. पू. ९५ मध्ये सिरियाची तीन स्वतंत्र राज्ये झाली, ती दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ यात विभागली गेली. त्याचा फायदा घेऊन आर्मेनियाचा राजा पहिला टायग्रेनीस याने सिरिया पादाक्रांत करुन एकरपर्यंतचा प्रदेश जिंकला (इ. स. पू. ६९). त्यानंतर पाचच वर्षांनी रोमन सेनानी पॉम्पी याने सिरियाची ही तिन्ही राज्ये जिंकून ती रोमन साम्राज्यात समाविष्ट केली, तेव्हा तेरावा अँटायओकस सत्ताधीश होता. त्यावेळी सिल्युसिडी घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
पहा : इराणी संस्कृति अँटायओकस, तिसरा.
संदर्भ : 1. Boardman, Jasper Griffin Murray, Oswyh, Ed. The Oxford History of the Classical World, Oxford, 1986.
2. Downey, Glanville, A History of Antiochus in Syria : From Seleucus tothe History of Macedonia, London, 1990.
3. Grant, Michael Kitzinger, Ed. Civilization of the Ancient Mediterranean Greece and Rome, 3 Vols., London, 1988
महाजन, स. दि.
“