सिलिगुडी : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपैगुरी जिल्ह्यातील एक प्रसिद्घ व भूराजनीतीच्या दृष्ट्या महत्त्वाचे शहर. लोकसंख्या ५,०९,७०९ (२०११). ते राज्याच्या उत्तर भागात महानंदा नदीच्या पश्चिमेला दार्जिलिंगच्या आग्नेयीस सु. ४८ किमी.वर वसले आहे. ते रस्ते व अरुंदमापी लोहमार्गाने दार्जिलिंग, कालिंपाँग व सिक्कीम यांना जोडले असून व्यापाराचे महत्त्वाचे मध्यवर्ती केंद्र आहे. येथून सिक्कीम, तिबेट व दार्जिलिंग यांच्याशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. शहरात लाकूड कापण्याचे कारखाने, फर्निचरनिर्मिती, तागाच्या गिरण्या हे महत्त्वाचे उद्योग आहेत. याशिवाय येथे चहाचे मळे असून चहाच्या पानावर प्रक्रिया करण्याचा उद्योग चालतो. येथे अव्वल इंग्रजी अंमलात नगरपालिकेची १९३१ मध्ये स्थापना झाली. नगरपालिका स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिःसारण वगैरे सुविधा पुरविते. शहरात प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अनेक महाविद्यालये आहेत. ती नॉर्थ बेंगॉल यूनिव्हर्सीटीशी संलग्न आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी (१९४७) आणि १९७१ मधील बांगला देश निर्मितीच्या वेळी सिलिगुडी हे निर्वासितांनी गजबजलेले केंद्र होते. त्यांच्या छावण्या शहरभर विखुरलेल्या होत्या. सिलिगुडीचे भौगोलिक स्थान आंतरराष्ट्रीय सीमांना लागून असल्यामुळे त्यास राजकीय व भूराजनीतीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोसे, आतिश सुरेश